निसर्गाची रहस्ये उलगडण्यासाठी नियोजनबध्द संशोधन गरजेचे

सप्टेंबर (September) व ऑक्टोबरमध्येही मी रोजच पठारावर संध्याकाळची ‘मळभशोभा’ पहायला उत्सुक असतो.
निसर्गाची रहस्ये (secrets of nature) उलगडण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने सखोल, सूक्ष्म शास्त्रीय संशोधन करता येते.
निसर्गाची रहस्ये (secrets of nature) उलगडण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने सखोल, सूक्ष्म शास्त्रीय संशोधन करता येते. Dainik Gomantak
Published on
Updated on

परंपरेप्रमाणे मोसमी पावसाचा (Rain) कालखंड १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत (September) मानला जातो व गोव्याची वेधशाळा १ जूनपूर्वीचे पर्जन्यमापन व ३० सप्टेंबरनंतर पडलेला पाऊस मोसमी पावसात समाविष्ट करीत नाही. ऑगस्ट संपता संपता गोव्यातील निसर्गाने कात टाकलेली दिसते हे सूर्यास्तापूर्वी तास- दोनतास मावळतीच्या आकाशाकडे पाहिले तर चटकन जाणवते. माझे विद्यापीठ, प्रयोगशाळा व निवासस्थान अशा एका विस्तीर्ण, सपाट व सुंदर गवताळ पठारावर आहे की तिथून आकाश, जमीन व पाण्याचे विलक्षणीय विहंगम (Vihangam) वैशिष्‍ट्यपूर्ण दर्शन प्रत्येक ऋतूत सहज घेता येते व निसर्गाची रहस्ये (secrets of nature) उलगडण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने सखोल, सूक्ष्म शास्त्रीय संशोधन करता येते. या ताळगांव-बांबोळी-दोनापावला पठारावरील २९ सप्टेंबर महिने, १९९१ ते २०२० पर्यंतचे, माझ्या स्मरणात व छायाचित्रसंग्रहात आहेत. त्यातील १९ महिने तर पूर्ण सप्टेंबर मी इथेच वास्तव्य असल्याने २००१ पासून निसर्ग संशोधनात अत्यंत औत्सुक्याने व आनंदाने घालविलेले आहेत व सप्टेंबर महिन्याने सृष्टीसौंदर्याची व वैज्ञानिक रहस्यांची दालनेच्या दालने मला एकापाठोपाठ एक उघडून दाखवलेली आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही मी रोजच पठारावर संध्याकाळची ‘मळभशोभा’ पहायला उत्सुक असतो. संध्याकाळी चार वाजल्यानंतर ढगांची शोभा वाढत जाते. चित्रकाराच्या पोतडीतील सर्वच रंगांची मुक्तहस्ते उधळण झालेली दिसते. समुद्रावरून मंद मंद झुळूक येते व डोक्यावरचे ढगाचे मोठे पर्वतकाय, महाकाय आकार चित्रविचित्र रूपे धारण करतात. माझ्या निवासस्थानाजवळच एक बालोद्यान आहे. तेथून शिरदोन-चिखली ते दोनापावलाचा उपसागर दिसतो व थेट पश्‍चिम क्षितिजापर्यंत नजर जाते. मुरगांव भूशीर व दोनापावलाचे दगडाळ बेट यामधील क्षितिजरेषा स्पष्ट दिसते व इथेच समुद्रात बुडाल्याचा आभास निर्माण करणारे मावळतीच्या वेळी वातावरणाच्या किमयेमुळे ताटाएवढे मोठे दिसणारे सूर्यबिंब उघड्या डोळ्यांनीही न्याहाळता येते. सप्टेंबरमधील त्या नारिंगी सूर्यबिंबाची शोभा काय वर्णावी? पठारावरूनच मला सौरमालेतील सूर्याला प्रदक्षिणा करणाऱ्या अवकाश धुळीचा अथवा जिला ‘इंटरस्टेलर डस्ट’ म्हटले जाते तिचा शोध लागला व हा ब्रह्मांडात आपण कःपदार्थ असल्याचा पुरावा देणारा झुंजुमुंजू फिकट गुलाबी, लालसर, जांभळा संधीप्रकाशाचा विलक्षण पट्टा कॅमेऱ्यात बंदिस्त करता आला. त्यामुळे पावसाळ्यानंतर गोव्यातून सौरमंडलातील, सूर्यप्रभावित अवकाशस्थ धुळीचे निरीक्षण करता येणे शक्य असल्याचा शोध लागला. मांडवी नदीवरच्या तिन्‍ही सेतूंवरून सूर्यास्तानंतर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात ब्रह्मांडधुळीचा हा विलक्षण गुलाबी पट्टा, संधीप्रकाश आपण पाहू शकतो व त्याचे मांडवीच्या संथ वाहत्या, सुंदर, प्राचीन पात्रात पडणारे प्रतिबिंब मोहरून टाकते. सप्टेंबरमध्ये ढगांची दिशा, आकार व रंग यावर भरपूर संशोधन केले व त्यातून अनेक पृथ्वीसत्यांचा व पृथ्वीतत्त्वांचा देखणा साक्षात्कार झाला. आदिमानवाला गुहांच्या भिंतीवर, मोठमोठ्या शिलाखंडांवर व टणक भूपृष्ठावर चित्रे रंगविण्याची वा खोदण्याची प्रेरणा कशी मिळाली ह्याचा उलगडाही ढगांचे महाकाय, चित्रविचित्र बदलते आकार अभ्यासल्यानंतर झाला. असंख्य कथा, दंतकथा व आख्यायिकांचा उगम सप्टेंबरमधील आदिमानवांनी केलेल्या ह्या निरागस आकाशदर्शनात आहे.

निसर्गाची रहस्ये (secrets of nature) उलगडण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने सखोल, सूक्ष्म शास्त्रीय संशोधन करता येते.
Goa Government: शिक्षण धोरणाचं सरकारी वाटोळं

सप्टेंबर महिन्यात पठारावरील गवताला फार गोमटे रूप लाभते. सकाळच्या रेशमी किरणांत व संध्याकाळच्या मावळत्या सूर्यप्रकाशांत पठारावरील गवताचे इवले इवले डोंगर व पुंजके सोन्यासारखे झळाळून निघतात. पठारावरील गवतावर संशोधन करताना मऊ व टणक पृष्ठभागावर वेगळ्या जाती आढलल्या. गेली किमान पाच हजार वर्षे हे संपूर्ण पठार एक विस्तीर्ण गायरान, कुरण होते. आजही आजूबाजूच्या खेड्यातील गुरे-वासरे सवकळीने पाऊस सुरू झाल्यावर हक्काने, अधिकाराने, वांशिक, पारंपरिक स्मृतीने सूर्यास्तानंतर पठारावर हिंडतात. इथली जीवसंपदा निर्मिण्यात यो गोधनाचा भरपूर वाटा आहे. जिथे जिथे गुरांच्या शेणांचे ‘थापे’ अथवा पोपडे पडलेले असायचे तिथे तिथे फार हिरवेकंच, पाचुदार, दाट गवत उगवलेले दिसे. ते दुरून ओळखता येई. त्यामुळे केवळ शेणासारख्या नैसर्गिक सेंद्रिय खतातील पोषकमूल्यांमुळे पठाराचेही किती पोषण होते याचा प्रत्यक्ष पुरावा मिळाला. सप्टेंबरमध्ये या गवतसंपन्न झाडोऱ्यात आणखी एक नैसर्गिक चमत्कार होतो व पाऊस नसला तर सकाळच्या दंवामुळे तो तुम्हाला चकित करून जातो. कुठून तरी असंख्य तऱ्हेचे छोटे-मोठे कोळी येतात. खाली उपसागरात ओशेल, कांक्रा, नावशी, बांबोळी, शिरदोनच्या आदिवासी मच्छीमारांची पहाटेपासून मासेमारी चालते तर इथे पठारावर हे कोळी अचूक जागा पकडून मोठ्या संख्येने उडणाऱ्या कीटकांची शिकार करायला फार सुंदर गोलसर लहान मोठी जाळी लावून ऐटीत बसलेले असतात. आणि गंमत अशी की ज्यांना उंचावर अशी शिकार करता येत नाही. ते छोटे पण तरबेज काळसर, कुरूप कोळी चक्क जमिनीलगतच गवतात मचाणासारखे पांढरे शुभ्र कापसासारखे जाळे विणतात. कोळ्यांची ही सर्वच जाळी जलभेद्य प्रार्थनांपासून तयार होत असल्याने ती तशी भिजत नाहीत. पण जलभेद्यतेमुळे दंवबिंदू मोत्यांच्या माळेसारखे या जाळ्यात अडकलेले दिसतात. त्यातून सकाळचे सूर्यकिरण परावर्तित होऊन छोटी छोटी तरंगती इंद्रधनुष्ये तयार होतात. दवंबिंदूचा उपयुक्त वापर अनेक जातीचे कोळी करतात हे माझे निरीक्षण आहे. दंवबिंदूवर सूर्यकिरण पडल्यावर ते झळाळून निघतात व दिवसा भरपूर सूर्यप्रकाश असला तरी या झळाळत्या जाळ्यांकडे कीटक आकृष्ट होतात. ‘नेफीला’ या जातीची भलीमोठी काळसर पट्टेरी कोळीण म्हणजे ‘मादी कोळीण’ या महिन्यात झाडाझुडपात पण जमिनीपासून उंचावर एक ते दोन मीटर्स व्यासाची अतिसुंदर गोलगोल जाळी विणतात. ह्या कोळ्यांचा मी सुमारे १५वर्षे सूक्ष्म अभ्यास केला आहे. दिवाळीनंतर हळूहळू ते गायब होतात. ‘जायंट वूड स्पायडर’ अथवा महाकाय जंगली कोळी असे ह्या जातीचे नाव आहे. संपूर्ण पठारावर कीटकांना व झाडांवरून उड्या मारणाऱ्या बेडकांनाही त्यांची दहशत असते. ते कुशलपणे तऱ्हेकवार पतंग, फुलपाखरे, गांधीलमाश्‍या, टोळ, पंख फुटलेली वाळवी व मुंग्यांची शिकार करतात.

निसर्गाची रहस्ये (secrets of nature) उलगडण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने सखोल, सूक्ष्म शास्त्रीय संशोधन करता येते.
Goa: मानवी कोंडीची मांडणी

हा पुरावा मला सकाळी मिळायचा. एकदा जाळ्यात अडकलेल्या छोट्या बेडकावर हा कोळी मजेने ताव मारत असल्याचे पाहिले. या कोळ्याच्या जाळ्याविषयी दहा वर्षे मी माझ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले व त्यांची हत्या न करता वेगवेगळे प्रयोग केले. भक्ष्य व अभक्ष्य यातील फरक ह्या कोळ्यांना पटकन समजतो. एखादे मेलेले फुलपाखरू, मेलेला कीडा जाळ्यात फेकला तर हे कोळी तो व्यवस्थित गुंडाळून ठेवायचे. पण वाळके पान, काड्या, कागदाचे तुकडे, प्लास्टिकचे तुकडे, खडुचे छोटे तुकडे वगैरे जाळ्यात अडकवले तर धावत येऊन हे कोळी यांत्रिकपणे असे अभक्ष्य पदार्थ तोडून टाकीत. या कोळ्यांनी माझे खूप शिक्षण केले. माणसांनी केलेल्या बांधकामाचाही हे कोळी जाळी विणण्यासाठी फायदा घेतात व उजेड व झुळुकीची दिशा पाहून जाळी लावतात हे माझे महत्त्वाचे निरीक्षण होते. ‘कण्हेर’ या शेणाचा वास असणारी फुले येणाऱ्या एका मोठ्या झुडुपावर दिसणाऱ्या कीटकांचे दरवर्षी मी तीन महिने सुट्टी सोडून सकाळ, दुपार, संध्याकाळी व रात्री निरीक्षण करीत गेलो. ‘झिझीपस इनोप्लीआ’ हे त्या काटेरी बोरांच्या वर्गातील झुडुपाचे नांव. तब्बल दहा वर्षे लागोपाठ निरीक्षणे केल्यावर पुष्पधारणा व फलधारणेच्या तीन महिन्यात या एकाच झुडपावर मला तब्‍बल ३०० जातीचे कीटक अवलंबून असल्याचे आढळले. यात ‘सदर्न बर्डविंग’ हे छोट्या पक्षाच्या आकाराचे गोव्यातील सर्वात मोठे फुलपाखरू होते. या झुडपाच्या छोट्या सदाहरित पानांखाली अतिशय लहान आकाराचे निष्णात खेकड्यासारखे काळे-पांढरे कोळी भक्ष्य पकडण्यासाठी दबा धरून बसत असल्याचे मी पाहिले. छोट्यामोठ्या माश्‍यांना ते जिवंत सोडत नसत. ह्या एकाच झुडपाभोवती फुले आल्यावर विविध रंगरूपाची, जातीची ६० पेक्षा जास्त फुलपाखरे रुंजी घालत असलेली मी पाहिली. सपासप, हे जंगली, हे रानटी, ते उपद्रवी म्हणून अशा पठारांवरील तब्बल ३०० कीटकांना अभय व आश्रय देणारी कण्‍हेरासारखी झुडपे आपण नष्ट करीत गेलो तर इथल्या जीवसृष्टीचे भविष्य काय असा प्रश्‍न मला पडतो. हे सर्व तथाकथित विकासाच्या बुलडोझरखाली नष्ट होणार म्हणून दर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मी संशोधन करीत गेलो व ते चालूच असेल.

(डॉ. नंदकुमार कामत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com