

राजू नायक
Narkasura Culture : नरकासुर हा गोव्याच्या संस्कृतीचा भाग आहे, असे मी म्हणणार नाही. परंतु तो निश्चितच गोव्याच्या लोकपरंपरेतून आलेला वारसा मानला पाहिजे.
ही परंपरा कधी-कधी विकृत स्वरूप धारण करतेही, परंतु तिच्यातील सौंदर्य, आनंद-हर्षाची भावना, लोकसंगीतातील चैतन्य नाहीसे करणे, आपली परंपरा आणि ओळख नष्ट करण्यासारखेच आहे. नरकासुर नष्ट करा म्हणणारे लोक गोव्यावर त्यांचे कथित सुसंस्कृतीकरण लादण्याचा प्रयत्न करीत असतात.
जचा माझा लेख तुम्ही वाचायला सुरवात कराल, तेव्हा पायाने कारीट फोडून तुम्ही त्याची कडू चव चाखलेली असेल. दुष्टांचा निःपात करण्याची ही परंपरा आपण पूर्वापार जपली आहे. त्यानंतर तुम्ही पोह्यांचे नाना प्रकारही चाखलेले असतील.
आपला आनंद तुम्ही इतरांना वाटलेला असाल. आजची दिवाळी तुमच्याही जीवनात आनंद, भरभराट आणि चैतन्याचा नवा उजेड निर्माण करो.
माझ्या मनात दिवाळीची वेगवेगळी रूपे आहेत. त्यात नरकासुराचा बेहोशी नाच आणि त्यावेळच्या पारंपरिक लोकवाद्यांचा कणकणाट घर करून आहे. मला आठवते ती दिवाळी अशीच आहे.
माझ्या आईने बनविलेले पोह्यांचे अनेक विविध प्रकार जरूर माझ्या जीभेवर रेंगाळत राहिले आहेत; परंतु लहानपणी पाहिलेला नरकासुर आणि कृष्णाचा नाच, त्यावेळची वाद्यांची बेधुंदी मनावर राज्य करून आहे.
लहानपणी आम्हाला भल्या पहाटे उठवले जाई, ते हा नरकासुर पाहण्यासाठीच. तो वेळपर्यंत ढोल-ताशांचा आवाज सारा आसमंत भेदून टाकत असे. आम्हाला उचलून बाहेर आणले जाई आणि मी नरकासुराची ती चमत्कृती डोळे विस्फारून थक्क होऊन पाहात असे.
घुमचे कटर घुम...
कटर कटर घुम...
घुमचे कटर घुम...
घुम घुम घुम...
विविध रंगांची आभूषणे, कागदी रंगाने लपटलेला नरकासुर, त्याचा आक्राळविक्राळ मुखवटा, हातात तलवार आणि त्याच्या समोर इवलासा कृष्ण आणि तोही लयीत नाचणारा. लोकवाद्यांच्या दणदणाटाने सारा आसमंत भारावून गेलेला असे. आमची काळजेही धडधडू लागलेली असत आणि त्याच तालावर नरकासुर आणि कृष्णाचा नाच ही आमची दिवाळीची आनंददायी चाहूल लावणारी घटना असे.
आम्ही या नरकासुराला बोरीचा नरकासुर म्हण असू. बोरी, आडपई, दुर्भाट येथून मडगावात स्थायिक झालेले अनेकजण एकत्र येऊन हा नरकासुर बनवित. मडगावचा नरकासुर हा इतर ठिकाणांहून वेगळा असे; कारण तो आतून पोकळ असे व एक किंवा दोन माणसे आतमध्ये शिरून नरकासुर उचलून नाच करू शकत.
मला आठवते, त्यानुसार बोरीचा हा नरकासुर उचलण्यासाठी किमान दोन माणसे लागत असावीत. नाचत असताना नरकासुराच्या प्रतिमेचे कपडे उडत असत, त्याचे हात हेलकावे घेत. त्यामुळे ही प्रतिमा जीवंत असल्यासारखी भासत असे.
मला आठवते ती नरकासुराची आणखी एक गोष्ट म्हणजे, त्याचा जबडा हालत असे, जणू काय तो कृष्णाला गिळून टाकेल. परंतु कृष्णही छोटा असला तरी एवढा चपळ असे, नरकासुराला सतत चकवा देत तो इतका सुंदर नाच करे, की वातावरणात चैतन्य भरून राही. आम्ही कोंबवासीय या नरकासुरामागे नंतर दामोदर सालापर्यंत चालत यायचो.
या देवळासमोर पुन्हा त्यांचा रोमहर्षक नाच होऊन सकाळी सहा वाजता कृष्ण त्याचा वध करे. आगीत लपेटून खाक होत गेलेला नरकासुर पाहणे ही एक आनंददायी घटना असे. डोळे विस्फारून आम्ही लहान मुले हा प्रसंग आमच्या मनाच्या खोल कप्प्यात तो साठवून ठेवत असू. ती आठवण अजूनही माझ्या मनात ताजी टवटवीत आहे.
नरकासुराचे गोव्यात प्रस्थ निर्माण केले जात आहे, असे आम्हाला कोणीही सांगितले नाही. दिवाळी म्हटले की नरकासुर आणि कृष्णाचा नाच, लोकवाद्यांची बेहोशी, एवढेच आमच्या मनात ठसलेले आहे. नरकासुर ही आमची परंपरा नाही, गोव्याला ही नसती उठाठेव करण्याचे प्रयोजन काय? असे विचारही आमच्या मनात त्यावेळी कधी आलेले नाहीत. कारण आमच्या जीवनाचा आणि परंपरेचा तो एक भाग झालेला आहे.
प्रसिद्ध लोकवेद अभ्यासक विनायक खेडेकर यांना आम्ही विचारले असता, म्हापसा येथे गोवा मुक्तीच्या काही काळ आधीपासून नरकासुर वध हा आकर्षणाचा विषय बनला होता, अशी माहिती ते देतात. माझ्या माहितीनुसार मडगावात बोरीचा नरकासुर हा सर्वांत मोठा नरकासुर बनविला जाई आणि गोवा मुक्तीच्या दहा-बारा वर्षांच्या आधीपासून तो नाचवला जात असल्याची माहिती मिळते.
खेडेकर यांच्या मते, गोव्यात पोर्तुगीज काळात परकीय राज्यसत्तेच्या विरोधात एक प्रतीक म्हणून नरकासुर वापरले जाई. परंतु त्यात कलाकौशल्याचे मिश्रण, लोकवाद्ये, आपल्या वारशांशी तालवाद्य वादन, त्याला अनुरूप नृत्य हे परंपरेने घडत गेले आणि त्याचा पुढे विकासही झाला. अभ्यासक रोहित फळगावकर यांच्या मते, अचानक एके दिवशी नरकासुर प्रकटला असता तर पोर्तुगिजांच्या तीक्ष्ण नजरेतून तो सुटलाच नसता.
हा लोकजागर गोवा-कोकणच्या लोकसंस्कृतीचाच भाग होता. प्रत्येक गावात नरकासुर तयार होत असे. कोकणात एका गावात काही कारणाने एका वर्षी तो झाला नाही, त्यावेळी गावावर अरिष्ट आले, असा उल्लेख सापडतो.
नरकासुराच्या रूपाने काही अनिष्ट गोष्टींचा नाश करण्याची लोकपरंपरा आमच्या संस्कृतीत आहे. गोव्यात उत्सवाच्या वेळी मंदिरामध्ये ढोल-ताशे आणि इतर पारंपरिक वाद्यांचा पूर्वापार वापर केला जातो. आपल्या पारंपरिक शिगमोत्सवातही हेच वादन स्फूर्ती आणण्यासाठी नेहमी वापरले जाते. मंदिरांनी ही कला जोपासली, त्याच्या कित्येक वर्षे आधी राजे-सरदारांनी शत्रूंशी लढण्यासाठी या पारंपरिक लोकवाद्यांचा उपयोग केला.
आपल्या मंदिर संस्कृतीने कालांतराने ही लोककला जोपासली आणि समृद्ध केली. आजही धार्मिक, सांस्कृतिक उत्सवावेळी हर्ष आणि उल्हास निर्माण करण्यासाठी आपण ढोल-ताशांचा वापर करतोच. सांस्कृतिक जीवनावर या लोकवाद्यांनी आणि नृत्याने जर एवढे गारूड घातले असेल, जर नरकासुर त्या परंपरेचा भाग बनलेला असेल, तर ती नाकारण्याचा नतद्रष्टपणा आपण का करावा?
मडगाव किंवा म्हापसा शहरात मुक्तीनंतरच्या पहिल्या दोन दशकांत एक-दोनच नरकासुर आपली आब राखून असत. परंतु त्यानंतर राजकीय पाठिंब्याने स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. लोकांची गर्दी जमवून एक मोठा समारंभ घडवून आणणे, हा उत्सवाचा प्रमुख भाग बनला. उत्तर भारतात रावण वध हा दसऱ्याचे एक प्रमुख आकर्षण असते.
तेथेही राजकीय पक्षांनी आपली दुकाने मांडली आहेत. तरीही लोक मोठ्या प्रमाणावर जमतात, ते अनोखा आणि भव्यदिव्य रावण पाहण्यासाठीच. त्या राज्यांमध्येही गल्ल्या-गल्ल्यांत रावण वधाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु आपल्या गोव्याचे वैशिष्ट्य हे नरकासुर वधाच्या अनोख्या सादरीकरणात आहे.
गेल्या वीस वर्षांत मात्र नरकासुर स्पर्धा आणि या प्रतिकृती विकृत पातळीवर जात तर नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतो. पणजी राजधानीत तर रस्त्या-रस्त्यांवर नरकासुराच्या प्रचंड उंचीच्या प्रतिमा तयार केलेल्या नजरेस पडतात, परंतु त्यांची कलाकुसर निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. एवढ्या भल्या मोठ्या प्रतिमा तयार करणे आणि पावसाची तमा न बाळगता त्या सुशोभित करणे, या वृत्तीला निश्चितच दाद दिली पाहिजे.
मी काही नरकासुर तयार करणाऱ्या मंडळांशी बोलत होतो. त्यांचे संघटन कौशल्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. क्राऊड फंडिंग ही नवी संकल्पना लोकांनी फार पूर्वीपासून जोपासली. ते राजकीय नेत्यांकडून पैसा गोळा करतातच. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी शहराच्या पायाभूत सुविधांकडे आणि स्मार्ट सिटीसाठी चाललेल्या बेदरकार खोदाईकडे जरूर आडनजर केली असेल. परंतु प्रत्येक नरकासुराला त्यांनी बजेट ठरवून दिलेे आहे.
तेवढा पैसा हमखास मिळत असल्याने दरवर्षी नरकासुरांची उंची आणि विस्तार वाढत गेलेला आपण पाहतो. नरकासुर बनविणे हे जरूर कलाकुसरीचे काम आहे. हे नरकासुर एकाच जागी उभे असले तरी आतमधून पूर्णतः पोकळ असतात. लोखंडाचे विणकाम असल्याने थोडा भुसा भरून व बाहेरून रंगीबेरंगी कागद चिकटविणे सोपे बनते.
पणजीचे वैशिष्ट्य म्हणजे, ते शरीर बनविण्यासाठी कागदाचा लगदा वापरतात. त्यावर रंगकाम केले जाते, कागदाचा लगदा आणि रंग एवढ्या कौशल्याने बनविले जातात की, नरकासुराची शरीरयष्टी, पिळदार स्नायू नजरेत भरतात. नरकासुराचा मुखवटा तयार करणे हे कौशल्य. कागदाच्या लगद्यापासून त्यांचे आक्राळ-विक्राळ मुखवटे बनवतात. त्यावरील रंगकाम हेसुद्धा कौशल्याचेच काम आहे.
कोणाचा नरकासुर अधिक भेदक आणि आकर्षक असेल, यासाठी स्पर्धा लागलेली असते. परंतु ही स्पर्धा निकोप आहे. एक मंडळ दुसऱ्यावर कुरघोडी करताना दिसत नाही. त्यांच्यात आपसांत निश्चितच सौहार्द आहे. कारण ते एक-दुसऱ्यांना मदत करतानाही दिसतात.
वास्तविक पणजीमधील हे संघटनकौशल्य, कलाकुसर त्यांच्यातील एकोपा, सामाजिक कार्यातील तडफ निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. संघटनात्मकदृष्ट्या त्यांच्या कामाची अद्याप कोणी दखल घेतलेली नाही. त्यातील काहीजण निश्चितच राजकीय, सामाजिक क्षेत्रांत काम करीत असतील. परंतु बहुसंख्य तरुण पडद्याआड राहून काम करणारे आहेत.
विविध क्रीडा स्पर्धा भरविण्यातही त्यांचे कौशल्य दिसते. परंतु पणजी शहरातील नरकासुर बनविणारी मंडळी ही एक निश्चितच शक्ती आहे. कधी तरी या सर्व मंडळांना एकत्र आणून त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे. एखादा सामाजिक उपक्रमही ते एकत्रितपणे पेलू शकतील, एवढा मला भरंवसा वाटतो.
एका बाजूला संघटनकौशल्य तर दुसऱ्या बाजूला नरकासुर बनविण्याच्या या उपक्रमाला काही विकृतीही चिकटलेली आहे.
तरुण मुले नरकासुर तयार करतेवेळी दारू प्यायला शिकतात. नरकासुर हा सांस्कृतिक उपक्रमाचा भाग बनल्याने राजकीय नेते किंवा व्यापारी पैसे देण्यात कुचराई करीत नाहीत. त्यामुळे भरपूर पैसा येतो. हे तरुण रात्रं-दिवस एकत्र जमतात, तरुण एकत्र आले की, आपोआपच मौजमौजेकडे कल असतो.
त्यातून चार तरुण जमले की दारू मिळवायची, हा गोव्यात सर्वसाधारणपणे एक वेगळ्या सामाजिक उपक्रमाचाच भाग झाल्याचे दिसते. हे पंधरा दिवस दारू किंवा जुगार हे प्रकार तेथे सर्रास घडतात आणि आसपासचे लोकही त्याकडे काणाडोळा करीत आलेे आहेत.
काही ठिकाणे तर हे तरुण वर्षभर एकत्र येण्याने ते रस्ते अड्डाच बनलेले आहेत. तेथे सिगारेट, दारू आणि धाकदपटशा असे प्रकारही दिसून येतात. त्यामुळे नरकासुर बनविण्याच्या या प्रक्रियेला ‘समाजकंटकांचा अड्डा’ असेही संबोधले जाऊ लागले आहे, जो प्रकार निश्चितच या सामाजिक उपक्रमाला गालबोट लावणारा आहे.
गोव्यात दिवाळीला नरकासुर बनत, तेव्हा बहुजन समाजातील तरुण मंडळी त्यात पुढाकार घेत असत. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत नरकासुर स्पर्धांमुळे आणि राजकीय भरभक्कम पाठिंब्यामुळे पारंपरिक नरकासुर आता वेगळ्या वळणाकडे वळत असल्याचे चित्र दिसते. आता अनेकजण नरकासुर बनवितात. पिकॅन नरकासुर बनवून ते मोटारींना चिकटविले जातात. स्पर्धांवर लाखो रुपये खर्च केले जातात.
गेली काही वर्षे होणाऱ्या फातोर्ड्यातील नरकासुर स्पर्धेचे पहिले पारितोषिक एक लाख रुपये होते आणि ते एक आकर्षण राहिले. परंतु आता राज्य सरकारने राज्यस्तरीय नरकासुर वध स्पर्धा आयोजित करून या उपक्रमाला पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पर्वरीत होणाऱ्या या स्पर्धेला पहिले बक्षीस अडीच लाख रुपयांचे आहे. त्यासाठी हाऊसिंग बोर्डच्या जागेवर शामियाना उभारला आहे.
स्पर्धांमुळे नरकासुर वध आता केवळ बहुजन समाजाचे किंवा हिंदू धर्मांचे प्रतीक राहिलेले नाही. मुस्लिम, ख्रिश्चन हा समाजही आता नरकासुर बनवित आहेत. झोपडपट्ट्यांमध्येही नरकासुराचे प्रस्थ वाढले आहे. त्याचे कारण या काळात नेत्यांकडून सहज निधी गोळा करता येतो. परंतु एक चांगली गोष्ट होते, ती म्हणजे नरकासुराने सर्व जाती-धर्मांना एकत्र आणले.
तुम्ही नरकासुर का बनवता, असे मुस्लिमांना कोणी विचारत नाही आणि बालगोपाळांच्या आऩंदाचा तो विषय असल्याने मुस्लिमांनीही नरकासुर प्रतिमेला विरोध केलेला नाही. पणजीमध्ये काही मोठ्या आकर्षक प्रतिमांना रंगरंगोटी आणि कलाकुसर करताना ख्रिस्ती मुलांचा पुढाकार असल्याचे नजरेस आल्याशिवाय राहात नाही.
या सर्व जमेच्या गोष्टी धरल्या तरी नाक्यानाक्यांवर नरकासुर तयार करून त्यांनी रस्ते अडविणे उचित नाही. महत्त्वाच्या शहरांमध्ये पारंपरिक लोकवाद्यांचे संगीत आता बाजूला राहिले आणि मोठ्या डिजेची मोठमोठी ध्वनियंत्रणा उभी केली जाते. संध्याकाळपासून कानठळ्या बसवणारे त्याचे आवाज आसपासच्या लोकांना त्रासदायक ठरू लागले आहेत.
हा दिवाळी सण जरी सर्वांचा आकर्षणाचा असला तरी गोव्याच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दाटीवाटीने इतर धर्माचे लोकही राहतात. अशा प्रचंड आवाजाच्या प्रदूषणाने वृद्धांना तर खूपच त्रास सहन करावा लागताे. दिवाळीच्या निमित्ताने इतरांच्या शांततेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणाला नाही. हिंदूंनाही शांतता प्रिय आहे. या काळात विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत असतात. काहीजण जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड देत असतात.
त्यांची शांतता हिरावून घेण्याचा अधिकार कोणाला नाही. वस्तुतः अशा अडचणीत आलेल्या लोकांना मदत देणे, त्यांची विचारपूस करणे, निराधारांना अन्न आणि गोडधोड पोहोचविणे हे तर दिवाळीचे प्रथम कर्तव्य आहे. शिवाय दिवाळीच्या दिवशी या नरकासुरांना आग लावून त्यांचे अवशेष कित्येक दिवस रस्त्यांवरच टाकून दिलेले असतात.
देशातील अनेक शहरे प्रदूषणामुळे संकटात आहेत. सध्या दिल्लीला गॅस चेंबरचेच स्वरूप आलेे आहे. त्यामुळे यावर्षी फटाके वाजवू नका, अशा सूचना तेथील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. दुर्दैवाने तेथील विरोधी पक्ष फटाक्यांची अधिक आतषबाजी करा, असे आवाहन करतो. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर निर्बंध आणले आहेत. आवाजाच्या प्रदूषणावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ध्वनियंत्रणा वापरण्यावरही मर्यादा आहेत. दुर्दैवाने आपल्या सरकारकडे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणणारी यंत्रणाच उपलब्ध नाही.
नरकासुराने निर्माण केलेल्या विकृती वगळल्या तर पारंपरिक नरकासुर हा निश्चितच येथील लोकसंस्कृतीची ओळख बनला आहे, हे मान्य करावे लागेल. ‘सुसंस्कृत’करणातून या परंपरा सोडून देणे, हे कितपत योग्य याचा विचार झाला पाहिजे. अनेक धर्ममार्तंडांनी हस्तक्षेप केल्यामुळे आपण आपल्या सांस्कृतिक खुणा आणि प्रतिकांचा त्याग केला. विशेषतः आदिवासी परंपरेतून आलेल्या प्रतिकांना सोडून दिले.
त्यामुळे एक धेडगुजरी संस्कृती आपण समाजावर लादली आणि ती आपलीच असल्याचे सोंग आम्ही मिरवतो. मी लोकवेद अभ्यासक विनायक खेडेकर यांच्याशी चर्चा करीत होतो. सुसंस्कृतकरणाच्या प्रभावातून आपण समाजाला प्रिय असलेल्या अनेक विभुती व पारंपरिक प्रतिकांचा त्याग केला आहे. गोव्यात सातेरीमधूनच आपण शांतादुर्गा तयार केली.
विनायक नारायण शेणवी धुमे यांच्या ‘पुण्यभूमी गोमन्तक’ या ग्रंथाचा उल्लेख करून खेडेकर म्हणाले, पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरे भस्मसात केली, तेव्हा त्यांनी कोठेच शांतादुर्गेचे मंदिर तोडल्याचा उल्लेख नाही. संशोधक लुई गोमीश पेरेरा यांनी पोर्तुगिजांनी तोडलेल्या मंदिरांंमध्ये सातेरीची मंदिरे होती, परंतु शांतादुर्गा नावाची नव्हती, असे नोंदविलेले आहे. याच मंदिरांचे पुनर्निर्माण झाले, तेव्हा लोकांनी ‘शांतादुर्गा’ या लोकदेवतेचे असे नामकरण केले.
धुमे आपल्या ‘पुण्यभूमी गोमन्तक’ पुस्तकात म्हणतात, श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर आज कवळे गावात आहे. ते प्राचीनकालीन सोळाव्या शतकाच्या मध्यापूर्वी सासष्टीतील केळशी गावात होते. परंतु केळशी येथे ते श्री सातेरी देवी या नावाने होते, हे ऐतिहासिक पुराव्यावरून ताडता येते. १५६७ साली पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिलेल्या ‘फोराल दी सालसेत’ या हस्तलिखितामध्ये या मूळ देवीचे वर्णन सातेरी असे केलेले आढळते.
पुढे सुसंस्कृत पद्धतीनुसार तिचा उल्लेख श्री शांतादुर्गा असा केला जाऊ लागला. याच हस्तलिखितामध्ये श्री मंगेश देवाचा उल्लेख ‘मंगनाथ’ असा केला आहे. कृष्णदास श्यामाने तदनंतर त्यास श्री मंगशास नमन असा उल्लेख केला आहे.
खेडेकर यांनी आपल्या ‘गोवा देव मंडल’ या पुस्तकातही देवदेवतांच्या रचनांचा इतिहास मांडला आहे. सातेरचे उन्नयन जसे शांतादुर्गा झाले, तसेच वाचाळ नाव गावठी दिसू लागल्याने त्याला वाचाळेश्वर बनविण्यात आले. घाट्येवेलोचे रूपांतर घाट्येश्वर झाले. रवळूचे रवळनाथ करण्यात आले. संस्कृतकरणाने जुनी प्रतिके नष्ट झाली.
सातेरीच्या नावाने आपण या मातीचे-भूमीचे पूजन करीत असू. ती आपली सृजनदेवता. तुम्ही वारूळ काय पूजता, असे सांगत बाहेरून आलेल्या धर्ममार्तंडांनी आमचे सांस्कृतिक उन्नयन करण्याचा विडा उचलला, तेव्हा आमच्या देवदेवतांना सोन्या-चांदीचे मुखवटे चढविले गेले. आमच्या नागड्या वेताळांना कपडे नेसवण्यात आले.
जुन्या मूर्तींच्या ठिकाणी नव्या प्रतिकांची स्थापना झाली. जुनी श्रद्धास्थाने पारंपरिक, गावठी असली तरी ते आपले खरे संचित होते, ही सांस्कृतिक वैभवे आपल्या पूर्वजांनी निर्माण केली होती आणि सांस्कृतिक व सामाजिक रचनेची भाग होती. आदिवासींना धर्म नव्हता, त्यांच्यावर धर्म लादल्यानंतर त्यांचे निसर्ग पूजनाचे सारे सोहळे आणि उत्सव नष्ट करण्यात आले. मानववंश शास्रज्ञ या प्रकारांना ‘अघोरी’ असेच संबोधतात.
याच सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा धांडोळा घेताना नरकासुरसुद्धा कधीकाळी आपल्या संस्कृतीचा आणि लोकपरंपरेचा एक भाग बनलेला आहे. रोहित फळगावकर तर ठासून म्हणतात, ही लोकसंस्कृतीची खोलवर रुजलेली परंपरा आहे. ती नाकारणे म्हणजेच स्वतःला अधिक सुसंस्कृत म्हणविण्याचा नतद्रष्टपणा नव्हे काय?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.