गोव्यातच राहून मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने अभिजात शास्त्रीय संगीतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये आग्रा घराण्याचे प्रतिथयश गायक पंडित कमलाकर नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. काल दिनांक 8 डिसेंबर रोजी त्यांनी 73 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांचा जन्म काणकोण (Canacona) तालुक्यातील आगोंद या खेडेगावात 1949 साली झाला. त्यांचे वडील कै. बाबनी नाईक हे भजनी गायक. त्यामुळे बाल वयातच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. आग्रा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद विलायत हुसेन खाँ व उस्ताद फैयाझ खाँ साहेब यांचे ज्येष्ठ शिष्य, पंडित रत्नकांत रामनाथकर यांचे शिष्यत्व पंडित नाईक यांना आठ वर्षे लाभले व त्यांच्या तालमीत ते तावून-सुलाखून निघाले. पुढे त्यांना आग्रा घराण्याचे बुजुर्ग गुरु तथा संगीततज्ञ पंडित आठवले, पंडित बबनराव हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाचा त्याना लाभ झाला.
पुढे आपली ज्ञानलालसा पंडित नाईक यांनी कायम ठेवत आग्रा व अत्रौली-जयपूर घराण्याचे बुजुर्ग गायक उस्ताद अस्लम खानसाहेब, यांच्याकडून तालीम घ्यायला सुरुवात केली. अशाप्रकारे त्यांचे गाणे समृद्ध होत गेले. ख्याल गायनाबरोबरच इतर उपशास्त्रीय प्रकारही ते गातात. पंडित नाईक यांचे गायन आकाशवाणीच्या राष्ट्रीय प्रसारणातूनही प्रसारित झाले आहे. त्यांनी देशभरातील काही प्रतिष्ठेच्या संगीत संमेलनातून मैफली सादर केल्या आहेत. त्यात ‘सवाई गंधर्व, पुणे महोत्सव’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा संगीत संमेलनाचा समावेश आहे. 1987 साली रशिया येथे झालेल्या भारतीय कला महोत्सवातही ते सहभागी झाले होते.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पंडित नाईक यांनी घरंदाज गायक म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांचा आवाज जात्याच सुरेल, मधुर वगैरे नव्हता परंतु रियाजाच्या जोरावर त्यांनी शास्त्रीय गायनाला पोषक असा आवाज कमावला. नोकरी करून त्यांनी पुढील अकॅडमिक शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (एम. ए. समाजशास्त्र) प्राप्त केली. तसेच गांधर्व महाविद्यालय मंडळाची ‘संगीत अलंकार’ ही पदव्युत्तर पदवी मिळवली. कला अकादमीच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विभागात त्यांनी तेरा वर्षे शास्त्रीय गायन शिकवले व अनेक शिष्य घडवले जे आज नावारूपाला आले आहेत व त्यांच्यापैकी अनेकजण स्वतंत्र मैफलीही करत आहेत. त्यांचे अनेक शिष्य, संगीत शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. पुढे 1997 ते 2011 पर्यंत पंधरा वर्षे त्यांनी गोवा संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
उत्कृष्ट प्रशासक व गायक हि त्यांची दोन्ही अंगे मजबूत असल्यामुळे संगीत महाविद्यायाची घडी त्यांनी उत्तम बसवली. संगीत महाविद्यालयात संगीताचे पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी राबविले. गोवा विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट अॅण्ड फाईन आर्ट व म्युझिक फॅकल्टीचे ते अधिष्ठाताही (डिन) बनले. गोवा विद्यापीठाच्या सिनेट, शैक्षणिक मंडळावर, तसेच कार्यकारी व इतर समित्यांवर त्यांची नियुक्ती झाली आहे. कला अकादमीच्या सल्लागार समितीवरही त्यांनी काम केले आहे.
उत्कृष्ट प्रशासक व गायक हि त्यांची दोन्ही अंगे मजबूत असल्यामुळे संगीत महाविद्यायाची घडी त्यांनी उत्तम बसवली. संगीत महाविद्यालयात संगीताचे पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी राबविले. गोवा विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट अॅण्ड फाईन आर्ट व म्युझिक फॅकल्टीचे ते अधिष्ठाताही (डिन) बनले. गोवा विद्यापीठाच्या सिनेट, शैक्षणिक मंडळावर, तसेच कार्यकारी व इतर समित्यांवर त्यांची नियुक्ती झाली आहे. कला अकादमीच्या सल्लागार समितीवरही त्यांनी काम केले आहे.
पंडित नाईक यांनी ‘गुणीरंग’ या नावाने विविध रागातील स्वतंत्र बंदिशी व तराणे रचले आहेत. त्यांनी पाच तपे संगीताची अखंड साधना केली आहे. त्यांच्या भरीव योगदानाबद्दल ‘गोमंत कलाभूषण’, ‘गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार’, ‘पंडित अभिषेकी बुवा पुरस्कार’, कलकत्ता येथील ‘सूरनंदन भारती पुरस्कार’ व सत्कार त्यांना लाभले आहेत. आजही या वयात त्यांची संगीताची अविरत साधना चालू आहे तसेच ते विद्यादान ही करत आहेत.
- नितीन कोरगावकर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.