Goa : गोव्यातील पाणथळीच्या जागा

Goa : आपल्या देशांच्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीला ७५वर्षे पूर्ण होतानाच रामसर जागांची ७५ संख्या पार करून, एक लक्षणीय पर्यावरणीय परिसंस्थांच्या संवर्धनाचा टप्पा गाठलेला आहे.
Goa
GoaDainik Gomantak

राजेंद्र पां. केरकर

गोव्याची भूमी पाणथळीच्या जागांसाठी पूर्वापार ख्यात आहे. भौगोलिक आकाराने छोटेखानी असलेली ही भूमी पाणथळीच्या वैविध्यपूर्ण आणि समृध्द अशा जागांनी युक्त आहे.

पृथ्वीतलावरती सजीवांची पैदासी पाण्यात झाली आणि आदिम काळापासून इथे वावरणाऱ्या आपल्या पूर्वजांची तृष्णा भागवण्याबरोबर त्याच्या जगण्याला आधार देण्याचे कार्य पाणथळीच्या जागा करत आलेल्या आहेत.

पाणवठ्याजवळच्या जागा म्हणजे पाणथळभूमी असून, त्यात विहिरीचा काठ, नदीकिनारा, तलावाची हद्द, खाडी किंवा नद्यांच्या मुखाजवळचा काठ यांचा समावेश पाणथळीच्या जगात होतो. २ फेब्रूवारी १९७१ रोजी इराणातल्या रामसर शहरात संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष सभेत पाणथळ भूमीच्या असलेल्या स्थानाला महत्त्व देण्यात आले.

पाणथळ भूमीच्या संवर्धन आणि विकासासाठी महत्त्वाच्या जागाचा समावेश रामसर स्‍थळात करण्यात येतो. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून रामसर पाणथळ भूमीच्या विकासाच्या योजनांचे नियोजन केले जाते.

आपल्या देशांच्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीला ७५वर्षे पूर्ण होतानाच रामसर जागांची ७५ संख्या पार करून, एक लक्षणीय पर्यावरणीय परिसंस्थांच्या संवर्धनाचा टप्पा गाठलेला आहे. मानवी समूहाला मासे, खेकडे, कोळंबी, खुबे आदी पौष्टिक अन्नाचे घटक पुरवण्याबरोबरच पशुपक्ष्यासाठी पाणथळीच्या जागा, नैसर्गिक आपदांपासून संरक्षण देत असतात.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणारी ही परिसंस्था आर्थिकदृष्टीबरोबर अनेक सजीवांच्या उपजिविकेशी संबंधित असतात.

नानाविविध बुरशीच्या प्रजाती, वृक्षवेली आणि जलचर प्राण्यांसाठी महत्त्वाच्या अधिवास असणाऱ्या पाणथळीच्या जागा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीने असाधारण असतात. जैवविविधतेच्या भरणपोषणाला कारणीभूत असणाऱ्या, या पाणथळीच्या जागा पर्यावरणाचा समतोल राखण्यास सहाय्यभूत ठरतात. नैसर्गिक जलचक्राच्या अस्तित्वाच्या दृष्टीने पाणथळीच्या जागा वेळोवेळी योगदान करत असतात.

जमीन आणि पाणी यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने पाणथळीच्या जागा महत्‍व पूर्ण असतात. नदीनाले, तलाव, खारफुटीची जंगले, खारभूमी क्षेत्र, दलदलीचा परिसर, कालवे, मिठागरे यांचा समावेश अशा जागात होतो.

परिसंस्थेतील सजीव मात्रांना पाणथळीच्या जागा उपयुक्त असतात. पूरनियंत्रण जलपुनर्भरणाच्या दृष्टीने त्या महत्त्वपूर्ण असतात. पक्ष्यांच्या आश्रयासाठी त्याचप्रमाणे प्रजननासाठी त्या अनुकूल असतात. प्रदुषणाची विस्तारात जाणारी समस्या पाणथळीच्या जागांच्या अस्तित्वाला मारक ठरलेल्या असून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही मानवी समाजाची विशेष जबाबदारी झालेली आहे.

२०२२ मध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५वर्षे पूर्ण झाली आणि या ऐतिहासिक टप्प्यावरती आपले राष्ट्र आलेले असताना, रामसर पाणथळ स्थळांची संख्या ७५ झालेली आहे, हे जैविक संपत्तीच्या दृष्टीने महासागर ठरलेल्या देशाला भूषणावह बाब झालेली आहे.

जैविकसंपदा आणि पाणथळीच्या जागा यांच्यात अनुबंध असून, निसर्गाने आपल्या देशाला जे भरभरून वैभव दिलेले आहे, ते सारे टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणीय परिसंस्थांचे अस्तित्व महत्त्वपूर्ण आहे आणि पाणथळीच्या जागा पशुपक्षी,कृमकीटकांचे भरणपोषण करण्याचे कार्य करत असतात.

गोव्याची भूमी पाणथळीच्या जागांसाठी पूर्वापार ख्यात आहे. भौगोलिक आकाराने छोटेखानी असलेली ही भूमी पाणथळीच्या वैविध्यपूर्ण आणि समृध्द अशा जागांनी युक्त आहे.

सत्तरीतील नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या ब्रह्मकरमळी आणि माळोली या दोन्ही गावात रानटी जायफळाच्या प्रजातींनी नटलेल्या दलदलीने युक्त पाणथळीच्या ज्ञात अशा तीन जागा आहेत. पृथ्वीवरती जेव्हा गोंडवनखंड अस्तित्वात होता, त्यावेळच्या जंगलाच्या वैभवाची स्मृती तिन्ही ठिकाणच्या या पाणथळीच्या जागा जागवतात.

इंग्रजीतील ‘यू’ अक्षराच्या उलट्या आकाराची मुळं असलेल्या वनस्‍पती इथल्या दलदलीत पहायला मिळायच्या. माळोलीतील एकेकाळी चार एकरात पसरलेली ही जागा, आज केवळ पाव एकराचे अस्तित्व टिकवण्यासाठी शेती, बागायती, लोकवस्ती, डांबरीरस्ता आदी संकटांना तोंड देत आहे.

कधीकाळी उस्ते, नानोडा आणि माळोली या तीन गावांतल्या कष्टकऱ्यांना नानाविविध संकटांतून रक्षण करणारी निसर्गातली अदृश्‍य शक्ती निराकार म्हणून ओळखली गेली आणि या शक्तीचे चिरंतन अधिवासाची जागा, निरंकऱ्याची राय या नावाने परिचित झाली.

ब्रह्मकरमळीतले असेच विलोभनीय जंगल आजोबांची तळी म्हणून नावारुपास आले. जंगली हळदीशी साधर्म्य असणारी वनस्पती इथल्या दलदलीला व्यापत असून, तेथे बेलदे नावाचे खेकडे आणि फुरसे सापासाठी नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठरलेला आहे.

आजोबाच्या तळीला संलग्न असणारी आणि बिबटीच्या वैशिष्ट्यपूर्ण वृक्षांनी नटलेली पाणथळची जागा बिबट्यान म्हणून ओळखली जाते. गोड्या पाण्यात खारफुटीसारख्या वृक्षाशी नाते सांगणारी वृक्षसंपदा बिबट्याची खासयित असून मलाबारी धनेशासारख्या पक्ष्यासाठी आणि मलाबारी वृक्ष अप्सरा फुलपाखरांसाठी आनंदवन ठरलेले आहे.

सांगे तालुक्यातल्या नेत्रावळी अभयारण्यातल्या भाटीत बाराजण, सुर्यगाळ आणि तळावली येथील दलदलीतले जंगल आम्हाला डायनोसोरच्या काळात घेऊन जात आहे. जेव्हा पृथ्वीवर आदिमानवाची पावले उमटली नव्हती, त्याकाळाच्याही पूर्वीचे हे जंगल नेत्रावळीच्या वैभवात भर घालत आहे.

नेतुर्ली गावातून बारमाही प्रवाहित असणाऱ्या सावरी धबधब्याकडे जाताना पूर्वी दलदली तळे असे. वैशिष्‍ट्यपूर्ण जंगल होते. त्यांची प्रचिती देणारी मुळे तेथे दृष्टीस पडतात. म्हादई आणि नेत्रावळी अभयारण्यातल्या या पाणथळीच्या जागा म्हणजे गोव्यातल्या नैसर्गिक संपदेचा अनमोल असा खजिनाच आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

देशात आजमितीस जी रामसर आंतरराष्ट्रीय पाणथळ यादीत समाविष्ट झालेली ७५ स्थळं आहेत, त्यात केपे तालुक्यातल्या काकोड्यातल्या नंदा तलावाचा समावेश झालेला आहे. ४२ हेक्टरात विस्तारलेल्या या तलावाला जुवारीच्या उपनद्यांतून पाण्याचा पुरवठा होत असतो.

शेतीद्वारे भाताच्या प्रजातींची विपूल पैदासी आणि चवदार माशाच्या पुरवठा करणारा हा तलाव गोकुळातल्या गोपगवळणींना आधार देणाऱ्या नंदासारखा जीवनाधार ठरल्याने, त्यांनी त्याला नंदा असे नाव दिले होते.

महाभारत महाकाव्याचा गोव्यातल्या लोकमानसावरती विलक्षण असा प्रभाव पडलेला असल्याकारणाने या तलावात असणारा आणि पृथ्वीचा लाखो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार शिलाखंड ‘पांडवा तळप’ म्हणून ओळखले जाते.

Goa
Goa Budget 2024: मागील अर्थसंकल्पीय आश्वासनांपैकी काही महत्वाची आश्वासनं सरकारकडून...

इथल्या महाकाय काळ्या पाषाणातून देवालयाची निर्मिती ‘एका रातीन आणि एका वातीन’ करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.

परंतु तत्पूर्वी कोंबड्याने बांग दिली आणि आपले स्वप्न मूर्त स्वरुपात आणण्यापूर्वी पांडवांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. कुडचडे - काकोडा नगर पालिका क्षेत्रात येणारा नंदा तलाव रामसर पाणथळ यादीत समाविष्ट झाल्याने गोव्याच्या जलस्त्रोताच्या वैभवाचा तो मुकूटमणी ठरलेला आहे.

रामायण महाकाव्यात ज्या क्रौच पक्ष्याच्या जोडप्याचे प्रणयात दंग असताना, पारध्याच्या बाणात शिकार झाल्याच्या वेदनेनं वाल्मिकिला शोकविव्हळ करून, काव्याच्या पहिल्या श्‍लोकाचा जन्म दिला, तो क्रौच पक्षी सायबेरियाच्या प्रदेशात हजारो मैल ओलांडून हिवाळ्यात गोव्यातल्या पाणथळीच्या आकर्षणपायी येतो ही बाब लक्षणीय अशीच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com