भन्नाट चवीचं द आईस्क्रीम मॅन

मशीनमेड आईस्क्रीमचा काळ असताना कोणीतरी ‘हॅण्डमेड’ आईस्क्रीम करतो हे ऐकून कानाला छान वाटलं.
Ice Cream
Ice Cream Dainik Gomantak

मनस्विनी प्रभुणे नायक

मला माहीत नाही तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या बालपणात वडाच्या पानावर दिलं जाणारं आईस्क्रीम खाल्लं आहे. माझ्या बालपणी अशा पद्धतीचं आईस्क्रीम मिळायचं.

एक वृद्ध आजोबा डोक्यावर बादलीच्या आकाराचा डबा घेऊन यायचे त्याच्या आत आणखी एक डबा असायचा ज्यात गुलाबी रंगाचं आईस्क्रीम असल्याचं. त्या डब्यातलं आईस्क्रीम चपट्या चमच्याने काढून वडाच्या पानावर ते खायला द्यायचे. विरघळेल म्हणून पटकन खावं लागायचं. हे आईस्क्रीम खाण्यासाठी चमचा मिळायचा नाही. तसंच जिभेनं खायला सुरुवात करावी लागायची. ते वडाच्या पानावर मिळणार आईस्क्रीम पुढे परत कधीच खायला मिळालं नाही. आईस्क्रीम बनवण्याची पद्धत आता खूप विकसित झाली आहे.

आता कितीतरी प्रकारचं आईस्क्रीम मिळतं. पण तरीही अजून त्या जुन्या आईस्क्रीमची चव विसरली जात नाही. त्याकाळी भर दुपारी उन्हाच्या कडेला घंटा वाजवत कुल्फीवाला यायचा. २५ पैश्यांना छोटी आणि ५० पैश्यांना मोठी कुल्फी मिळायची. या कुल्फीसारखी चव देखील नंतर कधीच मिळाली नाही. या चवीचं रहस्य हेच कि हे सगळे प्रकार ''हॅण्डमेड'' आणि ''होममेड'' होते. आता सारखे सरसकट फॅक्टरी मध्ये बनवतात तसे नव्हते.

वडाच्या पानात मिळणारं अतिशय मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारं ते आईस्क्रीम घरी बनवलेलं असायचं. ते आजोबा गेले आणि त्यांच्यासोबत आईस्क्रीम देखील गेलं. या आठवणींनी ''नॉस्टॅलजिक'' व्हायला पणजीतील ''द आईस्क्रीम मॅन'' निमित्त ठरलं. माझी लेक आणि जावई ''द आईस्क्रीम मॅन''चे चाहते आहेत. त्यांच्यामुळे मी इथं गेले आणि तिथल्या ''हॅण्डमेड'' आईस्क्रीममुळे अनेक आठवणी जाग्या झाल्या.

कल्पक निर्मिती :

मशीनमेड आईस्क्रीमचा काळ असताना कोणीतरी ''हॅण्डमेड'' आईस्क्रीम करतो हे ऐकून कानाला छान वाटलं. प्रत्यक्षात ''द आईस्क्रीम मॅन'' मध्ये प्रत्येक आईस्क्रीमची चव घ्यायला छोट्याशा चमच्यात आईस्क्रीम देतात तरीही वेगवेगळ्या चवींचं आईस्क्रीम बघून कोणतं आईस्क्रीम खावं या संभ्रमात पडले. ''द आईस्क्रीम मॅन'' सुरु करण्यामागे जोशुआ अल्वारो अंताव हा अत्यंत कल्पक असा तरुण आहे.

Ice Cream
Watch Video: ‘या अल्लाह 8 साल के लिए मोदी को हमारा PM बना दो’, पाकिस्तानी व्यक्तीने केली कळकळीची विनंती

भन्नाट अशा कल्पना डोक्यात असणारा आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणाऱ्या जोशुआला मी ''काजू फेस्त''मध्ये बघितलं होतं. या फेस्तमध्ये त्यांनी ''निरो'' आणि ''हुर्राक'' आईस्क्रीमला पहिल्यांदा लोकांसमोर आणलं. ऐन कडकडीत उन्हाळ्याच्या दिवसात खवय्ये मंडळी अक्षरशः या दोन्ही आईस्क्रीमवर तुटून पडली होती. ''द आईस्क्रीम मॅन'' मधली अतिशय वेगळ्या चवींची आईस्क्रीम बघून जोशुआच्या ''निरो'' आणि ''हुर्राक'' आईस्क्रीमची निर्मिती लक्षात आली. या माणसाने काय आणि किती प्रकारच्या नवनवीन आईस्क्रीमची निर्मिती केली आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष इथं गेल्यावरच समजू शकेल.

ज्यांना ''दुग्धजन्य'' पदार्थ खाल्लेले चालत नाही अशा ''लॅक्टोज फ्री'' लोकांसाठी दुधाचा अंश नसलेलं आईस्क्रीम त्याने तयार केलं आहे ज्याला ''सोरबत'' असं छानसं नाव दिलंय. दुधाचा अंश नसलेलं आईस्क्रीम मिळणं आता दुरापास्त झालंय. इथं ते बघून मला लहानपणी खाल्लेल्या रंगीबेरंगी बर्फाच्या गोळ्याची आठवण झाली. जोशुआने बनवलेलं ''सोरबत'' आईस्क्रीम बर्फाच्या गोळ्यासारखं नाही तर त्यात बरेच नवे प्रयोग केले आहेत. स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, रासबेरी, लिंबू या फळांच्या रसाचा वापर करून आंबट गोड ''सोरबत'' आईस्क्रीम बनवलं आहे. शिवाय आत्ता आंब्याच्या हंगामात आंबा - मिरची आणि लिंबू पासून बनवलेलं आंबट-गोड -तिखट असं मँगो सोरबत आईस्क्रीम लोकांना फार आवडलं.

हंगामी फळांचं आईस्क्रीम :

इथल्या आईस्क्रीमची नावं वेगळी आहेच शिवाय त्यातील आगळेवेगळे घटक बघून त्याचं विशेषपण लक्षात येतं. माडाचा गूळ आणि नारळापासून बनवलेलं ''माडाचो गोड'' हे आईस्क्रीम, ऍप्पल पाय आईस्क्रीम, सेरॅदुरा आईस्क्रीम इथली खासियत आहेत. याशिवाय गोव्यातील हंगामी फळांचं आईस्क्रीम फारच वेगळ्या पद्धतीनं बनवतात.

बाकीच्या प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरमध्ये गोड गोड आईस्क्रीममुळे त्यात असलेल्या फळांची चव हरवून जाते. आम्ही गेलो तेव्हा जांभूळ आणि पेरूचं आईस्क्रीम होतं. जांभूळ आईस्क्रीमची चव अफलातून होती शिवाय या आईस्क्रीमवर मीठ आणि तिखट घालून दिलं. त्यामुळे हे आईस्क्रीम खाताना मजा आली.

''हेझलनट आणि चॉकलेट''. ''पिस्ताशिओ आणि व्हाइट चॉकलेट'', सॉल्टेड बटर कॅरॅमल'', अशी आंबट, गोड, तुरट, किंचित खारट, थोडीशी आंबट -तिखट चव असणारी आईस्क्रीम खाऊन बघायची आहेत. आजच्या घडीला एक आश्वासक गोष्ट घडतेय ती म्हणजे ''हॅण्डमेड'' आणि ''होममेड'' या प्रकारांना परत एकदा महत्त्व प्राप्त झालं आहे.

यामुळेच आज अनेकजण घरून नवनवीन पदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री करू लागले आहेत. जोशुआने कोरोनाच्या काळात घरी आईस्क्रीम बनवून बघितलं. त्याची चव सर्वांना आवडली आणि यातूनच ''द आईस्क्रीम मॅन''ची निर्मिती झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com