गोवा: काल रंग खेळून झाले असतील. अवघा काळ का असेना पण चेहऱ्यावर वेगळे रंग धारण करुन राहणे आणि स्वतःला विसरणे हे अपूर्वाईचेच असते. रंगपंचमीनंतर आता प्रतीक्षा असेल ती शिमगोत्सवाच्या मिरवणुकींची. गोव्याची रंगबेरंगी लोकपरंपरा या मिरवणुकीतून मिरवत जाताना आणि ‘ओस्सय ओस्सय’ घोष ऐकताना कडेला राहून पाहणाऱ्यांच्या ह्रदयातही मुके हुंकार घुमवते.
गोव्यात, आज फोंडा शहरात निघणाऱ्या पहिल्या मिरवणुकीने या महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर 20 मार्च रोजी म्हापसा, 22 मार्च रोजी वास्को, 26 मार्च पणजी आणि शेवटची मिरवणूक 27 मार्च रोजी मडगांव येथे निघेल. या दिवसात त्या-त्या शहरांमधले मिरवणुकीचे मार्ग पताकांनी आणि शिगमो- चिन्हांनी सजतील.
रस्त्यांवरुन घोष करत जाणाऱ्या चित्ररथांद्वारे वेगवेगळ्या गावांची, तिथल्या युवा संघांची प्रतिभा चमकदारपणे आणि जल्लोषाने सादर होईल. पुराणातले विषय घेऊन त्यातील व्यक्तिचित्रे आकर्षकपणे सादर करण्यात या संघांची स्पर्धा असते. चित्ररथातील देव आणि राक्षस यांचे संघर्ष आधुनिक संगीताच्या तालावर, शक्यतो रौद्रपूर्णरितीने सादर करून दर्शकांचे लक्ष आकर्षून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतो.
दशावताराचे, रामायणाचे, महाभारताचे त्यातले संदर्भ क्वचित आपल्याला वर्तमान स्थितीकडेही निर्देशित करणारे असतील. चित्ररथांच्या व्यतिरिक्त वैयक्तिकरित्याही अनेकजण या मिरवणुकीत, विविध पौराणिक व्यक्तिरेखा बनून सामील होतात. ‘विकट हास्य करत चालत जाणारा दहा तोंडाचा रावण, हातात डमरू आणि गळ्यात सर्प धारण करून तांडव करत जाणारा शंकर, हाती भाला घेऊन सिंहावर स्वार असलेली दुर्गा- मिरवणुकीचा मार्ग साक्षात देव-दानवलोकीचा एखादा भागच बनून जातो.
ढोल, ताशे घुमट, कांसाळी अव्याहत वाजत असतात. मिरवणुकीत गोव्याची अनेक लोकनृत्ये आपापल्या पदन्यासांनी दर्शकांना एकाचवेळी रिझवतात. तालगडी, तोणयामेळ, गोफ, पोडेमोडणी, गजनृत्य (चेपय) ही त्यांच्या अस्सल स्वरूपात सादर होतात. तरंगे - तरंगत, फेर घेत मार्गक्रमण करत असतात. पारंपरिक संगीताच्या तालावर, ठेक्यावर लयबद्धरितीने नाचणारे पाय दर्शकांनाही त्या तालाशी समरस करतात.
गेल्या वर्षी कोरोनामुळे शिमगोत्सवाची मिरवणूक पार पडू शकली नाही. पण यावर्षी पुन्हा तरुण - वृद्ध, पुरुष स्त्रिया पुन्हा या मिरवणुकीत सामील असतील. गेल्या शेकडो वर्षापासून जनांनी या उत्सवाची मौलिकता जिवंत ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. हे गोव्याच्या समृद्ध वारशाचे अद्भूत दर्शन आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.