Reverse Brain Drain : रिव्हर्स ब्रेन ड्रेन शक्य आहे का?

Reverse Brain Drain साऱ्या जगाला ब्रँड गोव्याचं आकर्षण आहे. त्याचा फायदा घेऊन गोव्याला साजेशा लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना वेगवेगळ्या प्रोत्साहन योजना देऊन राज्यात उद्योग थाटण्यासाठी आमंत्रित करावं लागेल.
What Is Reverse Brain Drain
What Is Reverse Brain DrainDainik Gomantak
Published on
Updated on

संगीता नाईक

‘निसर्गरम्य गोव्यात सेकंड होम घेण्याच तुमचं स्वप्न आम्ही साकार करू’, रेडिओवरची रियल इस्टेटची जाहिरात जगभरच्या लोकांना ग्वाही देत होती.

जिचा एकुलता एक आयटी इंजिनियर मुलगा गोव्यात नोकरी न मिळाल्यानं हल्लीच बंगलोरला स्थायिक झालाय अशी एक मैत्रीण बाजूला बसलेली. ‘काय विरोधाभास आहे पहा! साऱ्या जगातील लोक इथं सेकण्ड होम बनवण्यासाठी येतायत, पण इथला तरुण मात्र नोकरी धंद्याच्या शोधात आपल्या फर्स्ट होमलाच पारखा होतोय’, हे बोलताना तिचा आवाज जड झालेला.

गेली पंचवीस तीस वर्ष संगणक क्षेत्रातील लाखो लोक कधी स्वखुशीने तर कधी नाईलाजानं गोव्यापासून दूर जात आहेत. कूर्मगतीनं कूस परतणाऱ्या इथल्या आयटी उद्योगांमूळ गोव्यावर, घरच्यांवर अतीव स्नेह असूनही त्यांचे परतीचे सारे मार्गही बंद झाले आहेत. ही घुसमट अनुभवणाऱ्या अनेक लोकांना मी खूप जवळून ओळखते.

आजपावेतो गोव्याच्या राज्यकर्त्यांचे, निर्णयकर्त्यांचं लक्ष फक्त खाण आणि पर्यटन ह्या दोनच उद्योगांवर केंद्रीत आहे. अति हव्यासानं खाण उद्योग डळमळला. कोविड महामारीनं पर्यटन उद्योगावरील अवलंबित्वाचा तकलादू पणा दाखवून दिला. नाही म्हटल्यास गोव्याचा फार्मास्युटिकल उद्योग देशात चौथ्या क्रमांकावर आहे, पण तो ऑरगॅनिकपणे वाढलाय.

गोव्यातील बहुतेक तरुणांचा उच्च शिक्षण घेण्याकडे कल असल्याने आमच्याकडे शिक्षित मनुष्यबळ मुबलक प्रमाणात आहे. आपलं गोवा हे अवघे ३,७०२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल लहानसं राज्य. कौशल्ययुक्त मनुष्यबळ आणि राज्यातील जमीन आणि इतर नैसर्गिक संसाधनांची मर्यादा लक्षात घेता गोव्यासाठी सर्वांत पूरक उद्योग म्हणजे आयटी उद्योग. हे आम्हाला कळत, पण वळत नाही. ह्या हरित उद्योगाला चालना देण्यासंबंधीची आश्वासन बाजी गेली पंचवीस तीस वर्षे केली जातेय.

गोव्याला आयटी उद्योगाच देशातील केंद्रस्थान बनवू, २०२५ पर्यंत राज्याला आशियातील पहिल्या २५ स्टार्टअप डेस्टिनेशन मधील एक बनवू, यंव आणि त्यव. पण प्रत्यक्षात मात्र बोलाची कढी आणि बोलाचाच भात. आयटी क्षेत्राच्या सर्वसामावेशकतेमुळं त्या क्षेत्रात अनेक रोजगाराच्या नव्या संध्या सदैव तयार होत असतात.

त्यामुळेच राज्यातील बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये आयटी संबंधित कोर्सेस आहेत. दर वर्षी गोव्यातील ५ इंजिनियरिंग कॉलेजमधून १,७००च्या वर इंजिनिअर शिकून बाहेर पडतात आणि त्यातील बहुतेक आयटी क्षेत्राशीच निगडित असतात. गोव्यातील ३८ पैकी बहुतांश कॉलेजेस, सरकारी तंत्रनिकेतन इत्यादींमध्ये आयटी क्षेत्रासंबंधी अभ्यासक्रम आहेत.

आयआयटी, बिट्स, एनआयटीमधून पास होणाऱ्या गोवेकरांचा नंबरही वर्षानुवर्षे वाढत आहे. ह्या सर्व आयटी शिक्षण घेऊन दरवर्षी बाहेर पडणाऱ्या तरुणाईचा आकडा हजारोंच्या घरात आहे. त्यांच्यासाठी आयटी रोजगाराच्या संधी मात्र अगदीच मर्यादित प्रमाणात आहेत. ह्याला इतर अनेक घटकांबरोबरच सरकारचा नाकर्तेपण आणि दूरदृष्टीचा अभावही तेव्हढाच जबाबदार आहे. मग यातील बहुतांश युवक रोजगाराच्या संधी शोधत राज्याबाहेर निघून जातात.

हा ब्रेन ड्रेन थांबवण्यासाठी शहामृगी पवित्रा झटकून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची आज घडीस नितांत गरज आहे. त्यासाठी विविध स्तरांवर समांतरपणे कार्यक्रम राबवावे लागतील. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन योग्य नियमन करावं लागेल. गोव्यात १००च्या आसपास आयटी कंपन्या आणि सुमारे २५० आयटी स्टार्टअप आहेत. सर्वांत आधी त्यांना ग्रासणाऱ्या समस्यांचे समाधान शोधावे लागेल.

जेणेकरून ह्या कंपन्या व्यवस्थित चालतील, भरभराटीला येतील आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतील. मागची अनेक दशके गोव्याचा आयटी उद्योग खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी, विस्तारासाठी जागेचि वानवा, अपुरी सार्वजनिक आणि महागडी खाजगी वाहतूक व्यवस्था, लाल फिती, सरकारद्वारे आयटी उद्योगांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंबंधीच्या प्रयत्नांसंबंधीची उदासीनता, आयटी धोरणाच्या अंमलबजावणीत चालढकल, योजनांची अयोग्य अमंलबजावणी इत्यादी संबंधी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आवाज उठवतोय. स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याविषयी गोवेकर तरुणांना आकर्षण आहे.

अनेक जण स्वतःच्या हिमतीवर असे प्रयत्न करतही आहेत आणि यशस्वीही होत आहेत. पण अनेकांना योग्य वेळी, योग्य मदत व खासकरून आर्थिक मदत न मिळाल्यानं एक तर ते व्यवसाय बंद तरी करतात किंवा चांगल्या प्रकारे मदत योजना राबवणाऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर तरी करतात. अनेक आश्वासक स्टार्टअप इथल्या अनास्थेला कंटाळून गोव्याबाहेर गेल्याची भरपूर उदाहरणेही माझ्या माहितीत आहेत.

महत्त्‍वाची गोष्ट ही आहे की या कंपन्यांसाठी काही प्रमाणात तरी सरकारद्वारे बाजारपेठ निर्माण करून दिली गेली पाहिजे. नोंदणीकृत कंपन्यांकडून आवश्यक सेवांची निश्चित टक्केवारी अनिवार्यपणे खरेदी करण्यासाठी सरकार प्रत्येक खात्याला आदेश देऊ शकते. याच अनुषंगाने उद्योगांना केंद्रस्थानी ठेवून गोव्यात, तसेच देश विदेशात व्यापार मेळावे, खरेदीदार-विक्रेता मेळावे, इनोव्हेशन झोन, ग्रँड चॅलेंज, हॅकाथॉन्स वैगेरे आयोजित केले गेले पाहिजेत.

गोव्याच्या इकोसिस्टममध्ये सहा इनक्यूबेटर, १५ को-वर्किंग स्पेसीस, १५ स्टार्टअप कॅफे यांचा समावेश आहे. ह्यांची संख्या आणि व्याप्ती वाढवावी लागेल. ज्यायोगे दूरवरचा प्रवास टाळून आपल्या जवळपास अशा सोयींचा फायदा कंपन्यांना खासकरून स्टार्टअपना घेता येईल. गोव्यातील जवळपास प्रत्येक प्रमुख शहरात अवाढव्य बस स्टँड नावाचा पांढरा हत्ती आहे. ह्या बस स्‍टँडवर जर अशा को-वर्किंग स्पेसीसी, स्टार्टअप कॅफे किंवा २५-५० सीटर ऑफिसची सोय केली गेली तर प्रवासाची साधन नसल्यामुळे येणारी समस्या काही अंशी सुटेल. साऱ्या जगाला ब्रँड गोव्याचं आकर्षण आहे.

त्याचा फायदा घेऊन गोव्याला साजेशा लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना वेगवेगळ्या प्रोत्साहन योजना देऊन राज्यात उद्योग थाटण्यासाठी आमंत्रित करावं लागेल. त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा लागेल. महत्त्‍वाची गोष्ट ही आहे की, स्टार्टअप आणि आयटी कंपन्यांचं योग्य समस्यानिवारण झालं, गोव्यासाठी साजेशा आयटी कंपन्या इथं आल्या तर त्यांच्याद्वारे खूप आणि चांगल्या प्रतीची रोजगार निर्मिती होऊ शकते.

प्रखर राजकीय इच्छाशक्ती दाखवून हे शक्य केलं गेलं तर ब्रेन ड्रेन रिव्हर्स होऊन गोव्यात परत आलेले गोवेकर गोव्याच्या प्रगतीला एक नवा आयाम देतील. होईल का कधी खरा हा कल्पनाविलास?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com