निर्णय प्रक्रियेत मुलांना सहभागी करून घेता का?

प्रश्न नक्की काय आहे, पण तो काय असल्याचे भासतो हे लक्षात येण्यासाठी चिकित्सेचे कौशल्य, वस्तुनिष्ठ विचार करण्याचे कौशल्य लागते.
parents
parentsDainik Gomantak

जेव्हा एखाद्या मुलाने किंवा तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडते तेव्हा मनोविकारशास्त्रातला तज्ज्ञ म्हणून मला मत विचारले जाते. खरे तर टोकाचे पाऊल उचलण्याची घटना क्षणिक असते.

पण त्या घटनेपर्यंत तो मुलगा किंवा तो तरुण का आणि कसा पोचला, याचा गांभीर्याने विचार करायला हवा असतो. एक लक्षात घ्यायला हवे की टोकाचे पाऊल उचलणे हा एक ‘प्रतिसाद’ असतो, जीवनातील विशिष्ट परिस्थितीला दिलेला! तो एक ‘निर्णय’ असतो, अनेक पर्यायांपैकी एक निवडण्याचा!

कदाचित तशीच परिस्थिती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आली तर ती दुसरी व्यक्ती दुसरा एखादा पर्याय निवडण्याची शक्यता असते. परिस्थिती एकच असताना ती हाताळताना दोन व्यक्तींच्या पर्याय निवडण्यामध्ये दिसलेल्या फरकाचे कारण काय? त्याचे कारण असते, त्या दोघांमध्ये असलेल्या विशिष्ट कौशल्यांमधील फरक! कोणती ती कौशल्ये? ती कौशल्ये म्हणजे निर्णय घेण्याचे कौशल्य, समस्या निवारण कौशल्य, परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन करण्याचे कौशल्य आणि सृजनशील विचार करण्याचे (आउट ऑफ बॉक्स विचार करण्याचे) कौशल्य!

मी असे म्हणणार नाही की ही कौशल्ये योग्य तर्‍हेने आत्मसात न केलेली व्यक्तीच टोकाचा निर्णय घेते.

ही कौशल्य असून देखील काही वेळा असामान्य परिस्थिती उभी राहू शकते, ज्या परिस्थितीत नक्की काय करायचे याबाबत माणूस संभ्रमित होऊ शकतो. कोणाही व्यक्तीच्या बाबतीत असे होऊ शकते. ‘नोबडी इज इम्यून फॉर इमोशनल ट्रॉमा’. पण वरील कौशल्ये आत्मसात केलेली असतील तर परिस्थिती अधिक सकारात्मक पद्धतीने हाताळली जाण्याच्या अधिक शक्यता निर्माण होतात.

पण प्रश्न असा येतो की ही कौशल्ये शिकवायची कशी? याची सुरुवात या गृहीतकाने करणे आवश्यक आहे की ही कौशल्ये आहेत, आपसूक येणाऱ्या गोष्टी नव्हेत. आणि दुसरे म्हणजे ती शिकता व शिकवता येतात.

तुमचे मूल तुमची बोली कशी शिकते? तुम्ही त्याला व्याकरणाचे नियम घालून देता का? विभक्ती प्रत्यय कसे लावायचे, क्रियापद कसे चालवायचे, हे शिकवता का? नाही. पण तरीही तुमच्या मुलाने तुमची बोली शिकावी म्हणून तुम्ही प्रयत्न करत असता. तुमच्या घरात सहा-सात महिन्यांचे मूल असेल तर तुम्ही त्याच्याशी कसा संवाद साधत असता, ते जरा आठवून बघा. तुम्ही तुमच्या नवजात बालकाशी बोलता.

सोपे सोपे बोलता, गाणी म्हणता, सुरुवातीला तुम्ही देखील त्याच्याशी बोबडे बोलता. त्याने एखादा शब्द उच्चारला की तुम्ही आनंद व्यक्त करता. त्याने मोठ्यांच्या बोलण्याचे जशास तसे अनुकरण केले की तुम्ही त्याचे कौतुक करता. थोडक्यात तुम्ही त्याला बोलण्यात सहभागी करून घेता. सकारात्मक दृष्टी ठेवून सहभागी करून घेता. अगदी तसेच निर्णय कौशल्य विकसित करण्यासाठी करायला हवे.

दिवसातून अनेकवेळा आपण आपल्या कुटुंबात निर्णय घेत असतो. आज भाजी कोणती बनवायची इथपासून शेजारच्या आजींना मदत करण्यापर्यंत असंख्य गोष्टींचे निर्णय तुम्ही घेत असता. हे निर्णय घेण्याचे तुम्ही काही निकष ठरवलेले असतात. त्या निकषांनुसार तुमचा प्राधान्यक्रम ठरतो. हे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत तुम्ही तुमच्या घरातील मुलांना सामील करून घेता का?

‘आज भाजी कोणती करायची?’ या क्षुल्लक वाटणाऱ्या प्रश्नात श्रेयस आणि प्रेयस मधला झगडा लपलेला असतो. चवीला प्राधान्य द्यावे की पोषणमूल्यांना? हा इथे कळीचा प्रश्न असतो. ‘तुमच्या पालेभाजीत क्षार, जीवनसत्त्वे, तंतू ढीगभर असतील हो, पण ते बेचव खाणार कोण?’ असा प्रश्न उपस्थित झाला की पुढचे कौशल्य वापरावे लागते. ते म्हणजे समस्या निवारण कौशल्य! बेचव वाटणारी भाजी चविष्ट कशी करावी, जेणेकरून पोषणमूल्यांचा बळी जाणार नाही, ही ती समस्या असते.

parents
Goa: विनाहात पायाचे मूल जन्माला येईल, 15 वर्षापूर्वी डॉक्टर म्हणाले होते पुन्हा विचार करा; पण मुलाने चमत्कार केला

पालकांच्या वर्कशॉपमध्ये मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित करतो तेव्हा पदार्थ चविष्ट बनवण्याच्या अनेक रेसिपी पटापट सुचवल्या जातात. त्यावर माझा प्रश्न असतो की हे तुम्ही जसे इथे सुचवताय तसे मुलांशी बोलताना सुचवता का? मुलांना त्यांच्या मर्यादित अनुभवाच्याद्वारे का असेना, ही समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवण्यास प्रोत्साहन देता का? मूल चुकेल, कदाचित पूर्णपणे अव्यवहार्य उत्तर सुचवेल. पण आपलेही मत विचारात घेतले जाते, आपण पॅसिव्ह नाही हा महत्त्वाचा मेसेज मुलापर्यंत पोचत असतो.

दिवसभरात निर्णय घेण्याचे आणि समस्या निवारण्याचे अनेक प्रसंग येत असतात. यातील अनेक निर्णय घेण्याच्या गोष्टी किंवा समस्या तशा साध्यासुध्याच असतात. त्या हाताळताना त्रुटी राहिल्या म्हणून फारसे काही बिघडत नाही. पण अशा प्रक्रियांत लहान मुलांना सामावून घेतले तर ही कौशल्ये विकसित व्हायला मदत होते आणि आपण अशा गोष्टींना हाताळू शकतो याचा आत्मविश्वास देखील मुलात निर्माण होतो.

असे प्रसंग हाताळून झाल्यावर त्यावर चर्चा करावी, पण चर्चेचा रोख टीकेचा नसावा तर वस्तुनिष्ठ मूल्यांकनाचा असावा. या चर्चेत तुम्ही विशिष्ट समस्या सोडवताना कोणकोणत्या पायऱ्या वापरल्या, हे मुलाशी बोलले पाहिजे.

प्रश्न नक्की काय आहे, त्याला काय पर्याय आहेत, प्रत्येक पर्यायाचे संभाव्य गुणदोष काय आहेत? गुणदोषांची जोखणी करून सर्वांत योग्य पर्याय कोणता वाटला? आणि हेदेखील सांगितले पाहिजे की हा पर्याय वापरून अपेक्षित रिझल्ट नाही मिळाला तर ते अपयश पचवले पाहिजे. आणि पुढच्यावेळी असाच प्रसंग उभा राहील तेव्हा आता लक्षात न आलेला घटक विचारात घेतला पाहिजे.

प्रश्न नक्की काय आहे, पण तो काय असल्याचे भासतो हे लक्षात येण्यासाठी चिकित्सेचे कौशल्य, वस्तुनिष्ठ विचार करण्याचे कौशल्य लागते.

मला हे मान्य आहे की या सगळ्यासाठी पालकांकडे धीर धरण्याचे कौशल्य हवे. मूल हे प्लेजर- पनिशमेंट तत्त्वावर सर्व गोष्टींकडे पाहत असते.

आत्ता मजा कशात आहे याकडे त्याचा कल असतो आणि आत्ता न आवडणारी गोष्ट (भविष्यात फायद्याची असली तरी ती) नाकारण्याकडे त्याचा कल असतो. त्यासाठी संयम पाळण्याचे कौशल्य मुलाला शिकवता येईल का?

मी सायकीयॅट्री शिकायला लागल्यानंतर माझ्या लक्षात येत गेले की आजीच्या वागण्यात बिहेविअर थिअरची बरीच तत्त्वे सामावलेली होती. क्लासिकल कंडीशनिंग, ओपेरंट कंडीशनिंग, पॉझिटिव्ह रिएनफोर्समेट वगैरे होते. फक्त ती आपण वापरतोय हे तिला कळत नव्हते.

पण बहुधा होते काय की हे सगळे शिकवत बसायचे म्हणजे वेळ जातो, मुले काम करताना चुका करतात, त्यांच्या चुकांनी मोठ्यांचे काम वाढते. असा तक्रार वजा आक्षेप असतो. हा आक्षेप बरोबरच आहे.

मुले निर्णय प्रक्रियेत येणार म्हणजे ती इतरही कामात भाग घेऊ पाहणार. मुलांना पाण्यात काम करायला तर जाम आवडते. त्यांना कपडे धुवायला, भांडी विसळायला आवडते. पण हे करताना त्यांच्याकडून चुका होतात, धडपड होते, खट्याळपणा देखील होतो, त्यात सुधारणा करण्याचा ती प्रयत्न करतात. आणि एक दिवस तेच काम आपण परफेक्ट करू शकलो या अचिव्हमेंटचा आनंदही त्यांना होतो.

खरं म्हणजे मुलांना कामाचा कंटाळा नसतो. ती भरपूर शारीरिक श्रम करायला उत्सुक असतात. पण आपण मोठेच त्यांना थांबवतो, अनेकदा आपल्या ओरड्यामुळे कामातून त्यांना मिळणारा नैसर्गिक आनंद आपण अडवतो.

बरेचदा हे गृहीतक असते की मूल मोठे झाले की काम करेल. पण दहाव्या वर्षापर्यंत आम्ही मुलांची काम करण्याची नैसर्गिक ऊर्मी अडवून लावली तर पंधराव्या वर्षी ती पुन्हा आणणे कठीण होऊन बसते.

आता कामातला आनंद संपलेला तर असतोच, पण कामाविषयी तिटकारा निर्माण झालेला असतो. तेव्हा आपले मूल ज्या वयात असेल त्या वयापासून सुरू करूया. पालक म्हणून विकसित होण्याचा आनंद घेऊ या!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com