गोव्याची आपली अशी एक लय होती. सहज. साधेपणाची. या मातीत संगीत उपजत आहे. म्हणूनच कलाकार, गायक, वादक, संगीतकार उपजले. या सहज लयीत व ठेक्यात कुणालाही गाणं गुणगुणावं असं वाटणं साहजिक. कांतार गावं. संतोषी मनाचं लक्षण हे.
माझा जन्म गोवा मुक्तीनंतर झाला. आईवडिलांचं प्राथमिक शिक्षण पोर्तुगीज भाषेत झालं होतं. पाखले, पोर्तुगीज सत्ता यांच्याविषयी आजी आजोबांकडूनही ऐकायलं मिळायचं. विकास प्रगतीचं वारं वाहू लागलं. गोवा भारताचा व भारत जागतिक लयीचा श्वास घेऊ लागला. द्रूत लय आली. विलंबित ठेहराव गायबच झाला. मनुष्यत्व माणुसकीचे झरे विहिरींसारखे आटू लागले. विहिरी म्हणजे काय असा प्रश्न नवी पिढी न विचारू म्हणजे मिळवलं.
म्हार्दोळला मंगेशीपर्यंत आज जिथं बायपास हायवे मार्ग आहे तिथं होती फक्त जंगलं. १९६९. तिथं डोंगरावर होते जायांचे सुंदर मळे. वनस्पतीची कत्तल, डोंगरांची कड्यांची कापाकापी होऊन प्रगतीची गती सुरू झाली. शेतं होती. थोडी बुजवली. एक नाला होता. ओहोळ. तिथं पावसात मुलं मासे पकडायची. विशिष्ट शिट्या मारून खेकड्यांना साद घालून खेकडे पकडायची. ते सौंदर्य लोप पावलं. म्हार्दोळला चतुर्दशीला शिमग्याचा जोष उत्साह यांना कायम उधाण यायचं. आमी जावय म्हाळशेचे भेटे रे, असा गजर जयघोष करत येणारे शिमग्याचे मेळ बघून अंगात संचार व्हायचा. लक्ष आणि लक्ष्य देवी महालसेच्या चरणी असायचं. त्यात स्पष्टता असायची. भक्तिभावरस असायचा. दिशा होती.
आता सगळ्यांचंच कमर्शियलायझेशन झालेलं दिसतं. पणजी, म्हापसा, मडगांव, वास्को इथं जे रोमटांमेळ जातात, त्यांची दिशा कुठं केंद्रित आहे ते कळत नाही. व्यापारीकरण बाजारीकरण होऊन गोव्याच्या मूळ स्वभावाचं अस्मितेचं सौंदर्य हरवू नये असं मनापासून वाटतं. कारण आम्ही त्याचा गोडवा अनुभवला आहे. हृदयात ती चारूता आणि खुमारी साठवली आहे.
होय. नवतेचा स्वीकार हवा. त्याच्याशिवाय गती नाही. तंत्रज्ञानाचा क्रांतिकारी स्फोट होऊ घातला आहे. पर्याय नाही. सगळं डिजिटल झालंय. पण जास्मिनचा कृत्रिम परिमल जिवाला तृप्ती देणार नाही हो. जायांचाच दरवळणारा सुगंध पाहिजे. पिझ्झा बर्गर सर्व काही नवं खाऊ. पण पातोळ्यो, खतखतें, खटखटें, मणगणें उच्चारायची शरम नको. ते आनंदाने सेवन करू. रूचीने. नवरतन खुर्मा, पुलाव खाऊच. पण उकड्या तांदळ्यांची पेज पण जेवू. आंबलेचा तुकडा तोंडी लाऊन. पाश्र्चात्य संगीताचा आऩंद घेऊच. पण आपलं लोकसंगीत सोडून देऊन बिलकूल नको. समतोल पाहिजे. नाही तर आमच्या जीवनाचा तोल बिघडून जाईल.
मंदिरात चौघुडा वादन ऐकायला येई. गांवच्या लोकांची ती घड्याळ होती. त्या त्या वेळी मंगल शहनाई वादन कानावर पडलं की कळायचं की अमूक वेळ झाली आहे. आता या ऑनलायन जगात त्याची जागा डिजिटल शहनाई संगीताने काबीज केली आहे. त्या त्या वेळी स्वयंचलीत स्तरावर हे संगीत वादन होत असतं. हे उदाहरण प्रतिक रूपात सांगितलं आहे. जिथं भक्तसेवक लोक हृदयातून देवाची सेवा म्हणून संगीत वाजवायचे तिथं हे रोबोटीकवजा डिजिटल संगीत आलं आहे. आम्ही प्लास्टीक नाही. आम्ही कृत्रिम नाही. मनुष्यमात्राला भावना, संवेदना असे अनेक ओलाव्याचे अंतर्गत स्तर आहेत. त्यांची भूक त्या त्या पौष्टीक आहारानेच भागते.
गोव्याचं सध्याचं राजकारण बघितलं तर आम्हाला खंत होतेच. स्वातंत्र्यसैनिकांना या वृध्द वयात अतोनात त्रास होतात. ज्या हालअपेष्टा त्यानी कारावासात सोसल्या, जो त्याग केला, बलिदान केले ते असला गोवा, अशी शासनरचना, समाजरचना, अर्थव्यवस्था बघून विध्द होण्यासाठी? भौतिक प्रगती आणि इमारती हा विकास नसतो हे तथ्य हल्लीच जगभर सर्वांना पटायला लागलं आहे. लोक सुखी आहेत का, हे महत्त्वाचं. हल्ली शहराचा खुषी निर्देशांक (हॅपिनॅस इंडेक्स) काढायला सुरुवात झाली आहे. स्वागतार्ह गोष्ट आहे.
प्रगतीच्या केंद्रस्थानी मनुष्य आहे. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजानंतर सुख, शांती, समाधान हे प्राधान्यानं अगोदर हाताळायला हवं. गोव्यानं साठ वर्षात कमावलं, काय गमावलं याचाही विचार हवा. वारा आल्यावर पालापाचोळा वाहवत जातो तसं आपण इंग्रजीकरण, वैश्विकरण यात आपल्या इतिहास वारसा संस्कृतीची मुळे सोडून बहकत भरकटत न जाऊ. नव्या युवा पिढीच्या मनावर गोव्याच्या इतिहासाचं महत्त्व कोरू. निरंतर, नवता आणि परंपरा यांची सुसूत्र सांगड घालून पुढं जाऊ. गोव्याच्या विकासाला आमचं हातबोट लावू.
-मुकेश थळी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.