खाद्यभ्रमंती: दुर्गापूजा आणि बंगाली खाद्यपदार्थ

बंगाली लोक अतिशय उत्तम खाऊनपिऊन दुर्गापूजा साजरी करतात.
Durga Puja and Bengali food
Durga Puja and Bengali foodDainik Gomantak
Published on
Updated on

मनस्विनी प्रभुणे-नायक

आपल्या सर्व सणावारांचे आणि खाद्यपदार्थांचे अतूट नाते आहे. त्या त्या सणांना ते विशिष्ट पदार्थ खाल्ले नाही तर सण साजरा होत नाही. दोन दिवसांपासून दुर्गापूजा सुरू झाली आणि मन भूतकाळात गेले. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने दुर्गापूजा साजरी होते. काँग्रेस भवनमध्ये साजरी होणाऱ्या दुर्गापूजेला आम्ही मैत्रिणी हमखास जायचो.

त्यात कोणीही ओळखीचे नसायचे. आम्हांला कुणाच्या ओळखीची गरज नसायची. माँ दुर्गेचा साजशृंगार, तिथे जमलेल्या समस्त बंगाली महिलांची मिष्टी बंगाली भाषा आणि स्पेशल कोलकातावरून आलेल्या आचाऱ्यांनी घातलेले ‘बंगाली फूड स्टॉल’ इतकी निमित्ते आम्हाला पुरे असायची. हे सगळे अनुभवण्यासाठी तरी ‘दुर्गापूजा पेंडॉल’मध्ये चक्कर व्हायचीच.

दुर्गापूजा तशी दहा दिवसांची पण शेवटच्या पाच दिवसांना अधिक महत्त्व. त्यातही सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी हे दिवस महत्त्वाचे. अष्टमीला दुर्गेला वाहिली जाणारी पुष्पांजली आणि नवमीच्या दिवशीचा ‘खिचडी’चा भोग हे सर्वांत जास्त आवडते.

Durga Puja and Bengali food
Blog: स्वराज्य सौदामिनी राणी ताराबाई

भोगेर खिचुरी

बंगाली लोकांची माँ दुर्गा ही त्यांच्यासारखीच. या लोकांना जे आवडते ते सगळे ते माँ दुर्गेला भोग(नैवेद्य)मध्ये देतात. मग त्यात अतिशय साधी - सोपी मानली जाणारी खिचडी असते. नवमीच्या दिवशी दाखवला जाणारा खिचडीचा भोग हा माझा अत्यंत आवडता पदार्थ.

एरवी केली जाणारी खिचडी आणि नवमीच्या दिवशी दुर्गेला भोग दाखवली जाणारी खिचडी यांच्या चवीत खूप वेगळेपण दिसून येते. बटाटा - फ्लॉवर - मटार या भाज्या घालून अतिशय मऊ अशा या खिचडीत अगदी नाममात्र मसाला घातला जातो.

कधी संधी मिळाली तर तुमच्या जवळपास कुठे बंगाली लोकांची दुर्गापूजा साजरी होत असेल तर नवमीच्या दिवशी मुद्दाम ही प्रसादाची खिचडी खायला जा. भरपूर हळद घातलेल्या या खिचडीची आणि बेगून भाजा (वांग्याची कापे) यांची चव अफलातून लागते. काही बंगाली घरात मासळी - मटणाचा नैवेद्य दाखवला जातो.

ते जे खातात तेच देवीलाही देतात. याशिवाय रोज खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात यात ‘पुजो थाळी’मध्ये ‘लुची-अलूर दोम’, ‘माछ’, ‘मंगशो’ आणि पुलाव, डाळ -भात, ‘भाजा’, ‘शोब्जी’, ‘शुकतो’, ‘लबडा’(थोडीशी कोरडी भाजी), ‘आलूर चॉप’, ‘बेगन भाजा’, टोमॅटो चटणी आणि ‘पायेश’, ‘मिष्टी दोयी’ एवढे पदार्थ असतात. पुजो थाळी म्हणजे देवीसाठी केलेला नैवेद्य. हा भोग अजिबात चुकवू नये असा असतो.

दुर्गापूजेतले खाद्यपदार्थांचे स्टॉल

दुर्गापूजेत लागणारे फूडस्टॉल हे सर्वांत मोठे आकर्षण असते. दुर्गेला रोज न्याहाळताना ती वेगळीच दिसते. कधी कधी असे वाटते की दुर्गापूजा तर एक निमित्त आहे. खरे तर हे एकत्र येणे ‘पोट पूजेसाठी’ आहे.

इथे काय मिळत नाही असे नाही. ‘माशेर झोल’पासून ते अतिशय खात्रीशीर असा रसगुल्ला खाण्यासाठी इथे मुद्दाम जावे. गोव्यात पणजी - मडगाव - फोंडा - वास्को या शहरात दुर्गापूजा साजरी होते. पणजीत गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात गेली कित्येक वर्ष दुर्गापूजा मोठ्या उत्साहाने साजरी होते.

या काळात मी पुण्यात नसेन तर पणजीत गोमंतक मराठा सभागृहात तर नक्की जातेच. अष्टमीला पुष्पांजली आणि नवमीला भोगची खिचडी खाल्ल्याशिवाय दुर्गापूजा असल्यासारखे वाटत नाही.

‘पूजोभोग थाळी’तील पदार्थांचे महत्त्व

या साऱ्या पदार्थांना दुर्गापूजेदरम्यान खूप महत्त्व असते. यातील ‘भोगेर खिचुरी’ ही मूग डाळ आणि तांदूळ वापरून केलेली अनोखी खिचडी दुर्गा पूजा, लक्ष्मी पूजा, सरस्वती पूजा इत्यादी उत्सवांदरम्यान बनवतात आणि प्रसाद म्हणून देतात.

बंगाली लोकांचे ‘भोगेर खिचुरी’शी आजीवन प्रेमळ नाते जुळलेले आहे. तसेच ‘लूची’ आणि ‘दम’. बंगाली नाश्ता तर ‘लूची’शिवाय अपूर्ण. पण दुर्गापूजेच्या काळात ‘लूची’ म्हणजेच पुरी आणि ‘दम’ म्हणजे बटाट्याची भाजी. लूची आणि दम हे सप्तमीला बनवतात. ‘ढोकर डाळना’ हा आपल्या पाटवड्यासारखाच असतो.

दुर्गापूजेदरम्यान हा पदार्थ अवश्य बनवला जातो. मसूर डाळ वाटून त्याची उकड काढून त्याच्या वड्या बनवल्या जातात आणि मसालेदार रश्शात त्या शिजवल्या जातात. दुर्गापूजेच्या दरम्यान प्रसादाची खिचडी आणि गरम गरम पुरीसोबत आवडीने हा पदार्थ खाल्ला जातो. ‘कोश मंगशो’शिवाय पूजा अपूर्ण आहे.

भरपूर बटाटे, कांदे, मिरची आणि मसाले घालून मोहरीच्या तेलात शिजवलेले मटण म्हणजे ‘कोश मंगशो’. बऱ्याच बंगाली घरांमध्ये नैवेद्याच्या थाळीमध्ये ‘कोश मंगशो’ला महत्त्व असते. मासळीशिवाय ही पदार्थांची यादी संपणार नाही.

‘भापा इलिश’ या पदार्थावर तर तमाम बंगाली बाबू जीव ओवाळून टाकतात, ‘भापा इलिश’ जो मूलत: वाफवलेला हिल्सा माशापासून बनवला जातो, मोहरी आणि खसखसच्या पेस्टमध्ये तयार केलेल्या ‘भापा इलिश’ हा बंगाली लोकांचा सर्वांत आवडता पदार्थ. नारळाच्या पानात किंवा केळीच्या पानात इलिशला मोहरी आणि खसखशीच्या वाटणात मॅरीनेट करून वाफवून घेतात. ज्यामुळे या मासळीला अनोखी आणि समृद्ध चव मिळते. वाफाळलेल्या गरम गरम भातासोबत ‘भापा इलिश’ आहाहा! काय भारी लागतो!!

दुर्गापूजा स्पेशल पायस

माझे गोड पदार्थांशी फारसे जमले नाही पण या दिवसांत खास कोलकात्यावरून मिठाईवाले बोलावले जातात आणि खास ताजी ताजी बंगाली मिठाई बनवली जाते. ‘रसगुल्ला’, ‘चमचम’, ‘पायस’, ‘सोंदेश’ अशा एकापेक्षा एक बंगाली मिठाया डोळ्यासमोर असताना त्या न खाणे म्हणजे गुन्हाच ठरतो!

खजुराचा गूळ घालून बनवलेली ‘पायस’ हा आणखी एक अत्यंत आवडता पदार्थ. आमच्या शेजारी रॉय चौधरी काकू अतिशय चविष्ट अशी खजुराच्या गुळाची पायस बनवायच्या. त्यांची आठवण काढून आता मीदेखील दरवर्षी अष्टमीला नाही तर नवमीला ही पायस बनवते. यात सगळ्यात अतिशय वेगळी गोष्ट म्हणजे खीर शिजताना यात ‘तमालपत्र’ घातली जातात.

एरवी आपण तमालपत्राचा उपयोग मसाल्याच्या पदार्थांमध्ये करतो. पण या खास अशा बंगाली पायसमध्ये तमालपत्र वापरले जाते. ही खीर शिजायला लागली की घरभर त्यातील खजुराच्या गुळाचा आणि तमालपत्राचा सुगंध दरवळत राहतो. अशी खीर म्हणजे स्वर्गीय सुख.

बंगाली खाद्यसंस्कृती मासळीशिवाय अपूर्ण आहे. ‘हीलिश’ (हिल्सा) मासळी म्हणजे बंगाली लोकांचा जीव की प्राण. हिल्सा मासळीची करी आणि तीदेखील मोहरीच्या तेलात शिजवलेली मिळाली तर अस्सल बंगाली त्यावर तुटून पडेल. गरमगरम भात आणि हिल्सा फिश करी चवीने खाणारे दुर्गापूजेच्या पेंडॉलमध्ये अनेकजण दिसतात.

याशिवाय ‘आलूर दम’ आणि ‘लूची’, ‘पुचका’(पाणीपुरी), ‘बेगून भाजा’ हे पदार्थ तितकेच आकर्षित करतात. दुर्गापूजेचे दिवस माझ्यासाठी हक्काने बंगाली पदार्थ खाण्याचे दिवस असतात. महाराष्ट्र - गुजरात आणि बंगाल सांस्कृतिकदृष्ट्या आणि खाद्यसंस्कृतीच्या अंगाने विचार केला तर अतिशय वेगवेगळे प्रदेश आहेत.

गुजरात - महाराष्ट्रात नऊ दिवस उपास करून नवरात्र साजरा करतात. पण बंगाली लोक बघा अतिशय उत्तम खाऊनपिऊन दुर्गापूजा साजरी करतात. या तीनही राज्यांत नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते आणि तितक्याच भिन्न भिन्न पद्धतीच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन या दिवसांत घडते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com