Sunburn Festival Goa : गोव्यातील सनबर्न महोत्सवाचे ढोंग

‘सनबर्न’ला विरोध हा आपला दुटप्पीपणा आहे. आपण नाक्यानाक्यावर दारूची दुकाने उभी केली, शाळांसमोर ड्रग्स सापडतात. रेव्ह पार्ट्या आता किनारपट्टीवरील हॉटेलात सुरू झाल्या आहेत. आपल्या पूर्वजांनी बाया ठेवण्याची परंपरा सुरू केली होती. आपल्या देवस्थानामध्ये देवपूजेला कमी, पण नायकिणींचे नाच पाहायलाच गर्दी उडत असे...’
Sunburn Festival Goa
Sunburn Festival GoaDainik Gomantak
Published on
Updated on

राजू नायक

`सनबर्नला विरोध?’ ती व्यक्ती माझ्याकडे पाहून कुत्सित हसू लागली. पुरे हो तुमचा ढोंगीपणा!’

तो म्हणाला गोव्यात सनबर्नच्या आकाराच्या रेव्ह पार्ट्या झालेल्या तुम्हाला चालतात. तुम्हाला माहीत आहे, दर आठवड्याला गोव्यात त्या सुरू आहेत.

पोलिस बंदोबस्तात चालतात. स्थानिक नेते संरक्षण देतात. काही आमदार तर बाके टाकून तेथे बसायचे-‘पाहुया कोण तुमची पार्टी बंद करतो ते’.

त्याने मलाच नव्हे तर संपूर्ण गोवेकर समाजाला ढोंगी म्हटले. ‘तुमच्या राजधानी पणजीत एस्कॉर्ट सर्व्हिस चालते, माहीत आहे तुम्हाला? गोव्यातल्या व बाहेरच्या मिळून ३० हजार मुली त्यात गुंतल्या आहेत. पाच हजार स्थानिक मुली- काही तर येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या - सहज उपलब्ध आहेत. त्यात काही तुमच्या ओळखीच्याही निघाल्या तर नवल नाही’. मला आणखी एक धक्का देत तो म्हणाला.

‘चर्च धर्म संस्थेला या रेव्ह पार्ट्या दिसत नाहीत? एस्कॉर्ट दिसत नाहीत?

तुला माहीत आहेत, केवढ्या मोठ्या प्रमाणात पुरुष वेश्‍या गोव्यात आहेत?’

आता मी सावरून बसलो, कारण तो धक्क्यावर धक्के देत होता. त्याला मी एक बुद्धिमान संशोधक म्हणून ओळखतो. धक्के द्यायची त्याची सवय जुनीच. विद्यार्थी चळवळीत असल्यापासूनची. परंतु हातात आकडेवारी असल्यामुळे आम्ही त्याच्याशी वाद घालायला कधी जात नाही.

सनबर्नपासून सुरू झालेली चर्चा मला धक्के देत तो आता मुख्य मुद्द्याकडे वळवत होता. ‘गोवा ट्रान्स’ तू ऐकले आहेस ना? ते संगीत कुठेतरी युरोपात तयार झालेले असू शकते. परंतु गोव्याच्या नावावर चालले. २१व्या शतकातील मनोव्यापारातील तो एक महत्त्वाचा शोध आहे. या इलेक्ट्रॉनिक संगीतामुळे नशा आणखी चढते. रात्रभर पाय थिरकू शकतात. जर्मनीतून गोवा, गोव्यातून जगभर असा या मानसिक, शारीरिक परिणाम करणाऱ्या संगीताचा प्रवास आहे. गोव्याच्या नावातच बेहोषी आहे. त्यात मेंदूत खोलवर घुसणाऱ्या या संगीताच्या कॉकटेलने गोव्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेले. त्या संगीताला नवी डूब आहे, सनबर्न महोत्सवाची’. तो म्हणाला ः या महोत्सवाला मान्यता मिळविण्यात लाचलुचपत द्यावी लागते का? त्याला मान्यता कशी मिळते, स्थानिक ग्रामसंस्थेचा पाठिंबा कसा मिळतो, या प्रश्‍नांची उत्तरे साऱ्यांना माहीत आहेत.

गोव्यात कुठल्या क्षेत्रात लाचलुचपत नाही? आसगावला पूजा शर्माला एका दिवसांत प्रॉपर्टीचे म्युटेशन करून मिळाले, ते काय सहज मिळाले. गोव्यात नाइट पार्ट्या चालतात, तेथे काय चालते? मुली कोठून येतात? असे प्रश्‍न करणे आता भाबडेपणाचे ठरले आहे. त्याचप्रमाणे सनबर्नमध्येही अमलीपदार्थ मिळतात, तेथे मुली उपलब्ध असतात, तेथे येणारे पुरुष काय उद्योग करतात, याची उत्तरे पत्रकारांपासून नेत्यांपर्यंत साऱ्यांकडे असतात.

मग प्रश्‍न कुठे उपस्थित होतो?

प्रश्‍न आहे नैतिकतेचा!

आता दक्षिण गोवा जर नैतिकतेच्या मुद्द्यावर सनबर्नला विरोध करीत असेल व या भागाला जर नैतिकतेवर आधारितच पर्यटन हवे असेल, तसा ते आग्रह धरणार असतील तर त्यातून काय निपजणार आहे, हे सर्वांना माहीत आहे. चर्चप्रणित संघटनांनी ऐंशीच्या दशकात कार्निव्हलला विरोध केला होता. चर्चचे आवार सरकार पुरस्कृत कार्निव्हलला मिळणार नाही. परंतु कालांतराने मांडवी-झुवारीतून बरेच पाणी वाहून गेले.

कार्निव्हलमध्ये पैसा आहे. शिवाय सरकारी पातळीवर होतो, त्याहून मोठा निधी खासगी पातळीवर खर्च होतो. त्यात ख्रिस्ती आमदारच गुंतलेले असतात. हा पैसा अनेकांना खूष ठेवण्यासाठीही वापरला जातो. परंतु ऐंशीच्या दशकातील कार्निव्हलचे आजचे स्वरूप कितीतरी भीषण आहे. त्या चित्र-विचित्र पोषाखाआड दडलेल्या पोटात बरेच अक्राळ विक्राळ चेहरे लपलेले आहेत. रेव्ह पार्ट्या, ड्रग्स् नाइट व किनारपट्टीवरील इतर स्वैराचार त्याचीच तर अपत्ये आहेत.

सरकार, राज्यातील ‘नैतिक पोलिसांना’ हे प्रकार माहीत नाहीत, असे थोडेच आहे, ठिकठिकाणच्या धार्मिक संस्थांनाही त्याचा हिस्सा जातो.

तो सांगत होता, सनबर्न तर सर्व कायदे पाळून आयोजित होतो. वागातोर येथे तो साजरा झाला. ज्या जागेत तो झाला त्या ग्रामसंस्थेने व पंचायतीनेही रीतसर मान्यता दिली होती. सरकारी मान्यता मिळविण्यात ते यशस्वी ठरले.

मग चर्चा कॅसिनोंकडे वळली.

गोव्यात एकच कॅसिनो आला होता. त्यावेळी किती वादंग माजले होते. परंतु एकच म्हणता म्हणता कॅसिनोंची रांग लागली. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महिला संघटनांचे तेथे आंदोलन चालू असता, मनोहर पर्रीकर यांनी जंगी भाषण केले होते. कॅसिनोंमध्ये घुसून ते बंद करायला आम्ही कमी करणार नाही, असा त्यांचा पवित्रा होता.

परंतु त्यानंतर भाजपनेच किती कॅसिनो आणले? गोवा जुगार नियमन कायद्यात केवळ एकच शब्द ‘ऑफशोअर’ घुसवून ही किमया करण्यात आली आहे. त्यावेळी मनोहर पर्रीकरांनी राज्यातील बुद्धिमंतांच्या एका बैठकीत बोलताना `आता मी केवळ खाणी सुरू होण्याचीच वाट पाहतोय, त्यानंतर कॅसिनोंवर आम्ही बंदी आणू,’ असे उद्‍गार काढले होते. पर्रीकर त्यावेळी मनापासून बोलताहेत असे वाटे.

त्यामुळे कार्यकर्ते, बुद्धिवंत यांना ते खरेच बोलताहेत असे वाटले होते. एकदाच्या सुरू होऊ देत खाणी, असे मनात म्हणत ते त्या बैठकीतून बाहेर पडले होते. आज ७०० कोटी रुपयांचा महसूल कॅसिनोंमधून प्राप्त होतो. त्याशिवाय अनेक राजकीय नेत्यांसाठी ते एटीएम मशीन आहे.

कॅसिनो सुरू ठेवण्यामागे आणखी एक गंमत आहे. पर्रीकर पणजीचे आमदार असताना त्यांनी आपल्याच एका संस्थेकडून शहरात एक सर्वे करून घेतला होता, पणजीत कॅसिनोंमुळे काय अडचणी सोसाव्या लागतात, हे जगजाहीर आहे. रात्रभर पणजीत धांगडधिंगा चालू असतो. रहदारी सुरू राहते, वाहतुकीची कोंडी होते.

कुठेही आणून वाहने उभी करतात, शिवाय कॅसिनोंमध्ये काम करणाऱ्यांची वाहने रात्रंदिवस रस्त्यावर उभी करून ठेवली जातात. इतर गोष्टींबद्दलही बोलायचे झाल्यास पणजी शहरात ज्या पद्धतीचे ‘पर्यटन’ सुरू झाले आहे, त्याचा कोणी विचारही केला नसेल. कॅसिनोंमध्ये खेळायला येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘सुविधा’ येथे तयार झाल्या आहेत. रस्त्यांरस्त्यांवर ‘स्पा’ आणि ‘मसाज पार्लर’ यांची राळ उडवून देण्यात आली आहे.

परंतु सर्वेमध्ये पणजीकरांनी कॅसिनोंमध्ये काही वावगे नाही, असे मत व्यक्त केले. पणजीत जेथे संपूर्ण मांडवी नदी कॅसिनोंनी अडविली आहे, त्याबद्दल लोकांना काही वाटत नाही. मग आक्षेप घेतोय कोण? सासष्टी! जो तालुका प्रत्येक सामाजिक प्रदूषणाबद्दल पोटतिडकीने बोलतो, त्या सासष्टीला कॅसिनो गोव्यात नको आहे. त्याबद्दल काँग्रेसला जर सोयरसुतक नसेल तर भाजपने- ज्यांना सासष्टीने कधी खिजगणतीत घेतले नाही, का बरे पर्वा करावी, असे भगव्या नेत्यांना वाटले असेल.

ही झाली गृहस्थ माणसाची प्रतिक्रिया - म्हणजे सनबर्नबद्दल ५० वयोगटातील माणसाची प्रतिक्रिया. तरुण काय विचार करतो? मी काहीजणांशी बोलत होतो.

नैतिकतेचा प्रश्‍न उपस्थित केल्यावर त्यांना हसू आले. ते म्हणाले, कोणतीच सक्ती आम्हांला मान्य नाही. गोव्यात दारूबंदी नाही, धूम्रपानाला बंदी नाही, नियम-कायदे कानून लागू करा, कर प्राप्त करा. नियमन अत्यंत कठोरपणे राबवा. मान्यता द्या, नैतिकतेच्या प्रश्‍नावर चाललेली चर्चा सवंग आहे, असे त्यांना वाटते.

एक जण म्हणाला, तुमच्या सध्याच्या पर्यटनामुळे केवळ म्हातारी माणसे गोव्यात येतात. विदेशातून म्हातारे व देशातून दारूची नशा करणारे विकृत पर्यटक जे उघड्या बायका पाहिल्या की चेकाळतात.

तरुणांच्या मते, अशा पद्धतीचे संगीत महोत्सव सृजनोत्सव असतात. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांची गोव्याकडे रीघ लागते. सरकारने आणि लोकांनी नैतिक पोलिस होऊ नये, परंतु त्यांनी अमलीपदार्थांविरोधात जरूर कारवाई करावी.

मी काही माजी पोलिस अधिकाऱ्यांशी बोलत होतो, ते म्हणाले, असे सनबर्न महोत्सव नियंत्रित करणे सहज शक्य आहे. परंतु विरोध लुटुपुटुचे असतात. त्यामुळे सरकारलाही बहाणा मिळतो. परवानगी मिळणार असतेच, कारण आयोजकांचे हात वरपर्यंत गेलेले आहेत. शिवाय उलाढाल प्रचंड असते. त्यात सर्वांना खूष ठेवण्याची तरतूद आहे.

त्यामुळे मॅचफिक्सिंग होते. परंतु त्यामुळे समांतर अर्थव्यवस्था उभी झाली आहे. सरकारला जो कर मिळायला हवा, तो काहीजणांच्या खिशात जातो. स्थानिक पंचांपासून आमदार मंत्र्यांपर्यंत सर्वांची सोय पाहिली जाते. गोव्यात चालू असलेला जुगार, सेक्स बाजार, अमलीपदार्थ हे प्रकार सरकार व पोलिसांच्या देखरेखीखाली चालले आहेत.

समांतर अर्थव्यवस्थेचा तो भाग आहे. एकेकाळी खाण उद्योग गोव्याच्या अर्थव्यवस्थेच्या तीनपटीने अधिक पैसा तयार करीत असे. ही समांतर अर्थव्यवस्था आहे. हा सारा पैसा विदेशात गुंतविण्यात आला आहे. ३५ हजार कोटींचा घोटाळा म्हणणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी तो पचवला व ढेकरही दिला.

तेच आज खाणी त्वरित सुरू व्हायला हव्यात असा गलबला करतात. त्यासाठी मात्र सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कोणत्याही अटी पाळलेल्या नाहीत. गोवा फाउंडेशनला पुन्हा-पुन्हा न्यायालयात जाऊन आदेश आणावे लागतात. परंतु लोकांना काही पडून गेलेले आहे काय, नाही. कारण खाण पट्ट्यातील लोकांना त्या भ्रष्ट अर्थव्यवस्थेचा हिस्सा प्राप्त होत नाही, तोपर्यंतच ते गलका करीत राहतात.

जुगार, अमली पदार्थ व पर्यटनातील अनागोंदीचेही तसेच आहे. जोपर्यंत हिस्सा धार्मिक संस्थांना पोहोचतो, तोपर्यंत आक्षेप घेण्याचे कारण उरत नाही.

तो सद्‌गृहस्थ आमचा सामाजिक नीतिमत्तेचा दुतोंडीपणा विषद करून सांगत होता.

त्याने स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न काढला. निवडणुकीच्या काळात काळ्या पैशातूनच राज्यातील लहान-मोठे धंदे जोरात चालतात. त्यात एक असतो टॅक्सी व्यवसाय. सनबर्नमुळेही टॅक्सीवाले खूष असतात. आसपासची हॉटेले, दुकाने, इतर व्यवसाय यांना बरकत येते.

या टॅक्सीवाल्यांशी मी बोलत होतो. हे टॅक्सीवाले हणजूण, बागा भागात व्यवसाय करतात. त्यांच्या मते ड्रग्सवाल्यांना शोधून काढणे सोपे आहे. पोलिसांनी त्यांचा सारा ठावठिकाणा माहीत आहे. पोलिसांनी ठरविले तर ड्रग्ज धंदा संपूर्णतः बंद होऊ शकेल. परंतु सनबर्नमध्येच ड्रग्स मिळतात काय? बंगळुरूहून येणारा तरुण तेथूनही ते आणू शकतो. हा हायफाय युवक आहे. तो जागतिक कंपन्यांमध्ये काम करतो. त्याचा पगार ५० लाख रुपयांहून अधिक आहे. त्यालाच सनबर्न परवडू शकते. शिवाय त्यांना किंवा सनबर्नसाठी येणाऱ्या कोणालाही येथेच येऊन ड्रग्स घेण्याची आवश्‍यकता नाही.

गोव्यात त्यातल्या त्यात एक डिसेंट नाइट क्लब चालविणारा स्थानिक उद्योजक माझ्या संपर्कात आहे. कुठे-कुठे रेव्ह पार्ट्या चालू आहेत, त्याची इत्थंभूत माहिती त्याच्याकडे असते. एकेकाळी रेव्ह पार्ट्या निर्जनस्थळी उघड्यावर चालत. आज त्याची लघुरूपे किनारपट्टयांवर अनेक रेस्टॉरंटमध्ये चालू आहेत. मागे सिने क्षेत्रातील एका नटीला अमलीपदार्थ दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काय घडले? हा नाइटक्लब बंद झाला? या परिसरातील ड्रग ट्रेड बंद करण्यात आला? तरुणांना समजले असेल तेथे ड्रग्स उपलब्ध असतात, ते माग काढत तेथे गर्दी करू लागले असतील...

तो गृहस्थ सांगत होता, दक्षिण गोव्यात सनबर्न होणारच. आयोजकांना आता आणखी एक-दोन कोटी रुपये जादा खर्च करावे लागतील. काही धर्मसंस्था, त्यांचे स्थानिक नेते यांच्या हातावर टेकवले की काम होणार. काही फुटबॉल संघांनाही पुरस्कृत करावे लागेल. ‘जोर रडटा पेजेक’, त्याने या कोकणी म्हणीचे प्रत्यंतर दिले.

सनबर्न न होऊ द्यायला, गोवा काय ‘पंढरपूर’ आहे? असा एक प्रश्‍न त्याने माझ्या तोंडावर फेकला. येथे नाक्यानाक्यावर दारूची दुकाने उभी केली आहेत. येथे फेस्त आणि जत्रांमध्ये दारूचे मांड पडतात. अनेक ठिकाणी जुगारवालेच जत्रा पुरस्कृत करतात. एकेकाळी गोव्यात देवालयांच्या उत्सवाला गर्दी उडायची, ती देवभक्तीने नव्हे तर नायकिणींचे नाच बघायला, असे इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. प्रत्येक नाक्यानाक्यावर मटक्याचे बिट घेणारे लोक टेबले टाकून खुलेआम बसलेले असतात.

पंढरपूरचा विषय आला म्हणून सांगतो. परवा विजय सरदेसाईंनी पंंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांंसाठी अनुदान देण्याची मागणी विधानसभेत केली. त्यावर माझा हा विचारवंत दोस्त म्हणाला, अरे वारकरी हा संप्रदाय त्यागावर उभा आहे. त्याने विठोबाच्या मीलनासाठी अंग झिजविले पाहिजे.

पोर्तुगीज अमदानीत लोक सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या फेस्ताला पायी चालून जात. कोणा भक्ताने व्हॉइसरॉयकडे त्यांच्यासाठी मोफत बसेसची सोय करण्याची मागणी केली, तिला व्हॉइसरॉयने विरोध केला. ते म्हणाले, तुम्ही भक्तिभावाने तेथे जाऊ पाहता ना मग चालत जा. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सरकारी खर्चाने जायचे? सॉफ्ट हिंदुत्वात हे चालत असेल. खऱ्या भक्तीत नाही.

आता सनबर्नच्या अर्थकारणाचा विचार करू. यंदा पर्यटन खात्याने हेलीपॅडवर सांजाँव महोत्सव आयोजित केला होता. लोकांनी पाठ फिरविली. पण सनबर्न हा ब्रॅण्ड झालाय हे मान्य करावे लागेल. तेथे उसळणारी तरुणांची गर्दी अभूतपूर्व आहे, तीही उच्चशिक्षित. ही मुले काय संस्कारी नसतात? दिल्लीतील काही प्रख्यात महिला समाजसेविकांनी माझ्याकडे यापूर्वी सनबर्नच्या पासेससाठीही संपर्क साधला आहे.

माझ्या अर्थतज्ज्ञ दोस्ताने सनबर्न महोत्सवाच्या फायदा नमुन्याचा अभ्यास केला आहे. त्याचा दावा आहे, या महोत्सवाला किमान ३५० कोटी रुपये नफा होत असावा. तरी ते किती कर भरतात, शंकाच आहे. जीएसटी त्यामध्ये शेकडो कोटींच्या करांचे उल्लंघन होत असणार, या महोत्सवासाठी तिकीट दर ३ हजारांपासून सुरू होतो. तीन लाखांची उपस्थिती, तीन हजारांच्या दराने एका दिवसाच्या उपस्थितांचाच विचार केला तर किमान ९० कोटी रुपये जमा व्हायला हवेत. तीन दिवसांचे चारशे कोटी रुपये. एवढे उत्पन्न असेल तर दोन अडीच कोटी रुपये सहज बाजूला काढून लाच खिलविणे शक्य आहे.

Sunburn Festival Goa
Calangute Mobile Theft: रेस्टॉरंटमधील कामगारांचे फोन लंपास! पोलिसांनी आवळल्या प. बंगालमधील दोघांच्या मुसक्या

अर्थतज्ज्ञ म्हणाला, पर्यटन पट्ट्यात खुलेआम जीएसटी चुकवला जातो. काही वर्षापूर्वी त्या वेळच्या व्यावसायिक कर विभागाच्या आयुक्तांंकडे अनौपचारिक चर्चा करताना त्यानेच उघड केले होते. बार्देश तालुक्यात पर्यटन पट्ट्यात कर निरीक्षक पाठवू नयेत म्हणून खूप राजकीय दबाव असतो. या पट्ट्यात वर्षाकाठी ५ हजार कोटींपेक्षा अधिक कर चुकवला जातो. ही गोष्ट २०११ सालची आहे. त्यानंतर मांडवी नदीतून किती पाणी वाहून गेले असेल!

हे सर्व मुद्दे गोव्यात सनबर्न हवा की नको, यावर ऊहापोह करताना मला सुनावण्यात आले. गोव्यात सनबर्न कायमचा वस्तीला आला आहे. तो जर तसा आला असेल तर योग्य नियमनावर त्याला उभा का केला जात नाही? कायदे कानून पाळायला भाग पाडा, अति ड्रग्स सेवनाने तरुणाईची हिरवी स्वप्ने खाक होऊ देऊ नका.

वास्तविक चिमुकल्या गोव्याने पर्यटकांसाठी भूतानचा आदर्श ठेवला हवा होता. भूतानने जाणीवपूर्वक अति पर्यटन नको म्हटले. कमी पर्यटन, हेच योग्य पर्यटन याचा तो डोळस धडा आहे. गोव्यालाही तसे करता आले असते. गोव्यात पाय ठेवण्यासाठी पर्यटकांना पथ्ये पाळण्याचे बंधन आम्ही लागू करू शकलो असतो. परंतु तो मार्ग आपण कधीच सोडून दिला. आज आपण सामाजिक प्रदूषणाच्या नावाने गळा काढतो. मगरीचे अश्रू आहेत ते!

... आता सनबर्नला मान्यता देताना एकच बघा, जेथे ते स्थळ निवडतील तेथील लोकांना किमान विश्‍वासात घ्या. बाकी सगळ्या गोष्टी फिजूल आहेत. माझा तो विद्वान दोस्त म्हणाला आणि मला त्याने तोंडात लगावल्यासारखे वाटले!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com