आईसारखे दैवत..

स्त्री, आई झाली की ती परिपूर्ण झाली असा समज आपल्या समाजात आहे.
Mother
MotherDainik Gomantak

श्रद्धा केणी डिकुन्हा

देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे,जीवन देई मम बाळाला....’ फक्त आईच्याच तोंडून असे शब्द निघतील.

आई म्हणजे प्रत्यक्ष न पाहिलेल्या देवाचे रूप, ममतेचा सतत पाझरणारा झरा, आभाळमाया, प्रेमाचा महासागर, प्रेमाची सावली, आधार देणारा वटवृक्ष, दुधावरची मऊ साय अशा असंख्य उपमा आईसाठी वापरलेल्या ऐकत आपण लहानाचे मोठे होतो.

साने गुरुजी लिहितात, ‘माझी आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू’. तर प्रख्यात मराठी कवी यशवंत म्हणतात, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’. अत्यंत नि:स्वार्थीपणे, आपल्या मुलांवर बिनशर्त प्रेम करणारी, स्वतःआधी आपल्या मुलांच्या भल्याचा विचार करणारी, मुलांच्या व्यक्तिगत, नैतिक, वैचारिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी, आपल्या मुलांसाठी सतत देवाकडे प्रार्थना करणारी व्यक्ती, जिचे आपल्या मुलांशी नाते इतर कुठल्याही नात्यापेक्षा नऊ महिने जास्त असते, ती म्हणजे आई.

आईच्या भावनांचे विविध पैलू दाखवून जातात. प्रत्येक आईचे अतिशय प्रिय काम म्हणजे स्वतः बनवलेले पदार्थ पोट फुटेपर्यंत मुलांना खाऊ घालणे. विवाहित मुलगी माहेरी येणार म्हटल्यावर ती घुसलीच स्वयंपाकघरात.

Mother
बदलत जाणारा आपला रमणीय भूप्रदेश

स्त्री, आई झाली की ती परिपूर्ण झाली असा समज आपल्या समाजात आहे. हे चुकीचे आहे की बरोबर त्यावर मी इथे चर्चा करणार नाही. पण, मला असे विचारावेसे वाटते की स्त्रीमध्ये मातृत्वाच्या भावना जर उपजतच असतात, तर ती कुठल्याही मुलांवर प्रेम करू शकते, त्यांची आई होऊ शकते, नाही का?

यशोदा नाही का श्रीकृष्णाची आई झाली? कर्णाला राधा नावाच्या स्त्रीने सांभाळले नाही का? राणी लक्ष्मीबाईंनी नाही का दत्तक मुलाला वाढवले? मग एखादी स्त्री काही कारणाने मूल जन्माला घालू शकली नाही तर तिला समाजात अवहेलना का सहन करावी लागते? तिच्यावर वांझपणाचा शिक्का का बसतो? विचार करण्यासारखी बाब आहे ना?

आणि जेव्हा ती मुलाला 9 महिने गर्भाशयात वाढवून, बाळंतपणाच्या वेदना सहन करून, जन्म देते तेव्हा तिचा पुनर्जन्मच होतो नाही का? मग या सगळ्यामुळे तिने खूप महान काहीतरी केले असेही म्हटले जात नाही. मुलांच्या नावापुढे तिचे नावसुद्धा लावता येत नाही.एखाद्या स्त्रीचा बाई ते आई हा प्रवास अत्यंत खडतर असतो असे म्हटले तर ते गैर नसावे.

कारण जन्माला येणारे मूल कसे असेल या भावनिक आधाराने सुरुवात झालेल्या या प्रवासाचे गंतव्य स्थान त्या स्त्रीचा अंत हेच असावे, कारण त्यानंतर ती आई म्हणून ओळखली जाते.

या अथक प्रवासात तान्ह्या बाळावर सतत लक्ष ठेवणारी, मूल बसायला, चालायला लागताना पडू नये म्हणून काळजी घेणारी, आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर मुलाचे एक थेंब रक्त दूरच, मुलांना होणारी छोटीशी वेदना बघून कासावीस होणारी, मुलांच्या आनंदात आनंद मानणारी आणि डोळे कायमचे बंद होईस्तोवर मुलांच्या दर्शनाची इच्छा बाळगणाऱ्या आई या व्यक्तीबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडले तर नवल नाही.

काही अपरिहार्य कारणांमुळे एखाद्या आईला आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवण्यासाठी मनावर दगडच ठेवावा लागतो. आईसाठी तिचे मूल कायम लहानच राहते, असे म्हणतात. उपदेशांचे बाळकडू ती कायम मुलांना पाजत असते. या प्रवासात तिच्या वाट्याला बरेचदा उपहास येतो, टोमणे मिळतात.

मुले नीट वागत नसतील, त्यांना वाईट सवयी असतील तर आईला दोषी ठरवले जाते. मुलींना आईने चांगले वळण लावले नाही, तर मुलाला जास्त लाड करून बिघडवला असे म्हटले जाते. पण व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमांनुसार जितक्या ‘आया’ तितक्या संगोपनाच्या व्याख्या, असे असावे. तरीही, क्वचितच एखादी आई अशी असेल जी आपल्या मुलांना वाईट वागायला शिकवेल.

प्रलोभनांना बळी पडणे हा मनुष्यस्वभाव, काही मुले वाट चुकतात, आईची शिकवण विसरतात. त्यात आईचा काय दोष? मानसशास्त्रात परफेक्शनिस्ट, अनप्रेडिक्टेबल, फ्रेंडली, मी फर्स्ट, आणि कम्पलीट असे आयांचे प्रकार सांगितले आहेत. शब्दांच्या अर्थावरून आपल्याला स्वभावाची कल्पना येईल.

Mother
Restaurant: नावाप्रमाणे ‘सुरबूस'

आजच्या आईची एक नवीन संकल्पना म्हणजे ‘सुपरमॉम’. ही आई पारंपरिक बालसंगोपन, घरगृहस्थी संचालन, मुलांचे शिक्षण, आरोग्य, खेळ, कला प्रशिक्षण ई.,परिपूर्ण आहार, मुलांच्या भावनिक गरजा यांचा योग्य समन्वय साधून स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरीही उत्तम पद्धतीने चालू ठेवते. थोडेसे माझ्या आईबद्दल आजच्या दिवशी मी लिहू इच्छिते.

तिच्या आईचा सहवास तिला फक्त अकरा बारा वर्षेच लाभला आणि याची खंत तिला कायम राहिली होती. खूप जुनाट मतांच्या आजीने तिचे संगोपन केले. माझ्यासाठी तिचे नियम खूप कडक होते. संध्याकाळी सातच्या आत घरी हा त्यापैकी एक. मुलीच्या जातीने, कसे वागावे, गृहकृत्यदक्ष कसे व्हावे ह्यावर सखोल अभ्यास होता तिचा आणि त्या सर्वांचे मला सतत धडे दिले जायचे.

तिच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नसे. खरे सांगायचे तर बरेचदा जाचक वाटायची तिची विचारसरणी, राग यायचा. आमची शाब्दिक चकमक व्हायची, मग माझा अबोला, उपोषण, माफी... आणि मग अत्यंत आवडीची सुरक्षित जागा, तिच्या कुशीत शिरून मी रडले की सारे मार्गी लागायचे.

दिसायला खूप सुंदर, वडीलधाऱ्यांचा मान ठेवणारी, कलाकुसरीची अफाट आवड असलेली, मनमिळाऊ पण बरीचशी बुजरी, स्वाभिमानी, स्वतःची मते, मी सोडून कोणासमोर तिला कधीच स्पष्टपणे मांडता आली नाहीत.

आज जेव्हा कोणी मला, मी माझ्या आईसारखी दिसते, तिच्यासारखी वागते असे म्हणतात तेव्हा मला धन्य धन्य वाटते आणि विचारांअंती माझ्या संगोपनात तिचा वाटा अधिक आहे याचा अभिमान वाटतो.

मीसुद्धा एका प्रौढ मुलाची आई आहे.् आदर्श आई हे थोडे पुस्तकी ज्ञान आहे असे मी समजते. कारण प्रत्येक आई ही आपल्याला प्राप्त झालेल्या कौटुंबिक, आर्थिक सामाजिक परिस्थितीनुसार योग्य तारतम्याने विचार करून, प्रसंगी अनेक आव्हाने स्वीकारून, आपल्या मुलांचे संगोपन करते.

ती कधी चुकत असेल, थकत असेल, कुठे तरी कमी पडत असेल, दु:खी, अपमानित होत असेल, दुबळी ठरत असेल. पण आपल्या मुलांसाठी, त्यांच्या उत्तम वर्तमान आणि उज्ज्वल भावी जीवनासाठी ती सतत प्रयत्नशील राहते. मुलांसाठी आपली आई हीच आदर्श आई असते. खरे तर आईचा दिवस रोजच असतो, ती असली तरी आणि नसली तरी....

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com