ज्येष्ठ सहित्यिक अर्जुन परब ; प्रबोधन परंपरेचा चिरा निखळला

त्यामध्ये धर्मानंद कामत, राजाराम पैंगीणकर, गो.पुं. हेगडे देसाई, टी. बी. कुन्हा, पीटर अल्वारीस, ज्योकीम डायस यासारखे काही जण होते. ही प्रागतिक विचारांची परंपरा ज्यांनी पुढे चालू ठेवली त्यात अर्जुन जयराम परब यांचा समावेश होतो.
Arjun Parab
Arjun ParabDainik Gomantak

ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिक तथा पुरोगामी विचारवंत अर्जुन जयराम परब यांचे निधन ही गोव्यातील वैचारिक चळवळीची फार मोठी हानी आहे. गोव्यातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देणारे अनेक द्रष्टे विचारवंत आणि समाजसुधारक होऊन गेले.

त्यामध्ये धर्मानंद कामत, राजाराम पैंगीणकर, गो.पुं. हेगडे देसाई, टी. बी. कुन्हा, पीटर अल्वारीस, ज्योकीम डायस यासारखे काही जण होते. ही प्रागतिक विचारांची परंपरा ज्यांनी पुढे चालू ठेवली त्यात अर्जुन जयराम परब यांचा समावेश होतो.

गोवा मुक्तीसाठी भूमिगत कार्य करणारे स्वातंत्र्यसैनिक, सलग तीस वर्षे आदर्श शिक्षकाचे व्रत चालविणारे अध्यापक, कायद्याचे जाणकार, अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीतील सक्रीय कार्यकर्ता, सुस्पष्ट भूमिका घेऊन लेखन करणारा बेडर लेखक अशा अनेक पातळ्यांवर कार्यरत राहिलेल्या अर्जुन जयराम परब यांनी आपल्या कार्याची सर्वत्र छाप सोडली.

अर्जुन जयराम परब यांनी पोर्तुगीज काळात मुंबईत जाऊन बी. ए. तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून मराठी एम. ए. केल्यानंतर रीतसर कायद्याचे देखील शिक्षण घेतले. त्यावेळी शिक्षक आणि वकिल असे दोन्ही पर्याय त्यांना उपलब्ध होते. घरच्या गरीबीवर मात करायची तर वकिली व्यवसायात जावे, असा सल्ला त्यांना त्यांच्या शिक्षकांनी दिला. पण शिक्षण घेऊन केवळ स्वतः चा उदरनिर्वाह करणे व सुरक्षित कोशातील मध्यमवर्गीय आयुष्य जगणे एवढेच आपल्या जगण्याचे उद्दिष्ट नाही हे त्यांना त्याचवेळी कळले होते.

विद्यार्थी दशेत मुंबईतील राजकीय व सामाजिक चळवळींचा जवळून परिचय झाला होता. गोवा मुक्तीसाठी पत्रके वाटणे, स्वातंत्र्यसैनिकांच्या बैठकांना हजेरी लावणे, राष्ट्र सेवा दल शिबीरात जाणे यातून समाजासाठी काही केले पाहिजे ही जाणीव विकसित झाली होती. म्हणून त्यांनी गोव्याला परत येताच शिक्षकी पेशाची निवड केली. उपजिविका आणि समाजसेवा असे दोन्ही उद्देश त्यामुळे साध्य होणार होते. चौगूले शिक्षण संस्थेच्या माता हायस्कूल वास्को येथे त्यांनी ३० वर्षे अध्यापन केले.

नाटक हा प्रत्येक गोमंतकीयांचा आवडीचा विषय. तसा तो अर्जुन जयराम परब यांचाही होता. महाराष्ट्राच्याही आधी म्हणजे विष्णूदास भावे (१८४५) यांच्या कितीतरी पूर्वी धारगळच्या रघुनाथ शेट सावंत यांनी १८१८ साली ''ताकडधूम'' हे मराठीतील पहिले नाटक लिहिले याचा त्यांना मोठा अभिमान होता. त्या प्रेरणेतून अर्जुन जयराम परब यांनीही '' आशेचा अंकुर'' हे नाटक लिहिले. त्यानंतर गोवा व कोकणातील प्रसिद्ध लोकनाट्यप्रकार त्यांनी अभ्यासला. त्यावर ''लोककला दशावतार'' हे संशोधनपर पुस्तक लिहिले.

गोव्यातील लोककला हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यावर आणखी लिहिण्यासाठी अभ्यास सुरू असतानाच ते वैचारिक साहित्यही वाचत होते. याच दरम्यान राजर्षि शाहू, साने गुरूजी, राम मनोहर लोहिया, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे, भगतसिंग यांचे साहित्य त्यांच्या वाचनात आले. या सामाजिक क्रांतीचा ऊद्घोष करणाऱ्या लेखनाने अर्जुन जयराम परब यांच्या विचारांची दिशाच बदलून टाकली, आपला जन्म मनोरंजनपर लेखन करण्यासाठी नाही, याची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली.

त्यातूनच मग डाॕ. बाबासाहेब आंबेडकर - एक चिंतन प्रकटन, श्रींची इच्छा, ज्ञानयोगी ज्ञानेश्वर, विचारवेध, संत गाडगेबाबांची कीर्तने, शिवाजी त्यांचा - शिवाजी आमचा, सनातन संस्कृतीचा पंचनामा, गरीब देशातील श्रीमंत देव, क्रांतिवीर भगतसिंग, धर्मांतर ते राष्ट्रांतर, तुका झालासे कळस, अवतारी परशुराम- हिंदू धर्म तारक की मारक?, मराठी असे आमुची मायबोली, लोहिया यांचा समाजवाद विरुद्ध हिंदुत्ववाद, अशी अनेक वैचारिक पुस्तके लिहिली.

गोव्याचे वरवरचे स्वरूप हे पुढारलेले आणि आधुनिक असले तरी येथील भोळूयाभाबड्या समाजाच्या देवभोळेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना कर्मठ रूढी- परंपरा यात जखडून ठेवणारी व्यवस्था कायम आहे, हे अर्जुन जयराम परब हे पुरते जाणून होते. ही कर्मकांडी व्यवस्थाच या राज्यातील विषमता जोपासते. तेव्हा तिच्यावर सतत प्रहार केला पाहिजे, असे ते म्हणायचे. त्यांच्या आजवरच्या लेखनावर दृष्टिक्षेप टाकला तर त्याचि प्रचिती येते.

Arjun Parab
Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

ज्ञान, तर्क, विवेक, चिकित्सा आणि विचार या पाच विश्लेषक मुद्यांच्या आधारे त्यांनी प्रतिगामी विचार प्रखरपणे खोडून काढले. सामाजिक समता हाच भारतीय लोकशाहीचा बळकट आधार आहे. तो राखून ठेवण्यासाठी आपण प्रागतिक विचारांचा वारसा जोपासला पाहिजे, हे व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले.

एकविसाव्या शतकात कृत्रिम बुध्दिमत्ता मानवी बुध्दीला आव्हान देत असलेल्या काळात देखील अनेक अंधश्रध्दांची वारूळे आपल्याला वेढून आहेत. अशा स्थितीत अर्जुन जयराम परब यांच्या चिकित्सक विचारांचा वारसा जोपासणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.

गोव्यातील लोककला हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com