निकोला टेस्लाचा क्रोएशिया

जुन्या जाग्रेबच्या डोंगर उतारावरून निर्मळ पाण्याचे २० ओहोळ वाहायचे. हे ओहोळ ओलांडण्यास साकव (छोटे पूल) होते. आता हे ओहोळ पुरवून त्यावर जुन्या जाग्रेबचे उपशहर वसले आहे.
goa
goaDainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

२०१८ साली फुटबॉल वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात फ्रान्स व क्रोएशिया यामध्ये लढत चालू होती. यावेळी सर्व गोमंतकीय क्रोएशियाला पाठिंबा देत होते.

गोवा आणि क्रोएशिया यांचे ऐतिहासिक नाते आहे. हे नाते ५00 वर्षापूर्वीपासून आजतागायत कायम आहे. १५१० साली पोर्तुगीज सरदार आफोंस द आल्बुकेर्कने विजापूरच्या आदिलशहाचा पराभव करून गोवा जिंकला. १५३० ते ३५ च्या दरम्यान क्रोएशियाच्या दोब्रोवनिक ह्या किनारी शहरातून काही खलाशी जहाजे घेऊन गोव्यात आले.

त्यांना गोव्याहून मसाले व तलम वस्त्रे आयात करायची होती. हा व्यापार पुढील ३५ - ४० वर्षेपर्यंत म्हणजे १५७० सालापर्यंत चालला. या दरम्यान क्रोएशियाचे सुमारे १२००० रहिवाशी गोव्यातील गावडोली गावात स्थायिक झाले. त्यांनी गावात सेंट ब्लेझचे चॅपेल बांधले. हे चॅपेल दिब्रोवनिकच्या सेंट ब्लेझ चॅपेलची हुबेहूब प्रतिकृती आहे.

क्रोएशिया हा हजार बेटांचा देश आहे. क्रोएशियात सुमारे १२२४ छोटी, मोठी बेटे आहेत. अनेक बेटे निर्मनुष्य आहेत. एका बेटावर रॉबिनसन क्रुसोप्रमाणे एकच माणूस राहतो.

क्रोएशियाला पूर्व युरोपचा पूर्णविराम मानला जातो. क्रोएशियाला पूर्व युरोप संपतो आणि पश्चिम युरोप सुरू होतो. क्रोएशिया पूर्व व पश्चिम युरोपच्या सीमेवर, एड्रीयाटीक सागराच्या किनाऱ्यावर आहे. सुमारे ४० लाख लोकवस्तीच्या ह्या देशाला दरवर्षी २ कोटी म्हणजे लोकवस्तीच्या पाचपट पर्यटक येतात. भारत निसर्गसंपन्न व संस्कृतीसंपन्न असूनही भारतात दरवर्षी केवळ १ कोटी पर्यटक येतात.

क्रोएशिया सांस्कृतिक पर्यटनावर (cultural tourism) भर देतो. देशाच्या निसर्ग सौंदर्यासमवेतच इथले किल्ले, पुरातन कॅथेड्रल्स, खाद्यसंस्कृती, संगीत, लोकपरंपरा यांचे दर्शन पर्यटकांना घडवले जाते. इजिप्तमध्ये मला हीच गोष्ट आढळली. इजिप्तमध्ये पर्यटन व संस्कृती खाते एकाच केंद्रीय मंत्र्याकडे असते. संस्कृती व पर्यटन यातला अन्योन्य संबंध ह्या देशांनी ओळखला आहे.

जाग्रेब हे क्रोएशियाचे राजपाटण आहे. टुमदार असे हे शहर आहे. शहराचे जुने जाग्रेब व नवे जाग्रेब असे दोन भाग आहेत. जुने जाग्रेब डोंगर उतारावर वसले आहे आणि त्याभोवती संरक्षक भिंत आहे. जुने जाग्रेब व नवे जाग्रेब या दोन्ही उपशहरामध्ये शतकानुशतके राजकीय वैर होते.

जुन्या जाग्रेबच्या डोंगर उतारावरून निर्मळ पाण्याचे २० ओहोळ वाहायचे. हे ओहोळ ओलांडण्यास साकव (छोटे पूल) होते. आता हे ओहोळ पुरवून त्यावर जुन्या जाग्रेबचे उपशहर वसले आहे.

जाग्रेबचा डोंगर चढून जावे आणि खाली पहावे तर जुन्या व नव्या जाग्रेबच्या कौलारू घरांचे विहंगम दृश्य आपल्याला दिसते. मृद््रंगी कौलांची उतरती छपरे असलेली घरे एवढ्या दाटीदाटीने वसली आहेत की त्यांचा कोलाज बनावा.

जाग्रेबची घरे, इथली चॅपेल्स, चर्चेस, कॅथेड्रल्स ह्या सर्व वास्तुना भूमितीतल्या त्रिकोणाचे वेड आहे. त्रिकोण हा आकृतीबंध मूलतः सुंदर असतो. जाग्रेबमधल्या वास्तु ही अनेक त्रिकोणांची बेरीज आहे. ह्या वास्तुमधला चौकोन देखील चौकोन असत नाही तर दोन त्रिकोणांची संगत असते. अर्धवर्तुळ हे त्रिकोणचे विकसित रुप आहे असे जाग्रेबमधल्या वास्तु मानतात. गणितात त्रिकोणाला विशिष्ट महत्व आहे. गणितातली trignomentry ची उपशाखा त्रिकोणावर आधारीत आहे. सर्वेक्षणात आणि खगोलशास्त्रात ट्रिग्नोमेट्रीचा खूप उपयोग केला जातो.

जाग्रेबच्या बहुतांश वास्तु पिवळ्या रंगात आहेत. प्रत्येक शहरातील वास्तु एकाच रंगात रंगवलेल्या असाव्यात असा नियम सर्वच शहरांत केला पाहिजे असे माझे मत आहे. राजस्थानातले जयपूर गुलाबी रंगात माखलेले तर जोधपूर निळ्या रंगात बुडलेले शहर आहे.

ओमानची राजधानी मस्कतने आॅफ व्हायट रंग पसंत केला आहे. मोरोक्कोत तर पांढरी, गुलाबी, लाल व निळ्या रंगाची चार वेगवेगळी शहरे आहेत. ग्रीसमधल्या सांतोरीनी बेटावरची घरे शुभ्रधवल रंगात शोभून दिसतात.

जाग्रेबमध्ये पिवळ्या रंगाची विविध रुपे पाहायला मिळतात. पिकलेल्या दाणेदार कणसाचा पिवळा रंग, झाडपिक्या आंब्याचा पिवळा रंग, दसऱ्याच्या उंबरठ्यावर फुलून आलेल्या झेंडूच्या फुलांचा पिवळा रंग, नववधुला लावलेल्या हळदीच्या लेपाचा पिवळा रंग! व्हिन्सेंट व्हॅन गोचा हा आवडता रंग. व्हॅन गोचे नाव काढले की त्यांची सूर्यप्रकाशात न्हावून जाणारी पिवळीधम्मक सूर्यफुले आठवतात.

पिवळ्या रंगात थोडा लाल रंग मिसळला की संत्र्याचा नारींगी रंग बनतो. सूर्यास्ताचा केशरी रंग बनतो. इंग्रजीत त्याला मार्मालेड स्काय म्हणतात. एखाद्या बरणीत भरलेल्या फळांच्या मार्मालेड सारखी दिसणारी सायंकाळची पिवळी उन्हे!

गोव्यात रतनआबोली नावाचे फूल आहे. पिवळ्या आबोलीला मोनी आबोली म्हणतात तर केशरी आबोलीला रतन आबोली. ह्या केशरी रतन आबोलीची वेणी माळलेली ललना दिसावी तसे जाग्रेब शहर पिवळ्या, नारींगी, केशरी रंगाने माखलेले आहे.

इंग्रजीत ह्या bright, तजेलदार रंगाना सायकेडेलिक कलर्स असे म्हणतात.

वसंत ऋतु बहरला आहे. जाग्रेबमधली झाडेही पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या फुलांनी डवरलेली आहेत. शहरात जागोजागी छोट्या, मोठ्या बागा, पाण्याची कारंजी, फुलांनी काठोकाठ भरलेली तळी, झुळूझुळू वाहणारे पाण्याचे ओहोळ, वळणदार रस्ते आणि ह्या रस्त्या वरून आरामात जाणारी निळ्या रंगाची ट्रॅम!

जाग्रेबमध्ये पावलोपावली कॅफेज व सोव्हिनीर शाॅप्स आहेत. इथल्या कॅफेमध्ये हाॅट चाॅकलेट मागवावे आणि चाॅकलेटचा स्वाद जिभेवर रेंगाळत जिभेवरच्या रुचीच्या कळ्यांना फुलू द्यावे.

जाग्रेबमधल्या सोव्हिनीर शाॅपमध्ये रंगीबेरंगी वेषातील आकर्षक बाहुल्या मिळतात. बाहुली आणि बाहुला पाहिला की माझे बालपण जागे होते. बाहुली आणि बाहुल्याला बालपणाचे चिरंजिवीत्व लाभलेले असते. मी माझ्या नातवंडासाठी बाहुल्या घेतल्या. खरे म्हणजे मी माझ्यासाठी बाहुल्या घेतल्या. बाहुली ही एक गोठलेली स्मृतीरंजकता आहे.

लहानपणी आम्ही बाहुला - बाहुलीचे लग्न लावायचो. बाहुला आणि बाहुलीच्या लग्नात आलेली गंमत पुढे दुसऱ्या कुठल्याच लग्नात आली नाही!

जाग्रेबमध्ये musuem of broken relationship नावाचा अनोखा म्युझियम आहे. तुटलेल्या नात्यांचा म्युझियम. घटस्फोट घेतलेल्या एका दांपत्याने घटस्फोटापूर्वी एकमेकांना दिलेल्या भेटी एकत्र करून हा म्युझियम सुरू केला. यानंतर जगभरातील घटस्फोटीत दांपत्ये अशा भेटी ह्या म्युझियमसाठी पाठवू लागल्या.

मानवी नाती कशी जुळतात, जोडतात आणि तुटतात, तोडली जातात हे न सुटणारे कोडे आहे. म्युझियम आॉफ ब्रोकन रिलेशनशिप पाहून मी विषण्ण झालो. जुळलेले नाते तुटावे असे कुणाला वाटते? युरोपमध्ये अनेक पुलांच्या लोखंडी कमानीला छोटी छोटी कुलपे बंद करून लटकवली जातात व कुलपांची किल्ली खालून वाहणाऱ्या नदीत फेकली जातात. आपले नाते कधीच तुटू नये ही प्रेमिकांची इच्छा - त्यांची प्रतिकमात्र - ही बंद कुलपे आणि हा मोडलेल्या नात्यांचा म्युझियम!

goa
Goa Missing Case: नाईट आऊटसाठी बाहेर पडला अन् मध्यरात्री मेसेज केला, 'मी जीवन संपवतोय', केपे-शेळपेतील तरुण बेपत्ता

जाग्रेबमध्ये जागोजागी आबेज, चॅपल्स, बासिलीका, चर्चेस यांच्या वास्तु आहेत. ज्या वास्तुत धर्मगुरूना राहण्यास हाॅस्टेल्स आहेत त्यांना आबेज म्हणतात. खास उत्सव होत असलेल्या चर्चेस म्हणजे बासिलीका. लहान धर्ममंदिर म्हणजे चॅपेल. त्याहून मोठे चर्च जिथे बिशप राहतात ते कॅथेड्रल.

ख्रिश्चन चर्चची संघटना पिरेमिडप्रमाणे आहे. सर्वोच्च स्थानी पोप, त्याखाली कार्डिनल, मग आर्चबिशप, त्याखाली बिशप, मग प्रिस्टस् आणि सगळ्यात शेवटी - डेकन्स.

पूर्व युरोपमधल्या अॉर्थोडोक्स चर्चने धर्मगुरूना विवाहाची अनुमती दिली आहे. कॅथोलिक चर्चलाही नजिकच्या भविष्यकाळात धर्मगुरूना विवाहाची परवानगी द्यावी लागेल. ब्रह्मचर्य हा अनैसर्गिक आहे व कामेच्छा नैसर्गिक आहे हे कॅथोलिक चर्चला मान्य करावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com