River In Goa: गोष्ट संथ वाहणाऱ्या वाळवंटी नदीची...

पावसाळा ओसरल्यानंतर वाळवंटी नदीच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर व्हायचा.
Valvanti River
Valvanti River Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: एकेकाळी केरी परिसरासाठी जीवनदायिनी असणारी वाळवंटी नदी मान्सूनच्या पावसाळ्यात रौद्ररूप धारण करून वाहत होती. पावसाळा ओसरल्यानंतर तिच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर व्हायचा आणि त्यावेळी वाहत्या पाण्याला नियंत्रित करण्यासाठी नदी पात्रातल्या दगडगोट्यांचा वापर करून गोड्या पाण्यातले मासे पकडण्यासाठी ‘किंव’ नावाचे बांध घातले जायचे.

वर्षाचे बारा महिने लोकांचा कधी तिच्या पात्रात डुबकी मारण्यासाठी अथवा पोहण्यासाठी, तर बायाबापड्यांचा भांडीकुंडी, कपडेलत्ते धुण्यासाठी संबंध असायचा. जगण्याला पाठबळ देणारी नदी त्यामुळे त्यांच्यासाठी केवळ पाण्याचा स्रोत नव्हती,

तर लोकजीवन आणि संस्कृतीची पालनकर्ती होती. घोटेली नं.2 येथील ‘वाकाची’, ‘भिण्णीची’, ‘कळस कोण’ आदी डोह ओलांडून येणारी ‘थोरली न्हय’ केरी गावातून येणाऱ्या कळटी नदीच्या प्रवाहाशी ‘हड्डेचो कणो’ परिसरात एकरूप होते

त्यामुळे तिच्या पात्राचा इथे विस्तार होतो. घोटेली नं. 2 येथे हणजुणे धरणाचे पाणी पाट आणि कालव्यांतून वाहण्याच्या पूर्वी नदीच्या पात्रातल्या पाण्याची कल्पकतेने उचल पारंपरिक तंत्रज्ञानाद्वारे करायचे आणि त्याच्यावरती वायंगणी शेती, बागायती पिके तसेच भाजीचे मळे करायचे.

सेंद्रिय खताद्वारे भाजीचे मळे, वायंगणी शेती नदीच्या पाण्यातल्या सिंचनामुळे केली जायची. नदीतल्या पाण्याशी आणि शेतजमिनीतल्या सुपीक मातीशी त्यांचे स्नेहबंध निर्माण झाले होते. वन खात्याने जेव्हा वाघेरी डोंगरावरती सामाजिक वनीकरणाखाली अकेशिया, युकालिप्टसची लागवड केली तेव्हा तेथे वास्तव्यास असलेली धनगर समाजातली कुटुंबे वाळवंटी नदीच्या उजव्या काठावरती असलेल्या ‘वण्टीचे मळ’ येथे स्थायिक झाली.

गाई, म्हशी आणि बकऱ्यांचे पालनपोषण करणाऱ्या समाजासाठी वाळवंटीचे पाण्याने भरलेले पात्र जगण्याचा आधार झाला. ‘हड्डेचो कणो’ परिसरात वाळवंटी आणि कळटीचा संगम जेथे होतो तेथे पात्रात उभ्या असलेल्या दगडांवरती उभे राहून नदीच्या प्रवाहांचा संगम पाहणे अत्यंत प्रेक्षणीय आहे.

सकाळ, संध्याकाळ इथला परिसर नानाविध पक्ष्यांच्या किलबिलाटानेगजबजलेला असतो. तेथून ही नदी मोर्ले गावात प्रवेश करते. पोर्तुगीज अमदानीत आपल्या क्रौर्यासाठी ख्यात असलेला पोलीस अधिकारी आजिंतो मोंतेरो केरीत यायचा तेव्हा बऱ्याचदा येथील ‘अलगाचो गुणो’ येथे दबा धरून बसलेल्या क्रांतिकारकांच्या गोळीबाराला सामोरे जावे लागायचे.

ज्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतराजीत होतो ती नदी मोर्लेत प्रवेश करताना तिच्या पात्रात विशेष कठीण असे चढ-उतार नसल्याने संथ वाहते आणि रावण, मोर्ले आणि घोटेली अशा तीन गावांच्या परिसरात असलेल्या पेळावदेत प्रवेश करते.

पेळावदे येथे वाळवंटी नदीचा संगम गटारो नदीशी होतो. रावण गावातल्या एकेकाळी समृद्ध जंगल असलेल्या परिसरात उगम पावणारी पेळावदेसाठी महत्त्वाची ठरलेली गटारो हिवाळ्यातल्या शेती, बागायतीच्या सिंचनाचा आधार ठरली होती.

गटारो नदीच्या पात्रात बारमाही पाणी उपलब्ध होते. आणि रावण गावातून घोटेली नं. 2 येथे प्रवेश करताना ती दगडधोंड्यातून पुढे येते. त्यामुळे जलप्रपाताचे दर्शन व्हायचे. गटारोचे पाणी उन्हाळ्यात, छोट्या स्वरूपात का असेना, ते निरंतर वाहताना शिलाखंडातून यायचे आणि त्यामुळे ही जागा ‘मुतरो गुणो’ म्हणून ओळखली जायची.

गटारो नदीवरती वायंगणी भातशेती आणि भाजीचे मळे इथले कष्टकरी पिकवायचे. त्याकाळी गटारो नदीला रावण येथील अळमो डोंगरावरील पाणी उपलब्ध असायचे. पावसाळ्यात, श्रावण, भाद्रपदात घनदाट वृक्षवेलींनी समृद्ध असलेल्या अळमो डोंगरावर अळंब्यांचे पीक यायचे आणि या मौसमी पिकाचा लाभ कष्टकरी समाज उत्साहाने घ्यायचा.

त्यामुळे हा डोंगर ‘अळमो डोंगर’ म्हणून ओळखला जायचा. सरकारी राखीव जंगलक्षेत्र असलेल्या अळमी डोंगरावरचे नैसर्गिक वृक्षाच्छादन गेल्या काही वर्षांपासून नष्ट झाल्याने तेथील गवेे, सांबर, भेकरे, पिसय यांचा अधिवास संकटांनी वेढलेला आहे.

गटारोला पाण्याचा पुरवठा करणारे स्रोत दिवसेंदिवस क्षीण होत गेले. रावण गावात जेथे जंगले आणि मौसमी गवतांनी समृद्ध माळराने होती, तेथे केळावडे गावातल्या हणजुणे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आणि त्यामुळे तेथील जलस्रोतांचे अस्तित्व संकटग्रस्त झालेले आहे.

Valvanti River
Goa Climate Change: गोव्यातल्या झाडांना अवेळीच येतो बहर; 'डूम्स डे' अभी दूर नहीं..!

हणजुणे धरणाचा जलाशय, तळे, पाणी पाट, कालव्यांतून शेत जमिनीत आणण्यासाठी अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांची दखल न घेता डांबरी रस्त्यांचे, पुलांचे त्याचप्रमाणे कालव्यांना जोडणारा अ‍ॅकवा उकट आदीचे बांधकाम करण्यात आल्याने त्याचे गंभीर असे दुष्परिणाम गटारोच्या नैसर्गिक प्रवाह आणि पात्रावरती झालेले आहेत.

रावणातून घोटेली नं. 2 येथे प्रवेश करणारी ही नदी मोरशीवाड्यावर यायची. तेथे उसाची लागवड करून त्याच्या रसाद्वारे गुळाची निर्मिती करणारे गुर्‍हाळ चालू होते. आज उसाची लागवड आणि गूळ निर्मितीची इथली परंपरा लोप पावलेली आहे.

मोरशीतल्या शेतजमिनी हिवाळा आला की वायंगणी भातशेती आणि भाजीपाल्याच्या लागवडीने हिरव्यागार दिसायच्या. मोरशी येथे गटारोच्या पात्रात चंद्र, सूर्याची प्रस्तर चित्रे आढळली होती. गटारोच्या काठावरती मोरशी येथे कधीकाळी आदिम संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या समूहाची वस्ती असली पाहिजे.

हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेली मोरशी तेथे सुरू करण्यात आलेल्या स्टोन क्रशर आणि खाणीमुळे अक्षरशः हादरून गेली होती. दगडफोडीबरोबर सुरू झालेल्या जंगल तोडीचे दुष्परिणाम गटारोवरती झाल्याकारणाने तिचे पात्र गतवैभव हरवून बसलेले आहे. मोरशीहून गटारो ‘वण्टीचे मळ’, पेळावदे येथे येते.

तिच्या पाण्याच्या आधारे शेती, बागायतीची परंपरा इथल्या कष्टकऱ्यांनी जोपासली होती. आज धरणाच्या जलसिंचन ओलिताखाली येण्याऐवजी इथल्या शेतजमिनीत सिमेंट -काँक्रीटची बांधकामे उभी राहिलेली आहे आणि लोकवस्तीचा विस्तारही झपाट्याने वाढत चालला आहे.

त्यामुळे घोटेली नं. 2 धनगरवाडा, सातेरीचे टेंब, पेळावदे इथल्या कष्टकऱ्यांच्या जगण्याला बळ देणारा हा जलस्रोत विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे. गटारोच्या पाण्यावरती ज्या माडाच्या, केळीच्या बागा उभ्या राहिल्या होत्या.

त्यांचे अस्तित्व कालव्याचे पाण्याद्वारे बहरण्याऐवजी परिवर्तनाच्या झंझावातात सापडलेले आहे. जेथे गटारो नदी वाळवंटीच्या पात्रात एकरूप होते तेथे इथल्या कष्टकऱ्यांना दिव्यत्वाची प्रचिती आली होती. ते वैभव लोप पावत चालले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com