Restaurants in Goa: 'शारदा' ते 'गोपाळ' नाव बदललं, चव नव्हे

Restaurants in Goa: अस्सल गोमंतकीय चव चाखण्यासाठी गोव्यातील शारदा रेस्टॉरंटला नक्की भेट द्या.
Restaurants in Goa
Restaurants in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

कधी कधी अगदी साध्या दिसणाऱ्या टपरीवजा हॉटेलमध्ये अतिशय चविष्ट जेवण मिळतं आणि अतिशय टापटीप असणाऱ्या, सुंदर सजावट असलेल्या हॉटेलकडे बघून तिथं जेवायला जावं तर आपला भ्रमनिरास होतो. गोव्यात अशी भरपूर ठिकाणं आहेत ज्याच्या दिसण्यावर, रंगरूपावर जायचं नाही. वरवर बघताना जरा साधंसं वाटणारं रेस्टोरंट मात्र कमालीचं अप्रतिम जेवण देणारं असतं.

पणजीवरून (Panaji) मडगावला जाताना बांबोळीला जिथे 'फुलांचो खुरीस' आहे, त्या वास्तूला खेटूनच जो रस्ता आत जातो तिथेच मागच्या बाजूस साधंसुधं असं 'शारदा'(Sharda Restaurants) नावाचं रेस्टोरंट आहे. तिथे अतिशय चविष्ट पदार्थ मिळतात. मी ज्या संस्थेत काम करत होते, त्या संस्थेचे संचालक यशवंत ठकार हे अतिशय चवीनं खाणारे व्यक्ती होते. ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने जेव्हा केव्हा गोव्यात (Goa) येणं होई तेव्हा त्यांचं कुठं जेवायचं? कुठे नाश्ता करायचा हे सगळं ठरलेलं असायचं.

Restaurants in Goa
Recipe Of The Day: पावसाळ्यात कुरकुरीत बटाटा-चणा डाळ पकोड्यांचा घ्या आस्वाद

तेव्हा मी मासे खात नव्हते. पण मला मासळीबद्दल आणि त्यांच्या केल्या जाणाऱ्या पदार्थांबद्दल उत्सुकता असायची. याबद्दल जाणून घ्यायला आवडायचं. जेवायला त्यांच्यासोबत जायचे पण डाळ खिचडी नाहीतर दालफ्राय आणि रोटी हे माझे कायम ठरलेले पदार्थ असायचे.

बांबोळीला असणाऱ्या 'शारदा' रेस्टोरन्टमध्ये जेवायला जाताना मात्र 'तू येऊ नको. तिथे येऊन तू दाल-रोटी खाणार का?' अशी चेष्टा हे दोघेजण करायचे. याच कारणास्तव मी या शारदा नावाच्या प्रसिद्ध अशा रेस्टोरन्टमध्ये कधी गेलेच नव्हते. त्यानंतर खूप वर्षांनी जेव्हा मासळी खायला लागले तेव्हा मात्र एकदा ठरवून इथे गेले. कारण इथल्या पदार्थांचं खूप रसभरीत वर्णन मी कायम ऐकत आले होते.

शारदा रेस्टोरंट बऱ्यापैकी जुनं आहे. चाळीस - पंचेचाळीस वर्ष झाली असतील. बांबोळी पठाराच्या खाली असलेल्या 'शिरीदाव - पाळें' गावातील गोपाळ गावस यांनी छोट्याशा खोपट्यात 'शारदा' सुरू केलं. गोपाळ गावस यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मुलांनी जगदीश आणि निर्देश गावस या दोघांनी आपल्या वडिलांचा वारसा सुरू ठेवला आहे.

या लेखाच्या निमित्ताने निर्देश यांच्याशी बोलत असताना आणखी एक महत्त्वाची माहिती समजली कि गोपाळ यांच्या मृत्यू पश्चात 'शारदा' नाव बदलून वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'गोपाळ बार अँड रेस्टोरंट' असं नाव दिलं आहे.

वडिलांनी सुरु केलेलं रेस्टोरंट त्यांच्याच नावाने ओळखलं जावं अशी जगदीश आणि निर्देश यांची इच्छा होती. इथल्या पदार्थांची (Food) आजही तीच चव आहे. गोपाळ यांनी 'शारदा' सुरु केलं तेव्हा त्याला 'घरगुती खानावळ' असं स्वरूप दिलं होतं. त्यांच्या आईनं घरी बनवलेले मसाले आणि आईचीच पाककृती त्यांनी शारदात आणली.

त्यामुळे अन्य रेस्टोरंटमध्ये न मिळणारे आणि जे फक्त घरीच बनवलेले जातात असे खास गोमंतकीय पद्धतीचे पदार्थ इथं सहजासहजी मिळू लागले. उदाहरणार्थ 'सांगो -सुंगटाचे हुमण', 'भेणें -सुंगटाचे हुमण', 'बोडकांची कडी' 'सांगटाचे आंबट तीख', 'बांगडा रेशाद मसाला', 'बांगड्याचे धबधबीत' ही सगळी पदार्थांची नावं रेस्टोरंटमध्ये सहजासहजी मेनूकार्डवर दिसत नाहीत. पण शारदात म्हणजेच आजच्या 'गोपाळ' मध्ये मात्र हे सगळे पदार्थ मिळतात. तुम्ही अस्सल मासळी खाऊ असाल तर गोपाळमधील मासळीच्या पदार्थांची चव अवश्य घ्या.

'फिशकरी राइस' सर्वच रेस्टोरन्टमध्ये मिळते. पण यातही वेगळेपण जपावं लागतं. गोपाळमध्ये आईच्या पाककृती आणि आईनेच दिलेल्या मसाल्यांच्या प्रमाणावर आजही पदार्थ शिजतात. इथले 'तिसऱ्याचे सुके' देखील आवर्जून खावे. तिसऱ्यातल्या मसाल्याची चव देखील वेगळीच आहे. दुपारच्या इथे वेळी फिश थाळी (Fish Thali) मिळते.

तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उकड्या तांदळाचा भात मागवू शकता. वेगवेगळ्या पदार्थाना निवडून त्यापद्धतीची 'फिशथाळी' तुमच्या समोर येते. इथे बहुसंख्य ग्रुप्स येतात. कधी कोणाचा वाढदिवस असतो, तर कधी कोणाची काही विशेष कारणांनी दिलेली पार्टी असते.

'खाण्यापिण्यासाठी' अतिशय मोकळंढाकळं असं हे ठिकाण आहे. तुम्हाला जर उत्तम इंटिरिअर केलेलं, 'एसी' असलेलं रेस्टोरंट हवं असेल तर इथे येऊ नका, पण तुम्हाला अस्सल गोमंतकीय चव, ताजी ताजी मासळी, घरगुती पदार्थ खायचे आहेत तर त्यासाठी 'गोपाळ' हे एकदम योग्य असं रेस्टोरंट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com