लाजरी कन्या ते बिनधास्त नायिका

त्या एका गाण्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. गाण्याची गरज म्हणून बिकिनीचा वापर खरेतर केला गेला. त्या तशा कपड्यातही कुठेच अश्लिलता झळकली नाही
goa
goaDainik Gomantak

आसावरी कुलकर्णी

तिचे डोळे माशासारखे रेखीव, समुद्राचा गहिरेपणा लेऊन बसलेले. लाजरी बुजरी कन्या लग्न होऊन सासरी गेली. तिला काय माहीत गोव्याचा उंबरठा ओलांडताच तीच नशीब पालटणार आहे.

एवढं की लाजेचा पडदा बाजूला सारून एका बोल्ड आणि बिनधास्त मदनिका म्हणून तिची ख्याती होईल. पेडणेची रतन कोल्हापूरला जाऊन मीनाक्षी होईल आणि रूपेरी पडद्याला अक्षरशः आग लावेल.

यालाच नियती म्हणतात बहुतेक. आज कान चित्रपट महोत्सवात अभिनेत्री काय (किंवा काय काय) घालून जातील याचा नेम नाही. यावर चर्चा रंगते. आजही आंतरराष्ट्रीय स्टेजवर पाश्चात्य कपडे घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या अभिनेत्रींवर आडून आडून टीका होते.

goa
Goa Statehood Day 2024: गोवा घटकराज्य दिन विशेष! समृद्ध वारसा, इतिहास आणि संस्कृती

पण मजा म्हणजे ज्यावेळी स्त्रियांनी केवळ नऊवारी नेसून फिरावे असा जनमानस असताना रूपेरी पडद्यावर चक्क बिकिनी घालून अभिनय करण्याचे काम रतनने केले. एक कार मेकॅनिकशी विवाह करून त्या कोल्हापूरला गेल्या. तिथल्या चित्रनगरीत त्यांच्या पतीचे बरेच मैत्र होते. हंस चित्रपट संस्थेसाठी एका नव्या चेहऱ्याची गरज होती. दिग्दर्शकांच्या नजरेत रतन भरली. परंतु पूर्वी कधी अभिनय न केल्यामुळे रतनने सपशेल नकार दिला.

त्यात सिनेमात एक गाणे बिकिनी घालून करायचे असल्यामुळे तिने अजूनच आढेवेढे घेतले. शेवटी पती पांडुरंग शिरोडकर, निर्माते पांडुरंग नाईक यांनी समजवल्यामुळे त्या तयार झाल्या. सिनेमा जगतातील पहिल्या बिकिनी घालून काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्या नावारूपास आल्या. रतनची मीनाक्षी झाली. मास्टर विनायक यांच्याबरोबरच्या ब्रह्मचारी या चित्रपटात यमुना जळी खेळू खेळ कन्हेैया का लाजता हे गाणे त्यांनी स्वतः गायले होते.

त्या एका गाण्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. गाण्याची गरज म्हणून बिकिनीचा वापर खरेतर केला गेला.त्या तशा कपड्यातही कुठेच अश्लिलता झळकली नाही. त्या घटनेमुळे स्त्रियांना या रूपातही बघण्याची सवय लोकांना लागली. उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर मास्टर विनायक यांच्या बरोबर त्यांनी विविध चित्रपटांतून काम केले. खरेतर कित्येक तरुण तरुणी चित्रनगरीत अभिनेता अभिनेत्री बनण्यासाठी येतात. "काही थोडकेच यशस्वी होतात तर कित्येक अयशस्वी होऊन पुन्हा आपल्या गावी परतात किंवा तिथेच मनाविरुद्ध छोटी मोठी कामे करत रहातात. पण मीनाक्षी यांना हे यश न मागताच मिळालं.

अर्थात त्यानंतर त्यांनी उपजत गुणांनी ते निभावून नेलं. हसऱ्या चेहऱ्याच्या बोलक्या डोळ्याच्या अभिनेत्री म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. त्यांनी उचललेल्या या धाडसी पावलामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. परंतु पतीच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्या काम करतच राहिल्या. हंस पिक्चर्सच्या अद्वितीय यशानंतर मीनाक्षी हा परवलीचा शब्द बनला.

बिकिनी सीनमुळे मिळालेली प्रसिद्धी मात्र त्यांना तशी खटकतच होती. तो काळच तसा होता. स्त्रियांना बंधनं होती. त्यामुळे हे शल्य त्यांना होते. सोनेरी सावली या चित्रपटात शेवटचे काम करून त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. पतीसमवेत त्या मुंबईत रहायला गेल्यावर शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास त्यांनी सुरू केले. चित्रपटातून काम कमी केल्यानंतर त्यांनी संगीत नाटकातूनही भूमिका केल्या. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांच्या दोन नाती नम्रता आणि शिल्पा या क्षेत्रात आल्या. नम्रता शिरोडकर हिने तर मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धाही जिंकली.

माधवीताईंनी त्यांचे वर्णन करताना यामुनाजळी विहारणारी मांडवीची कन्या असे यथार्थ चित्रण केले आहे. आजही चर्चेचा विषय ठरणाऱ्या बिकिनीचा वापर करून नवीन पायंडा पाडणाऱ्या या गुणी अभिनेत्रीला मानाचा मुजरा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com