लंच बॉक्स क्लाउड किचन

‘क्लाउड किचन’ म्हणजे जिथे फक्त खाद्यपदार्थ तयार करून मिळतात, तिथे बसून तुम्ही ते खाऊ शकत नाही. तुम्ही तुम्हाला हवे ते पदार्थ ऑर्डर करायचे आणि घरी निवांतपणे खायचे.
goa
goaDainik Gomantak

मनस्विनी प्रभुणे-नायक

क्लाउड किचन ही संकल्पना आता बऱ्यापैकी रुजली आहे आणि हे घरपोच खाद्यसेवा देणाऱ्या ऑनलाईन ॲपमुळे घडू शकले. ही सेवा जेव्हा अस्तिस्त्वात नव्हती तेव्हाचे दिवस आठवा.

जर घरी काही विशेष कार्यक्रम, समारंभ असेल तर असे बाहेर ऑर्डर देऊन खाद्यपदार्थ आपण मागवायचो. कोणीतरी खात्रीलायक व्यक्ती जिने खाद्यपदार्थ बनवण्याच्या व्यवसायात आपले नाव कमावले आहे अशा व्यक्तीला आपण ऑर्डर द्यायचो. मग आपल्या घरातील प्रत्येक कार्यात त्या विशिष्ट 'केटरर्स'चाच स्वयंपाक असायचा.

पण कधी घरी कोणतंही कार्य नसताना आपल्याला त्यांच्याकडचे काही विशिष्ट प्रसिद्ध असलेले पदार्थ खावेसे वाटले तर मात्र ते मिळायचे नाहीत. कारण एवढी छोटीशी ऑर्डर घेण्याची सोय यात नव्हती.

पण 'क्लाउड किचन'ने हे देखील सोप्पे केले आहे. कुठे बाहेर रेस्टोरंटमध्ये जाऊन खाण्याचा कंटाळा आलाय? घरातच बसून काहीतरी वेगळे खावेसे वाटते? शिवाय ते खात्रीलायकदेखील हवे, अशा सगळ्या अपेक्षा आता 'क्लाउड किचन' पूर्ण करत आहे. क्लाउड किचन ही संकल्पना राबविणाऱ्यांमध्ये तरुण पिढी अधिक आहे. स्वतःचे रेस्टोरंट सुरू करण्यापूर्वी अशा क्लाउड किचनच्या माध्यमातून स्वतःला पारखून घेत आहेत.

लंच बॉक्स

ऑफिसमध्ये दुपारच्यावेळी जेवायला काहीतरी मागवायचे होते. साग्रसंगीत जेवण नको पण पटकन जेवता येईल असे काहीतरी हवे होते. मग एका ॲपवर 'लंच बॉक्स' हे नाव दिसले जे आमच्या ऑफिसच्या जवळच्या भागात होते.

लंच बॉक्स म्हणले की कसा सुटसुटीत मेनू हवा. पटकन खाल्ले आणि लगेच कामाला लागले, असे व्हायला हवे. 'लंच बॉक्स' या क्लाउड किचनची सेवा पुरवणाऱ्या मंडळींनी यातला मेनू अगदी याच पद्धतीने तयार केला आहे. मात्र लंच बॉक्स हे गोमंतकीय खाद्यपदार्थ पुरवणारे 'क्लाउड किचन’ नाहीये.

इथे तुम्हाला उत्तर भारतीय पदार्थ मिळतात. अस्सल उत्तर भारतीय चवीचे पिंडी छोले, राजमा चावल, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे, बटर चिकन, मुघलाई चिकन ग्रेव्ही, चिकन खिमा, व्हेज बिर्याणी, मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, दाल मखनी, पालक पनीर हे सारे पदार्थ लंच बॉक्समध्ये मिळतात. मी 'आलू परांठा विथ दाल मखनी' ऑर्डर केले होते. दोन मध्यम आकाराच्या आलू पराठ्याचे चार तुकडे आणि दाल मखनी आणि सलाड असे त्या लंच बॉक्समध्ये आले. आलू पराठा हा त्यावर लावलेल्या बटरमुळे चविष्ट लागतो.

इथे व्यवस्थित बटर लावलेला गरम गरम पराठा आणि क्रीम घातलेली दाल मखनी होती. दोन्हीची चव अगदी खात्रीलायक उत्तर भारतीय पद्धतीची होती. दाल मखनी खावी ती उत्तर भारतीय रेस्टोरंटमध्येच. कारण ती बनवण्याची विशिष्ट पद्धत जर अवलंबली नसेल तर ती बेचव बनते. दाल मखनीतील डाळ दुधात मंद आचेवर शिजवली जाते ज्यामुळे त्याला वेगळी चव येते. जास्त मसाले नसतात, चवीला सौम्य असते. लंच बॉक्सक्सही दाल मखनी या साऱ्या निकषांवर खरी ठरणारी होती.

यामध्ये राजमा पराठा, पनीर पराठा, चिकन खिमा पराठा, स्मोक बटर चिकन आणि पराठा मटण भूना आणि पराठा असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे खाद्यसेवा पुरवणाऱ्या ॲपवर उपलब्ध आहे. नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, ऑफिसमधून बाहेर पडून जेवायला वेळ नसेल तर 'लंच बॉक्स'ला तुम्ही ऑर्डर करू शकता. 'लंच बॉक्स' कोण चालवतात याबाबत उत्सुकता होती.

बराच शोध घेतला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण ज्याने कोणी हे सुरू केले आहे त्याला दाद द्यायला हवी. उत्तर भारतीय पदार्थांचा वेगळाच मेनू, अतिशय वेगवेगळ्या 'कोम्बो' ऑफरमध्ये देणारी ही मंडळी नक्कीच स्थानिक नाहीत. यांनी अस्सल गोमंतकीय पदार्थ अशा 'कोम्बो' ऑफरमध्ये द्यायला सुरुवात केली तर गोमंतकीय खवय्ये मंडळींचा अजून चांगला प्रतिसाद मिळेल.

क्लाउड किचन म्हणजे काय?

क्लाउड किचन म्हणजे जिथे फक्त खाद्यपदार्थ तयार करून मिळतात, तिथे बसून तुम्ही ते खाऊ शकत नाही. तुम्ही तुम्हाला हवे ते पदार्थ ऑर्डर करायचे आणि घरी निवांतपणे खायचे. यालाच ''घोस्ट किचन'' किंवा ''व्हर्च्युल किचन'' देखील म्हणतात. पण या दोन्ही पेक्षा क्लाउड किचन म्हणणे कानाला जरा बरे वाटते.

जेव्हा रेस्टोरंट सारखी मोठी व्यवस्था उभी करायची नसते, पण आपण बनवत असलेले चविष्ट पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात तेव्हा क्लाउड किचन एकदम योग्य पर्याय बनतो. खाद्यपदार्थांविषयी ''स्टार्टअप'' करणाऱ्या अनेकांनी ''क्लाउड किचन''ला जवळ केले आहे. मध्यंतरी मी या अशा क्लाउड किचनच्या शोधात होते आणि खाद्यसेवा पुरविणाऱ्या एका ऍपवर मला ''लंच बॉक्स'' नावाचे क्लाउड किचन सापडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com