Zuari River : अघनाशिनी झुआरी नदी

Zuari River : दिघी घाटाच्या व्यापारी मार्ग म्हणून प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात प्रभावीपणे उपयोग व्हायचा. परंतु गोवा कंदब राजवटीत शिवचित्त पेरमाडी देवाने व्यापार उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी राजाश्रय दिला आणि त्यामुळे दिघी घाटाचा लौकिक वृध्दिंगत आला होता.
Zuari River
Zuari RiverDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

गोव्याच्या भूमीला सुजलाम, सुफलाम करणाऱ्या दोन महत्त्वाच्या नद्या म्हणजे मांडवी आणि जुवारी या असून, मांडवी ही गोव्याची मोठी नदी तर जुवारी ही लांब नदी आहे. पश्‍चिमवाहिनी असणारी जुवारी नदी सह्याद्रीच्या पर्वतरांगात उगम पावल्यानंतर दगडधोंड्यातून मार्ग काढत शेवटी मुरगाव शहराच्या आसपास अरबी सागराशी एकात्म होते.

११९ किलोमीटर लांबीच्या या नदीच्या उगम पश्‍चिम घाटातल्या नेत्रावळी अभयारण्याच्या कक्षेत येणाऱ्या ऐतिहासिक अशा दिघी घाटात होत असून जुवारी नदीच्या खोऱ्याचा विस्तार राज्याच्या ९७३ चौरसकिलोमीटर क्षेत्रफळात झालेला आहे. सह्याद्री पर्वतरांगातून वहात येणाऱ्या या नदीच्या खोऱ्यात ३१.४ टक्के वनक्षेत्र आहे.

कर्नाटक राज्यातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या जोयडा तालुक्यातल्या काळी व्याघ्र राखीव क्षेत्राशी गोवा राज्यातले नेत्रावळी अभयारण्य संलग्न असून, दिघी गावातल्या जंगलातून कारवारची जीवनदायिनी म्हणून परिचित असलेल्या काळीगंगेचा उगम होत असतो, तर त्याच्यापासून काही अंतरावरती जुवारीचा उगम होतो.

गोवा कदंब राजवटीत दिघी घाटमार्गाचा उपयोग व्यापार, उद्योगात गुंतलेली मंडळी मोठ्या प्रमाणात करायची. एका बाजूला गोवा कदंबाची घाटावरची राजधानी हळशी तर तत्पूर्वी वनवासी कदंबाची राजधानी शिरसीजवळच्या वनवासी जाण्यासाठी दिघी घाटाचा प्रामुख्याने उपयोग केला जायचा.

आज मांडवी आणि जुवारी या दोन्ही नद्या, स्वतंत्र म्हणून ओळखल्या जात असल्या तरी पृथ्वीतलारवती जेव्हा शेवटच्‍या हिमयुगाचा कालखंड चालू होता, तेव्हा २० हजार वर्षांपूर्वी मांडवी आणि जुवारी या नद्या खडकाळ प्रदेशातून एकल नदीप्रणाली म्हणून वहात होत्या असे संशोधन राष्ट्रीय समुद्रविज्ञान, संस्था, दोनापावला येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. ए.के. चौबो यांनी केलेले आहे. हिमयुगाच्या शेवटच्या टप्प्यात १२५,००० ते २०,००० वर्षाच्या कालखंडात या नद्यांच्या पात्रात पाण्याची ५ ते २१ मीटरपर्यंत खोली होती.

त्यावेळी डोंगरमाथ्यावरती उपलब्ध असणारा प्रचंड पाण्याचा साठा कवेत घेऊन, मांडवी-जुवारी एकल नदीप्रणाली म्हणून वाहत होती. आज या दोन्ही नद्यांचे खोरे जरी स्वतंत्र असले तरी बाणस्तारी ते मडकईला जोडणाऱ्या कुंभारजुवेच्या कालव्याद्वारे या दोन्ही नद्यांतल्या पाण्याचा संगम होत असतो आणि त्यामुळे त्यांचे अस्तित्व एकमेकाला पूरक असून, मांडवी नदीतल्या गोड्या पाण्याच्या प्रवाहाचे भिसरण जुवारी नदीच्या पात्रात होत असतो आणि त्यावरती जुवारीच्या क्षारतेचे प्रमाण अवलंबून आहे.

२० हजार वर्षांपूर्वी मांडवी आणि जुवारी एकल नदी प्रणाली म्हणून वाहत होती त्यावेळी त्यांचे जलसंचय क्षेत्र आजच्यापेक्षा ज्यादा होते आणि त्यामुळे पाण्याचा साठा ही जास्त असायचा. खडकाळ प्रदेशातून वाहणारी एकल नदी प्रणाली कालांतराने गाळाच्या स्तरातून वाहू लागली.

दिघी घाटाच्या व्यापारी मार्ग म्हणून प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात प्रभावीपणे उपयोग व्हायचा. परंतु गोवा कंदब राजवटीत शिवचित्त पेरमाडी देवाने व्यापार उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी राजाश्रय दिला आणि त्यामुळे दिघी घाटाचा लौकिक वृध्दिंगत आला होता. त्या इतिहासाच्या असंख्य पाऊलखुणा उगे ते दिघीपर्यंत जंगलात ठिकठिकाणी पहायला मिळतात.

आज केवळ ३-४ घरांचा जुना गाव जुन्या काळी बराच नावारूपाला आला होता. जुना गावात असलेल्या जुनागडावरचे पाणी ओहळ, नाल्यांत एकत्रित येऊन शेवटी जुवारीनदीच्या पात्रात त्यांचा संगम व्हायचा. दिघी घाट प्राचीन काळात जसा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला होता, तसाच पोर्तुगीज राजवटीतही त्याचे महत्‍त्व वृध्दिंगत झाले होते. कर्नाटक राज्यात जेव्हा सत्ता ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली तेव्हा दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती वसलेल्या दिघी घाटाचे महत्त्व विशेष अधोरेखित झाले होते.

जुनागडाच्या डोंगरमाथ्यावरचे पावसात कोसळणारे पाणी जेव्हा तेथे नैसर्गिक वृच्छादन होते, तेव्हा भुगर्भात जलसंचय होऊन उगे नदीला बारामाही पाण्याची उपल्ब्धता व्हायची आणि त्यामुळे उगे नदी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा घेऊन प्रवाहित व्हायची. नेत्रावळी अभयारण्यातल्या जुना, म्हावळिंगे आदी गावातले पाण्याचे प्रवाह एकत्र होऊन उगेला सशक्त करत होते. धारगिणीच्या जंगलातला पंचमहानाला या नदीशी उगेला एकरूप होतो.

साळावली धरणात आज जलाशयाशी एकात्म झालेल्या कुर्डी गावातली गुळेली ही महत्त्वाची नदी होती. नेतुर्ली आणि कुंभारी हे दोन्ही नाले गुळेलीशी एकरूप होतात. सह्याद्रीतून वाहत येणारी गुळेली शेवटी सांगेच्या वरच्या भागात उगेशी एकात्म होते. या दोन्ही नद्यांच्या संगमामुळे हे शहर संगमपूर या नावाने परिचित होते आणि कालांतराने संगमपूरचे रुपांतर सांगे असे झाले.

गुळेली आणि उगे या दोन नद्यांच्या संगमस्थळी प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र अस्तित्वात आले. श्री विठ्ठल, श्री पाईकदेव, श्री महादेव आदी दैवतांच्या वास्तव्यामुळे या संगमातल्या पाण्याचे पावित्र्य वृध्दिंगत होऊन सांगे शहरातून प्रवाहित होणारी नदी जुवारी म्हणून नावारुपास आली. या नदीतल्या पाण्याला शिवलिंगाचा स्‍पर्श होत असल्याने, इथल्या भाविकांत त्याच्या पावित्र्याची ख्याती विस्तारली आणि त्यामुळे जुवारी नदीला आणि तिच्या पाण्याला पापनाशिनी ही संज्ञा लाभली. त्यामुळे तिचे नाव अघनाशिनी असे पूर्वीपासून असल्याची इथल्या लोकमानसात श्रध्दा आहे.

चिरकनळी, कुशावती, गोकुल्डे नाला, कावरे नाला आणि सांतान अशा जलस्त्रोतांचे पाणी जुवारीच्या पात्राशी एकात्म होत असल्याने सावर्डे परिसरातून वाहत जाणारी ही नदी पुढे पुढे विस्तारत जाते. सांगे, केपे तालुक्यातून जुवारी सासष्ठीत प्रवेश करते आणि कुठ्ठाळीहून तिचा प्रवेश तिसवाडी तालुक्यात होतो. तिसवाडीतल्या गोवा वेल्हा म्हणजे पूर्वाश्रमीच्या थोरल्या गोव्यात जुवारी नदीचे मात्र विस्तारलेले असल्याने गोव्यातल्या मध्ययुगीन इतिहासातल्या राजकर्त्यांनी गोपकपट्टण म्हणजे गोवा पुरीच्या बंदराचा पाया घातला.

देश विदेशात जाणाऱ्या जलमार्गाशी निगडीत असलेले गोपकपट्टण बंदर अल्लाऊद्दीन खिलजीच्या सेनापती मलिक काफूरच्या विध्वंसक आक्रमणामुळे प्रतिकुल परिस्थितीशी लढा देत कालांतराने विस्मृतीत गेले. आज या बंदराचे विखुरलेले जीर्णावशेष जुवारी नदीच्या गतवैभवाची प्रचिती आणून देतात.

Zuari River
Goa Congress:...तर दोन दिवसांत गोव्यात काँग्रेसचे सरकार; विरोधीपक्षनेते आलेमाव यांनी सांगितले गणित

सासष्ठी तालुक्यातून जुवारी शेवटी मुरगाव तालुक्यात अरबी सागराशी एकात्म होते. इथेच मुरगाव बंदराची उभारणी करण्यात आल्याकारणाने जुवारी नदीच्या मुखातून अरबी सागराद्वारे देश विदेशात जाणाऱ्यासाठी मुरगाव बंदर महत्त्वाचा दुवा ठरलेले आहे. कुशावती नदी खोऱ्यात विसावलेल्या आदिमानवाच्या समुहाला जुवारीनेच जगण्याची प्रेरणा दिली होती.

अश्‍मयुगीन आदिमानवापासून आधूनिक माणसाच्या इतिहास, संस्कृतीला चालना देणारी जुवारी नदी जलमार्गाद्वारे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणाऱ्या समुहासाठी वेळोवेळी सहाय्यक ठरली होती आणि त्यामुळे तिच्या दिव्यत्वाची आणि भव्यत्वाच प्रचिती आलेल्यासाठी ही नदी प्रेरणास्त्रोतच नव्हे तर देवतास्वरुपही ठरली होती. गोमंतक भूमीच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार असलेली ही नदी म्हणजे जीवनदायिनीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com