कॅनडास्थित शीख दहशतवाद्याचा 'खात्मा'; वाचा नेमके प्रकरण

अमेरिकेची सीआयए किंवा इस्राईलची मोसाद हेरगिरीसाठी आणि देशाच्या दुश्‍मनांचा खात्मा करण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. या दोन्ही संघटना हेरगिरीतील निपुण मानल्या जात असतानाच भारताच्या रॉ संघटनेने कॅनडामध्ये जाऊन देशाविरुद्ध हिंसक कारवाया आणि देशविघातक कृत्य करणाऱ्या शीख दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे प्रकरण गाजत आहे. त्यामुळे कॅनडा आणि भारताच्या परस्पर संबंधांनाही बाधा निर्माण झाली आहे. काय आहे, नेमके प्रकरण?
Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar
Khalistani Terrorist Hardeep Singh NijjarDainik Gomantak

कॅनडास्थित शीख दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचे पडसाद अजूनही उमटताहेत. १८ जूनला कॅनडा येथील वॅनकूवरचे उपनगर असलेल्या सुरैय येथे ४५ वर्षीय हरदीपसिंगची ५० गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ती भारताने घडवून आणली असा आरोप कॅनडाने केल्याने दोन्ही देशांच्या संबंधात वितुष्ट आले आहे.

या हत्येला पुष्टी देणारे अहवाल कॅनडाच्या मित्र राष्ट्रांनीही दिले आहेत आणि कॅनडाच्या गुप्तहेर यंत्रणेने तर स्वतःकडे हत्येचे बरेच धागेदोरे असल्याचाही आरोप केला आहे. दुसऱ्या बाजूला भारताविरुद्ध लोकशाहीच्या नावाखाली कॅनडामध्ये बरीच कटकारस्थाने खपवून घेतली जातात आणि बरेच भरभक्कम पुरावे देऊनही खलिस्तानवाद्यांना तेथे आश्रय दिला जातो, असा आरोप भारताने केला आहे.

हरदीपसिंगवर तर भारतात खलिस्तान विषयावर सार्वमत घेण्याचा प्रचार चालविल्याचा व एका हिंदू पुजाऱ्याची हत्या, तसेच इतरही बऱ्याच घातपाताच्या घटनांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप आहे.

विदेशी प्रसारमाध्यमांनीही अत्यंत सूत्रबद्धरित्या हरदीपसिंगची हत्या करण्यात आल्याचे वृत्त ब्रिटन आणि अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेचा हवाला देऊन दिले आहे. या प्रकरणात बरेच धागेदोरे आपल्या हाती लागल्याचा त्यांचा दावा आहे.

जगभरातील खलिस्तानवाद्यांनी हे भारतीय कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. शिख मुक्ती आघाडीचे एक संस्थापक मोहिंदरसिंग यांनी तर हरदीपसिंगच्या मोटारीला तिचा ठावठिकाणा सांगणारा बग (ट्रॅक करणारी) बसविली होती. त्यामुळे हल्लेखोर हेरांची हरदीपसिंगवर बारीक नजर होती आणि हरदीपचा काटा काढण्याचाच त्यांचा इरादा होता, असा आरोप केला आहे.

हल्लेखोरांनी हरदीपसिंगवर एकूण ५० गोळ्या झाडल्या, त्यापैकी ३५ त्याच्या शरीरात घुसल्या. हरदीपसिंगवर हल्ला कसा झाला याचे नेमके चित्रण सुरैय भागातील गुरुनानक शीख गुरुद्वाराच्या सुरक्षा कॅमेऱ्यात टिपले गेले आहे.

या ९० सेकंदाच्या चित्रफितीत हरदीपसिंग आपली राखाडी रंगाची पिकअप पार्किंगमधून बाहेर काढताना दिसतो. पुढच्या रांगेतून अचानक एक पांढऱ्या रंगाची सेडान गाडी बाहेर येऊन या पिकअपला समांतर चालू लागते. पिकअपचा वेग वाढताच सेडान गाडीही आपला वेग वाढवते, काही क्षणात दोन्ही मोटारी आजूबाजूला वेगाने पुढे सरकतात.

पार्किंगचा भाग ओलांडल्याबरोबर सेडान वेगाने पुढे येऊन पिकअपसमोर उभी ठाकते. वॉशिंग्टन पोस्टने व्हिडिओचा हवाला देऊन दिलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे, सेडानमधून दोन शीख पेहरावातील हल्लेखोर उतरतात आणि पिकअपच्या समोर येऊन उभे ठाकतात.

दोघांच्याही हातातील बंदुका पिकअप चालकावर रोखलेल्या असतात, दोघेही तुफान गोळीबार करतात. सेडान गाडी त्यानंतर तेथून वेगाने पुढे जाते, हे दोघे हल्लेखोरही गाडीमागून वेगाने पळतात.

वृत्तपत्राच्या बातमीमध्ये ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचाही हवाला देण्यात आलेला आहे. लोकांच्या मते हल्लेखोर शिख पेहरावात होते आणि त्यांनी आपल्या दाढीधारी चेहऱ्यावर बुरखा पांघरला होता.

नियमितपणे सुरैयच्या गुरुद्वारात प्रार्थनेसाठी येणारा हरदीपसिंग निज्जर त्यादिवशी विलक्षण घाईत होता. कारण त्या दिवशी फादर्स डे असल्याने घरी त्याची बायको व दोन पुत्र मेजवानीसाठी थांबले होते. या गुरुद्वारातून बाहेर पडतेवेळी हरदीपसिंगने आपल्या २१ वर्षीय मुलाला फोनही केला होता.

‘आईने आज जेवणासाठी पिझ्झा बनविला आहे आणि मी स्वतः शेवयांची खीर केली आहे’, असे मुलाने सांगितले. हरदीपसिंगला खीर आवडत असे. ‘जेवण तयार असेल तर मी ताबडतोब घरी पोहोचेन’, असे शेवटचे वाक्य हरदीपसिंग बोलला.

कारण गुरुद्वाराबाहेरच दोन किंवा तीन शस्रधारी हल्लेखोर त्याची वाटच पाहत होते...दहा मिनिटांतच हरदीपसिंगच्या घरचा फोन वाजू लागतो, तुम्ही गोष्ट ऐकली आहे का, त्यांचा एक कौटुंबिक मित्र मुलाला विचारतो.

गुरुद्वारामध्ये काहीतरी गडबड झाली आहे. तुझ्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या...अजूनही हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात कोणाला अटक झालेली नाही. परंतु कॅनडातील शीख समाज भारतानेच हे कृत्य केल्याच्या समजात आहे.

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar
Gomantak Editorial: शेतकऱ्यांचा वाटाड्या

हरदीपसिंगबद्दल भारतातील राष्ट्रवाद्यांना तशी सहानुभूती असण्याचे कारण नाही. त्याचे प्रत्येक कारनामे भारताविरुद्ध होते आणि अलीकडच्या काळात खलिस्तानवाद्यांमध्ये उलट्या खोपडीचा म्हणून त्याने आपली प्रतिमा निर्माण केली होती.

मुळात हा हरदीपसिंग १९९० मध्ये बनावट पासपोर्टच्या आधारे कॅनडात गेला आणि तेथे त्याने भारतात आपली सतावणूक होत असल्याचे सांगून आश्रय मागितला. बनावट विवाह रचल्यानंतर मे २००७ मध्ये त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले.

नोव्हेंबर २०१४ मध्ये त्याच्याविरोधात इंटरपोल सूचना जारी झाली. त्यात एका हिंदू पुजाऱ्याची हत्या, अनेक गुन्हेगारी कृत्ये व हिंसाचारात सहभाग असल्याच्या नोंदी आहेत. एवढे आरोप असूनही कॅनडा प्रशासनाने कानावर हात ठेवले, त्याला स्थानबद्ध करण्यात नकार दिला. केवळ विमानात प्रवेशबंदी ही एकच तरतूद त्याला लागू करण्यात आली होती.

अमेरिकेविरुद्ध एखादे कारस्थान करून असा दहशतवादी कॅनडात आरामात जीवन कंठू शकला असता का? दुसरे इस्राईलविरोधात कटकारस्थाने करून तो कॅनडात, आणखी कुठल्या युरोपीय देशात सुखेनैव जगू शकला असता काय?

पहिली गोष्ट म्हणजे कॅनडाला या दोन देशांविरुद्ध कारस्थाने करणाऱ्या कोणाही कथित दहशतवाद्याला आश्रय देणे शक्यच झाले नसते. कारण हे देश आपणाविरुद्ध कारस्थाने करणाऱ्यांना कधीच क्षमा करीत नाहीत.

मग भारताबद्दल असा काय समज कॅनडाने करून घेतला? भारत कुचकामी देश आहे आणि या देशाविरुद्ध कोणी काही करू शकतो. मुळात कॅनडा अनेक बाबतीत भारतावर अवलंबून आहे. भारतीय नागरिकांना कॅनडात विशेष सवलत मिळते, एवढेच नव्हे तर शिक्षणासाठी भारतातून कॅनडात जाणाऱ्यांची रिघ लागलेली असते. त्यादृष्टीने आर्थिक कारणांसाठीही कॅनडासाठी भारत हा एक महत्त्वपूर्ण देश आहे.

अंदाजे ३० लाख शीख समाज भारताबाहेर वास्तव्य करून आहे. कॅनडामध्ये त्यांची संख्या लक्षणीय आहे आणि तेथील संसदेमध्ये शिखांचे प्राबल्य मानले गेले आहे. कॅनडामध्ये लोकशाही बऱ्यापैकी चालते.

लोकशाहीनेच कॅनडतील शिखांना भारताविरुद्ध कारवाया करायला मोकळीक दिल्याचा दावा कॅनडा सरकार गेली अनेक वर्षे करते. त्यामुळे भारतात सार्वमत घेण्याची मागणी तेथे सर्रास होते, त्या प्रश्‍नावर निदर्शने होतात आणि तेथील संसदेमध्येही या प्रश्‍नावर आवाज उठविला जातो.

परंतु लोकशाही मार्गाने एखादा प्रश्‍न मांडणे आणि त्या प्रश्‍नावर निदर्शने करणे समजून येऊ शकते. परंतु भारतामध्ये हिंसक कारवाया करणे, कॅनडातील भारतीयांच्या जीवाला धोका निर्माण करणे, या बाबी लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसतात?

भारताने कॅनडाबरोबरच्या अनेक बैठकांमध्ये हा प्रश्‍न उपस्थित केला आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच युनोच्या व्यासपीठावरून कॅनडाला परखड शब्दांत सुनावले, याचे कारण कॅनडाच्या पंतप्रधानांनी जी-२० च्या बैठकीत भारतात येऊन केलेली आगळीक होय.

कॅनडाचे नागरिक असलेल्या हरदीपसिंगची हत्या भारतीय हेरांनी केल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींपुढे केला आणि आपल्याकडे तसे पुरावे असल्याचा दावा केला होता.

त्या प्रकरणाचा निषेध म्हणून भारताने कॅनडातील राजनैतिक अधिकाऱ्यांना परत पाठविले, एवढेच नव्हेतर आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना परत बोलावयाला आम्ही कमी करणार नाही, अशी भूमिका घेतली.

युरोपीय देशांबाबत अशी रोखठोक भूमिका घेण्याची ही तशी पहिलीच वेळ. शिवाय रॉने कॅनडाचे बोटचेपे धोरण आणि त्या सरकारची खलिस्तानवाद्यांपुढील शरणागती याचा सोक्षमोक्ष लावत कॅनडाच्या भूमीत जाऊन शीख दहशतवाद्याचा खातमा केला असेल तर तो प्रकार निश्‍चितच येथील ‘राष्ट्रप्रेमीं’ना भावला असणार.

कारण भारतामध्येही इस्राईलच्या गुप्तहेर संघटनेबद्दल आणि त्या संघटनेने चालविलेल्या उलथापालथीबद्दल आकर्षण असणारा बराच मोठा ‘उजवा’ वर्ग आहे. या गटाने अद्याप उच्चरवात भारताची विशेषतः आपल्या ‘दणकट’ पंतप्रधानांची वाखाणणी केली नसली तरी भारतात एव्हाना रॉचा जयजयकार सुरू झालेला आहे, यात शंका नाही.

दुसऱ्या देशातील विशेषतः शत्रू राष्ट्रांमध्ये हेरगिरी, उलथापालथी, राजकीय हत्या घडवून आणणाऱ्या घटनांमध्ये रस असलेला एक मोठा वर्ग आहे.

राजकीय दुश्‍मनांना त्यातल्या त्यात पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला अत्यंत तिखट धडा शिकवला पाहिजे आणि त्यासाठी भारताने कोणत्याही थराला जायला हरकत नाही, असे मानणारा हा वर्ग इस्राईलसारख्या उजव्या शक्तीचे नेहमी गुणगान गात असतो.

अमेरिकेच्या सीआयएच्या कारवायांवर खूप काही लिहिले गेले. इस्राईली गुप्तहेर संघटनाही ‘उजव्या’ मंडळींना भावत असते. इस्राईलच्या अंडरकव्हर हेर संघटनेचे चित्रण करणारी दूरचित्रवाणीवरील ‘फौदा’ मालिका बरीच गाजली होती.

रोमहर्षक हेरगिरी करणारे चित्रपट आवडणारी एक मोठी पिढी आहे. ‘फौदा’ या मालिकेचा प्रदर्शनीय खेळ गोव्यात गेल्यावर्षी इफ्फीमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हा त्याला सिनेरसिक आणि टीकाकारांनी मोठी गर्दी केली होती.

कारण फौदामधील अनेक कलाकार गोव्यात प्रत्यक्ष उपस्थित होते. या मालिकेत इस्राईल पॅलिस्टिनी लढाईचे वास्तव चित्रण आहे. पॅलिस्टिनी दहशतवाद्यांना शोधून त्यांच्याच भागात जाऊन त्यांचा निपटा करणारी ‘फौदा’- ज्याचा अर्थ ‘गोंधळ’ ही दहशतवादी कृत्ये दयामाया न दाखविता अतिरेक्यांचा छळ, त्यांच्या हत्या आणि सतावणूक, रक्तपात यासाठी गाजली आणि सततच्या उत्कंठेमुळे या मालिकेचा पुढचा भाग कदाचित यावर्षी प्रदर्शित होऊ शकतो म्हणून लोक डोळे लावून बसले आहेत.

फौदावर ती हिंसक मालिका असल्याची, तशीच इस्राईलचा वंशवाद जोपासते म्हणून खरपूस टीकाही झाली आहे. परंतु शत्रू राष्ट्रातील देशविरोधी घटक हा जगण्यास नालायक असतो.

त्याने हत्यार उगारण्यापूर्वीच आणि आपल्या देशाला धोका निर्माण करण्यापूर्वी कोणत्या बऱ्यावाईट मार्गाने का असेना, परंतु या शत्रूंचा संपूर्ण बिमोड झाला पाहिजे, या तत्त्वाने ही मालिका चालते आणि बहुतांश राष्ट्रवादी जनता या तत्त्वांच्या अधीन होत आपले राष्ट्र बलवान असले पाहिजे, इतर कोणाची डोळे वर करून आपल्याकडे पाहण्याची हिंमत होता कामा नये, अशीच विचारसरणी बाळगत आली आहे.

अलीकडच्या काळात भारतामध्ये ‘टायगर’, ‘पठाण’, ‘बेबी’, ‘राजी’सारखे चित्रपट निर्माण झाले, ज्यात भारतीय गुप्तहेर विदेशात जाऊन दुश्‍मनांचा खात्मा करतात, असे चित्रित केले आहे.

‘बेबी’मध्ये तर बेदरकार भारतीय हेर असलेला अक्षयकुमार आखातात आश्रय घेतलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अद्दल घडवितो आणि प्रसंगी तेथील कायद्यांचाही भंग करण्यात कचरत नाही, असे दाखविले आहे.

वास्तविक रॉसारखी संघटना याच कामासाठी बनविली असल्याचे सांगण्यात येते. परंतु तिचे काम प्रत्यक्ष कसे चालते याबाबत फारसे उजेडात येत नाही, परंतु कॅनडातील हत्येनंतर भारतीय गुप्तचर पाकिस्तानमध्येच नव्हे तर अनेक देशांत खलिस्तानवाद्यांच्या मागावर असल्याचे आरोप झाले आहेत व आता तर एफबीआयनेही तसे सूचित केले आहे.

भारताच्या कथित ‘राष्ट्रवादी’, ‘दणकट’ नेत्यांनी रॉनेच दुश्‍मनांचा खात्मा केल्याचे कधी छातीठोकपणे जाहीर केलेले नाही, जसे अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानात लपून बसलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनला मारून जाहीर केले होते.

अफगाणिस्तानध्येही ओसामाला संपविण्याचे अनेक प्रयत्न अमेरिकेने केले होते. परंतु त्यांना गुंगारा देत पाकिस्तानध्ये आश्रय घेतला, परंतु तेथे त्याचा पत्ता शोधून तेथील घरात घुसून त्याला मारण्यात आले.

त्यानंतर खोल समुद्रात ओसामाचे दफन करून त्याचे नामोनिशाणही मिटविण्यात आले. परंतु ओसामा संपविण्याची ही मोहीम अमेरिकेचे अध्यक्ष प्रत्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये बसून पाहत होते.

ओसामाची हत्या झाल्यानंतर त्यांनी आनंदाचे चीत्कार काढले हे जगाने पाहिले. अमेरिकेविरुद्ध असा जिहाद कोणी पुकारू शकतो, तर त्याचा वचपा काढण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा तो संदेश होता.

जर भारताविरुद्ध हिंसक कारवाया करणाऱ्या हरदीपसिंग निज्जरला रॉने संपविले असेल तर भारताचाही देशविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना तसाच संदेश जायला हवा, असे ‘राष्ट्रवाद्यां’ना वाटते. परंतु भारताने अजूनतरी आपला हात असल्याचे नाकारले आहे.

हरदीपसिंग निज्जर याच्या मागावर भारत २००७ पासून होता, यात तथ्य आहे. पंजाबमधील एका चित्रपटगृहात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा हात असल्याचे जाहीर झाले होते. या बॉम्बस्फोटात सहाजण मृत्युमुखी व ४० जण जखमी झाल्याची नोंद आहे.

तसेच भारतातील शीख नेते रुल्डासिंग याची २००९ मध्ये हत्या केल्याचा आरोप हरदीपसिंगवर आहे. भारताने २०१६मध्ये इंटरपोलकडे नोंदविलेल्या तक्रारीत भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्यामागचा तोच प्रमुख (मास्टरमाईंड) असल्याचे नोंदविले आहे.

ब्रिटिश कोलंबियामध्ये अतिरेकी प्रशिक्षण तळ चालवून तेथे भारताविरुद्ध हल्ल्यांची आखणी केली जाते, असाही आरोप त्याच्यावर होता. जुलै २०२२ मध्ये एनआयएने हरदीपसिंग विरोधात १२ लाखांचे इनाम जाहीर केले होते.

ब्रिटिश कोलंबिया तेथे स्थयिक झालेल्या हरदीपसिंगने खलिस्तानच्या चळवळीत आपला सहभाग असल्याचे कधी लपविले नव्हते. भारतात बंदी असलेल्या खलिस्तान टायगर फोर्सचा एक प्रमुख दहशतवादी म्होरक्या म्हणून भारताने त्याच्याविरोधात फुली मारलीच शिवाय अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले.

कॅनडातही अनेक परस्परविरोधी शीख गटांच्या रडारवर तो होता व त्याच्या जिवाला धोका असल्याचे कॅनडातील गुप्तहेर संघटनेनेही त्याला बजावले होते. कॅनडा सरकारच्या मते हरदीपसिंग कॅनडातील शिखांसाठी काम करीत व त्याची कृत्ये शांततापूर्ण होती.

सुरैय गुरुद्वारा मंदिराचाही तो अध्यक्ष होता व त्याच्या अंत्यसंस्काराला शेकडो लोक उपस्थित असल्याचा तेथील स्थानिक सरकारचा दावा आहे. सुरैयच्या एका माजी महापौराने तर हरदीपसिंगचा गौरव करताना खूप मोठी ऊर्जा असलेला माणूस म्हणून त्याचे वर्णन केले होते.

यावरून कॅनडातील शीख समाजाबद्दल तेथील प्रशासनामध्ये असलेला भीतीयुक्त आदर व्यक्त होतो. तेथील प्रशासनालाही भारताविरुद्ध चालू असलेल्या त्यांच्या कारवाया थांबवाव्यात असे कधीही वाटले नाही.

हरदीपसिंगच्या हत्येनंतर काही गोष्टी अधिक स्पष्ट झाल्या आणि दोन्ही देशांना दहशतवादी प्रश्‍नांवर एकत्रित बसून गांभीर्याने चर्चा करावी वाटली तर तो मोठाच विजय होय. यापूर्वी भारताच्या सर्व विनंत्या केराच्या टोपलीत फेकून देण्यात आल्या आहेत.

भारतासाठी खलिस्तान प्रश्‍न गंभीर आहे आणि त्या प्रश्‍नावर तडजोड नाही, ही भूमिका आता कॅनडाच्या पचनी पडली, तर भारताच्या कणखर उपायांचा तो विजय ठरेल.

कॅनडाचे पंतप्रधान जुस्तिन ट्रुडो यांनी हत्येसंदर्भात आमच्याकडे असलेल्या विश्‍वासार्ह आरोपांविषयी आम्ही भारताशी सल्लामसलत करू, असा प्रस्ताव दिला असला तरी भारताबरोबर ते आता विधायक चर्चा करण्यास तयार आहेत, असाही अर्थ त्यातून निघतो

परंतु कॅनडात लोकशाही आहे म्हणजेच त्या भूमीवरून भारताविरुद्ध कारस्थाने केली जाऊ शकतात, असा अर्थ नव्हे. कॅनडाने यापूर्वी खलिस्तानवाद्यांचा बिमोड केलेला नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय लोकशाही व्यवस्थेवर विश्‍वास ठेवायला कॅनडा तयार नाही.

त्यामुळेच गंभीर आरोप असतानाही अनेक खलिस्तानवाद्यांना भारताच्या हवाली केले नाही. वास्तविक दोन्ही देशांतील चर्चेमध्ये हाच महत्त्वाचा अडसर मानला जातो.

कॅनडासह अनेक युरोपीय देश अजूनही भारताकडे संकुचित नजरेने पाहतात. भारतातून कॅनडात तपासासाठी येऊ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडेही पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अस्वागतार्ह असाच आहे.

खलिस्तानवाद्यांनी सुरुवातीपासून कॅनडाला आपले केंद्र बनविले, शिवाय वैंकूवर, विनिपेग व टोरांटो येथे आपल्या कथित वकिलातीही स्थापन केल्या आहेत. १९८० मध्ये खलिस्तानच्या नावे भारतात रक्तपात सुरू झाला.

हिंसा हेच त्यांचे हत्यार बनले तरीही कॅनडा प्रशासनाने आपल्या भूमीत शीख अतिरेक्यांना अटकाव केला नाही. एअर इंडियाच्या जून १९८५ च्या कनिष्क बॉम्बस्फोटानंतरही दहशतवाद हे जागतिक संकट असल्याचे त्या देशाने ओळखले नव्हते.

या दहशतवादी कृत्यांना पाकिस्तानचा उघड पाठिंबा मिळत होता, तरीही कॅनडाने स्वस्थ बसणे पसंत केले. या प्रश्‍नावर भारताने आता कठोर भूमिका घेतली आहे आणि कॅनडाचे राजनैतिक अधिकारी परत पाठविण्यात आले आहेत.

कॅनडातील हत्येनंतर अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांमध्येही भीतीची लाट निर्माण झाली व ते लपून असल्याची चर्चा आहे.

हरदीपसिंगच्या हत्येचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटूनही कॅनडाने अद्याप त्यांच्याकडे असलेले नेमके पुरावे पुढे केलेले नाहीत. खलिस्तानवाद्यांचे आरोपच जर कॅनडा सरकार पुरावे समजत असेल, तर त्यातून काही निपजणार नाही.

परंतु त्यांचे पंचनेत्र असलेल्या अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व कॅनडाच्या संयुक्त गुप्तचर यंत्रणेने आता अधिक गांभीर्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाणे दोन्ही देशांच्या हिताचे आहे.

भारत कधीच आपण हरदीपसिंगची कॅनडात जाऊन हत्या केली असे सांगणार नाही. परंतु कॅनडात जाऊन तेथील दहशतवादाचा खात्मा करण्याची धमक मात्र आम्ही दाखवू शकतो हे जगापुढे आले असल्याने कॅनडाला आता स्वतंत्ररित्या खलिस्तानवाद्यांचा प्रश्‍न हाताळावा लागेल, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com