गोवा: एकही शब्द न उच्चारता आणि कुठल्याही प्रकारची रंगमंच सामुग्री न वापरता, केवळ शरीराचा वापर करून किती गहन गोष्टी सांगता येतात हे आम्हाला सर्वप्रथम मार्सेल मार्सिओ या प्रख्यात फ्रेंच मूकनाट्य कलाकाराने दाखवले. आपल्या भारतातही निरंजन गोस्वामी यांनी ‘माईम’ (मुकनाट्य) या कलाप्रकाराचा खूप प्रसार केला आहे. अर्थात, भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारातही मूकनाट्याचा अविष्कार मुद्राभावांमधून केला जात असला, तरी या दोन्ही प्रकारात मूलत: फरक आहे.
निरंजन गोस्वामी यांच्या दोन कथांवर आधारून निर्माण केलेल्या कला अकादमीच्या ‘कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स’चे मूकनाट्य ‘इन्साईड आऊट’, कलकत्ता येथे 25 मार्च ते 30 मार्च या काळात आयोजित होणाऱ्या ‘नॅशनल माईम थिएटर फेस्टिवल’मध्ये सादर होणार आहे. हा मूकनाट्य महोत्सव ‘इस्टर्न झोनल कल्चरल सेंटर’- कलकत्ता आणि ‘नॅशनल माईम इन्स्टिट्यूट’- कलकत्ता यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे. (National Silent drama Festival)
प्रख्यात भारतीय मूकनाट्य कलाकार निरंजन गोस्वामी यांच्याच ‘मेस हाऊस’ आणि ‘चिन्मय शक्ती’ या दोन कथावस्तूंचा आधार घेऊन सहाय्यक प्राध्यापक श्रीकांत गावडे यांनी या मूकनाट्याला आकार दिला आहे. साधारण 40 मिनिटे कालावधी असलेल्या या मूकनाट्याची बांधणी एका श्रीमंत मुलीला केंद्रस्थानी ठेवून केली गेली आहे. श्रीमंतीत वाढलेल्या या मुलीचे परिवर्तन, मानवी षडरिपूंशी ओळख झाल्यानंतर आणि त्यांचे स्वरूप समजल्यानंतर कसे होते हा या मूकनाट्याचा विषय आहे.
‘इन्साईड आऊट’ या मूकनाट्याचे दिग्दर्शक श्रीकांत गावडे या मूकनाट्याबद्दल सांगताना म्हणतात, मूकनाट्य हा अर्थातच अभिव्यक्तीसाठी कठीण असणारा प्रकार आहे. अभिनेत्यांसाठी तो एक विशेष जबाबदारीचा अभिनयप्रकार आहे कारण त्यानी सर्वात प्रथम, तो सांगू इच्छिणाऱ्या गोष्टींची कल्पना आपल्या मनात केली पाहिजे व आपण कल्पिलेले, आपल्या योग्य हावभावातून व योग्य हातवाऱ्यातून दर्शकांपर्यंत पोचवलेही पाहिजे. हा प्रकार जरी कठीण असला तरी योग्य तंत्र अनुसरल्यास आणि त्याचा सराव केल्यास ते सोपेही बनू शकते. ते म्हणतात, ‘माईम’ हे कलाकाराला त्याचे शरीर आणि चेहरा कसा वापरावा हे शिकवते. त्यामुळे प्रत्येक नाट्यकलाकारासाठी ‘माईम’ शिकणे आवश्यक आहे.’या मूकनाट्यात ‘कॉलेज ऑफ थिएटर आर्टस्’च्या सुमारे 22 कलाकारांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.