Spirituality: अत्मज्ञान किंवा मोक्ष प्राप्त करणार तर साधन म्हणून जे जे काही लागते, त्यांचा विचार आपण साधन चतुष्टयाच्या गेल्या काही लेखांतून केला. यातील चारही गोष्टी आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर आपल्यासाठी आवश्यक असतात. यातील एकाच मूल्याने मोक्ष, ब्रह्मज्ञान मिळेल, असे म्हणणे तेवढे उचित ठरणार नाही. आपण कुठल्या टप्प्यावर आहोत, त्यानुसार साधन निवडणे आवश्यक असते.
लहानपणी आपल्याला जे प्रिय असेल तेच करण्याला आपले प्राधान्य असते. ‘तुला चार लोक चांगलं म्हणतील, व्वा काय छान केलेस असे म्हणतील’, असे लहान मुलाला सांगितले तरी तो त्याला जे आवडते तेच करतो. प्रिय गोष्टीसाठी मिळत असलेले श्रेय त्यावेळेस आपण बाजूला सारतो. वयात आल्यावर ज्यापासून श्रेय मिळते ते करण्याकडे आपला कल वाढतो. आपण त्यासाठी एखादी अप्रिय गोष्टही करायला तयार होतो.
प्रसंगी श्रेय मिळवण्यासाठी प्रिय गोष्ट बाजूलाही सारतो. त्याही पुढे एक मानसिक अवस्था असते जिला नि:श्रेयस असे म्हणतात, जिथे सहसा आपण जात नाही. कारण प्रेयस आणि श्रेयस यातून आपली सुटकाच होत नाही. प्रिय असलेल्या गोष्टीतून सुखच हवे असते, सहसा दु:ख नको असते. श्रेय देईल अशी गोष्ट दु:ख देणारी असली तरी आपण खपवून घेतो. पण प्रियही नाही आणि कुणी त्याचे श्रेयही देणार नाही अशी एखादी गोष्ट आपण करतो का? त्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला पाहिजे. प्रिय गोष्ट कधी तरी अप्रिय होते, श्रेय देणारी गोष्ट कधी तरी शिव्या खायला, दोषारोप सहन करायलाही लावते.
दोन्ही गोष्टींचा आपल्याला त्रास होतो. पण, आवडते म्हणून नव्हे किंवा कुणी त्याबद्दल ‘क्रेडिट’ द्यावे म्हणूनही नव्हे, तर ती गोष्ट कर्तव्य म्हणून करणे गरजेचे आहे यासाठी आपण करतो का, याचा विचार झाला पाहिजे. अशी गोष्ट केल्यानंतर जर कुणी त्याचे श्रेय दिले नाही, उलट त्या गोष्टीच्या वाईट परिणामांसाठी आपणासच जबाबदार ठरवले, तरीही त्याबद्दल यत्किंचितही दु:ख न होणे हीसुद्धा विरक्तीच आहे.
आवडते तीच गोष्ट करण्याच्या वयात, माणसाला विरक्ती नकोच असते व त्याविषयी सांगणे त्याला अयोग्य वाटत असते. आवडणारी गोष्ट मन लावून कर असे सांगितले तर ते पटते. जी गोष्ट केल्याने चारचौघांत नाव होईल, ओळख निर्माण होईल, असे कार्य करतानाही माणसाला विरक्ती नकोच असते. मग, अशा वेळी केवळ वैराग्यामुळेच मोक्ष, ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, असे सांगितल्यास कुणी विरक्त होणार नाही. उलट मोक्ष मिळवण्याच्या विचारांपासूनच दूर पळेल.
प्रापंचिकांना मोक्ष, परमार्थ सांगताना आणखी एक घोळ घातला जातो; ‘तुम्ही देवपूजा, नामजप म्हणून जे काही करता, तो खरा परमार्थ नाही’, असे पुन्हा पुन्हा सांगितले जाते. परमार्थ हा परमार्थच असतो, तो खरा किंवा खोटा नसतो. उलट, असे सांगितल्याचा विपरीत परिणाम म्हणजे माणूस परमार्थ म्हणून जे काही करत असतो, तेही करणे बंद करतो. त्यातही जप, नामसाधना करणारा देवपूजा करणाऱ्याला कमी समजतो. योगसाधना करणारा, नामसाधना करणाऱ्याला कमी लेखत असतो. विचारमंथन, चिंतन मनन करणारे विचारवंत या सगळ्यांना ‘तुम्ही करताय तो परमार्थ नव्हे’, ‘विचार केल्यानेच आध्यात्मिक प्रगती होते’, असली वाक्ये विनाकारण ऐकवत असतात. परमार्थातही चालणारी ही उच्चनीचता पाहिली की, मन व्यथित होते.
माणूस जे जे कर्म करतो, ज्ञान होण्यासाठी धडपडतो, भक्ती करतो, विरक्त होतो, ते ते सर्व परमार्थाची पूर्वतयारी किंवा प्रक्रियेतील प्रगतीच असते. कुणी कुणालाही साधन निवडण्यावरून नावे ठेवण्याची काही आवश्यकता नसते. कर्म करणाऱ्याला अज्ञानी, अभक्त, आसक्त म्हणण्यात काहीच अर्थ नसतो. साधन चतुष्टयातील चारही मूल्ये एकमेकांना पूरक आहेत.
एकातून दुसऱ्यात जात मोक्ष प्राप्त करण्याच्या पायऱ्या आहेत. अगदी शेवटच्या पायरीवर पोहोचलेला माणूसही कधीतरी पहिली पायरी चढलेलाच असतो. तेव्हा पहिली पायरी किंवा मधल्या पायऱ्या चुकीच्या व अयोग्य ठरवण्यात काहीच अर्थ नसतो. प्रत्येक पायरीचा, साधनांचा जाणीवपूर्वक स्वीकार व आदर करणे महत्त्वाचे असते. त्यावरून आपली क्रिया आणि प्रतिक्रिया ठरत असते.
आमच्या वेळग्यात पावसाच्या दिवसांत वीज येत जात असते. श्रिया, माझी मुलगी लहान होती तेव्हा गेलेली लाइट आली की, आनंदाने टाळ्या वाजवत ओरडायची, ‘आलीऽऽऽऽ!’. त्यावेळी आमच्या मनात विचार असायचा, ‘आलीय खरी, पण किती वेळ टिकेल कोण जाणे!’ दुरुस्तीचे काम सुरू असल्याने काही फॉल्ट आढळल्यास आलेली लाइट जायची. तेव्हाही लहानगी श्रिया आनंदाने टाळ्या वाजवत ओरडायची, ‘गेलीऽऽऽऽ!’. त्यावेळी आम्ही सर्वजण गेलेल्या लाइटीवर, स्वत:च्या नशिबावर, वीज खात्यावर आणि काहीच नसेल तर शेवटी सरकारवर राग व्यक्त करायचो.
निरागस असलेले मूल आनंदी, ब्रह्मरूप असते. त्याला विश्लेषण करायला व लपवायला कळू लागते तसतसे ते आनंदापासून दूर जाऊ लागते. आनंद सोडून सुखाच्या मागे लागते. सुखाने जगण्याच्या नादात सुखी किंवा दु:खी होते पण आनंदी होत नाही. एकदा मोठे झालो की, पुन्हा मूल होता येत नाही, निरागसही होता येत नाही. मग, आनंद, ब्रह्म, मोक्ष मिळवायचा तरी कसा? त्याचे उत्तर आहे, सुखाने जगण्याचा अट्टहास सोडून जाणिवेने जगल्यास आपण निरागस असताना होणारा आनंद पुन्हा मिळवू शकतो. जाणिवेने जगण्याचा अभ्यास करण्यासाठीच साधन चतुष्टय आहे. ब्रह्म, अध्यात्म कठीण नाही. त्याकडे पाहण्याची निरागस दृष्टी व त्यामागील विचारांचा विचार करणारी जाणीव हवी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.