

लॅटिन भाषेतून जन्माला आला 'नाताळ'
Dainik Gomantak
"दिएश नातालीस’ ह्या लॅटिन शब्दावरून आलेला शब्द म्हणजे नाताळ. गोंयकारांची ‘नातलां’! त्याचा शब्दशः अर्थ आहे, ‘जन्माचा दिवस’! परमेश्वरी अंश घेऊन जन्मलेल्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. इसवी सन चौथ्या वर्षी 24 डिसेंबरच्या उत्तररात्री पॅलेस्टाईन देशातील बेथलेहेम गावात गुरांच्या गोठ्यात योसेफ आणि मारिया यांच्या पोटी येशूचा जन्म झाला.
हा सण (Festival) मुळात रोममध्ये साजरा करण्यात येई. रोमन लोक मुळातच सूर्योपासक. सुर्यालाच ते आपला राजा मानत. त्या गोलार्धात सप्टेंबरपासून दिवस लहान व रात्री मोठ्या होत जातात. त्यामुळे कडाक्याची थंडी पडते. परंतु 22 डिसेंबरच्या आसपास तेथे दिवसाचा काळ वाढू लागतो व त्याचे दृश्य परिणाम 25 डिसेंबरला दिसून येतात म्हणून 25 डिसेंबरला सूर्याचा जन्म होतो व त्यानंतर तो दिसामासी वाढत जातो अशी रोमन लोकांची धारणा. सूर्यदेवाचा जन्मदिन तोच येशूचा जन्मदिवस ठरवण्यात आला असंही मानलं जातं.
प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला या घटनेची आठवण म्हणून नाताळाच्यावेळी प्रत्येक कुटुंबात गोठ्याची प्रतिकृती तयार करून बाळ येशु, माय मारिया व सेंट योसेफ यांच्या प्रतिमा ठेवतात. ख्रिसमस ट्री (Christmas tree) आणि हिरव्या गवताने गोठा सजवला जातो. नक्षत्रे, बाहुल्या, खेळणी, फुले-फळे. पताका, फुगे इत्यादी क्रिसमस ट्रीला लटकावली जातात. नाताळात ख्रिसमस ट्रीला कंदील लटकावून सभोवताल प्रकाशमान करण्याची प्रथा दिसते. ही प्रथा मार्टिन ल्युथरने जर्मनीमध्ये (Germany) सुरू केली. पुढे जर्मनीमधून ती व्हिक्टोरिया राणीच्या काळात इंग्लंडमध्ये शिरली व रूढ झाली. ख्रिस्त जन्माच्यावेळी ईश्वराने बेथेलेहममध्ये पाठवलेल्या प्रकाशमान नक्षत्राची आठवण म्हणून या सणात नक्षत्रांचा वापर सजावटीत दिसतो. गोव्यात (Goa) काही वर्षांपूर्वी सुरूच्या झाडांच्या फांद्या ख्रिसमस ट्री म्हणून सर्रास वापरल्या जायच्या. अलीकडे ख्रिसमस ट्री म्हणून त्या झाडाच्या प्लास्टिकच्या लहान –मोठ्या प्रतिकृतीच वापरल्या जातात.
मित्रांना, नातेवाईकांना, नाताळाच्या (Christmas) निमित्ताने खास भेटकार्डे पाठवली जातात. या भेटकार्डांवर ख्रिस्ती धर्मातील विविध सण, सांताक्लॉज (Santa Claus), ख्रिसमस ट्री, नक्षत्रे, क्रॉस, शुभ्र कबूतर यां प्रतिमांचा समावेश असतो. पहिले व्यावसायिक भेटकार्ड सर हेन्नी कोल यांनी लंडनमध्ये इसवी सन 1843 मध्ये तयार केले असा भेटकार्डांचा (Greeting card) इतिहास सांगतो. आता तर दीपावली (Diwali) , नववर्ष (New Year) , वाढदिवस (Birthday) आणि इतर महत्त्वाच्या सण-समारंभाच्या (Festival) निमित्ताने व्यावसायिक भेटकार्डांची आणि ई-कार्डांची चलती जगभर आहे.
‘सांताक्लॉज बाबा’ तर नाताळाचे विशेष आकर्षण! त्याचीही कथा खूप मनोरंजक आहे. मूळ सांताक्लॉजला म्हणे दीड फूट लांब पांढरी दाढी होती. हा सांताक्लॉज कोण तर निकोलस बिशप. तो ख्रिस्त जन्मानंतर तीनशे वर्षांनी जन्मला. तो दयाळू व आनंदी वृत्तीचा होता. लोक त्याला आनंद यात्री म्हणतात. पुढे तो सेंट निकोलस झाला आणि नंतर, ‘सांताक्लॉज’ म्हणून परिचित झाला. जुन्याकाळी गोव्यात (Goa) त्याला ‘ज्याकी तिव’ या नावाने ओळखत. त्याचा वेश म्हणजे लाल रंगांचा पायघोळ डगला, लांब पांढरीशुभ्र दाढी. त्याच्याकडे कधीही न संपणाऱ्या खाऊची व खेळण्याची पोतडी असते. तो सहा हरणांच्या गाडीत बसून नाताळाच्या रात्री जगभर फिरत असतो आणि तो चांगल्या मुलांना खाऊ आणि खेळणी वाटतो.
गोव्यातील (Goa) ‘नातलां’ हा जगात साजऱ्या होणाऱ्या नाताळसणाची प्रतिकृती. अपवाद आहे तो फक्त येथील पारंपारिक खाद्यपदार्थांचा. पोर्तुगीजांनी (Portugal) गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले. त्यांच्या रीतीरिवाजांचे पडसाद येथील सामाजिक आणि खाद्य संस्कृतीवर उमटले. गोव्यात रोमन कॅथलिक लोकांची संख्या अधिक आहे. गावोगावी असणाऱ्या चर्चबरोबरच इथे मोठमोठ्या जगप्रसिद्ध अशी प्राचीन चर्च आहेत. त्यामुळे घराघरातून नातलांची धूम सुरू असते. ख्रिसमस ट्री, ख्रिस्त जन्माचा गोठ्यातील देखावा, कॅरल गायन, सांताक्लॉज, (Santa Claus) परस्परांना दिली जाणारी नातलांची परबी, भेटवस्तू अशा जल्लोषपूर्ण वातावरणात नाताळ साजरा होतो.अशा या नातलांची सर्वांना परबी!
- नारायण महाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.