Exclusive Interview: उदय, टोनींना मीच तर निवडून आणले

भाजपच्याच उमेदवारीवर उतरण्याची तयारी: बाबूश मोन्सेरात
Panaji MLA Babush Monserrate Exclusive interview
Panaji MLA Babush Monserrate Exclusive interviewDainik Gomantak

पणजीचे दोन माजी महापौर उदय मडकईकर, टोनी राॅड्रिग्स हे पणजी, ताळगाव मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारीवर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज होत आहेत. अगदी कालपर्यंत दोघेही आमदार आतानासियो ऊर्फ बाबुश मोन्सेरात यांचा डावा, उजवा हात म्हणून ओळखले जात होते. आता टोनी, उदय यांच्या या पवित्र्यामुळे पणजीच्या आमदारांना हादरा बसेल का? हे दोन्ही मतदारसंघ त्यांच्या हातून निसटतील का? टोनी, उदय यांच्यामागोमाग तेही पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करतील का? अशा प्रश्नांवर मोन्सेरात यांनी खास ‘गोमन्तक’ शी संवाद साधला.

प्रश्न: 2022 विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत. तुमचा डावा, उजवा हात समजल्या जाणाऱ्या माजी महापौर उदय मडकईकर, टोनी राॅड्रिग्ज यांना पणजी, ताळगावमधून काँग्रेसची उमेदवारी हवी. काल ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते निरीक्षक पी चिदंबरम यांनाही भेटले. तुम्हाला शह देण्याचा त्यांचा डाव दिसतो.

उत्तर: उदय मडकईकर, टोनी राॅडिग्ज हेच नव्हेत तर अनेक विरोधक पणजी, ताळगावात मला शह देण्यासाठी रिंगणात उतरण्यासाठी तयारी करीत आहेत. राजकारणात विरोधक हे असणारच आणि माझ्यासाठी उदय, टोनी दोघेही अनेक विरोधकांपैकी एक आहेत. त्यांनी जरूर निवडणूक लढवावी, मीही अनेक विरोधकांना सामोरे जाण्याची तयारी करीत आहे, मग ते उदय, टोनी, नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो किंवा आम आदमी पार्टीचे उमेदवार असोत.

Panaji MLA Babush Monserrate Exclusive interview
Chidambaram Impact: चोडणकरांना धक्का; काँग्रेसच्या समित्या बरखास्त

उदय, टोनी निवडणूक रिंगणात काँग्रेसतर्फे असणे तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही का?

उत्तर: माझ्यासाठी उदय, टोनी नव्हेत तर पणजी, ताळगांवची जनता महत्त्वाची आहे. पराभूत झालेल्या उदयना महापापालिका निवडणुकीत मीच निवडून आणले. उदय, टोनी माझ्यामुळेच महापौरही होऊ शकले. टोनी माझ्याविरुद्ध भाजपच्या उमेदवारीवर ताळगावात विधानसभा निवडणूक रिंगणात होते, त्यांचा मी पराभव केला आहे.

पण अचानक टोनी, उदय तुमच्याविरूद्ध का जात आहेत?

उत्तर: मलाही तोच प्रश्न पडला आहे. दोन वर्षे पणजीचे महापौरपद अन्य नगरसेवकांचा विरोध असूनही उदय मडकईकर यांना दिले. त्यांची कामगिरी कशी होती, ते काय आहेत याचे उत्तर मतदार, जनता देईलच. प्रश्न एकच आहे त्यांना यंदा पुन्हा महापौरपद मिळाले नाही, माझ्या पुत्रासाठी मी आग्रही राहिलो ते उदय यांना बोचले का? टोनी यांचेही तेच, दोघांचेही माझ्याशी चांगले संबंध आहेत, वैर नाही, मी कोणाशी सुडाच्या भावनेने वागत नाही. इतर विरोधकांप्रमाणे तेही विरोधक म्हणून त्यांच्याविरुद्ध लढत देऊ.

पण दोघांमुळे तुमच्या, तुमची पत्नी महसूलमंत्री जेनिफर यांच्या मताधिक्क्यावर परिणाम होणार नाही का?

उत्तर: पुन्हा एकदा स्पष्ट करतो, माझे मताधिक्य जनतेच्या हाती आहे, उदय किंवा टोनी यांच्या हातात नाही. अल्पावधीत पणजीतील साधनसुविधांत सुधारणा करण्याचे प्रयत्न मी केले, ताळगावात माझ्या विकासकामांचा जेनिफर यांना फायदा झालेला आहे, त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे, आता त्यांनी मंत्री म्हणून कामकाज केले आहे. तळागाळात सातत्याने संपर्क ठेवणारा आमदार म्हणून माझी ओळख आहे, कोणत्याही आणीबाणीप्रसंगी लोक माझ्याशी थेट संवाद साधून समस्या मांडतात, शक्य तसा आधार, मदत मी देतो.

प्रश्न: तुम्ही प्रथमच भाजप उमेदवारीवर निवडणूक लढवणार आहात, तुम्हाला भाजपत असुरक्षित वाटत नाही का? तुम्हाला काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणे सुरक्षित असल्यामुळे तुम्हीच टोनी, उदयना आधी काँग्रेसमध्ये पाठवले नंतर तुम्हीही भाजपला रामराम ठोकणार, तुमच्याबरोबरीने जेनिफरसुद्धा भाजप सोडतील अशीही चर्चा आहे.

उत्तर: मला, जेनिफरला भाजप सुरक्षित वाटते. आम्ही भाजप सोडणार नाही, भाजपच्याच उमेदवारीवर निवडणुकीत उतरण्याची आमची तयारी आहे. आता काँग्रेसमध्ये नाही, यापुढे आम्ही भाजपमध्येच. त्यामुळे उदय, टोनी यांना काँग्रेसमध्ये पाठवून नंतर आम्ही जाऊ, ही चर्चा निरर्थक आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर पणजीचे पंचवीस वर्षे आमदार होते. त्यांच्यासाठी काही मतदारांनी त्यांचे निवासस्थान पर्वरी, ताळगावात असूनही मतदानाचा पत्ता पणजीचाच ठेवला होता. यंदा त्यांचे मतदान ते ज्या ठिकाणी निवासी आहेत त्याठिकाणी होईल. स्व. पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत मी निवडणूक जिंकलो ती फक्त काँग्रेसच्या उमेदवारीवर नव्हे तर माझे स्वतःचे असे मतदार आहेत.

ताळगाव आणि नंतर पणजीत मी स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे, त्याचा प्रत्यय निवडणुकीत दिसून येईल. आमच्या कामगिरीमुळेच जनता आमच्यामागे राहिली व यापुढे राहील असा विश्वास मला आहे. लोक व्यक्ती बघतात, निवडणूक चिन्ह आहेच, भाजपचे निवडणूक चिन्ह पणजीत लोकांच्या ओळखीचे आहे त्यामुळे मला निवडणूक लढवणे सोपे होईल. ताळगाव, पणजीतील माजी काँग्रेस, भाजप कार्यकर्तेही आमच्याबरोबर आहेत. मी यापूर्वी युगोडेपाच्या उमेदवारीवरही निवडून आलो आहे.

Panaji MLA Babush Monserrate Exclusive interview
Goa Politics: उदय मडकईकर व टोनी रॉड्रिगीजा कॉग्रेसमध्ये प्रवेश

उदय, टोनी हे तुम्हाला आव्हान वाटत नाहीत का?

उत्तर:सगळेच विरोधक माझ्यासाठी समान आव्हान असतील, फक्त उदय, टोनीच नव्हेत. त्यांना

महापालिकेवर मीच निवडून आणले होते त्यामुळे त्यांचे मतदार, त्यांची धांव किती असेल ते मी जाणतो. माझी प्रतिमा ‘डाऊन टू अर्थ’ असल्याचे मतदार जाणतात. टोनी, उदय काय आहेत, हेही लोकांना ठाऊक आहे, त्यामुळे शेवटी निवड लोकांची असेल.

भाजपचे मतदार तुमच्या पाठीशी राहातील का?

उत्तर: भाजपचे निवडणूक चिन्ह एकदा मला मिळाल्यानंतर मतदारही भाजपबरोबर येतील हा विश्वास आहे. महापालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी मी झटल्यामुळे त्यांनी, कार्यकर्त्यांनी माझ्याशी जुळवून घेतले आहे. मी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुकीत उतरल्याचे लोकांना माहिती आहे. निवडणूक हे सर्वांसाठीच आव्हान असते, माझ्यासाठीही आहे परंतु अवघड नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com