Pernem: विकासाची स्‍वप्‍ने ठरताहेत मृगजळ; भूमिपुत्र ठरतोय उपरा!

पेडणे (Pernem) मतदारसंघ आजवर उपेक्षितच राहिला. विकासाची केवळ दिवास्वप्‍ने दाखवून आजवरच्‍या नेतेमंडळींनी दिशाभूल केली.
Pernem
PernemDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे : पेडणे मतदारसंघ आजवर उपेक्षितच राहिला. विकासाची केवळ दिवास्वप्‍ने दाखवून आजवरच्‍या नेतेमंडळींनी दिशाभूल केली. लोकांना अद्यापही मुलभूत सुविधाही धड मिळाल्‍या नाहीत. वीज, पाणी, रोजगार या प्रमुख समस्‍या असून आजवरच्‍या लोकप्रतिनिधींनी लोकांचा केवळ मतदानापुरता उपयोग करून घेतला. त्‍यांच्‍या प्रत्‍येक जाहीरनाम्‍यात मुलभूत सुविधांचे ठळक आश्‍‍वासन असते, तरीही निवडून आल्‍यावर दुर्लक्ष हे ठरून गेलेले आहे. त्‍यामुळे मतदारसंघातील जनता अद्यापही सुविधांपासून वंचित आहे. आता मोप विमानतळ, क्रीडानगरी, आयुष इस्‍पितळ, आयटी पार्क आदी नियोजित प्रकल्‍पांमुळे लोकांच्‍या आशा पल्लवीत झाल्‍या आहेत. आतातरी विकासाची संधी लाभेल, असे वाटते. मात्र, ते मृगजळ ठरू नये म्‍हणजे झाले. (Lack of electricity, water and health facilities in Pernem constituency in Goa)

जनता तहानलेलीच!

पाणीसमस्‍या ही पेडणे तालुक्‍याची प्रमुख समस्या आहे. चांदेल येथील जलप्रकल्प हा पंचवीस - तीस वर्षांपूर्वीचा आहे. त्यानंतर घर, बांधकामांची संख्या वाढली तशी नळ जोडण्यांची संख्याही वाढली. या जलपुरवठा प्रकल्पाची क्षमता १५ एमएलडी आहे व प्रत्यक्षात तालुक्याला पाण्याची गरज 25 एमएलडी एवढी आहे. ही गरज भागत नसल्याने दुरवरच्या गावांपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. परिणामी भर पावसाळ्यात सुद्धा नळाला पाणी नसते. उन्हाळ्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होते. मग, विविध गावांतून पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चे वगैरे येतात. त्यांच्या दबावामुळे कुठल्यातरी बाजूचे पाणी वळवून वेळ मारून नेली जाते. पण याचवेळी आणखी कुठेतरी पाण्याची समस्या निर्माण होते.

Pernem
Goa: ‘स्मार्टनेस’ हरवून बसलीय पणजी!

नवीन प्रकल्‍पाचे काम संथगतीने

चांदेल येथे आणखी एका जल प्रकल्पाची पायाभरणी एक वर्षापूर्वी झाली व हल्ली कुठेतरी त्याच्या बांधकामाला सुरवात झाली, तरीही हे बांधकाम रखडत सुरू आहे. पाणी ही तालुक्याची ज्वलंत समस्या असल्याने हे काम वेगात होण्यासाठी प्रयत्न हवेत. दुसरे म्हणजे तालुक्यात कित्येक विहिरी विनावापर आहेत. अशा विहिरींची दुरुस्ती केल्यास त्यातील बऱ्याच विहिरी उपयोगात आणणे शक्य आहे.

वीजपुरवठ्याला तांत्रिक दोषाचे ग्रहण

तालुक्यात विजेचा लपंडाव हा नित्‍याचेच झाले आहे. थिवी वीज केंद्रातून पेडणे तालुक्याला वीजपुरवठा होतो. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी थिवी येथून येणाऱ्या वीज पुरवठ्यातील तांत्रिक दोषावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. इतरत्र तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांना झाडेझुडपे लागतात, वीज वाहिन्यांवर, खांबावर झाडे पडून वीज खंडित होते. यावर उपाय म्हणून भूमिगत वाहिन्या घालायला हव्यात.

भूमिपुत्र ठरतोय उपरा!

वाढती बेरोजगारी ही या मतदारसंघातील आणखी एक समस्या आहे. मोप विमानतळ, आयुष इस्पितळ, आयटी पार्क असे मोठे प्रकल्प या मतदारसंघात येत आहेत. त्यासाठी लाखो चौरस मीटर जमीन संपादित केली आहे. या प्रकल्पात कोणता आणि किती रोजगार मिळणार, हा गहन प्रश्न आहे. विविध प्रकल्पांसाठी तसेच देशातील धनाढ्यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे स्वत:च्या भूमीत भूमिपुत्र उपरा ठरू शकतो. पेडणे तालुक्‍यात बहुतांश ठिकाणी कुळ, मुंडकारांचा प्रश्‍‍न प्रलंबित आहे.

Pernem
Goa: काणकोणात साधनसुविधांची वानवा

लोकप्रतिनिधीही लादलेले...

पेडणे मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मध्यंतरीच्या काळात ‘धारगळ’ या नवीन मतदारसंघाची स्थापना झाली होती. तेव्हा ही राखीवता धारगळ मतदारसंघात होती. पण, मतदारसंघ फेररचनेनंतर धारगळ मतदारसंघाचे अस्तित्व संपले व पेडणे मतदारसंघ हा पूर्वीप्रमाणे अनुसुचित जातीसाठी राखीव झाला. पेडणे किंवा धारगळ मतदारसंघातून अद्याप अनुसूचित जातीतील एकही स्थानिक नेता निवडून आलेला नाही. देऊ मांद्रेकर हे तीनवेळा निवडून आले, पण ते मांद्रे मतदारसंघातील. म.गो, काँग्रेस व भाजप हे येथील मुख्य राजकीय पक्ष. यापैकी भाजपने एकदा बाळकृष्ण धारगळकर, तर मगो पक्षाने मनोहर पेडणेकर या स्थानिक उमेदवारांचा अपवाद वगळता आतापर्यंत स्थानिक उमेदवाराला या पक्षांनी उमेदवारी दिलेली नाही. सुरवातीची परिस्थिती वगळता आता या मतदारसंघात चांगल्यापैकी शिक्षित, उच्च शिक्षित असे बरेच युवक आहेत. पण, सध्याच्या निवडणुकांचा विचार करता निवडणूक लढविणारी व्यक्ती ही आर्थिकदृष्ट्या बरीच सक्षम पाहिजे. असे ‘सक्षम’ उमेदवार या मतदारसंघात नाहीत. याचमुळे येथील स्थानिक नेत्यांना राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जात नाही.

  • एकूण मतदार - 32,824

  • पुरुष मतदार - 16, 437

  • महिला मतदार - 16,387

मतदारसंघात समाविष्ट पंचायती : कोरगाव, खाजने-अमेरे-पोरस्कडे, वारखंड- नागझर, तांबोसे- मोप-उगवे, तोरसे, विर्नोडा, धारगळ, कासारवर्णे, चांदेल-हसापूर, वझरी, हळर्ण, इब्रामपूर-हणखणे तसेच पेडणे नगरपालिका क्षेत्र

आमचा जाहीरनामा :

१. रोजगारपूरक प्रकल्प साकारावेत

२. मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा

३. वीज समस्येवर उपाययोजना हवी

४ . पेडणे शहराच्या सुधारणेसाठी आराखडा हवा

५. भूमिपुत्रांच्या हक्क रक्षणासाठी कायदा हवा

६. कुळ, मुंडकारांचा प्रश्‍‍न सोडवावा

....................

आत्मियता असलेले नेतृत्व हवे

मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ‘विकास आराखडा’ तयार करायला हवा. मोठमोठे प्रकल्प इथे साकारतात, पण या विकासाचे केंद्रबिंदू असलेले पेडणे शहर, अनेक साधनसुविधांपासून अलिप्त आहे. ना सरकारची खाती असलेली इमारत उपयुक्त आहे, ना नियोजनबद्ध बाजारपेठ. शहर वाटावे असे कोणतेच नियोजन नाही. पेडणेबद्दल आत्मियता असलेल्या नेतृत्वाची आज गरज आहे.

- राजमोहन शेटये, कोरगाव

नेत्यांकडे विकासाचा दृष्टिकोन हवा

लोकप्रतिनिधींकडे विकासाचा दृष्टिकोन असेल, तर मतदारसंघाचा चांगल्यापैकी विकास घडवून आणू शकतो. पेडण्यातील बहुतांश लोक हे वैयक्तिक फायद्याचा विचार करतात, त्यामुळे राजकारणी, निवडून आलेले आमदार, मंत्री लोकांना आपण सांगेन तसेच होईल, हे गृहित धरून चालतात. राजकीय पक्षांना देखील उमेदवारी देताना पेडणेत चांगला उमेदवार देणे भाग पाडायला हवे.

- डॉ. साईनाथ चणेकर, पेडणे

रोजगार संधी मिळाव्यात

आतापर्यंत जे उमेदवार निवडून आले, ते बहुतांश मतदारसंघाबाहेरील. त्यामुळे इथे विकासाच्याबाबतीत दुर्लक्ष झाले आहे. हल्लीच्या काळात काही प्रमाणात रस्ते, वीज, पाणी इत्यादी साधनसुविधा मिळाल्या. पण, नियोजनबद्ध विकास अपेक्षित आहे. रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला हव्यात. मोप विमानतळ प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना धड मोबदला नाही, जमीन गेलेल्यांना प्रमाणपत्र नाही, त्यांना नोकरी मिळेल की नाही याची ग्वाही नाही. राष्ट्रीय महामार्गाचे काम निष्कृष्ट आहे. त्यावर नियंत्रण हवे.

- भारत बागकर, धारगळ

मतदारसंघ आरक्षण फिरते असावे

पेडणे हा राखीव मतदारसंघ आहे. पण, सर्व राजकीय पक्ष स्थानिक उमेदवारांना डावलतात. अन्य समाजाच्या दृष्टीने अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या कमी आहे. निवडून येणारे जरी अनुसूचित समाजातले असले तरी ते दलित समाजातील लोकांकडे आस्थेने पाहत नाहीत. त्यामुळे अनेक वस्त्या विकासापासून वंचित आहेत. वास्तविक संपूर्ण राज्यात अनुसूचित जातीतील लोक आहेत. त्या मतदारसंघातही निवडणूक लढविण्याची संधी मिळायला हवी म्हणून आता हा राखीव मतदारसंघ राज्यभर फिरता ठेवावा.

- तुकाराम तांबोसकर (डॉ. आंबेडकर चळवळीतील समाज कार्यकर्ते )

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com