गोव्याने सन्मित्र गमावला

देशाच्या सनदी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपला अंतःस्वर ऐकत विविध क्षेत्रांत कार्यरत राहिलेले शक्ती सिन्हा वारले. त्यांच्या रुपाने गोव्याने एक सच्चा मित्र गमावला आहे.
Shakti Sinha Goa Connection
Shakti Sinha Goa ConnectionDainik Gomantak
Published on
Updated on

देशाच्या सनदी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपला अंतःस्वर ऐकत विविध क्षेत्रांत कार्यरत राहिलेले शक्ती सिन्हा वारले. त्यांच्या रुपाने गोव्याने एक सच्चा मित्र गमावला आहे. सिन्हा यांच्या कर्तृत्वाचा आवाका फार मोठा आहे. शेवटपर्यंत ते आपली हुकुमत असलेल्या विषयांत आपले वैचारिक योगदान देत राहिले. त्याचा आढावा घेण्याआधी गोव्याविषयी त्यांना असलेल्या ममत्वाबद्दल सांगणे संयुक्तिक ठरेल. गोव्यावर सनदी नोकर लादले जातात ही वस्तुस्थिती आहे. यातले बरेच सेवेतला एक अपरिहार्य टप्पा म्हणून येथे येतात आणि आपल्याच कोषात वावरत येथून निघून जाण्याची संधी शोधत असतात. सुखासीनतेला थोडीशी कर्तव्यपरायणतेची जोड द्यायची, आपल्या दिल्लीतील गोतावळ्याला येथे बोलावून जिवाचा गोवा करायचा आणि जाताजाता एखादा जमिनीचा तुकडा विकत घेऊन निवृत्तीनंतरच्या संभाव्य निवासाची किंवा ‘सेकंड होम’ची व्यवस्था करून ठेवायची.

एवढे करतानाच त्यांचा गोव्यातला कार्यकाल संपतो. मग, येथील जनतेत मिसळणे, आपल्या कार्यक्षेत्राच्या समस्या समजून घेत आपल्याला मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे त्या समस्यांना भिडणे त्यांना शक्य होत नाही. त्याची कुणाला खंतही नसते, कारण तशी इच्छाच मुळात नसते. खुंटावरल्या कावळ्यांची उपमा बव्हंशी सनदी नोकरांना चपखल शोभावी अशीच. गोव्याचा अंतर्भाव अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि काही संघप्रदेशांच्या समवेत ज्या ‘अॅग्मुट’ केडरमध्ये होतो, त्यातून पुढे येणारे सनदी सेवकही याच परंपरेला जागतात. याचा अनुभव आपण अगदी आजही घेत असतो. शक्ती सिन्हा हे मात्र या कार्यपद्धतीला नाकारलेले आणि केवळ आपल्या गोव्यातल्या कार्यकाळातच नव्हे, तर त्यानंतरही गोव्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात रममाण झालेले ‘आयएएस’ अधिकारी होते.

Shakti Sinha Goa Connection
Goa: गोमंतकीय परंपरा निष्ठेने सांभाळणारे इंद्रफुल कोमेजले

गोव्यातल्या आणि त्यातही राजधानीतल्या साहित्यिक, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा क्षेत्रांत गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकांत, दोन दशकांत सक्रिय असलेल्या व्यक्तींशी त्यांचे ऋणानुबंध जुळले होते आणि ते त्यांनी अखेरपर्यंत जपले. 1985 ते 1992 या काळात त्यांनी गोव्याचे शिक्षण सचिव, कला आणि संस्कृती खात्याचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळला. कला अकादमीचे सदस्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या काळात मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडेच कला अकादमीचे अध्यक्षपद असायचे, यावरून या नियुक्तीचे महत्त्व कळावे. या कार्यकाळात ते गोव्यात खरोखरच रमले आणि रळले. सनदी सेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रांचा विचार करायचा तो काळ होता. सप्ताहात सुट्ट्या उपभोगण्यासाठी शुक्रवारच्या विमानसेवेने कुणी दिल्ली गाठत नसायचे, हेही महत्त्वाचे. शक्ती सिन्हा यांना माणसांचे वेड होते आणि त्यांनी सात वर्षांच्या गोव्यातल्या वास्तव्यात अनेक माणसे जोडली आणि शेवटपर्यंत त्यांच्याशी असलेले स्नेहबंध जोपासले. इथल्या अनेकांशी त्यांचे मधूर संबंध होते आणि नंतरच्या दिल्लीतल्या वास्तव्यातही गोवा आणि गोमंतकियांना त्यांच्या मर्मबंधात विशेष स्थान राहिले. खऱ्या अर्थाने ते गोमंतमित्र होते.

वर उल्लेख केल्याप्रमाणे शक्ती सिन्हा यांच्या कार्याचा आवाका बराच मोठा आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अमोघ वक्तृत्व आणि विचारवैभवाने ते प्रभावित झाले होते आणि वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. दोन वर्षे वाजपेयींचे स्वीय सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. वाजपेयींवर लिहिलेल्या पुस्तकातून त्यांनी या काळात देशाच्या परराष्ट्र धोरणाने कशी कूस पालटली याचे मनोज्ञ चित्रण केले आहे. अनेक राजकीय ताण्याबाण्यांवरही तटस्थपणे लिहिले आहे. वाजपेयींच्या राजकारणातील अस्तानंतर शक्ती सिन्हा हे काही दिवस दिल्ली सरकारच्या प्रशासनात वित्त खात्याचे सचिव म्हणून कार्यरत होते. वाजपेयींचे विश्वासू असल्यामुळे त्यांच्याकडे बिगर भाजपा वर्तुळात संशयानेच पाहिले जायचे. तशात वीज वापरावरील अनुदानाच्या विषयावरून तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि त्यांचे कार्यपद्धतीवरून बिनसले आणि सिन्हा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सनदी सेवेतून बाहेर पडले.

Shakti Sinha Goa Connection
गोव्याला दुसऱ्या वसाहतवादाकडे फरपटत नेण्याची नांदी

आपल्याला सरकारी वर्तुळाच्या बाहेर जाऊन काम करावयाचे आहे, असे कारण त्यांनी आपल्या स्वेच्छा निवृत्तीसाठीच्या अर्जात दिले होते, तरी खरे कारण दिल्लीतल्या जाणकारांच्या नजरेतून सुटले नव्हते. सनद सेवेतून बाहेर पडल्यामुळे काही त्यांचे कार्यबाहुल्य कमी झाले नाही. उलट ते अनेक अंगानी विस्तारले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठात वाजपेयींच्या नावाने धोरणात्मक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना वाहिलेल्या खास संस्थेची स्थापन करून तिच्या संचालकपदाची जबाबदारी पेलणे असो, दिल्ली विद्यापीठात सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाला वाहिलेली संस्था सुरू करणे असो, किंवा इंडिया फाउंडेशनचे बहुआयामी कार्य असो, शक्ती सिन्हा यांच्या कर्तृत्वाचा आणि नियोजन कौशल्याचा अमीट ठसा सर्वत्र उमटला. लडाख हा त्यांच्या आत्मियतेचा विषय होता आणि आताही त्या प्रदेशाच्या भविष्याचा उहापोह करण्यासाठी आयोजिलेल्या एका विचार परिषदेत ते सहभागी होणार होते.

सिन्हा यांनी सार्वजनिक धोरण आणि भारत व चीनचा इतिहास अशा दोन विषयांतून पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या होत्या आणि चीनबरोबरच अफगाणिस्तान हा त्यांच्या मनन चिंतनाचाही विषय होता. आर्थिक धोरण आणि नियोजनातले ते जाणकार होते. यादवीमुळे जर्जर झालेल्या अफगाणिस्तानच्या पुनर्वसनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने गठित केलेल्या विशेषाधिकार समितीचे नेतृत्‍व त्यांनी काही काळ केले होते आणि जागतिक बँकेच्या संचालक मंडळाचे वरिष्ठ सल्लागार म्हणूनही ते कार्यरत होते. आपली विद्वत्ता आणि व्यासंग यांची उपयोजिता जाणणारा ते बुद्धिमान सेवक होते. गोव्यासाठी आपल्या हृदयात विशेष स्थान राखून ठेवलेल्या शक्ती सिन्हा यांना ‘गोमन्तक’ची भावपूर्ण श्रद्धांजली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com