वारसा: गोव्यातील चिमुकली बेटे

गोव्यातील या चिमुकल्या द्वीपांचा आणि तेथील परिसंस्थांचा अजून तपशीलवार अभ्यास झाला पाहिजे.
Tiny islands in Goa
Tiny islands in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. संगीता साेनक

सकाळीसकाळी बोटीतून कुंभारजुवा कालव्यातून फेरफटका घेताना मस्त थंड वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबत होती. पाण्यावर पडलेला धूसर सूर्यप्रकाश मोहक वातावरण निर्माण करत होता. दीपाने आम्हा सगळ्यांना निळा आणि पांढरा ड्रेस कोड सांगितल्यामुळे आमच्या बोटीत निळ्या पांढऱ्या रंगाची सुरेख मैफलच जमली होती.

गाणी म्हणत, हसत खेळत आम्ही कालव्यातून जात होतो. दोन्ही बाजूंनी खारफुटीची झाडे दिसत होती. तेवढ्यात आमच्या बोटीच्या ‘कॅप्टननी’ आम्हांला एक मगर दाखवली. पाण्यातून पोहत जाणारी मगर बघून आमच्याबरोबर असलेल्या मुलांना आनंद झाला. गोड्या पाण्याच्या या मगर प्रजातीला आता आपल्या गोव्याच्या खाऱ्या पाण्याची थोडी सवय झालेली आहे.

कुंभारजुव्याच्या या कालव्यात या मगरींचे वास्तव्य असते. हा कालवा मांडवी आणि जुवारी या गोव्याच्या दोन मुख्य नद्यांना जोडतो. त्या दिवशी या कालव्यात आम्ही तीन-चार मगरी बघितल्या. यांपैकी एक खूपच मोठी होती. किनाऱ्यावरील खारफुटीच्या झाडांत ती आरामात पहुडली होती.

Tiny islands in Goa
खाद्यभ्रमंती: दुर्गापूजा आणि बंगाली खाद्यपदार्थ

जरा पुढे गेल्यावर आम्हांला काही पक्षी दिसले, बलाकचोच धीवर (स्टॉर्क बिल्ड किंगफिशर), सामान्य धीवर (कॉमन फशर), समुद्रगरुड (व्हाइट बेलीड सी इगल), लहान क्षत्र बलाक (लेसर अ‍ॅडजुटंट स्टॉर्क), पाणकोंबडी (वॉटरहेन) वगैरे. यांपैकी लेसर अ‍ॅडजुटंट स्टॉर्क ही एक असुरक्षित प्रजाती आहे.

किनाऱ्यावर असलेली खारफुटीची झाडे या पक्ष्यांना आसरा देतात. कुंभारजुव्याला नुसते ‘जुवें’ असेही म्हणतात. याचे अजून एक नाव म्हणजे ‘सांत इस्तेव’. ‘जुवें’ म्हणजे बेट. पाण्याने वेढलेला भूभाग. गोव्यात अनेक बेटे - जुवे आहेत. काही गावांच्या नावातही हे प्रतिबिंबित होते, जसे कुंभारजुवे, खोरजुवे.

तिसवाडी तालुका हेही एक जुवेंच होते, याला ‘इल्यश’ असेच म्हटले जायचे. आपल्या राजधानी पणजीला १६३३-३४ मध्ये कॉजवे (मोठा बांध) बांधून रायबंदरला जोडले गेले. पूर्वी गोव्यातील या सगळ्या बेटांवर जायला फक्त होड्या असायच्या. आता यातील अनेक बेटे पूल बांधून मुख्य भूभागाशी जोडली गेली आहेत.

आमची बोट अजून थोडी पुढे गेली आणि किनाऱ्यालगतच्या पाणथळ भागात आम्हांला एकमेकांशी खेळत, बागडत असलेली सात आठ पाणमांजरे (ऑटर, हुदा) दिसली. गोव्यात या पाणमांजरांच्या दोन प्रजाती आहेत, गुळगुळीत लेपित (स्मूथ कोटेड) आणि आशियाई लहान नखे असलेले (एशियन स्मॉल क्लोव्ड).

या दोन्ही प्रजाती असुरक्षित श्रेणीत आहेत. गोव्यातील खारफुटी आणि खाजन शेतीत या पाणमांजरांचा, खास करून, स्मूथ कोटेड ऑटरचा, आढळ असतो. खाजन शेतीत येणारे मासे खायला ही पाणमांजरे तेथे येतात. रोगी मासे ही लगेच खाऊन टाकतात. कारण रोगी मासे पटकन पळून जाऊ शकत नाहीत आणि त्या रोगाची बाधा या ऑटरना होत नाही. त्यामुळे पाणी साफ राहते. या पाणमांजरांना स्वच्छ पाणी लागते. त्यामुळे यांची उपस्थिती प्रदूषणरहित परिसंस्थेची सूचक आहे. गोव्यातील ‘वाइल्ड ऑटर’ ही संस्था या पाणमांजरावर शोधकाम करत आहे.

मध्येच अजून एका बेटावर थोडा वेळ थांबून परत जायचे असा बेत ठरला. त्यानुसार आम्ही दिवाडी बेटावरील नार्वे येथील महादेवाच्या देवळापाशी थोडा वेळ थांबलो. हे देऊळ नवीन बांधले गेले आहे. येथील जुनी मूर्ती पैलतीरावरील सप्तकोटेश्वर येथील देवळात हलवली गेली आहे. दिवाडी बेटावरील खाजन शेतींवर मी अनेक वर्षे शोधकाम केलेले आहे.

दिवाडी अजूनही चारी बाजूंनी मांडवीच्या पाण्याने घेरलेले बेट आहे. थोडा वेळ दिवाडी येथे थांबून आम्ही कुंभारजुव्याला परतलो. संध्याकाळी सतराव्या शतकात पोर्तुगिजांनी बांधलेला सांतइस्तेव किल्ला बघितला. छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला १६८३मध्ये अल्प काळासाठी जिंकला होता.

दिवाडी बेटाजवळच असलेले अजून एक बेट म्हणजे चोडण. येथील परिसंस्था दिवाडीच्या पर्यावरणाशी मिळत्याजुळत्या आहेत. दोन्ही बेटांवर मुबलक खारफुटी, खाजन शेती आणि ‘मानस’ (स्लूइस गेट) आहेत. चोडण बेटावर ‘डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य’ आहे. हे एक खारफुटीचे जंगल आहे.

हिवाळ्यात अनेक पक्षी येथे स्थलांतरित होताना दिसतात. आता पक्षी यायला सुरुवात होत आहे. चोडणप्रमाणेच दिवाडीला जवळ असलेले बेट म्हणजे वाशी. दिवाडीच्या दुसऱ्या बाजूला असलेले हे एक लहानसे बेट आहे. मांडवी नदीत असलेली ही काही बेटे.

मांडवी नदीसारखीच जुवारी नदीतही अनेक बेटे आहेत. यापैकी ग्रँड आयलंड, ‘पिकेन’ (लहान) आयलंड (किंवा बॅट आयलंड), सांजॉर्ज, सांत जासिन्तो ही काही बेटे वास्कोच्या जवळ आहेत. ही छोटी छोटी बेटे जणू नुसती पाण्यातून डोकी वर काढतात. ही बेटे खडकाळ आहेत. या सगळ्या बेटांवर मानवी वस्ती नाही.

यापैकी सांत जासीन्तो येथे मानवी वस्ती आहे. हे बेट आता एका पुलाने मुख्य भूभागाशी जोडलेले आहे. ‘ग्रँड’ आणि ‘पिकेन’ आयलंड या बेटांजवळ प्रवाळ (कोरल रीफ) आहेत. प्रवाळ ही जगातील सर्वांत जास्त उत्पादनक्षमता असलेली परिसंस्था आहे. अनेक सागरी जीवांना प्रवाळ आसरा देते. प्रवाळामुळे मत्स्यउत्पादनही वाढते. आजकाल या बेटांजवळ पर्यटकांची गर्दी दिसते.

जलक्रीडांची मौज घेण्यासाठी अनेक पर्यटक छोट्याशा जागेत गर्दी करतात. याचा परिणाम सागरी परिसंस्थांवर होतो. प्रवाळ ही अतिशय संवेदनशील परिसंस्था आहे. जागतिक तापमान वाढीमुळे सर्वत्र प्रवाळ नष्ट होत आहेत. त्यात अशा तणावाचा त्यांच्यावर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. येथे पर्यटकांच्या वहनक्षमतेचा (कॅअरिंग कॅपेसीटी) अभ्यास झाला पाहिजे.

गोव्याच्या दक्षिण सीमेवर असलेले अजून एक ‘सोबित माणकुले’ द्वीप म्हणजे अंजदीव. कारवारहून येताना मागे एकदा आम्हांला येथे जाण्याचा योग आला होता. भारतीय नौदलाच्या स्वाधीन असलेले हे एक छोटेसे बेट. बेटावर पोहोचताच दिमाखाने उभे असलेले एक चॅपल आपले लक्ष वेधून घेते. दक्षिण गोव्यातील अजून एक बेट म्हणजे ‘बटरफ्लाय बीच’. या बेटावर जाण्याचा योग मात्र अजून जुळून आलेला नाही.

या सगळ्या बेटांच्या भूसंरचना वेगवेगळ्या असतात. पण पाण्याने वेढलेला भूभाग असल्यामुळे ही बेटे पर्यावरणीयदृष्ट्या काही समान वैशिष्ट्ये दाखवतात. यांच्या समस्या सारख्या असतात. यांच्यावर येणारे तणाव समान असतात. गोव्यातील या चिमुकल्या द्वीपांचा आणि तेथील परिसंस्थांचा अजून तपशीलवार अभ्यास झाला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com