गोव्याला (Goa) वसाहतवादाच्या (Colonialism) बंधनातून मुक्त करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी मूकपणे काम केले. त्यांचे योगदान दुर्लक्षित झाले कारण त्यांना तुरुंगवास भोगावा लागला नाही. त्यांनी त्यांच्या योगदानाची प्रसिद्धीही केली नाही. ते खरे राष्ट्रवादी होते. ते पोर्तुगीजांच्या (Portuguese) जोखडातून गोवा मुक्त करण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले आणि लढले. परंतु प्रसिद्ध झाले नाहीत. गोवा मुक्तिलढ्यातील अशाच एक मूक कार्यकर्त्या म्हणजे श्रीमती शरद विश्वनाथ गुडे.
मडगाव येथे श्री. शांतानंद नाडकर्णी यांच्या घरी शरदताईंचा जन्म झाला. मडगावात कु. शरद शांतानंद नाडकर्णी या नावाने त्या ओळखल्या जात. त्या सांगायच्या, ज्या काळात मुली आपल्या घरातल्या राजांगणाच्या चार भिंतीत बंदिस्त असायच्या. त्यांची कारकिर्द घरापुरतीच मर्यादित असायची, त्या काळातही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कार्यावर अथवा त्यांच्या प्रयत्नावर निर्बंध घातले नाहीत किंवा विरोध केला नाही. त्यांच्या घरात त्या चार बहिणी आणि दोन भाऊ, अशी एकूण सहा भावंडे होती. 1953 च्या सुमारास शरदताईंचा परिचय गोवा मुक्ती लढा आणि गोपाळ आपा कामत, पांडुरंग मुळगावकर यांच्यासारख्या मुक्तिवीरांशी झाला.
धारवाड येथे आपली एसएससी परीक्षा पूर्ण करून त्या मित्रा बीर यांना सामील झाल्या. मित्रा बीर या मुक्ती लढ्यात सक्रियपणे कार्यरत होत्या. तत्काली त्यांचे नाव मित्रा काकोडकर (पूर्वाश्रमीचे नाव) असे होते. पेशाने त्या शिक्षिका होत्या. 1954-55 हे वर्षे बहुतेक स्त्रियांच्या मुक्ती लढ्यातील सहभागाला साक्ष देणारे ठरले. विशेषत: सिंधू देशपांडे आणि सुधाताई जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली अनेक महिलांनी गोवा मुक्ती लढ्यात उडी घेतली. कुमुदिनी पैंगीणकर, सूर्यकांती फळदेसाई, शशीकला होडारकर, शालिनी लोलियेंकर या बहुतेक दक्षीण गोमंतकीय स्त्रियांचा त्यात समावेश होता. वास्तवतः, पोर्तुगीजांच्या विरोधात सत्याग्रह करून तुरूंगात गेलेल्या कार्यकर्त्यांसाठी त्या काम करायच्या.
मडगाव येथील भाटीकर हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत असताना शरदताई तुरुंगात असलेल्या मुक्तीवीरांसाठी काम करू लागल्या. त्यांच्यासाठी औषधे आणणे, संदेश पोहोचविणे, अन्न देणे, तुरुंगवास भोगणाऱ्या मुक्तीवीरांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे, मुक्ती वीरांसाठी अशी कित्येक कामे करून शरदताईंनी मुक्ती लढ्याच्या कार्यात आपली भूमिका बजावली. त्यांना तुरूंगवास भोगावा लागला नाही. शरदताई नॅशनल काँग्रेस (गोवा) या प्रमुख सत्याग्रही संघटनेच्या सदस्य होत्या. विश्वनाथ गुडे, जे नंतर त्यांचे पती झाले, ते एक प्रमुख आणि समर्पित स्वातंत्र्यसैनिक होते. 17 फेब्रुवारी 1955 च्या सत्याग्रहात सहभाग घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. रेईश मागूश येथील तुरूंगात त्यांना डांबण्यात आले होते.
गोवा मुक्त झाल्यानंतर कु शरद नाडकर्णी यांनी श्री. विश्वनाथ गुडे यांच्याशी विवाह केला आणि त्या सौ. शरद विश्वनाथ गुडे बनल्या. या दांपत्याने आपले जीवन शेतीसाठी वाहून घेतले. शरदताई बालवाडीत रुजू झाल्या आणि नंतर त्यांनी शाळा उघडली. श्री विश्वनाथ आणि सौ. शरद गुडे यांचे जीवन समर्पण, साधेपणा आणि कठोर परिश्रमांनी भरलेले होते. गांधीजींनी मांडलेली स्वतंत्र भारताची संकल्पना त्यांच्या जीवनास पूरेपूर लागू पडणारी होती. श्री. विश्वनाथ यांचे कमी वयातच निधन झाले आणि त्यांच्या पत्नी शरद यांनी आपल्या दिवंगत पतीने कृषी क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य पुढे नेले.
28 डिसेंबर 2021 रोजी वयाच्या 86व्या वर्षी शरदताई यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉ. विशाल, रमिश आणि नातवंडे असा परिवार आहे.
गोवा मुक्ती लढ्यातील या वीरांगनेला श्रद्धांजली... सलाम त्यांच्या कार्याला... जय हिंद, जय गोमंतक.
प्रसिद्धीपासून अलिप्त राहून गोव्याच्या मुक्तिलढ्यात आपले योगदान देणाऱ्या शरद गुडे याना याच सप्ताहात, 28 डिसेंबर 2021 रोजी वयाच्या 86व्या वर्षी देवाज्ञा झाली. या तेजस्वी वीरांगनेचा हा परिचय...
मुक्तिलढ्यातली वीरांगना श्रीमती शरद गुडे
-प्रजल साखरदांडे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.