Air Quality
Air QualityDainik Gomantak

Air Quality: हवी हवी अशी हवा

’हवा’ या सृष्टिघटकात केवढा मोठा आशय भरून राहिला आहे! वायू हा पंचमहाभूतांपैकी एक.

कमलाकर द. साधले

मागच्या लेखाच्या शेवटी आपण अशा निष्कर्षाप्रत आलो की, आपल्या गरजा जेवढ्या आपण आपल्या परिसरातील सृष्टिव्यवस्थेतून घेऊ तेवढे आपण स्वावलंबी बनू आणि इतरांच्या परिसराला बाधा आणणार नाही.

हे आपण येथील ऊन, पाणी, पाऊस, वारा, भूमी, वनस्पती-जीवसंपदा या सृष्टिघटकांतून घेऊन, सृष्टितत्त्वे, आपली विचारसंपदा, श्रम व कौशल्ये यांचा वापर करून स्वस्थ-संपन्न - शाश्‍वत अशा व्यवस्थेची बांधणी करू शकू.

हवा ही पहिली गरज, आपल्याला मिनिटामिनिटाला लागणारी, जी आपण थेट सृष्टीतूनच घेतो. जेथे बाजार- कारखानदारीची, सरकारची आणि त्यांच्या तंत्रकारीची लुडबुड झाली नाही तेथे ती सृष्टिव्यवस्थेनुसार शुद्धच राहणार.

वस्तीत, गावात, शहरात जेवढ्या प्रमाणात ही लुडबुड कमी करू शकू तेवढी तेथील माणसे श्‍वसनाच्याच नव्हे तर अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्त राहतील. हवेत प्रदूषके पसरण्यात प्रमुख भूमिका कारखानदारीची.

Air Quality
Land Amendment Act : जमीन कायदा दुरुस्ती ही भांडवलदारांच्या हिताची-नगरनियोजनच्या सदस्यांचा सूर

पण वस्तीत प्रदूषण आणणारी ती वाहने, पेट्रोल- आणि -डीझेल सर्वांत जास्त. त्याला थोडा कमी प्रदूषणकारी पर्याय आहे नैसर्गिक ज्वलनवायूंचा (सीएनजी), विजेवर चालणाऱ्या वाहनांचे प्रदूषण त्याहूनही कमी वाटेल. पण, भारतात 75 टक्के वीज ही कोळसा जाळून तयार होते.

वापराच्या ठिकाणी नसेल पण, दूर वीज उत्पादनाच्या ठिकाणी प्रदूषण म्हणजे आपल्याच पृथ्वीच्या वायुमंडलात राहणार आहे. शिवाय सर्वच प्रकारची जलदे वाहने ही धूळ प्रदूषण आणि कमीजास्त प्रमाणात ध्वनिप्रदूषणही करतातच.

याला एक दीर्घकालीन उपाय म्हणजे नगरनियोजनाची रचनाच बदलणे, वाहनमार्ग कमी करणे. वाहनांची संख्या आणि वापर कमी होईल, अशा प्रकारची नगररचना हा एक दीर्घकालीन उपाय, नागरी व्यवहारात चलनवलनात कुठेही अडचण, गैरसोय होणार नाही, अशा प्रकारे ती बनविणे शक्य आहे. त्यातून रस्त्यांचा खर्चही कमी येतो. सुरक्षितता वाढते.

लोकसंख्येची घनता तीच राहूनही मोकळ्या जागा वाढतील. केवळ हवेची शुद्धता वाढेल एवढेच नव्हे तर इतर अनेक उपलब्धी प्राप्त होतील. हवेचा, वायुमंडलाचा दर्जा ज्यातून सुखदता व शांततेचा लाभ होऊ शकतो त्याची गुणात्मकता म्हणजे तापमान आणि ध्वनी ऊर्फ गोंगाटाची पातळी, वाहतुकीच्या या नव्या व्यवस्थेत या दोन्हीत सकारात्मक बदल घडतो.

‘हीट होम’ म्हणजे गरम हवेचा घुमट शहराला व्यापून राहिलेला असतो. हे आजच्या शहराच्या पर्यावरणीय अवस्थेचे एक दोषपूर्ण वास्तव. त्याची तीव्रता शहराच्या मध्याला सर्वांत जास्त असते. बिनशहरी परिसर जवळ येतो तशी ती उतरू लागते.

इमारतींच्या गर्दीत सिमेंट-कॉंक्रीट, काचा, ऍल्युमिनियम क्लॅडिंग, वगैरे धातूंचा वापर, डांबरी किंवा कॉंक्रीटचे रस्ते, पेव्हर्स, फरसबंदी, हे सर्व उष्णता वाढविणारे घटक. ते आपण उरावर घेतो आणि उष्मा सोसवत नाही म्हणून शीतलीकरणासाठी एसी खरेदी करतो.

त्यातून आपल्याभोवती तात्पुरता भंडावा येतो पण परिसराची उष्णता अजून वाढते. झाडे, बागबगीचा, गवत, हिरवळ, पालापाचोळा (किंवा मातीची जमीनसुद्धा) एवढा उष्मा होऊ देत नाही. नदी, नाले, तलाव पाणथळी हे सर्व हवेतील उष्मा कमी करतातच, शिवाय ऊन, हवेतील कर्बवायू धूळ हे सर्व उपयोगात आणतात, गोंगाट शोषून घेतात आणि हवा स्वच्छ, शुद्ध शीतल, शांत बनवितात.

Air Quality
PM Kisan Samman Nidhi : ‘त्या’ अपात्रांवर कारवाईचा बडगा

यासाठी आपल्याला काहीही करावे लागत नाही. फक्त सृष्टिघटकांना या परिसरातून हटविले जाणार नाही याचीच दक्षता घ्यायची. विकासाच्या अतिरेकातून उद्भवलेल्या दुष्परिणामांचा मुकाबला फक्त ‘नॉन डुईंग’ने म्हणजे सृष्टिव्यवस्थेत लुडबुड न केल्याने होऊ शकतो हा केवढा चमत्कार आहे! वरील विवेचन हे ढोबळ विधानांचे नव्हे.

या परिणामांचा सशास्त्र अभ्यास झालेला आहे. परिणाम निरनिराळ्या वैज्ञानिक मापन साधनांनी मोजले गेले आहेत. काही वर्षांपूर्वी मला कोल्हापूरला प्रिंस शिवाजी आर्किटॅक्चर कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी बोलावले होते. दोन दिवस वर्गात व्याख्याने झाली.

तिसऱ्या दिवशी परिसरात जायचे ठरविले, जवळचाच रंकाळा तलावाचा परिसर निवडला. मी त्या तलावाच्या काठावरच साधारणपणे चारपाचशे मीटर अंतरावर या विद्यार्थी व शिक्षकवर्गाला एक-एक एकरची अशी दोन हवामान क्षेत्रे दाखवून दिली.

दोन्ही ठिकाणी एकाच वेळी तापमानाची नोंद केली. त्यांतील एका क्षेत्रात होते बांधकाम, सिमेंट कठडे, दगडी पायऱ्या यांचे. या परिसरापेक्षा त्याच वेळी झाडाझुडपांशिवाय काहीही नाही अशा क्षेत्राचे तापमान ५-६ अंशांनी खाली होते! पैशांशिवाय परिसर सुखदायी बनू शकतो!

Air Quality
Bicholim: लाडफे गावातील मंदीरातून चोरट्यांनी फंडपेटी पळवली, दहा हजारांची रक्कम चोरी

दिल्लीची सुप्रसिद्ध बिनसरकारी पर्यावरण संस्था सेंटर ऑफ सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट, तिच्या संचालिका सुनिता नारायण सांगत होत्या की एप्रिल मे महिन्यांमध्ये आपल्या लहानपणी मुले, पुरुष गच्चीवर उघड्या अंगणात झोपत होतो.

ही प्रथा भारतभर होती. घराबाहेरील परिसर सूर्यास्तानंतर लगेच गार होतो. घरात उष्णता पहाटेपर्यंत रेंगाळत असते. बाहेर संध्याकाळी झुळझुळ वारा, वाहत असतो. अशावेळी आकाशातील तारका बघत झोपण्यात काय मजा असते, हे मीही अनुभवले आहे.

रातराणी, जाई, चमेली यांचा सुगंध त्यांच्या बहराच्या दिवसांतील एक पर्वणी. आज डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. पूर्वी डास तिन्हीसांजेच्या वेळी अर्ध्या तासापुरते यायचे. आता रात्रभर डासांचा उपद्रव असतो. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आज बाहेर झोपणे टाळावे लागते.

याशिवाय जिकडे तिकडे उंच उंच इमारतींची गचंगडी, विजेच्या दिव्यांचा चकचकाट रात्री उशिरापर्यंत चाललेली वाहनांची रहदारी, त्यांचे आवाज, यामुळे सर्वजण स्वतःला घरात कोंडून घेणेच पसंत करतात.

Air Quality
Land Amendment Act : जमीन कायदा दुरुस्ती ही भांडवलदारांच्या हिताची-नगरनियोजनच्या सदस्यांचा सूर

’हवा’ या सृष्टिघटकात केवढा मोठा आशय भरून राहिला आहे! वायू हा पंचमहाभूतांपैकी एक. त्याला ‘प्राण’ असेही नाव आहे. ते अत्यंत समर्पक असेच आहे. कारण शरीरात हवेचे चलनवलन चालू आहे तोपर्यंत शरीर जिवंत असते.

ते थांबले की मृत्यू, अशा या सर्वांत महत्त्वाच्या घटकाबद्दल आजची व्यवस्था किती बेजबाबदारपणे वागत आहे! सृष्टिसंवर्धनातून आणि त्याला पूरक व्यवस्थापनातून आपण पुनः शुद्ध, गंधित, तजेलदार, हवेचा आस्वाद घेऊ शकतो.

आज रस्त्यातून येता-जाता वाहनांतून निघणारा जळका गरम हवेचा भपकारा, रस्त्याच्या कडेच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निघणारा, नाक मुठीत धरून चालायला लावणारा कुचकट वास, स्वत:च्या कृत्रिम थंडाव्यासाठी एसीच्या खोक्यातून स्वतःच्या घरातील उष्णता, बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर भसाभस फेकणारा उद्दाम वारा, धावत्या वाहनाद्वारे रस्त्यावरील धुळीचे लोट लोकांच्या अंगावर, नाकातोंडांत फेकणारा बेफिकीर वारा, काळ्याकुट्ट सांडपाण्यातून फसफसणारा विषारी दर्पयुक्त वारा, हे आजचे वास्तव जर हटवायचे असेल तर आपल्या गावांत, शहरांत योजकतापूर्ण सृष्टिसमृद्धीला पुनःस्थापित करणे हाच सर्वांत सोपा मार्ग आहे.

हवेतील भगभग कमी करून थंडावा, तजेला वाढविणे निरनिराळ्या फुलांच्या वासाने भारलेली गंधित हवा, पहिल्या पावसाला ‘मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा’ हेही शक्य आहे. पुढच्या अंकात पाण्याची शुद्धता, जलस्रोतांचे रम्य रूप आणि पाण्याच्या गरजेविषयी स्वावलंबन कसे साधता येईल, हे पाहू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com