कोस्मे-द-ग्वार्दने सन 1685 मध्ये गोव्यातील मुरगावमध्ये लिहिलेले ‘शिवचरित्र’

छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) चरित्र्य कसे होते याचा उत्तम पुरावा म्हणजे परकीय शत्रू असणाऱ्या पोर्तुगीज कोस्मे-द-ग्वार्दचे हे 'शिवाजी चरित्र'.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak
Published on
Updated on

एखाद्या व्यक्तीचे चरित्र आणि चारित्र्याचे महत्त्व कधी कळते ? तर, त्या व्यक्तीला समकालीन असलेल्या त्याच्या शत्रुला त्याचे चरित्र लिहावे असे जेव्हा वाटते तेव्हाच त्या व्यक्तीची थोरवी कळते. गोव्यातील पोर्तुगीज शिवाजी महाराजांना उद्देशून "शिवाजी हा गोवे राज्याचा (पोर्तुगीजांच्या) महान शत्रु" आहे, असे मानत. महाराजांचे समकालीन पोर्तुगीज जेजूईट फादर लेईश याने "अखिल हिंदुस्तानास शिवाजीचा धाक वाटत होता, "असे लिहून ठेवले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
पावसाच्या सावटातही झाला दिव्यांच्या लखलखाट!

शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर आंतोनियु पाइश यास कळली तेव्हा त्यांने जे दोन वाक्यांचे उद्गार काढले, त्या दोन वाक्यांवरून पोर्तुगिजांना शिवाजी महाराजांचा किती धाक होता आणि शिवाजी महाराजांची त्यांच्या शत्रूविषयी निती कशी होती, हे कळून येते. गव्हर्नरने म्हटले होते, "शिवाजीच्या मृत्यूमुळे हे राज्य (पोर्तुगिजांचे) आता काळजीतून मुक्त झाले! युद्धकाळापेक्षा शांततेच्या प्रसंगी तो अधिक भीतीदायक होता! सतराव्या शतकात शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या दरम्यान पोर्तुगीज स्वःताला संपूर्ण जगावरील समुद्राचे बादशहा समजत. अशा काळात गोव्यातील पोर्तुगीजाना शिवाजी राजांच्या कार्यकर्तृत्वाचा धाक कसा होता, याचा परिचय होतो. त्यामुळे पोर्तुगीजाना त्यांच्या आशियाच्या इतिहासात आणि आशियातल्या त्यांच्या राजधानीत, म्हणजे गोव्यात जबरदस्त दहशत बसवणाऱ्या त्यांच्या शत्रूचे अर्थात शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिण्याइतके आकर्षण वाटावे हे, साहजिकच होते.

Chhatrapati Shivaji Maharaj
केजरीवाल आज गोव्यातील महिलांसाठी करणार मोठी घोषणा

इ.स. 2169 मध्ये गोव्यात मुरगाव येथे वास्तव्य करून असलेल्या कोस्मे-द-ग्वार्द या, जन्माने गोवेकर पोर्तुगीज असलेल्या नागरिकाने "सुप्रसिद्ध शिवाजी" या नावाचे शिवाजी महाराजांचे 168 पृष्ठांचे चरित्र लिहिले.कोस्मे-द-ग्वार्द याने शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिण्याचे कारण त्यांना शिवाजी महाराजांविषयी वाटणारे आकर्षण, हेच होते. कित्येक युरोपीयनाना ते त्यांच्या पौराणिक ग्रीक व रोमन कथांमधील नायक वाटू लागले होते. अशाच रोमहर्षक आकर्षणातून कोस्मे-द-ग्वार्दने. “पोर्वात्य भारतातील प्रसिद्ध व अत्यंत यशस्वी अशा शिवाजीचे चरित्र आणि कृत्य" या नावाने चरित्र लिहिले. कोस्मे-द-ग्वार्द हा खरे तर इतिहास लेखक नव्हता. त्यामुळे इतिहास लेखनाचा, संदर्भ तपासून लिहिण्याचा नियम त्याने लिहिलेल्या या चरित्रलेखनात पाळलेला दिसत नाही. त्यामुळे अनेक प्रसंग चुकीच्या जागी आणि चुकीच्या वेळी त्याने लिहिले. प्रत्यक्षात हे पुस्तक म्हणजे कॉस्मे याने त्याकाळात शिवाजी महाराजांविषयी ऐकलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टींचा एक लेखसंग्रह आहे. कोस्मे-द-ग्वार्द बहुतेक पोर्तुगीजांसाठी त्यांच्या परराष्ट्र सेवेत कार्यरत असावा. त्याच्या उमेदवारीच्या काळांत त्याने नोकरीनिमित्त भारतात विविध जागी प्रवास केला असावा, कारण, त्यांच्या या चरित्रात अनेक ठिकाणी फारसी व हिंदी शब्द येतात. त्याला फारसी भाषेचे जुजबी ज्ञान असावे, असे दिसते.

कोस्मे-द-ग्वार्दच्या चरित्रांत मनोरंजक बाजारगप्पा असल्या तरी त्यात गोव्यातील अनेक प्रसंगाचे तपशिलाने वर्णन मिळते. शिवाजी महाराजांच्या सन 1665 च्या फेब्रुवारीत कर्नाटकातील बसरूर स्वारीच्या वेळी मराठ्यांचे नौदल परतीच्या वाटेवर असताना मुरगावच्या समुद्रांत त्याच्या पोर्तुगीजांबरोबर झालेल्या लढाईसंदर्भातला तपशील पुस्तकात मिळतो. शिवाजी महाराजांच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या बार्देश स्वारीच्या प्रसंगाला कारणीभूत असणाऱ्या कोकणातील देसायांविषयीच्या हकिकतीस पोर्तुगीज दप्तरांचा दुजोरा मिळतो. याशिवाय गोव्यातील पोर्तुगीज अमलाखालील जनतेमध्ये शिवाजी महाराजांविषयी कशा आख्यायिका निर्माण झाल्या होत्या, यांचीही माहिती मिळते. गोव्यातील या प्रसंगांशिवाय अफझलखान वध, शाहिस्तेखान व जसवंतसिंह राठोड यांच्याविरुद्धच्या मोहिमा, सुरतेची पहिली वसुली मोहीम, मिर्झाराजा जयसिंहाची शिवाजी महाराजांच्या विरोधातली मोहीम, जयसिंह आणि शिवाजी महाराज यांची विजापूरवरील स्वारी, आग्रा भेट, सुरतेची दुसरी वसुली, शिवाजी महाराजांचा मृत्यू इत्यादी प्रसंगाना कोस्मे-द-ग्वार्दने लिहून काढले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
गोवा राज्य ‘कॅसिनो कॅपिटल’; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचे 'प्रमोशन' धोरण

शिवाजी महाराजाचे चारित्र्य कसे होते याचा उत्तम पुरावा म्हणजे परकीय शत्रू असणाऱ्या पोर्तुगीज कोस्मे-द-ग्वार्दचे हे शिवाजी चरित्र. "युद्धात शत्रूच्या मुलखातील स्त्रिया, लहान मुले जर कैद झाली तर शिवाजी महाराज त्यांना सन्मानाची वागणूक देतात," असे कोस्मे-द-ग्वार्द लिहितो. महाराजांचा अधिकारी अनंत पंडित ऊर्फ सभासद आपल्या बखरींत शिवाजी महाराजांच्या काय आज्ञा होत्या, हे लिहिताना "परमुलखात पोरबायका न धरावी" अशी सक्त ताकीद दिल्याचे सांगतो. अशा चारित्र्यवान राजाचे चरित्र त्यांच्या शत्रूंनाही लिहावे असे वाटणे साहजिकच होते.

शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर अवघ्या 15 वर्षानी, सन 1685 मध्ये कोस्मे-द-ग्वार्दने हे शिवचरित्र गोव्यातील मुरगाव येथे लिहिले. परकीय भाषेतले आणि परकीय व्यक्तीने लिहिलेले शिवरायांवरले हे पहिलेवहिले शिवचरीत्र. ग्वार्दच्या या पोर्तुगीज चरित्राचे इंग्रजी भाषांतर सुप्रसिद्ध इतिहसकारकार डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी करून ते त्यांच्या फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी, या ग्रंथात छापले आहे. सन 1730 मध्ये ग्वार्दच्या निधनानंतर पोर्तुगालमध्ये त्याचा ग्रंथ पहिल्यांदा छापून प्रकाशित झाला. त्या पहिल्या प्रकाशनाची प्रत पोर्तुगालच्या लिस्बन येथील राष्ट्रीय ग्रंथालयात जतन करून ठेवली आहे. या ग्रंथाचे मुखपृष्ठ गोव्यातील इतिहासकार डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांनी त्यांच्या पोर्तुगीज-मराठे संबंध या पुणे विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात छापले आहे. या ग्रंथाची एक प्रत डॉ. पिसुर्लेकर यांच्या संग्रहात आहे. सध्या पिसुर्लेकरांचा पुस्तक संग्रह गोवा विद्यापीठात आहे.

-सचिन मदगे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com