Sernabatim Canal : कोण होतीस तू? काय झालास तू? सांतइनेज कालवा

Sernabatim Canal : दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
Sernabatim Canal
Sernabatim Canal Dainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. संगीता सोनक

कांपाल ते ताळगाव भटकताना बहुतेक ठिकाणी आपल्याला सांतइनेज खाडी सोबत करते. खाडी म्हणा वा ओढा किंवा कालवा, हिला स्वतःचा असा एक इतिहास आहे.

इराणमधील रामसर शहर. छोटेसे. कॅस्पियन किनारपट्टीवर वसलेले. २ फेब्रुवारी १९७१ या दिवशी पर्यावरण क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना येथे घडली. १८ देशांचे प्रतिनिधी येथे जमले आणि एक करार केला.

जेणेकरून आजतागायत जगाच्या नकाशावर या शहराचे नाव प्रसिद्ध झाले. जागतिक स्तरावर नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षण करणारे जगातील पहिलेवहिले अधिवेशन. हे अधिवेशन होते आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या आर्द्र्भूमी किंवा पाणथळ, विशेषत: पाणपक्ष्यांचे अधिवास असलेल्या, क्षेत्रावरील अधिवेशन.

पाणथळ परिसंस्था पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या आहेत. खास करून शहरी भागात. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या परिसंस्था मानवालाही उपयुक्त आहेत, मोलाच्या आहेत. सेंद्रिय पदार्थांनी संपन्न असल्यामुळे सजीवांच्या अनेक प्रजातींच्या आश्रयदात्या आहेत.

काही प्रजाती केवळ आर्द्र भूमीतच आढळतात. कित्येक जलचर, मासे, पशुपक्षी यांच्यासाठी या निवासस्थान, प्रजननस्थान आणि पोषणस्थान आहेत. पूरनियंत्रण, जमीनक्षरणप्रतिबंध, भूजलपुनर्भरण, प्रदूषणरोधक इत्यादी अनेक कामे या परिसंस्था करतात.

शिवाय सांस्कृतिकदृष्ट्या तसेच नयनरम्य अशा निसर्गसौंदर्याने मानवी जीवन सुखदायक बनवतात. परिसराचे सौंदर्यात्मक मूल्य वाढवून आपल्या मनोहर सृष्टिसौंदर्याने या परिसंस्था मानसिक संतोष देतात.

दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक वेगळा विशिष्ट विषय घेतला जातो. या वर्षीचा विषय होता ‘आर्द्र प्रदेश आणि मानव कल्याण’. आपल्या गोव्यातही अनेक ठिकाणी उत्साहाने हा दिवस साजरा केला गेला. गोव्यात अनेक पाणथळ आहेत.

अशीच एक पाणथळ जागा म्हणजे आपल्या राजधानी पणजीतील खाडी. सांतइनेज खाडी किंवा कांपाल खाडी. आमच्या आयुष्याची कितीतरी वर्षे आम्ही सांतइनेजमध्ये घालवली. तेव्हा या खाडीत सर्वत्र वाहते पाणी होते. बऱ्यापैकी स्वच्छ होते, एव्हढे घाणेरडे तर नक्कीच नव्हते. खाडीतील पाणी पिताना अनेक प्राणी, पक्षी दिसायचे.

कांपाल ते ताळगाव भटकताना बहुतेक ठिकाणी आपल्याला सांतइनेज खाडी सोबत करते. खाडी म्हणा वा ओढा किंवा कालवा, हिला स्वतःचा असा एक इतिहास आहे. ह्या इतिहासाची काही पाने आज धूसर असली तरी पणजी शहराशी हिचे नाते अतूट आहे.

आप्टेश्वर सिद्धिविनायक मंदिराच्या मागे आल्तिनोच्या टेकडीवरून एका छोट्याशा धबधब्यासारखे खाली येणारे पाणी एका विहिरीवजा बावडीत जमा होते. ही येथील ‘थिगूर बांय’. सांतइनेजला लहानपण घालवलेल्या अनेक व्यक्तींना या पाण्यात उडी ठोकून पोहोल्याच्या सुखद आठवणी असतील.

पावसात २४ जूनला ‘सांजाव फेस्त’ डोक्याला कपेला बांधून, या विहिरीत उडी टाकून साजरे व्हायचे. जवळ असलेला धोबीघाट. पणजीत धुलाईला जाणारे बहुतेक लोकांचे कपडे येथे धुतले जायचे. हा धोबीघाट कपडे धुवायला येणाऱ्या स्त्रियांच्या एकमेकांशी होणाऱ्या सुखदुःखाच्या हितगुजांना साक्षी आहे.

थोड्याशा अंतरावर, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पाण्याच्या या प्रवाहाला ताळगावच्या कामराभाटातून येणाऱ्या ओढ्याचे पाणी मिळते. पूर्वी हे पाणी ताळगाव नदी म्हणून ओळखले जायचे असे सांगतात.

नागमोडी वळणे घेत पणजी शहरात फिरून ही खाडी दोन ठिकाणी मांडवी नदीत विलीन होते. पणजी मार्केटजवळ आणि क्रीडा संचालनालयाजवळ. खाडीलगत बारा कल्व्हर्ट आहेत. यांपैकी सत्रेकडेन (आता विवान्ताजवळ) असलेला साकव सुंदर आहे, लक्षवेधी आहे.

पणजी शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू झाले तेव्हा मजूर लोकांच्या झोपड्या या खाडीजवळ उभ्या झाल्या. ही जागा खूप सोयीस्कर होती. चोवीस तास खाडीचे पाणी मिळाल्यामुळे अनेक कामे सोपी झाली. बांधकाम करणाऱ्या मालकांनी शौचालयांची सोय न केल्यामुळे सांडपाणी थेट खाडीला अर्पण होत गेले.

शिवाय खाडीच्या काठावर आलेल्या बांधकामाच्या कचऱ्याचा ढिगारा खाडीच्या पाण्यात जाऊ लागला. आजही पणजीत ह्या गोष्टी सर्रास होताना आपल्याला दिसतात. मजूर लोकांना शौचालये पुरवण्याची जबाबदारी मालकावर असते याचा सगळ्यांनाच विसर पडला आहे.

हळूहळू शहरातील रहिवाशांच्या घरातील कचरा खाडीच्या पाण्यात किंवा काठावर टाकला जाऊ लागला. खाडीला उकिरड्याचे स्वरूप येऊ लागले. हे सांडपाणी आणि कचरा खाडीच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे.

अलीकडच्या वर्षांत खाडीची स्थिती गटारमय झाली आहे. आज ‘नाला’ हा शब्द खाडीला घट्ट चिकटला आहे. हे नाव खाडीच्या ऱ्हासास अंशतः हातभार लावते कारण नाला या शब्दाचा अर्थ ओढा असा होत असला तरी अनेक लोक याचा संबंध उकिरड्याशी लावतात आणि सांडपाणी आणि कचरा टाकण्यासाठी त्याचा वापर न्याय्य मानतात.

या खाडीवर झालेल्या अत्याचारांचा मानवी आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. काही परिणाम अप्रत्यक्ष असतात, तर काही प्रत्यक्ष, काही दीर्घकालीन असू शकतात. सांडपाण्यामुळे खाडी बहुपोषी (eutrophic) बनते. यामुळे पाण्यात आश्रय घेणाऱ्या वनस्पतीच्या श्रेणी बदलतात. हा बदल अनेक तऱ्हेने घातक आहे,

अपायकारक आहे. तसेच मानवी विष्ठेतून अनेक जंतू पाण्यात मिसळतात. याचा मानवी आरोग्यावर थेट परिणाम होतो. गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचते. या खाडीवर डॉ. नंदकुमार कामत यांनीही अनेक वेळा लिहिले आहे.

काही वर्षांपूर्वी गोवा राज्य प्रदूषण मंडळासाठी केलेल्या कामाचा अहवाल आणि पुस्तकाचा मसुदा मी मंडळाला सादर केला होता. पण मंडळाकडून हे पुस्तक प्रकाशित मात्र झाले नाही.

Sernabatim Canal
Goa Budget Session 10 Feb 2024: कार्निव्हलसाहित राज्यातील अन्य घडामोडी वाचा एका क्लिकवर

एकेकाळी जैवविविधतेने नटलेली ही सुंदर खाडी जीर्ण वस्त्रे लेऊन आज शासनाच्या दारात उभी आहे. शासनाकडून वेळेवर हस्तक्षेप होणे अत्यंत महत्त्वाचे, आवश्यक आणि अपेक्षित आहे.

तसेच रहिवाशांनीही हिचे स्वरूप बदलून हिला पूर्ववत स्थिती प्राप्त करून देण्यास मदत करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com