हृदयाशी नाते जोडणारा कुशल शल्यविशारद डॉ. मंजुनाथ

सरकारी रुग्णालयातल्या एका डॉक्टराला अखेरचा निरोप देण्यासाठी गोमंतकीयांनी दाखवलेली ही तत्परता डॉ. मंजुनाथ यांचा स्वभाव आणि कार्यकुशलतेविषयी प्रचंड भाष्य करणारी आहे.
GMCH Cardiologist Dr Manjunath Desai
GMCH Cardiologist Dr Manjunath Desai Dainik Gomantak

सरकारी रुग्णालयातल्या एका डॉक्टराला अखेरचा निरोप देण्यासाठी गोमंतकीयांनी दाखवलेली ही तत्परता डॉ. मंजुनाथ (Dr. Manjunath Desai) यांचा स्वभाव आणि कार्यकुशलतेविषयी प्रचंड भाष्य करणारी आहे. डॉक्टर आणि रुग्णाचे नाते विश्वासार्हतेच्या अत्यंत तलम धाग्यांनी विणलेले असते. डॉ. मंजुनाथ यांच्याविषयी त्यांच्या प्रभावळीत असलेल्या अवघ्यानांच दृढ विश्वास होता, म्हणूनच तर आपलाच कुणीतरी सुहृद गेल्यासारखा विलाप करणारी माणसे त्यांच्या अंत्यदर्शनाला आली. वैद्यकीय पेशातील अनेक अपप्रवृत्तींना सात्विक संतापाने आक्षेप घेण्याचा किंवा सामाजिक जीवनात जे घडते त्याचेच प्रतिबिंब प्रत्येक व्यवसायात पडते असे, म्हणून स्वतःचेच समाधान करून घेण्याचा आजचा काळ. या काळात हृदयाशी नाते जोडणारा कुशल शल्यविशारद, तोही सरकारी सेवेत सापडणे म्हणजे दुसरा कोहिनूर सापडण्यासारखेच. एका दुर्मिळ वाणाचा डॉक्टर अकालीच गमावल्याचे शल्य गोव्याला अनेक वर्षे बोचत राहील.

GMCH Cardiologist Dr Manjunath Desai
गोवा मेडीकल हॉस्पिटलचे प्रसिद्ध हदयरोग तज्ञ डॉ. मंजुनाथ देसाई यांचे निधन

डॉ. मंजुनाथ यांनी कर्करोगाशी प्रारंभीच्या काळात सक्षम झुंज दिली. पण, ती व्याधीच एका विवक्षित टप्प्यानंतर जीवघेणी होत असते. आपले माणूस आणखी एखाद- दुसरा दिवस तरी आपल्या सोबतीने असावे, यासाठी रुग्णाचे आप्त जंग जंग पछाडत असतात. आपण परतीची ग्वाही नसलेल्या प्रवासाला निघालो आहोत, याचे भान मात्र रुग्णाला आलेले असते. जे अटळ आहे, त्याचा धैर्याने स्वीकार करावा की उपचारांच्या आधारे जगण्याची थोडी उसनवारी करावी, हे रुग्णाच्या मर्जीवर अवलंबून असते. डॉ. मंजुनाथ यांना अटळ वास्तवाची जाणीव झाल्यानंतर त्यांनी उपचारांचे सोपस्कार टाळून शांतपणे आणि निर्भयपणे मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी केली होती, असे त्यांचे निकटवर्ती सांगतात. उणेपुरे ४४ वर्षांचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. डॉक्टर असले तरी मृत्यूविषयी इतका तटस्थ विचार करण्याचे हे वय नव्हेच.

डॉ. मंजुनाथ यांनी डॉ. गुरुप्रसाद नायक, डॉ. शिरीष बोरकर आणि अन्य समविचारी तरुण शल्यविशारदांच्या साथीने ‘गोमेकॉ’तल्या हृदयविकार विभागाचा डोलारा मजबूत अशा पायावर उभा केला आणि त्याला उर्जितावस्थेत आणले. आज या ‘सरकारी’ रुग्णालयातील विभागाची शिफारस खासगी क्षेत्रातले प्रथितयश डॉक्टर केवळ आपाल्या रुग्णांनाच करत नाहीत, तर स्वतःवरील उपचारांसाठीही येथेच धाव घेतात, यावरून या तरुण डॉक्टरांच्या कार्यक्षमतेचा परिचय व्हावा. खासगी क्षेत्रातील उत्तमोत्तम सुविधांच्या तोडीची संसाधने मिळवून ती रुग्णांसाठी वापरणारी कार्यकुशलता सार्वजनिक क्षेत्रातील देशभरातल्या रुग्णालयांतही दिसणार नाही. आपल्या परदेशातील कार्यबाहुल्यामुळे डॉ. नायक हे ‘गोमेकॉ’तील सेवेला पूर्णवेळ देऊ शकत नसल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत विभागाची जबाबदारी डॉ. मंजुनाथ यांच्यावर पडायची. त्यांनी या जबाबदारीला पूर्ण न्याय दिला. मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जेव्हा या विभागाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली तेव्हा तो मतदारतुष्टीचा अल्पायुषी प्रयोग वाटायचा. पर्रीकरांनंतर मुख्यमंत्री झालेले प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे तेव्हा आरोग्य खाते होते. कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाविना आणि लालफितीच्या अडथळ्यांविना विभागात आवश्यक सुविधा उपलब्ध होतील याची खातरजमा तेव्हा आणि आजतागायत झालेली आहे आणि त्याचे श्रेय पार्सेकर व त्यांच्यानंतर आरोग्य खात्याची जबाबदारी पेलणारे विश्वजित राणे यांनाही द्यावे लागेल. डॉ. मंजुनाथ, डॉ. नायक आणि अन्य शल्यविशारदांनी या संधीचे सोने केले.

GMCH Cardiologist Dr Manjunath Desai
डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या निधनाने राज्याला धक्का

कार्यबाहुल्यामुळे नित्य व्यस्त असले, तरी डॉ. मंजुनाथ यांच्या कार्यपद्धतीला माणुसकीचे विलोभनीय कोंदण होते. रुग्ण आणि त्यांच्या नातलगांच्या मानसिक घालमेलीला समजून घेणारे ते डॉक्टर होते. त्यांच्याशी चार शब्द बोलले की आपल्या जीवाची शाश्वती निश्चित झाली, असे रुग्णांना वाटायचे. परिचय नसलेली व्यक्तीही त्यांना सामोरी जात आपल्या आप्ताविषयी चौकशी करायची आणि तेही तितक्याच आत्मियतेने प्रतिसाद द्यायचे. उपचारांइतकेच विश्वासाला मोल असलेल्या या क्षेत्रात डॉ. मंजुनाथ यांचे वर्तन सामान्य जनतेला अप्रुपाचे का वाटायचे, याचा विचार खासगी रुग्णालयांसह एकंदरच आरोग्यक्षेत्राने करायला हवा. ‘गोमेकॉ’सारख्या प्रचंड व्याप असलेल्या सरकारी रुग्णालयात एखादा विभाग उभारणे आणि त्याचा पाया सतत सौहार्दपूर्ण वागणुकीद्वारे स्‍थिर ठेवणे, हे सोपे काम नव्हे. डॉ. मंजुनाथ यांच्या सहृदयतेचा परिसस्पर्श त्या विभागातील परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनाही झाला होता. अत्यंत तणावग्रस्त स्थितीत तेथे गेलेले आणि बरे होऊन परतलेले अनेक रुग्ण या सहृदयतेची तारीफ करत त्याचे श्रेय डॉ. मंजुनाथ यांना देताना दिसायचे. हा वारसा त्या विभागाला यापुढे चालवायचा आहे, किंबहुना तीच डॉ. मंजुनाथ यांच्या स्मृतीला खरी श्रद्धांजली असेल. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण ‘गोमेकॉ’ परिवाराला सतत व्हावे यासाठी ‘गोमेकॉ’तील एखादा विभाग किंवा सुविधेला त्यांचे नाव देण्याची जी मागणी आता जोर धरत आहे, ती उचितच आहे. राजकारण्यांची नावे सार्वजनिक सुविधांना देण्याचा प्रघात काही काळासाठी बासनात ठेवून या प्रस्तावाचा विचार आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जरूर करावा. जनमानसातूनही त्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com