Blog : पौष्टिक बाजरीची भाकरी; संक्रांत आणि बाजरीच्या भाकरीचे अनोखे नाते

लहानपणापासून बाजरीचा एकच पदार्थ माहीत होता तो म्हणजे बाजरीची भाकरी. संक्रांत जवळ येताच बाजरीच्या भाकरीची आठवण येणे स्वाभाविक असायचे.
पौष्टिक बाजरीची भाकरी
पौष्टिक बाजरीची भाकरीDainik Gomantak

सकाळी गंजन (गवती चहा), आले घालून केलेला चहा आणि संध्याकाळी गरम गरम सूप आणि सोबतीला एखादे आवडते पुस्तक हवे, असे सध्या दिवस आहेत. थोडा निवांत वेळ मिळताच अंगाभोवती मऊ, उबदारशीशाल पांघरून अबिदा परवीन, मेहंदी हसन नाहीतर जगजीत सिंगच्या गझल ऐकत गरम गरम कॉफीचे घोट घ्यावेत. अगदी स्वतःसाठी वेळ काढून हे सगळे साजरे करावे, स्वतःचे जरा लाड करावेत असेच दिवस आहेत.

ऋतुबदल आता शरीरालादेखील जाणवू लागला आहे. गोव्यात तसे दोनच ऋतू अनुभवायला मिळतात. उन्हाळा आणि पावसाळा. खूप थंडी जाणवेल असा हिवाळा ऋतू तसा फार अनुभवायला मिळत नाही. पण समुद्र किनारा सोडून सत्तरी, सांगे, काणकोण, खोतीगाव या भागांत गेलात तर थंडी अनुभवायला मिळते. गोव्यात हे दिवस मला फार दुर्मीळ वाटतात. ऋतुबदलाची चाहूल जशी शरीराला समजते तशीच ती पोटालादेखील समजते.

पौष्टिक बाजरीची भाकरी
Makar Sankranti Culture : तिळगूळ घ्या गोड-गोड बोला! इतर राज्यात अशाप्रकारे साजरा होतो मकर संक्रांतीचा सण

उष्ण पदार्थ आपोआप आपल्या ताटात येतात. कोणत्या ऋतूत काय खाल्ले पाहिजे हे घरातील ज्येष्ठ - जाणत्या महिलांना बरोबर माहीत असायचे. गोव्याच्या मानाने पुण्यात चांगलीच थंडी असते. दिवाळीपासून थंडीची चाहूल लागते ते पुढे तीन महिने ती मुक्कामाला असते. पावसाळा साजरा करण्याची जशी वेगळी रीत आहे, तसेच हिवाळादेखील साजरा करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे. पुण्यात डिसेंबर - जानेवारीच्या काळात कधी न कधी तापमान 10 डिग्री सेल्सियस खाली जातेच. मग या थंडीची मजा अनुभवण्यासारखी असते. हे दोन महिने खाण्यापिण्याची चंगळ असते. माझ्या माहेरी ऋतुबदल ताटापासूनच जाणवू लागतो. हिवाळा सुरू होताच आई रोजच्या गव्हाच्या पोळ्यांच्या जागी अधूनमधून बाजरीची भाकरी करायला सुरुवात करते.

बाजरी उष्ण असते त्यामुळे ती खाण्यासाठी वर्षभरात थंडीचे दिवसच जास्त पूरक असतात. आम्ही भावंडे लहान असताना या दिवसांची विशेषतः बाजरीची भाकरी खायला मिळण्याची वाट बघायचो. गरम गरम टम्म फुगलेली बाजरीची भाकरी ताटात पडतातच ताटातील पदार्थदेखील तिच्याकडे असूयेने बघायला लागतात. ज्वारीची भाकरीदेखील म्हणत असेल की,‘काय ते या बाजरीच्या भाकरीचे कौतुक! वर्षभर मीदेखील अधूनमधून येत असते पण माझ्या वाट्याला असे कौतुक येत नाही. पण, थंडीचा ऋतू सुरू होताच बाजरीची भाकरी भाव खाऊन जाते.’

ज्वारीपेक्षा रंगाने काळी असणारी बाजरी वर्षभर ताटाबाहेर असते पण जसा हिवाळा सुरू होतो तसे बाजरीला महत्त्व प्राप्त होते. गोव्यात बाजरी पीक घेतले जात नाही, पण महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजरीचे पीक घेतात.

बाजरीची एवढी चर्चा का?

भारताने तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली ’बाजरी वर्ष’ साजरे केले होते आणि जागतिक पातळीवर ‘बाजरी वर्ष’ साजरे केले जावे अशी मागणी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ’बाजरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. बाजरीतील पोषक मूल्य लक्षात घेऊन तिचा अधिकाधिक आहारात उपयोग व्हावा यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. हे जरी शासकीय पातळीवर होते असले तरी बाजरीचे अस्तित्व आपल्या देशात फार पूर्वीपासून आहे.

सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये बाजरीचे धान्य सापडले म्हणजे एवढ्या वर्षांपासून बाजरीचे अस्तित्व आहे. इथूनच भारताच्या त्या काळातल्या कृषी व्यवस्थेचा अभ्यास सुरू झाला. बाजरीतील गुणधर्म सध्या शारीरिक व्याधींमध्ये मधुमेह हा अतिशय चर्चिला जाणारा आजार होऊन बसला आहे. मधुमेही व्यक्ती सतत आपल्या आहाराबाबत जागरूक असते. काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत सतर्क असते. कोण काय सांगेल ते उपाय करायलादेखील तत्पर असते. तर अशा मधुमेही व्यक्तींसाठी बाजरी खाणे चांगले.

मधुमेहावर जागतिक पातळीवर संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या संशोधनातून समोर आले आहे की, बाजरीमुळे मधुमेह कमी होतो, कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते, कॅल्शियम वाढते, शरीरातील लोह यांची उणीव भरून निघते, तसेच बाजरीत ग्लूटेन नसल्यामुळे मधुमेही व्यक्तींना ते उपायकारक ठरते.

बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक घटक मानले जातात. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी बाजरी उपयोगी ठरते. विशेषतः हिवाळ्यात बाजरी खाण्याला जास्त महत्त्व दिले जाते. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देण्याचे काम बाजरी करत असते. हे सगळे झाले शास्त्रीय भाषेतील फायदे, पण जरा मागे वळून बघितल्यावर लक्षात येते की, आजी - पणजी आपल्या स्वयंपाकात बाजरीला का महत्त्व द्यायची? त्यांच्या आहारात मैद्यापेक्षा ज्वारी - बाजरीचे समतोल असे प्रमाण असायचे म्हणून त्यांना कधी रक्तदाब - मधुमेह सारख्या आजारांनी ग्रासले नाही.

लहानपणापासून बाजरीचा एकच पदार्थ माहीत होता तो म्हणजे बाजरीची भाकरी. संक्रांत जवळ येताच बाजरीच्या भाकरीची आठवण येणे स्वाभाविक असायचे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला वाण्याकडे किराणामालाच्या यादीत बाजरीचे स्थान अगदी पहिले असायचे. मग बाजरी दळून आली की, रात्रीच्या जेवणात बाजरीची भाकरी ठरलेली. या भाकरीचे रूपदेखील ज्वारीच्या भाकरीपेक्षा वेगळे. थोड्याशा कोमट पाण्यात बाजरीचे पीठ मळताना आई त्यात किंचित मीठ घालते.

भाकरी थापण्याआधी परातीत थोडे बाजरीचे पीठ पसरवते. मळलेल्या पीठाचा गोळा आधी दोन्ही हातांच्या तळव्याच्या साहाय्याने गोल आकारात थापते. हा पीठाचा गोळा जसजसा आकार घेऊ लागतो तशी ती परातीत पसरवलेल्या पीठावर भाकरी थापायला घेते. बघता बघता बाजरीची भाकरी छान गोल गरगरीत आकार घेते. मग त्यावर तीळ पसरवते आणि हलक्या हाताने उचलून गरम तव्यावर टाकते. तव्यावरच्या भाकरीला पाण्याचा हात लावला जातो. यामुळे भाकरीला छान पापुद्रा सुटतो. ज्वारीपेक्षा बाजरी रंगाने काळी, पण यावर पांढरे शुभ्र तीळ लावताच बाजरीच्या भाकरीचे रंगरूप कसे खुलून दिसते. तीळ लावून खरपूस भाजलेली भाकरी नुसती खायलादेखील चविष्ट लागते.

गरम गरम बाजरीची भाकरी आणि लोण्याचा गोळा बाकी काही नको. अगदीच चवीने खाणारे असाल तर त्यासोबत लसणाची चटणी, मिरचीचा ठेचा आणि झणझणीत भरल्या वांग्याची भाजी हवीच. आई सांगते की, तिचे आजोबा कायम रात्रीच्या जेवणात भाजरीची भाकरी कुचकरून त्यात दूध - दही आणि लसणाची चटणी मिक्स करून खायचे. रात्री त्यांचे एवढेच जेवण असायचे.

जिथे जिथे बाजरी पिकते तिथे वेगवेगळ्या प्रकाराने आहारात बाजरीचा वापर होतो. गुजरातमध्ये भुज - कच्छच्या रणात बाजरीची भाकरी तर बनवतात पण तिथं बाजरीची खिचडीदेखील बनवली जाते. डाळ - तांदूळ यांच्याबरोबरीने बाजरी भिजवून मग वाटून खिचडीत शिजवली जाते. विदर्भात बाजरीचे खिच्चे, बाजरीच्या खारोड्या (एक प्रकारचे पापड आणि सांडगे) बनवले जातात. पापडाचा अतिशय चविष्ट प्रकार असतो. याशिवाय बाजरीचे वडे, बाजरीचे थालीपीठ, बाजरीचे धपाटे हे सारे अतिशय पौष्टिक असे पदार्थ आहेत. ज्वारी आणि गव्हापेक्षा बाजरीमध्ये कॅलरीजदेखील कमी असल्यामुळे आपले वजनदेखील संतुलित राहू शकते.

आपल्या स्वयंपाक घरात कधी मैद्याने जागा घेतली आणि पौष्टिक गोष्टी कधी स्वयंपाकघराबाहेर गेल्या हे आपल्याला समजले नाही. आता जेव्हा जागतिक पातळीवर ‘बाजरी वर्ष’ साजरे केले जातंय तेव्हा गुगलवर बाजरी म्हणजे काय हे शोधणाऱ्यांचे प्रमाण वाढलंय!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com