Writer Mohan Kulkarni : ज्येष्ठ साहित्यिक मोहन कुलकर्णी मौन झाली लेखणी

Writer Mohan Kulkarni : विविध भाषा साहित्याचा उत्तम अनुवादक, भाषांतरकार, लेखक, प्रकाशक, कवी आणि विशेष म्हणजे गप्पांतून साहित्यसौंदर्याची सच्ची जाण हे सगळं इतकं घेऊन हा माणूस सतत अभ्यासू म्हणून कार्यरत राहिला.
Writer Mohan Kulkarni
Writer Mohan KulkarniDainik Gomantak

आसावरी कुलकर्णी

अशी शब्दपेरणीची नवी रुजवात करून एक कवी गेला, माणसं जातात खूप काही मागे सोडून. भौतिकाच्या सोबत वा पलीकडे काहीसं खूप जपून ठेवलेलं शब्दधन मोहन कुलकर्णी सोडून गेले.

बहुआयामी प्रतिभा आणि अनेक भाषांशी सजग लळा ठेवून साहित्यजगतात आपला वेगळा ठसा उमटविणारे बाबा म्हणजे मोहन कुलकर्णी.

कसल्याही भौतिक सुखांचा मोह न ठेवता मृत्यू समोर दिसत असतानाही आपल्यातल्या संवेदनशील कवीला जिवंत ठेवणारा हा मोठा लिहिता माणूस हिंदी, उर्दू, अरेबिक, इंग्लिश, कोंकणी, मराठी, तेलुगू, कन्नड, बांगला अशा एकूण भारतीय आणि बाहेरील भाषांतील कथाकविता साहित्यावर अमर्याद प्रेम करत त्यांनी जगातील अनेक चांगल्या साहित्याला इथल्या वाचकांच्या भाषेत आणण्याचे काम केले.

शिक्षक,मुख्याध्यापक या नोकरी ते निवृतीनंतरही शिकवण्याची सवय आणि शिकण्याची हौस अगदी तरुण ठेवली. हॉस्पिटलमध्ये फ्रेंच कवितांचा अनुवाद करत होते!

गोव्यातल्या एका गावात पंच्याऐंशीचा माणूस गालिबच्या गझलेला, मीरच्या शायरीला आणि फैजच्या नज्मला कोकणी, मराठीत उतरवतो हे वाचून ऐकून सरळ भेटलो जाऊन..सादगी जपणारा माणूस.विविध भाषांच्या प्रेमापोटी भाषांतर आणि पुस्तकांचे प्रकाशन करतो हे सगळं अप्रूप वाटण्यासारखं. त्यांच्या बोलण्यात लिहिण्यात सलोख्याची तिरीप सापडते असे त्यांना भेटणारे सहित्यप्रेमी म्हणायचे.

सगळ्याच जागा दूषित होताना गट तट राजसमाजकारण कंपू डंपु च्या पल्याड काही माणसं दिसतात. जुनी झाडं सावली आणि माया देतात,अनुभवही! गोव्यातला हा भाषाप्रेमी माणूस साहित्याने बहरत राहिला .

विविध भाषा साहित्याचा उत्तम अनुवादक, भाषांतरकार, लेखक, प्रकाशक, कवी आणि विशेष म्हणजे गप्पांतून साहित्यसौंदर्याची सच्ची जाण हे सगळं इतकं घेऊन हा माणूस सतत अभ्यासू म्हणून कार्यरत राहिला.

जगद्विख्यात कथांचे सोप्या मराठीतले अनुवाद असोत किंवा मेघदूताचे भाषांतर वा रवींद्रनाथांच्या कवितेला चक्क मराठीचा आवाज असले सगळे अफाट अवघड काम परिश्रमातून हा माणूस सोपं करत आणायचा त्यांनी साहित्याच्या हरेक क्षेत्रात भटकंती केली. स्वच्छंद, रोजनिशीच्या स्वरूपात प्रत्येक भाषेचा अभ्यास करत आपल्या लेखनाच्या पसाऱ्यात भारतीय भाषांची सुंदर फुले सजवून ठेवली.

आपलं मनस्वी जगणं आणि साहित्यावरील प्रेम, भाषासेवेचा प्रचंड जाणिवांचा वसा इतर कवी लेखकांना कळो.. वाद, इजम, गटतट, वय, सवय अशा सगळ्या आजच्या कंपुकरणाच्या पल्याड ,आणि त्याहूनही तुम्ही अधिक मोठे होता आणि सदैव रहाल. साध्या सच्च्यातील हा मोठेपणा दीर्घ आहे...

मोहन कुलकर्णी नावाच्या या दीर्घकवितेशिवाय गोव्यातील साहित्यविश्वाचे खरे वर्तुळ अपूर्ण राहील.बाकी पिकासोच्या वेडेपणाच्या अनेक दंतकथा ऐकून वाचून झाल्यात तशाच काही अनवट अवघड तरीही स्पष्ट गोष्टींनी या माणसाच्या आयुष्याचा मळा भरलेला आहे.काही महिन्यांपूर्वी त्यांचं बोलणं थांबलं पण माणसं भेटायला आल्यावर कागदभर गप्पा रंगत राहिल्या.

शेवटपर्यंत कागदलेखणीची साथ सुटू दिली नाही. ते लिहीतच राहिले.अक्षरसाहित्यातून अक्षय उरण्याची त्यांची आस पक्की झाली.स्वतःसाठी सुप करण्यासाठी लागाणाऱ्या भाज्या ते शेवटपर्यंत चिरून देत होते कापत्या हातानी. स्वाभिमान बहुतेक यालाच म्हणतात.

उन्हाळ्यातल्या पानांफुला झाडांचा रंग बदलतोय, हंगाम बदलतोय. बाबांनी अनुवादित केलेलं मेघदूत आणि गालिबच्या गझलांचा फ्यूजन समोर आहे. वाचावं सावलीत बसून तरी डोक्यावरले छप्पर हरवण्याच्या झळा गडद होत आहेत.

पण पानं झाडावरची आणि पुस्तकाची हलक्याने वाजताहेत ही फडफडय की बाबा अक्षरांतून सोबत असल्याची साक्ष !

मोहन कुलकर्णी नावाच्या एकट्या मुशाफिराचा हा प्रवास पटकन शब्दांतून मांडता येत नाही, आत्ता अप्रकाशित राहिलेलं आणि हस्तलिखितातून अपूर्णतेच्या खुणा सांगणार काही समोर येत आहे. हे पूर्ण होईल? खूप काही राहील त्यांचं लिहायचं, शिकायचं....

पूर्ण करावं लागेल, भाषा नदी असते आणि बाबांनी अनेक भाषांचा सुंदर संगम आणलाय... लेखनातून त्याला वाचवलं वाचलं पाहिजे बस्स...

सुन्न झाली लेखणी अन् कागद कोरा राहिला

नियतीच्या ह्या गर्दीमध्ये ''बाबा'' माझा हरवला

अद्भूत होती तुमची प्राज्ञा, सुमधुर तुमची वाणी

स्थितप्रज्ञ, तेजस्वी महत्तम,"जिणे गंगौघाचे पाणी"

माणसातील हा''देव'' माझा स्वर्गसदनी परतला.....................

गेल्यावर, त्यांच्या करा बिया

शिंपडा रानभर, येऊदे बहर

पानगळक्या रानाला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com