Restaurant: नावाप्रमाणे ‘सुरबूस'

स्वतः लक्ष घातल्याशिवाय त्या रेस्टोरन्टमधील पदार्थांची विश्वासार्हता कमवता येत नाही.
Restaurant
RestaurantDainik Gomantak
Published on
Updated on

मनस्विनी प्रभुणे-नायक

गेला संपूर्ण महिना पुरुमेंत फेस्तच्या तयारीत व्यग्र होते. गावागावांतल्या ‘तनिष्का व्यासपीठ’च्या महिलांसोबत बसून पुरुमेंत फेस्ताला लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची आमची तयारी सुरू होती. एक दिवस काणकोण - खोतीगावातली मीटिंग करून पणजीत पोहोचायला उशीर झाला. आता घरी जाऊन काहीतरी बनवून मग जेवायचे याचा कंटाळा आला होता.

अशातच नवऱ्याने बाहेर जेवायला जायचा छान ‘सिक्रेट प्लॅन’ केला. अशा गोष्टी आपोआप आपल्याला न कळता ठरल्या की छान वाटते आणि त्याच्या या प्लॅनमध्ये आमचे मित्र - सोबती दिलीप बोरकरदेखील सहभागी होते म्हटल्यावर जेवणाची चव आणखीनच वाढणार हे तर होतेच.

तर या सिक्रेट प्लॅनमध्ये मुख्य भूमिका पार पाडणारे कोणते रेस्टोरंट आहे? कुठे जेवायला जाणार आहोत? हे सगळे अगदी छान लपवून ठेवले होते. ऑफिसमधून बाहेर पडून सांतिनेजच्या आतल्या रस्त्याला लागलो आणि नव्याने सुरू झालेल्या ‘सुरबूस’ रेस्टोरंटच्या दारात थांबताच मुख्य भूमिका निभावणारे, इतक्या वेळ सिक्रेट असणारे ठिकाण समोर होते.

Restaurant
Holy Spirit Church: होली स्पिरिट चर्चचे वैभव

पणजीत सुरबूस सुरू होऊन बरेच दिवस होऊन गेले. पण आम्हाला मुहूर्त सापडत नव्हता. कधीतरी निवांत जाऊ या असे म्हणत ते राहूनच जात होते. अचानक ठरलेल्या अशा ‘सिक्रेट प्लॅन’मुळे सुरबूसमध्ये जाणे जुळून आले.

सुरबूस नाव ऐकताच या शब्दाचा अर्थ काय असावा, हेच पाहिले डोक्यात आले. सुरबूस शब्दाचे वर्णन ऐकताना ‘अरे याला आम्ही ‘सुग्रास’ म्हणतो’ हे पटकन ओठावर आले. पण मला सुरबूस शब्द आवडला. नवीन शब्द समजला की मी तो अनेकवेळा आळवत राहते. जेणे करून तो आपल्या तोंडात बसावा.

सुरबॉ हा तर स्वयंपाकाशी संबंधित शब्द. हा तर मला लक्षात ठेवायला हवा. सुरबूस हे नावाप्रमाणेच खरोखर सुग्रास आहे. तसे हे रेस्टोरंट आमच्या ऑफिसच्या जवळ असल्यामुळे ऑफिसमधले अनेक सहकारी तिथे जेवून आले होते. यातल्या उत्साही मंडळींनी रील करून आपल्या स्टेटस -इन्स्टा अकाउंटवर शेअरदेखील केलेले.

यातून मिळालेली सुरबूसची छोटीशी झलक तिथे जायला खुणावत होती. मग कोणाकडून तरी समजले की पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांचे हे रेस्टोरंट. त्यांचा मुलगा अद्वय मडकईकर सुरबूसमध्ये पूर्णवेळ असतो. घरातली नवी - तरुण पिढी व्यवसायात लक्ष घालते, हेच महत्त्वाचे.

Restaurant
ब्राह्मण व कोकणी आदिपर्वाचे काय झाले

सुरबूस हे मासळीसाठी प्रसिद्ध आहे. पणजी शहरात दुपारी ‘फिशकरी राइस’ थाळीची सर्वांत जास्त मागणी असते. त्यामुळे उत्तम फिशकरी राइस थाळी देणाऱ्या रेस्टोरंटमध्ये भरपूर गर्दी होते. सुरबूसमध्ये अशीच उत्तम ‘फिशकरी राइस’ थाळी मिळते. याशिवाय सीफूड - चिकन -मटणमधील विविध चविष्ट प्रकार प्रसिद्ध आहेत.

आम्ही इथला ‘भरलेला रेषाद बांगडा’ खाऊन बेहद्द खुश झालो आणि त्याचे कारण रेषाद मसाला. बहुतेक रेस्टोरन्टमध्ये रेषाद मसाल्यामध्ये व्हिनेगर घातलेले असते. पण घरगुती पद्धतीने रेषाद मसाला बनवताना त्यात चिंचेचा जास्त वापर करतात.

व्हिनेगर आणि चिंच घालून केलेल्या रेषाद मसाल्याची चव एकदम वेगळी लागते. मला चिंच घालून केलेला रेषाद मसाला जास्त आवडतो. सुरबूसमधला रेषाद मसाला हा चिंच वापरून केलेला घरगुती मसाला आहे. त्यामुळे इथला रेषाद बांगडा अतिशय रुचकर लागला.

सुरबूसचे शेफ अतिशय उत्साही आहेत. ‘स्टार्टर’ बनवण्यासाठी आपल्या कल्पकतेचा वापर करतात. नवनवीन पदार्थ तयार करून खवय्यांपुढे सादर करत असतात. मका(कॉर्न) घेऊन त्यांनी इतक्या चविष्टपणे ‘स्टार्टर’ बनवून आमच्यासमोर ठेवले की आमच्या रंगलेल्या गप्पांमध्येदेखील रंगत आणली.

कॉर्न म्हणजे टाइमपास असे नेहमी वाटते. पण यावेळी कुरकुरीत आणि माफक मसाला घातलेले कॉर्न फारच आवडले. तुम्ही सुरबूसमध्ये दुपारी जाणार असाल तर मुद्दाम फिशकरी थाळी खाऊन बघा आणि तुम्ही रात्री तिथे जाणार असाल तर मात्र वेगवेगळ्या प्रकारची मासळी खाऊन बघा.

Restaurant
बदलत जाणारा आपला रमणीय भूप्रदेश

अगदी नावाप्रमाणे सुरबूस असण्यामागचे रहस्य आम्हाला तिथे गेल्यावर उलगडले. उदय मडकईकरांना आपण पणजीचे माजी महापौर म्हणून ओळखत असलो तरी अस्सल गोमंतकीयांप्रमाणे त्यांचादेखील जीव मासळीत आहे. अगदी महापौर असतानाही त्यांना आम्ही अनेकदा भल्या सकाळी मासळी बाजारात खरेदी करताना बघितले आहे.

अतिशय बारकाईने मासळी निवडण्यात ते मश्गूल असतात. चोखंदळ असण्याची वृत्ती त्यांच्या फिश बास्केटमध्ये उत्तम प्रतीच्या मासळीची भर घालते आणि त्यांच्या मासळीप्रेमामुळे सुरबूसमध्ये आपण डोळे मिटून मासळी खाऊ शकतो. आम्ही खूपच अचानक सुरबूसमध्ये गेलो होतो त्यावेळी उदय आणि अद्वय दोघेही होते.

‘चांगली मासळी निवडण्यासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायला आवडत नाही. रेस्टोरन्टच्या व्यवसायात बरेचजण एजन्टवर अवलंबून राहतात. पण इथेच फसवणूक होते म्हणून मी स्वतः सकाळी मासळी बाजारात जाऊन मासळी खरेदी करतो.’ असे सांगून आपल्या रेस्टोरन्टमध्ये मिळणाऱ्या ताज्या मासळीचे रहस्य त्यांनी सांगून टाकले.

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी म्हण आपण अनेकदा वापरत असतो. रेस्टोरंट व्यवसायात यशस्वी झालेल्या अनेकांच्या यशाचे रहस्य हेच आहे. स्वतः लक्ष घातल्याशिवाय त्या रेस्टोरन्टमधील पदार्थांची विश्वासार्हता कमवता येत नाही. इथे तर वडील आणि मुलगा दोघेही मासळी खरेदीपासून ते किचनमध्ये स्वतः लक्ष घालतात. त्यामुळे वेगळे काही बोलायला नको.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com