अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह
‘सायमन गो बॅक...’ असा नारा गरजला तेव्हा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातील भारत स्वातंत्र्यलढ्यासाठी एकवटला. सायमन हा भारतीयांवरील अन्यायाचा प्रतिशब्द बनला. अन्याय, अत्याचाराविरोधात लढ्याचा प्रारंभबिंदू ठरला. यथावकाश स्वातंत्र्याची किरणे भारतवर्षावर प्रकटली आणि आज या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना ‘सायमन’ खरेच परत गेला का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्य ब्रिटिशांच्या अन्याय, अत्याचारापासूनचे असल्यास तो उद्देश साध्य झाला आहे का? मानसिक गुलामगिरीतून भारत मुक्त झाला का? तेजस्वी प्राचीन वारसा असलेल्या भारताला आपला मार्ग खरेच सापडला आहे? अनेक प्रश्नांचे ‘सायमन’ आजही तसेच आहेत. त्यांच्या विरोधात ‘गो बॅक’चा नारा देण्याची वेळ आली आहे.
‘भा’ म्हणजे ऊर्जा. भा-रत म्हणजे ऊर्जेची उपासना करणारे. हेच भारतीयत्व. ऊर्जेची उपासना करणारे जेथे कुठे असतील, त्यांना भारतीय म्हणावे, ही आपली प्राचीन ‘वसुधैव कुटुंबकम’ शिकवण. भारतीयत्व म्हणजे काय, हे स्वातंत्र्याला 75 वर्षे होत असताना आपण लक्षात घ्यायला आणि त्या दिशेने पुढे जायला पाहिजे.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, ते ब्रिटिशांपासून, त्याआधीच्या परकीय आक्रमणांपासून. त्यांच्या अन्यायापासून. आज स्वातंत्र्यानंतरही अन्याय आहे, असे मला वाटते. आपल्याला या अन्यायाविरोधात लढा दिला पाहिजे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. त्यासाठी आपली संस्कृती मुळापासून समजून घेतली पाहिजे.
भगवद्गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, असे आपल्याला सांगितले आहे. आपल्याकडे प्राचीन शास्त्र, वेद-पुराणे आहेत. ही संपदा विशिष्ट जाती-धर्मासाठी नाही, तर विश्वाच्या कल्याणासाठी आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्नांच्या मुळाशी जाता येईल. शिक्षणात बुद्धीला नव्हे; तर विवेकबुद्धीला स्थान द्यावे लागेल. नितीमूल्यांचा विकास घडवणाऱ्या विवेकबुद्धीच्या संस्काराला प्राधान्य द्यावे लागेल.
मोठ्या पदावरचा अधिकारी भ्रष्टाचार करतो किंवा शिकलेला माणूस लाल सिग्नल सुरू असताना पुढे जातो किंवा डॉक्टर सिगारेट पितो तेव्हा शिक्षणाचा काय उपयोग? या लोकांची विवेकबुद्धी कुठे गेली? आपली शिक्षण व्यवस्था नोकरी-व्यवसाय करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठीच असल्यास गडबड आहे. हे भारतात नाही, तर सर्व विश्वात घडते. जग फिरल्यानंतर, अनेक देशांत राहिल्यानंतर मी खात्रीने सांगू शकतो, की पायाभूत सुविधा, दरडोई उत्पन्न, सर्व सुखसोयी असलेल्या देशांतही सुख-समाधान, शांती नाही. विकसित देशांमध्ये निसर्गाचं काय झालं? दुसऱ्याचे नुकसान करून चैन सुरू असल्यास त्याला सुख म्हणणार काय?
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज ‘सकाळ माध्यम समूह म्हणून आम्ही सुरवात करतो आहोत. सकारात्मक ऊर्जा वाढविणारी लोककल्याणाची व्याख्या आपल्याला करायची आहे. ती विशिष्ट धर्माबद्दल नाही. त्यामध्ये सर्वांचा समावेश आहे. भारत हा श्रीमंतांचा देश आहे, कारण या देशात अनेक संत-महात्मे होऊन गेले. आपल्याला आध्यात्मिक वारसा असल्याने ही श्रीमंती आहे. या मंडळींनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला जायचे आहे. आपल्याकडे पंढरीची वारी आहे. मात्र, पुंडलिकांनी केलेली आई-वडिलांची सेवा आपण विसरतो. पुंडलिकांचं नुसतं कौतुक करायचं?
स्वातंत्र्य कशापासून?
मला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, ते कशापासून? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांपासून. त्यासाठी काय करायला हवे, याचा शोध घ्यायला आपल्याला सुरुवात करायची आहे. हेच स्वातंत्र्य किंवा भारतीयत्व. ही व्याख्या आजच्या पिढीला समजून सांगायची आहे, ती आचरणात आणायला शिकवायचे आहे. आम्हालाच सगळे समजले आहे, असा आमचा दावा नाही. आम्हीही चुका करतोय आणि शिकतोय. ‘सकाळ माध्यम समूह म्हणून आम्ही स्वतःपासून सुरवात करतो आहोत, प्रयोगांमधून शिकतो आहोत. प्रयोग लोकांसमोर मांडतो आहोत. ज्यांना या प्रयोगात सोबत यायचे आहे, ते जरूर येतील. सुख-शांती आणि समाधानाचा हा शोध एकत्रित घेता येईल.
स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीचे निकष आहेत दरडोई उत्पन्न, शिक्षण वगैरे. ज्या संत महात्म्यांना आपण मानतो, त्यांना हे निकष लावल्यास ते यांत बसतील? याचा अर्थ, भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक मानसिकता यांच्यात संतुलन असावे. याचा अर्थ वैराग्य नव्हे. आपल्याकडे सारे आशीर्वाद समृद्धीचेच आहेत. सर्व वैभव पायाशी असताना मोहमाया सोडून अयोध्येचा राजा राम वनवासात गेला. समृद्धी हवीच; तिच्यासोबत येणारी आसक्ती, मोह आम्हाला नको. आपला देश समृद्ध झालाच पाहिजे, पण निसर्गाची किंमत चुकवून नव्हे. अशी संस्कृती विकसित करणे आमचा उद्देश आहे. त्याची सुरवात ‘सकाळ माध्यम समूहा’पासून करतो आहोत. आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन समांतर पातळीवर जीवनाची वाटचाल करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.
‘‘माझ्या एका मित्राच्या माऊलीचा मला फोन आला. ‘तुझ्यामुळं एका मित्रानं सिगारेट सोडली, दारू सोडली, नॉनव्हेज सोडले,’ असे माऊली म्हणाली. त्या माऊलीचे मिळणारे आशीर्वाद पैशांत कसे मोजणार? अशा सगळ्या माता-भगिनींचे आशीर्वाद मिळवण्याचे कार्य करणे म्हणजे भारतीय वृत्ती. हे स्वातंत्र्य.’’ देश समृद्ध झाला पाहिजे. आक्रमणांविरोधात लढण्याची शक्ती आपल्याकडे पाहिजे. ते सहन करायलाच नको. भगवद्गीता तेच तर शिकवते! भगवंतांनी साधे राहा, असे कोठेही सांगितले नाही. माझ्याकडे १०० रुपये असतील, पण ८० रुपयांत सर्व भागतेय, तर मी श्रीमंत आहे. पण, माझ्याकडे १०० रुपये आहेत, १५० रुपये हवेत, तर मी गरीबच आहे. आपल्याला अशी गरीब-श्रीमंतीची व्याख्या करायची आहे. त्यासाठी चांगले संस्कार, सकारात्मकता घरोघरी पोहोचवायची आहे.
जीवनाचा आनंद घेण्यासाठी
आपला प्रत्येक सणवार आनंदासाठी असला, तरी आपण जीवनाचा आनंद घेणे विसरलो आहोत. दिवसभर काम करायचे, छान घर बांधायचे. घरात रात्री फक्त झोपायला जाणार असल्यास कसले स्वातंत्र्य? तुम्हाला पौष्टिक, सात्त्विक अन्न मिळत नसेल, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी प्रदूषण असल्यास आपण स्वातंत्र्याची व्याख्या काय करतोय? भौतिकदृष्ट्या आपल्याला प्रगती करायची आहे आणि अध्यात्मिकदृष्ट्या तशी मानसिकता विकसित केली पाहिजे. या दोन्हीचे संतुलन करता येऊ शकते. आपण स्वतःपासून सुरवात केल्यास समाजाला तशा वागण्याचे उदाहरण दाखविता येईल. त्यालाच ‘स्वातंत्र्य’ म्हणता येईल. ‘स्व’ हा अध्यात्मात उच्चपातळीवर आहे. त्यामुळे, त्याची उपासना करण्याचा प्रयत्न करणे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे अशी पावले आपल्याला उचलायची आहेत.
आपल्याला प्राचीन काळी शिकविलेला अभ्यास लोकांपर्यंत पोचवायचा आहे, त्यातून देशाला विश्वाच्या समस्या सोडवता येऊ शकतात. अगदी गर्भसंस्कारापासून सोळा संस्कारांपर्यंतचे संस्कार सर्वोत्तम आहेत. त्या सर्व थेरपी आहेत. त्यासाठी तुम्ही कुठल्या जाती-धर्माचे आहात, याने काही फरक पडत नाही. मी कोणत्याही भाषेत प्रार्थना केली, तरी ती चांगली स्पंदनेच आहे ना? ती तुमच्यापर्यंत आल्यास काय बिघडतेय? तुम्ही प्रयत्न तर करून बघा…!
आपले सणवार, त्या मागचे शास्त्र लोकांपर्यंत नीट पोचविले पाहिजेत. त्यासाठी आपण सगळे एकत्र येतोय. हे सणवार आपण विसरुन गेलोय आणि आपण नको त्या गोष्टी करतोय. गणपती म्हणजे छान सार्वजनिक उत्सव. आपण काय करून ठेवलेय त्याचे? मोठ्याने म्युझिक लावायचे, नको त्या गोष्टी करायच्या. गणपती ते दिवाळी म्हणजे मूलाधार चक्रापासून शिखरापर्यंतचे जे काही आहे, ते रूपक आहे. अशा गोष्टींच्या संस्काराची सुरुवात घरापासून करावी लागेल. सामाजिक व शालेय संस्कार आपण समाजात पोचविले पाहिजेत.
धर्माची व्याख्या
माझी ऊर्जा वाढतेय आणि त्याने दुसऱ्याचे नुकसानही होत नाही, ही माझ्या दृष्टीने, धर्माची व्याख्या. धर्म समजण्यासाठी आपल्याकडे भक्तीमार्ग आहे. कर्मयोग, हठयोग आहेत, या गोष्टी प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगायला हव्यात. आकडेवारी, तर्कशुद्ध कारण, कधी भावनिकदृष्ट्या, कधी कृती करून, कधी व्यापक स्तरावरच्या कृतीतून. असे केल्यास आपल्या लक्षात येईल, की अध्यात्म म्हणजे काय? त्याचा अर्थ काय?
अन्यायाच्या विरोधातच सगळे धर्म जगात निर्माण झाले. कुठलाही धर्म पाहा. आपल्याला देवाकडे जायचे आहे...त्याच्यात विलीन व्हायचे आहे... हे समजून ते वास्तवात उतरविता आल्यास त्याला वेगळा अर्थ प्राप्त होईल. आज 15 ऑगस्टचा ‘सकाळ’चा अंक आणि ‘साम’ टीव्हीमधून आपण जे लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय, त्यात दोन मार्ग आहेत. भौतिक आणि आध्यात्मिक. लोकांचा गैरसमज होतो की, भगवे कपडे घातले, रुद्राक्षाची माळ घातल्यास मी आध्यात्मिक. आध्यात्मिकता हे ऊर्जेचे गणित आहे. भौतिक पातळीवर आपल्याला सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत, हे मी समजू शकतो. भौतिक आणि आध्यात्मिक मानसिकता समांतर पातळीवर ठेवण्याची दिशा ‘सकाळ माध्यम समूह’ घेतो आहे.
पत्रकारितेत समस्या कोठे आहे, हे पाहायला शिकवतात. नकारात्मक गोष्ट सर्वत्र पसरते, मात्र सकारात्मक गोष्ट पसरायला वेळ लागतो. समाजातील ही विकृती समाजाचेच नुकसान करते. त्यामुळेच एखादी चांगली गोष्ट दहावेळा, शंभर वेळा सांगावी लागते, तरच तिच्यावर लोकांचा विश्वास बसतो. दुसऱ्यामध्ये विकृती पसरविण्याचे काम ‘साम’ वा ‘सकाळ’ करणार नाही. सकारात्मकतेचे तत्त्वज्ञान किंवा आदर्शवाद आम्ही उभा शकू. सर्व लोककल्याणासाठी करू.
‘कर्मयोगा’च्या दिशेने...
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमध्ये विलक्षण क्षमता आहे. त्यांच्याकडे देश आणि विश्वाचे कल्याण करण्याची कल्पना आहे. खरेतर, राजकारणात असे खूप जण असे आहेत. वेगवेगळ्या पक्षांत आहेत. माझी मध्यंतरी राहुल गांधी यांच्याशीही भेट झाली. त्यात, माझा दृष्टिकोन असा असतो की, तुमच्याकडून काय शिकता येईल आणि कशापद्धतीने एकत्रित काम करता येईल. आपण सगळ्या सज्जनांचे व्यासपीठ बनवले पाहिजे. हे सगळे चांगले लोक एका व्यासपीठावर का येत नाहीत? सर्वांनी एकत्र येऊन विश्वासाठी उदाहरण म्हणून चांगले करायचा प्रयत्न करू. भारताला विश्वगुरू बनविण्याचा हा मार्ग असू शकतो. मोदीजींनी मध्यंतरी ‘मिशन कर्मयोगी’ हा कपॅसिटी बिल्डिंग विभाग सुरू केला. सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी तेथे प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. ‘मिशन कर्मयोगी’मागे त्यांचा उद्देश काय आहे, हे आपल्याला लक्षात येत आहे. त्यात कृपया धर्म आणू नका. कर्मयोग समजून घ्यायचा, तर गीतेमधला अध्याय, त्याची व्याख्या आपल्याला समजली पाहिजे. ते आपण प्रशिक्षणात आणायचा प्रयत्न करत असू, तर हे संपूर्ण जगासाठी उत्तम उदाहरण ठरेल. अशा कामात सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
भारताच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे झाली. परकीय राजवटीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले; मात्र या संपूर्ण वाटचालीत सर्व समस्या, दुःखे संपली नाहीत. म्हणजेच, भौतिक प्रगतीपलीकडे समाधानाने जगण्यासाठी काहीतरी करायला हवे, याचा शोध आपल्या परंपरेत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. यालाच आम्ही ‘भारतीयत्व’ म्हणतो.
भारतीय परंपरेत, गीतेत कुठेही साधे राहा, असे सांगितलेले नाही. आपल्या परंपरेत समृद्धी, ऐश्वर्य सारे आहे. ते मिळवलेही पाहिजे. मात्र, त्याची आसक्ती असू नये. भौतिक आणि आध्यात्मिक असा दोन्ही मार्गांवरचा प्रवास एकत्रच केला पाहिजे, तोच समाधानाकडे नेऊ शकतो, तेच भारतीयत्व आहे. भौतिक प्रगतीला आध्यात्मिक विचारांची जोड देणे, हेच भविष्य घडवण्याचे काम. ते करण्यासाठी आम्ही ‘सकाळ’ला ‘भविष्यपत्र’ म्हणतो. ‘सकाळ’ हे भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा एकत्र विचार मांडणारे व्यासपीठ बनेल. ते सज्जनांचे व्यासपीठ असेल. ऊर्जा वाढवणे हेच त्याचे ध्येय आहे, त्यात धर्म-जात असले भेद नाहीत. प्रगतीची अनेक मॉडेल आपण अनुसरली आहेत. आता या मार्गाने जाऊन तरी पाहूया.
चार उदाहरणे...
एक अर्थ...
काही वर्षांपूर्वी ड्रायव्हर म्हणाला, ‘साहेब, मी अडचणीत आहे. माझा पगार दहा हजार आहे. मला परवडत नाही. मुलांचे शिक्षण आहे...’
----
दुसरे एक व्यवस्थापक आले. त्यांना त्या काळात लाखभर पगार मिळत होता. ते म्हणत होते, ‘मला परवडत नाही.’ आश्चर्य म्हणजे सर्वांना मुलांचीच काळजी होती.
----
एक सीईओ होते.
त्यांना महिन्याला त्या वेळी दहा लाख पगार होता. तेसुद्धा म्हणाले, ‘सर, मला परवडत नाही. माझा एक मुलगा ऑस्ट्रेलियात आहे. एक इंग्लंडमध्ये आहे. शाळेची फी जास्त आहे...’
----
पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. वयाने मोठे, जवळचे मित्र. मोठा बिझनेस. परिवारात वाद झाल्यावर त्यांनी मुलांना जबाबदारी वाटप करायचे ठरवले. धाकटा भाऊ म्हणाला, ‘तू मोठ्या भावाला समजव.’ मी म्हणालो, ‘काय पाहिजे तुला?’ तो म्हणाला, ‘दीडशे कोटी रुपये मिळाल्यास मी हॅपी राहीन.’ आम्ही चर्चा केली. काही काळाने मोठा भाऊ तयार झाला. धाकट्या भावाला दीडशे कोटी आणि मोठ्या भावाला बिझनेस. दीडशे कोटी मिळालेला धाकटा भाऊ म्हणाला, ‘माझा एकच मुलगा आहे. पण, दीडशे कोटीत काय होणार? एक प्रॉपर्टी नीट मिळणार नाही.’ माझ्या डोक्यात विचार आला, ‘बाप रे, दहा हजार असेल, दीड लाख असेल, की दीड लाख कोटी....जोपर्यंत तुमच्यात पैशाची भूक आहे, आसक्ती आहे, तोपर्यंत कितीही दिले तरी कमीच...’
भौतिक
भारतीय परंपरेतील ज्ञान धर्म किंवा जातीसाठी नाही, ते संपूर्ण विश्वासाठी आहे. हे ज्ञान शोधणे, परंपरांतील सूत्रांचा अभ्यास करणे, नव्या संदर्भात अर्थ लावणे याला महत्त्व आहे. तेच नव्या काळातील शोधपत्रकारितेचे स्वरूप आहे.
माणूस हुशार (इंटेलिजंट) आणि विवेकी (इंटेलेक्ट) असणे यात फरक आहे. उच्चशिक्षित आणि आपल्या चुकीच्या कृतीचे परिणाम समजणारेही अशा कृती करतात, तेव्हा मुद्दा विवकेबुद्धीचा असतो.
विवेकाचा जागर शिक्षणातूनच व्हायला हवा. सारे शिक्षण गुण, नोकरी, पैसा, क्रयशक्ती आणि परिणामतः चंगळवादाकडे नेणारे असल्यास शिक्षणात काहीतरी चुकते आहे. हे जगभरात चुकते आहे. यावर मात करण्यासाठी शिक्षणातच विवेकाचा अंकुश ठेवण्यावर भर द्यावा लागेल.
जगभर प्रगतीचे मोजमाप सकल राष्ट्रीय उत्पादन, दरडोई उत्पन्न या निकषांवर होते. स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीचा आढावा आपणही याच अंगाने घेतो. विकसित जगात पायाभूत सुविधा आहेत, सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत, उत्पन्न चांगले आहे, मात्र सारे सुखी आहेत काय?
भौतिक प्रगतीवर आधारित प्रशासनाची मॉडेल जगभर राबवली जातात. त्यातून समाधान मिळत नाही.
आपला सर्व प्रयत्न सुख-समृद्धी-शांतता यांसाठी असल्यास या वाटचालीत काही अपुरपेणा आहे, हे समजून घेतले पाहिजे.
आधुनिक सुविधांच्या उपलब्धतेमुळे कामे हलकी होत असली, तरी समाधान नाही. मोबाईल आल्याने संपर्क सोपा झाला; पण नाती जवळ आली का? विकसित देशांत प्रगतीसाठी निसर्गाचा ऱ्हास केला गेला, त्याचे समर्थन करता येईल?
जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे. तो नसल्यास संपत्ती कमावणे अर्थहीन बनते. कितीही कमावत असूनही रोज ताजे, सात्त्विक अन्न मिळत नसेल, सतत तणावाखाली राहात असाल, भवताली प्रदूषित वातावरण असेल, तर कमावण्याचा उद्देश काय?
उत्सवांचा आनंद मिळाला पाहिजे, तो आपले अंतरंग उजळवून टाकणारा असला पाहिजे. ही दृष्टी विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आध्यात्मिक
‘भारत’ या शब्दाचा अर्थच ऊर्जेची उपासना करणारे. ऊर्जा वाढते अशा गोष्टींना भारतीय मानले पाहिजे. ऊर्जेची उपासना करणाऱ्या जगातील प्रत्येकाला भारतीय म्हटले पाहिजे.
‘भारतीय’ तत्त्वाचा अवलंब रोजच्या जगण्यात करता आला पाहिजे, ज्यातून समाधानी जीवनाचा मार्ग सापडू शकतो. आपण आर्थिक प्रगतीसाठी अनेक गोष्टी करतो. मात्र, आपल्या परंपरेतील ‘अष्टांग योगाचा’ अवलंब का करीत नाही?
भारतात विचारांचे संचित आहे, म्हणून भारताने केवळ देशाचा नव्हे, तर विश्वाचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या पलीकडे समाजाचा, देशाचा आणि मानवजातीचा, पुढे सर्व भूतमात्रांचा विचार करणे म्हणजे उन्नत होत जाणे. ते आनंद देणारे आहे. याकडे जाण्याचा मार्ग आपल्या परंपरेत आहे.
भगवद्गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात, असे गीतेचे तज्ज्ञ सांगतात. म्हणजेच जगण्यातील प्रश्नांवरही गीतेतून मार्गदर्शन मिळाले पाहिजे. समाजासमोरच्या प्रश्नांनाही उत्तरे मिळाली पाहिजेत. ती शोधण्याचा प्रवास म्हणजे भारतीयत्वाकडे जाणे. ‘सकाळ’मधून हा प्रवास करतो आहोत.
व्यक्ती शास्त्राच्या आधारे सर्व आचार करत असेल आणि एखादा यातील काहीही अमलात आणत नसल्यास दोघांच्या जीवनात काय फरक पडतो, याचा शोध घेण्याचाही प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा एक भाग समाजात, व्यक्तिगत स्तरावर विवेकबुद्धीचा जागर करणे आहे.
आपला देश श्रीमंत आहे, तो संत-महात्म्यांच्या शिकवणीमुळे. आपण ज्या अर्थाने श्रीमंती मोजतो, त्या अर्थाने साईबाबा श्रीमंत होते काय? अतिश्रीमंतही साईंच्या चरणी लीन का होतात? कारण त्यांचे अध्यात्म. ते सांगतात ती ‘श्रद्धा आणि सबुरी’ आचरणात आणल्यास सुखाचा मार्ग मिळेल.
प्रत्येकाचा स्वभाव, मूळ प्रकृती वेगळी असते. साहजिकच अध्यात्माचे तेच सार निरनिराळ्या रीतीने सांगावे लागते. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि हटयोगाची योजना त्यासाठी शास्त्रात केली आहे. अध्यात्म म्हणजे आपल्यातील उच्चतम अशा ‘स्व’ला ओळखणे.
भारतीयत्वाची ही सूत्रे प्रत्यक्षात आणायची आहेत. खुल्या मनाने विचार केल्यास धर्माचे तत्त्व समजते. मानसिकता बदलणे हा त्याचा गाभा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.