Loksabha Election : एआय पावर्ड निवडणुका साधक की बाधक?

Loksabha Election : माहिती तंत्रज्ञानाचा वापर अनेक चांगल्या वाईट कारणांसाठी सर्वच पक्ष गेली कित्येक वर्ष करतच आहेत. पण आभासी आणि धादांत खोट्या कन्टेन्टद्वारे नागरिकांच्या मानसिकतेशी खेळून त्यांना स्वतःला पाहिजे तस वापरून घेण्याच सामर्थ्य आजघडीस डीपफेकद्वारे उपलब्ध आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

संगीता नाईक

मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या लोकांमध्ये एकदमच एक अस्वस्थ चुळबुळ सुरु झाली.

अक्षरशः प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवर आत्ताच आलेल्या सुमार सात सेकंदाच्या व्हिडीओ मेसेज कडे डोळे विस्फारून बघत होता. मोबाईल कानाला लावून बोलणाऱ्याच्या वाक्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता.

खरतर अशक्यप्राय गोष्ट, पण कानांनी ऐकलेल्या नी डोळ्यांनी दिसणाऱ्या व्हिडीओ वर दुर्लक्ष तरी कस करायचं? असं काय होत त्या सात सेकंदांच्या व्हिडिओमध्ये? निवडणुकीत पारडं बरच जड असलेल्या एका पार्टीचा नेता विरोधी पक्षाला भरभरून मत देण्याच आवाहन त्या व्हिडीओद्वारे मतदारांकडे करत होता.

या अनपेक्षितपणे समोर आलेल्या राजकीय समीकरणाने मतदार राजाला गोंधळात टाकलं. पार्टीकडे स्पष्टीकरण मागण्यास आणि पुढाऱ्यांकडे ते देण्यास वेळ ही नव्हता नि आचारसंहितेमुळे शक्यही नव्हतं. राजकीय विश्लेषकांच्या मते राज्यात विशिष्ट पक्षाचे सरकार येण्यास अगदी शेवटच्या क्षणास व्हाट्सअँप द्वारे लोकांपर्यंत पोहोचलेल्या या व्हिडीओच योगदान नक्कीच होत.

पण अस्वस्थ करणारी गोष्ट ही, की हा व्हिडीओ खऱ्या घटनेचा नव्हता तर एआय तंत्रज्ञान वापरून तयार केलेला डीपफेक होता.

आणि तेव्हढीच अस्वस्थ करणारी गोष्ट ही की लोकशाहीचा कणा असलेल्या मतदाराची अक्षरशः खिल्ली उडवण्यासाठी डीपफेकचा केला गेलेला वापर जगाच्या पाठीवर इतर कुठे नव्हे तर अगदी आपल्या भारतातील तेलंगाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीवेळी नोव्हेंबर २०२३ साली केला गेला.

माझ्या मते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदारापुढे एआयचा वापर करून काय वाढून ठेवले जाऊ शकते ह्याची हि नुसती एक झलक आहे.

जानेवारीत झालेल्या दावोस शिखर परिषदेच्या आधी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमन जगभरातील राष्टांपुढे येत्या दशकात असणाऱ्या जोखमींसंबंधीच विश्लेषण करणारा एक अहवाल प्रसिद्ध केला.

या अहवालानुसार या धोक्यांच्या यादीच्या शीर्षस्थानी आहे चुकीची माहिती आणि अपप्रचार, आणि या धोक्यामुळे अपरिमित हानी होऊ शकते अश्या असुरक्षित देशांच्या यादीत अग्रस्थानी आहे आपला भारत . ९० कोटी इंटरनेट आणि ४० कोटी व्हाट्सअँप वापरकर्ते असलेल्या आपल्या देशात कसलीही शहानिशः न करता ज्या वेगाने चुकीच्या आणि अपप्रचार युक्त माहितीचा प्रचार आणि प्रसार केला जातो त्या अनुषंगाने ह्या यादीतील आपल्या अग्रस्थान बद्दल नवल वाटून घ्यायची गरज नसावी.

तकलादू राष्ट्रीय अस्मिता, बहु वा अल्प संख्यांवरील कथित अन्याय, आभासी जनकल्याण इत्यांदीच्या नावे असा अपप्रचार छुपे अजेंडे असणाऱ्या स्वार्थी लोकांकडून केला जातो आणि डोळ्यांवर झापडं बांधलेली जनता, डोक्याला जास्त ताप न देता त्याचा अगदी हिरीरीने प्रसार करते.

जनमानसावर या गोष्टींचा किती दाहक प्रभाव पडू शकतो ह्याची आजपावेतोची भारतभरची अनेक उदाहरणे देता येतील. आणि म्हणूनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माहिती तंत्रज्ञान आणि एआयचा वापर राजकीय पक्ष किती सारासार विवेकबुद्धीने करतील ह्यावर आपल्या लोकशाहीचआरोग्य अवलंबून आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर अनेक चांगल्या वाईट कारणांसाठी सर्वच पक्ष गेली कित्येक वर्ष करतच आहेत. पण आभासी आणि धादांत खोट्या कन्टेन्ट द्वारे नागरिकांच्या मानसिकतेशी खेळून त्यांना स्वतःला पाहिजे तस वापरून घेण्याच सामर्थ्य आजघडीस डीपफेकद्वारे उपलब्ध आहे. ह्या मुळेच जनमानसावरील प्रभाव केंद्रस्थानी असलेल्या निवडणूक प्रक्रियेतहि एआय आणि डीपफेकचाही वापर होईलच हे गृहीत धरूनच चालावं लागेल.

आजघडीस माहिती तंत्रज्ञान हि सर्वच राजकीय पक्षांच्या म्यानातील दुधारी तलवार आहे. डीप लर्निंग, बीग डेटा एनालिटिक्स सारखं तंत्रज्ञान वापरून ९६.८ करोड मतदाराचा कल जाणून घेण्यासाठी, आपापली प्रचार आणि इतर रणनीती धारदार,लक्ष्य केंद्रित आणि प्रभावी करण्यासाठी सर्वच पक्षांची अहमिका लागेलच.

पण त्याच दुधारी तलवारीच्या दुसऱ्या बाजूचा म्हणजे डीपफेकचाही तेवढाच वापर अपेक्षित आहे. डीपफेकचा हा भस्मासुर निवडणुकीच्या जिंकू किंवा मरु वातावरणात दाहक रूप धारण करून आमच्या लोकशाहीच्या संकल्पनेलाच भस्म तर करून नाही ना टाकणार हे सगळ्यात मोठं भय आहे. ह्याच मुळे निवडणूक आयोग , राजकीय पक्ष आणि सर्वात महत्वाचे म्हणे मतदारान ह्या बाबतीत अत्यंत जागरूक राहण अपेक्षीत आहे.

भाजप हा पक्ष सुरवातीपासून माहिती तंत्रज्ञानाचा वापर मॅक्रो आणि मायक्रो पातळीवर करण्यात अग्रेसर आहे. मग ते आयटी सेल द्वारे सोशल मीडिया इंजिनीरिंग असू द्या किंवा एआय द्वारे अनेक भाषाशिकांपर्यंत एकाच बरोबर पोहचण्याचा प्रयोग असू द्या. २०१४ च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3D होलोग्रामचा वापरही भाजपने देशभरच्या प्रचार सभांमध्ये मोठ्या खुबीने केला होता.

पूर्वी प्लँचेट द्वारे मृतात्म्यांना पृथ्वीवर बोलावण्याचे प्रयोग केले जायचे, आजघडीस ते एआय द्वारे केले जात आहेत! आजपावेतो तामिळनाडूतील DMK पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना पक्षाचे २०१८ साली दिवंगत झालेले लोकप्रिय पक्षनेते करुणानिधी यांनी संबोधीत केलय. किंबहुना सारेच पक्ष हे नव्हत्याचे होते आणि होत्याचे नव्हतेहि करण्याचे तंत्र ह्या निवडणुकीत वापरणार आहेत हे नक्कि.

या अनुषंगाने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने देश विदेशातील एआय क्षेत्रा संबंधित कंपन्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्वे जरी केलीयत. पण हे तंत्रज्ञान वापरून गुन्हे करणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्यासाठी आमची कायदा, सुव्यवस्था आणि न्याय यंत्रणा अजून तयार व्हायची आहे हे सत्य आहे. ह्याचाही फायदा अनेकजण घेतील.

Loksabha Election
Goa Daily News Wrap: राजकारण, क्रीडा, गुन्हे आणि पर्यटन विश्वातील ठळक घडामोडींचा आढावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट म्हणतात, "नागरिकांनी हुशारीने निवड करण्याची तयारी केल्याशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी सगळ्यात महत्वाचे आहे ते शिक्षण."

रुझवेल्ट आज हयात असते तर त्यांनी या विधानाला एआयच्या विघटनकारी शक्ती विषयीच्या जागरुकतेच्या आवश्यकतेची हि जोड दिली असती हे नक्की.

आजघडीस माहिती तंत्रज्ञान ही सर्वच राजकीय पक्षांच्या म्यानातील दुधारी तलवार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com