गोव्यात होणाऱ्या ‘सेरंडिपिटी आर्ट्स फेस्टिवल’ (Serendipity Arts Festival) मधून केलेली दीपतेजची कलानिर्मिती जर तुम्ही पाहिली असेल तर मानवी कमकुवतपणाबद्दल त्याची भावना आणि अभिव्यक्ती किती तीव्र आहे हे तुम्हाला कळून येईल. कधी तो ‘चार्कोल’ हे माध्यम वापरून आपल्या भोवतालच्या गूढतेला ‘ॲब्स्ट्रेक्ट’ पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतो तर कधी भोवतालची यंत्रसाधने वापरून एका वेगळ्या मितीतून मानवी असहाय्यतेची मांडणी करतो. आजच्या युगात ‘वस्तूंना’ जखडून असलेला परावलंबी ‘माणूस’, टोकाच्या सररियलिस्टीक शैलीने तो आपल्यासमोर ठेवतो. अशा तऱ्हेने आपल्या टू डायमेन्शन’, ‘थ्री डायमेशनल’ कलाकृतींमधून पाहणाऱ्याला तो सतत बौद्धिक आव्हान देत राहतो. त्याच्या त्रिमितीय कलाकृती या आपण नित्य अनुभवत असलेल्या, आपण नित्य भोगत असलेल्या परिस्थितीची जणू व्यंग्यशिल्पेच असतात. कधी कधी त्याची चित्रेही त्याच्या ‘ॲब्स्ट्रॅक्ट’ व्हिडीओचा भाग बनतात.
‘गोवा कॉलेज ऑफ आर्ट’ (Goa College of Art) मधून कलेची पदवी मिळवल्यानंतर दीपतेजने हैदराबाद युनिव्हर्सिटीमधून मास्टर्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कुंभारजुवे या छोट्याशा आणि सुंदर अशा गावात मोठा होताना त्याने आपल्या लहानपणात दिवाळी आणि शिगमोत्सवाच्या मिरवणुकीत लोकांचे लक्ष आकर्षून घेणाऱ्या हलत्या आकृत्यांच्या निर्मितीत कौशल्य मिळवलं होतं. दीपतेज म्हणतो की यंत्राच्या वापरातलं तेव्हाचं त्याच ते कौशल्यच त्याच्या आजच्या कलात्मक अभिव्यक्तीची प्रगत पायरी आहे. ‘गोवा आर्टिस्ट्स कलेक्टीव्ह’ (Goa Artists Collective) आणि ‘गोवा ओपन आर्टस’ (Goa Open Arts) चा संस्थापक सदस्य असलेला दीपतेज आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या अनेक कलाप्रदर्शनाचा भाग बनला आहे. ‘इन्लेक फाऊंडेशन’ ‘फोर्बस इंडिया’. ‘कला शक्ती’ या राष्ट्रीय संस्थांचे पुरस्कार त्याला लाभले आहेत.
इटलीमध्ये 2020 साली होणाऱ्या ‘लाईव्ह इन्स्टॉलेशन’ची तयारी तो करतच होता. परंतु दुर्दैवाने कोरोनामुळे हे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. सध्या मुंबई येथे ‘स्पेस 118 मार्फत सुरू असलेल्या ‘ऑल दॅट ईज लाईफ’ या निमंत्रितांच्या प्रदर्शनात त्याची कलाकृती मांडली गेली आहे. सलोनी दोशी हे प्राख्यात कलातज्ज्ञ या प्रदर्शनाचे क्युरेटर आहेत.
दीपतेज
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.