गोवन बन्सचा नॉस्टेल्जिया

याला मंगलोरी बन्स म्हणता येणार नाही. जरी मंगलोर बन्सदेखील असे असले तरी गोवन बन्सची थोडी स्थानिक चव जाणवते.
goa food
goa foodDainik Gomantak
Published on
Updated on

मनस्वीनी प्रभुणे - नायक

केळ्याच्या चवीची जाणीव करून देणारे आणि किंचित गोड असणारे बन्स इथल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीत रुजले आहेत. याला मंगलोरी बन्स म्हणता येणार नाही. जरी मंगलोर बन्सदेखील असे असले तरी गोवन बन्सची थोडी स्थानिक चव जाणवते.

सकाळच्या नाश्ताचे पदार्थ असा विषय घेऊन एक यादी करायला गेले तर अगणित चविष्ट पदार्थ यात मिळाले. मग आपली सीमा ओलांडून अन्य राज्यांमधील पदार्थ डोळ्यासमोर आणले आणि हि यादी आणखी मोठी झाली. शिवाय घरी बनवले जाणारे आणि रेस्टोरंटमध्ये मिळणारे यात देखील विविधता दिसून आली.

जसे कि राजधानी दिल्लीमध्ये सकाळचा नाश्ता छोले - कुलचा /भटुराने होतो, बनारसमध्ये हीच सुरुवात कचोडी -सब्जीने होते, गुजरातमध्ये फाफडा - खमण - जिलेबी तर महाराष्ट्रात प्रत्येक भागाप्रमाणे यात पदार्थ बदलत जातात.

मग यात मिसळ - पोहे - उपमा- थालिपीठ- खान्देशात तूरडाळ घातलेली खिचडी, दक्षिण भारतात इडली -वडा सांबार, पंजाबमध्ये गरम गरम परांठे आणि लस्सी, हिमालयीन पर्वतीय भागात मोमोज, कोलकातामध्ये लूची (पुरी) सब्जी, इंदोरमध्ये पोहे जिलेबी अशी हि यादी अधिक चविष्ट बनत जाते.

यात गोव्यात रेस्टोरंटमध्ये मिळणाऱ्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत यादी करायला गेले तर प्रामुख्याने ''भाजीपाव - मिरची - बन्स'' हे त्रिकुट जास्त लोकप्रिय असल्याचे लक्षात येते. पूर्ण गोव्यात कुठेही जा रेस्टोरंट पासून अगदी छोट्या गाड्यावर चविष्ट भाजीपाव मिळतो. घराघरात मात्र नाश्ताच्या पदार्थांमध्ये वेगळेपण दिसून येते.

जसे आमच्या घरात पोळे चटणी, पोळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तोणाक, चपाती -भाजी हा नाश्त्याचा ठरलेला प्रकार. मतितार्थ काय प्रत्येक भौगोलिक भागाप्रमाणे तिथल्या नाश्त्यासाठी कोणता ना कोणता स्थानिक पदार्थ अपार लोकप्रिय असतो. लोकांच्या जीभेवर त्याचीच चव असते. नाश्ता म्हणताच तोच विशिष्ट पदार्थ डोळ्यासमोर येतो. गोवा म्हणलं कि मिरची -भाजीपाव आणि बन्स याला पर्याय नाही.

नाश्त्याच्या पदार्थांमध्ये माझी भाजीपावच्या आधी बन्सशी ओळख झाली. २००४ साली तिलारी धरणाच्या लाभार्थींबाबत एक प्रकल्प आमच्या संस्थेकडे होता. तिलारीचे लाभार्थी सगळे उत्तर गोव्यातील सीमावर्ती भागातले. त्यामुळे या प्रकल्पासाठी म्हापसा हे आमचे केंद्र होते. म्हापसातील शिरसाट लॉजमध्ये आमच्या पूर्ण टीमचा मुक्काम होता.

या शिरसाट लॉजच्या खाली बलभीम नावाच्या छोट्याशा रेस्टोरंटमध्ये पहिल्यांदा बन्स बघितले. दुरून टम्म फुगलेल्या पुरीसारख्या बन्सने आमचे लक्ष वेधून घेतले. बन्सची ऑर्डर देण्यापूर्वी सवयीप्रमाणे आधी आजूबाजूला इतरांच्या टेबलकडे बघितले. अनेकजण बन्स खाताना दिसले. त्यापूर्वी कधी बन्स खाल्ले नव्हते. सकाळची वेळ होती. भटारखान्यातून गरम गरम बन्स सतत येत होते. आम्हीही उत्सुकतेने बन्सची ऑर्डर दिली.

समोर आलेल्या टम्म फुगलेल्या गरम बन्सला खायला इतके उतावीळ होतो कि त्याची गरम वाफ बोटांना लागली. जर बन्स गरम आणि टम्म फुगलेला असेल तर त्याला पाहिले बोटाने फोडायचे, त्याची वाफ जाऊ द्यायची. अशी शिकवण तिथल्या वेटर कडून न विचारता मिळाली. बन्सच्या त्या पहिल्या तुकड्याने मन जिंकून घेतले.

वरून छान खुसखुशीत आणि आतून मऊ असणाऱ्या बन्सबद्दल फार माहित नव्हते. पहिल्या घासत काहीतरी परिचित चव, सुवास जाणवला. हि फक्त पुरी नाहीये हे आधीच लक्षात आले होते पण चव घेतल्यावर हे प्रकरण पुरते वेगळे आहे हे समजले.

आम्ही फारच नवखे आहोत हे ओळखणाऱ्या आणि न विचारताच सल्ले देणाऱ्या वेटरला परत बोलावून ''बन्स'' बद्दल जरा सविस्तर विचारले. वेटर कोकणातला होता. आम्ही पुणेकर आहोत हे त्याने ओळखले होतेच. त्यामुळे ''आहो काही नाही हो ''केळ्याची पुरी'' आहे हि'' असे बन्सच्या उत्सुकतेची हवाच काढून टाकली. पण तरीही केळे घालून केलेली पुरी हाच माझ्यासाठी आकर्षणाचा विषय ठरला.

ती ओळखीची वाटणारी चव आणि सुवास केळ्याचा आहे हे लक्षात आले. मग जितके दिवस आमचा मुक्काम शिरसाट लॉजमध्ये होता. तितके दिवस बन्स खाण्याची चटक लागली. मी आणि माझी मैत्रीण शैलजा आरळकर दोघी बलभीममध्ये शिरताच आमच्या बन्सच्या प्लेट न सांगताच तयार असायच्या. आता या गोष्टीला वीस वर्ष होतील. पण आजही बलभीमच्या बन्सची चव ओठावर आहे.

म्हापशातून जाताना येताना बन्सची आठवण येऊन बलभीमकडे आपोआप लक्ष जातेच. केळ्याच्या चवीची जाणीव करून देणारे आणि किंचित गोड असणारे बन्स इथल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीत रुजले आहेत. याला मंगलोरी बन्स म्हणता येणार नाही. जरी मंगलोर बन्स देखील असे असले तरी गोवन बन्सची थोडी स्थानिक चव जाणवते.

पुढे फिल्डवर्कच्या निमित्ताने इथल्या गावागावात फिरताना छोट्याशा गाड्यांवर बन्स दिसले. पण ते बलभीममधल्या बन्ससारखे लागले नाहीत. या बन्सची चव करण्याची पद्धत तीच असली तरी जरा अधिक जाड, आकाराने छोटे आणि तेवढे खुसखुशीत नव्हते. शिवाय त्यात तेलाचे अस्तित्व दिसायचे.

बन्स खाण्याचे साहस अशा ठिकाणी केले नाही. पणजीत मात्र मला बलभीमपेक्षा जास्त चांगले बन्स मिळाले. कॅफे भोसले, कॅफे तातो, नवतारा या खास स्थानिक चव असणाऱ्या रेस्टोरंटमुळे मी परत बन्स खाऊ लागले. यामध्ये कॅफे भोसलेचा बन्स मला विशेष आवडतो. कॅफे भोसलेमधला आकाराने मोठा, रंगाने पिवळा, छान खुसखुशीत, टम्म फुगलेला बन्स मी पहिल्यांदा खाल्ला आणि त्याच्या प्रेमात पडले.

बलभीमचा बन्स हा माझ्यासाठी खास होताच पण कॅफे भोसलेतील बन्सने माझा अनुभव बदलला. कॅफे भोसले, कॅफे तातो आणि नवतारा मध्ये मिळणारे बन्स हे अजिबात काळपट रंगाचे नसतात.

बाकी तुम्ही कुठल्याही गाड्यावर बन्स खा तिथे बन्स काळपट रंगाचे दिसतात. शिवाय जाड देखील असतात. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे वडील इथे आले होते. ते शाकाहारी असल्यामुळे त्यांना मी कॅफे भोसलेमध्ये घेऊन गेले.

दुपारची वेळ असल्यामुळे आम्ही थाळीची ऑर्डर दिली. थाळी येईपर्यंत त्यांना बन्स खायला मागवला. बाबांना बन्स इतका आवडला कि त्यांनी थाळी रद्द केली आणि अजून दोन बन्स खाल्ले. अगदी मनापासून त्यांनी बन्स खाल्ले.

अनेकजण बन्स सोबत भाजी खातात. तिखट गोड अशी मिश्र चव छान लागते. चहासोबत बन्सची चव अधिक छान लागते. आजचा लेख भाजीपाववर लिहायचा असे ठरवून सुरुवात केली होती. पण मध्येच बन्सचा उल्लेख आला आणि सगळा ओघ आपोआप बन्सकडे वळला.

goa food
Goa Accident Death: दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी अंत; चालक युवतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com