अथातो धर्मजिज्ञासा : आत्मज्ञानाची पूर्वतयारी

जडवाद आणि चैतन्यवाद किंवा विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
 Prerequisites of self knowledge
Prerequisites of self knowledgeDainik Gomantak
Published on
Updated on

प्रसन्न शिवराम बर्वे

आपल्याकडे भौतिक माहितीला ज्ञान म्हटले जात नाही. साधनचतुष्टयाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण ज्ञान असा शब्द वापरतो, तेव्हा तो बहुतेकवेळा ‘आत्मज्ञान’ या अर्थाने येतो. आपल्या स्वरूपाचे, अस्तित्वाचे यथार्थ ज्ञान होणे म्हणजे आत्मज्ञान.

स्वत:चा विकास, मोक्ष याच्या प्राप्तीसाठी जे जे काही लागते त्याला ‘साधन’ असे म्हणतात. ज्याची विभागणी सामान्यत: चार मूल्यांत केलेली आहे. ज्ञान, कर्म, भक्ती आणि वैराग्य.

आपला स्वत:चा भौतिक विकास करायचा असल्यासही याच मूल्यांची आवश्यकता असते. मोक्ष हे अंतिम ध्येय असेल तरीही ते गाठण्याचे साधन म्हणून याच मूल्यांचे आपल्या जीवनात पालन करणे आवश्यक आहे.

अनेक उपनिषदांमधून, दर्शनांमधून याचा साकल्याने विचार झाला आहे. आत्मज्ञान, मोक्ष यांना प्राप्त करायचे तर एकच एक मूल्य उपयोगाचे नाही.

केवळ ज्ञानाने किंवा केवळ कर्म केल्याने किंवा केवळ भक्ती असल्याने किंवा केवळ वैराग्य आहे म्हणून आत्मज्ञान होणार नाही आणि मोक्षही प्राप्त होणार नाही. या चारही मूल्यांचे आचरण जीवनात घडेल तेव्हाच आपला भौतिक आणि आध्यात्मिक विकास होणे शक्य आहे.

जडवादाच्या सिद्धांतापायी आपण चैतन्याचे अस्तित्व नाकारू लागलो. यातूनच जे जड आहे (सामान्यत: दिसते) तेच सत्य मानू लागलो.

सर्वच्या सर्व गोष्टी विज्ञानाच्या कक्षेत आणून कोंबू लागलो. त्यामुळे, जे विज्ञानाने सिद्ध होत नाही अशा कुठल्याही गोष्टीचे अस्तित्व नाकारू लागलो. त्याहीपुढे जात विज्ञान विरुद्ध देव, विज्ञान विरुद्ध धर्म, विज्ञान विरुद्ध श्रद्धा, विज्ञान विरुद्ध अध्यात्म, अशी तिरपागडी मांडणी करू लागलो.

विज्ञाननिष्ठ आहात तर देव मानता कामा नये, विज्ञाननिष्ठ आहात तर धार्मिक असता कामा नये, विज्ञाननिष्ठ आहात तर पूजा करता कामा नये, विज्ञान मानत असाल तर आध्यात्मिक असता कामा नये, असे विचित्र विचार पसरवले गेले.

प्रत्येक पूरक गोष्टीला एकमेकांच्या विरुद्ध उभे केले गेले. जडवाद आणि चैतन्यवाद किंवा विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

 Prerequisites of self knowledge
बोलघेवडा- गप्‍पीष्‍ट- इतिहास संशोधक: वाल्मिकी फालेरो

प्रारंभी गणित, विज्ञानच असते, त्यावर प्रभुत्व मिळवले की जे निर्माण होते ती कला असते. सायकल चालवायला शिकताना प्रत्येक जण सुरुवातीला पॅडलकडे लक्ष देतो.

किती वेगात पॅडल फिरवले व त्या गतीत संतुलन राखले की, सायकल स्थिरपणे चालवू शकतो याचे गणित शिकावे व जमावे लागते. ते एकदा जमले की, नंतर सायकल चालवणे ही एक कला होते.

शिकणे काही क्षणांत होते, आयुष्यभर येतात ते अनुभव. सायकल चालवण्याची पूर्णावस्था (पर्फेक्शन) येतच नाही; शेवटपर्यंत सगळे अंदाजच असतात. प्रावीण्यालाच पूर्णावस्था समजले की, अपघात होतात.

माहितीलाच, विज्ञानालाच ज्ञान समजले की फसगत होते. म्हणूनच बहुधा डॉक्टर हे आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर आयुष्यभर जी सेवा देतात त्याला इंग्रजीत ‘प्रॅक्टिस’ म्हणत असावेत.

केवळ ज्ञानावर नव्हे तर विज्ञानावरही आपली श्रद्धा असावीच लागते. श्रद्धा ही श्रद्धाच असते; डोळस-श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे काही नसतेच. तसे पाहू जाता श्रद्धा ही अंधच असते. माहीत नाही किंवा प्रत्यक्ष अनुभव नाही अशा गोष्टीचे अस्तित्व स्वीकारणे म्हणजे श्रद्धा.

श्रद्धा निग्रहपूर्वक बाणवावी लागते व ती परिणांमावर अवलंबून नसते. आपली देवावरील श्रद्धा, ‘काय मिळाले’ या मापात आपण तोलतो. ‘देवा माझी तुझ्यावर एवढी श्रद्धा होती, त्याचे हे फळ?’ असा विचारही मनात आला की, त्या श्रद्धेचे मूल्य शून्य होते.

अनेकदा आपण विश्वास आणि श्रद्धा यांची गल्लत करतो. अशाश्वत, बदलणाऱ्या गोष्टींवर, नश्वरावर आपण ठेवतो तो विश्वास आणि शाश्वत, स्थिर व ईश्वरावर आपली असते ती श्रद्धा. श्रद्धा ही अंधच असल्याने, ‘अंधश्रद्धा निर्मूलना’च्या नावाखाली आपण श्रद्धेचेच निर्मूलन करत असतो!

श्रद्धा असल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. केवळ श्रद्धा असल्याने आत्मज्ञान होणार नाही. त्यासोबत विवेक, वैराग्य, शमादिषटक व मुमुक्षत्व असावे लागते. ‘वि’चारान्ती ‘वे’ळेत ‘क’र्म करणे म्हणजे विवेक.

ढोबळमानाने विवेक म्हणजे निवड. संस्कृतमध्ये ‘राग’ या शब्दाचा अर्थ प्रेम किंवा आसक्ती असा आहे. प्रेम, आसक्ती नसणे म्हणजे विराग आणि अशी विरागी अवस्था म्हणजे वैराग्य. वैराग्य सामान्य माणसांसाठी नाही, असा एक अपसमज आहे.

हळूहळू विरागी होत जाणे, सांसारिक माणसासाठीही आवश्यक आहे. पण, दुर्दैवाने आपले वैराग्य केवळ स्मशानापुरतेच राहते. शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा या सहा प्रकारच्या निग्रहाला शमादिषटक असे म्हणतात.

अध्यात्म, आत्मज्ञान याच्या प्राप्तीसाठी प्रतिकूल असलेल्या गोष्टींपासून स्वत:च्या मनाला आवर घालणे म्हणजे ‘शम’ आणि इंद्रियांना आवर घालणे म्हणजे ‘दम’. विपरीत परिस्थितीतही टिकून राहिलेला व परिणामांनी बाधित न झालेला निग्रह म्हणजे ‘श्रद्धा’.

आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने सुखोपभोगांचा केलेला त्याग (संगत्याग आणि वस्तूत्याग) म्हणजे ‘उपरम’. परिस्थिती कशीही असली तरी मनाचा तोल ढळू न देणे म्हणजे ‘समाधान’. सुखदु:खाचे, सांसारिक आघात तक्रार न करता सहन करणे म्हणजे ‘तितिक्षा’. यात क्रम फार महत्त्वाचा आहे.

मोक्ष किंवा आत्मज्ञान याची तीव्र इच्छा म्हणजे ‘मुमुक्षत्व’. आत्मज्ञानासाठी लागणाऱ्या तयारीचा हा फक्त उल्लेख आहे. यातील प्रत्येक गोष्टीवर एकेक लेख लिहिला तरी कमी पडेल इतके त्यांचे महत्त्व आहे. पण, विस्तारभयास्तव केवळ तोंडओळख करून आपण थांबू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com