Kalasa Cannal: कळसा नाल्याचे समृद्ध खोरे

गोव्यातल्या म्हादई म्हणजेच मांडवी नदीच्या उपनद्या आहेत. त्यात कर्नाटक राज्यातल्या कणकुंबीत उगम पावणाऱ्या कळसा नाल्याचे महत्त्वपूर्ण स्थान होते.
Kalasa cannal
Kalasa cannal Dainik Gomantak
Published on
Updated on

Kalasa Cannal: गोव्यातल्या म्हादई म्हणजेच मांडवी नदीच्या उपनद्या आहेत. त्यात कर्नाटक राज्यातल्या कणकुंबी या खानापूर तालुक्यातल्या गावात उगम पावणाऱ्या कळसा नाल्याचे महत्त्वपूर्ण स्थान होते. कणकुंबी हा गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या सीमेवरती वसलेला निसर्गसंपन्न गाव होता. (Mhadai Water Dispute)

प्राचीन काळापासून कणकुंबी गावात असलेले माउली देवीचे मंदिर या परिसरातल्या भाविकांचे श्रद्धा केंद्र होते. दर बारा वर्षांनी इथे होणारी जत्रा तिन्ही राज्यांतल्या भाविकांना कणकुंबीत आकर्षित करत असते.

आज गावाचे नैसर्गिक आणि पर्यावरणीय वैभव विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर असून कधी काळी कणकीच्या बेटांबी आणि प्रचंड पर्जन्य वृष्टीसाठी ख्यात असलेला हा गाव कणकुंबी नावाने प्रसिद्धीस पावला होता.

ब्रिटिश अमदानीत आंतरराष्ट्रीय सीमेवरती वसलेल्या कणकुंबी गावाला सैनिकी आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व लाभले होते. कणकुंबीची सीमा पोर्तुगीज इंडिया म्हणजे गोवा राज्याशी भिडत असल्याने त्या काळातल्या दोन राष्ट्रांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कणकुंबीला लौकिक लाभाला होता.

सत्तरीतील नगरगाव पंचायत क्षेत्रातील लोक साटरे-‘आम्याचो गवळ’मार्गे पारवाडहून कणकुंबी येथे शुक्रवारी भरणाऱ्या साप्ताहिक बाजाराला घाटमार्गातून यायचे.

Kalasa cannal
Pakistan Economic Crisis: आट्यासाठी आटापिटा ! पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात

कणकुंबी गावातल्या ग्रामदेवी माऊलीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला ऐतिहासिक रामेश्वराचे मंदिर जुन्याकाळी घनदाट वृक्षवेलींनी समृद्ध अशा देवराईत वसले होते.

दरवर्षी मान्सूनात सरासरी 3,854 मिलिमीटर पर्जन्य वृष्टी होत असल्याने आणि बऱ्याचदा 6,000 मिलिमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद इथे होत असल्याने, कणकुंबी गावाला सुजसलाम आणि सुफलामतेचे वरदान लाभले होते.

प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या रामेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूच्या छपरावरचे पाणी कळसा नाल्याचा उगमस्रोतात, तर डाव्या बाजूच्या छपरावरचे पाणी मलप्रभा नदीच्या उगमात पडत असल्याने या परिसरालाच तीर्थक्षेत्राचे स्थान लाभले होते.

रामेश्वराच्या मंदिराकडे कृष्णा नदीची उपनदी असणारी मलप्रभा छोट्या तळ्यातून उगम पावल्यानंतर काही अंतर आल्यावर श्रीमाउली मंदिराच्या पवित्र तळ्यात तिचा प्रवेश निर्झराच्या माध्यमातून होतो अशी धारणा असल्याने भाविक येथे नतमस्तक होतात.

कणकुंबीहून वाहणारी ही नदी खानापुरातून उत्तर कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातल्या कुडल संगम येथे कृष्णेशी एकरूप होते आणि शेवटी कृष्णेचे पाणी बंगालच्या उपसागरात मिसळते.

कणकुंबीत उगम पावणाऱ्या कऴसा नाल्याचे पाणी सत्तरीत नानोडा नदी या नावाने प्रवेश करते आणि उस्ते या गावात तिचा दुसगीर येथे कृष्णापूरहून येणाऱ्या म्हादईच्या मुख्य प्रवाहाशी एकरूप होते. म्हादई उसगावनंतर मांडवी या नावाने परिचित होऊन शेवटी आग्वाद किल्ल्याच्या परिसरात अरबी सागरात एकात्म होऊन जाते.

Kalasa cannal
Goa Education: यांचे असे का होते, काही कळत नाही!

कणकुंबी येथील समृद्ध जंगलातल्या असंख्य छोट्या ओहळातले पाणी कळसात मिसळल्यावरती ‘आम्याचो हरल’ आणि हुळंद, पारवाडच्या जंगलातले स्रोत तिच्याशी एकरूप व्हायचे. त्यामुळे पावसाळी मौसमानंतर हिवाळ्यात या पाण्याचा उपयोग करून इथले कष्टकरी वायंगणी शेतीबरोबर भाजीपाल्याची लागवड करायचे.

कणकुंबी गावातले एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला पारवाड गावातले पाणी कवेत घेऊन हा कळसाचा नाला कांबार वेस येथे प्रवेश करतो. कांबार वेसच्या जंगलातून वाहत ही नदी जेव्हा गोव्याच्या सुर्ल गावाच्या दिशेने जाताना वळसा घेण्यास सिद्ध होते तेव्हा वायंगणी नदीतले सुर्ल, मान, चोर्ला, हुळंद इथले पाणी एकत्र आल्यानंतर काळ्या कातळावरून ते खाली कोसळताना बाराजणांचा वझराचे विलोभनीय दर्शन घडवते.

Kalasa cannal
Environment: वैचारिक परिवर्तनाची लाट

चोर्लातल्या चोरवेसच्या नाल्याचे त्याचप्रमाणे ‘फुगीचो झरो’ आणि ‘खडपादी न्हंय’ या जलस्रोतांतले पाणी पूर्वी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने बाराजणांचा वझर निसर्गातल्या दिव्यत्वाची प्रचिती देत होता. लाडकेचो वझर, जळवतीचो वझर अशा धबधब्यांचा आविष्कार घडवत ही नदी महाकाय शिलाखंडाच्या कुशीतून प्रवाहित होत जाते.

जळवतीचा वझर जेथे कोसळतो तेथे चुनखडीची नैसर्गिक गुंफा असून, इथे वास्तव्यास असणाऱ्या पट्टेरी वाघांसाठी ती आश्रयस्थान ठरली आहे. तत्पूर्वी लाडकेटच्या वझराच्या रूपात ही नदी जेव्हा खाली कोसळते ती खोल दरी जैविक संपदेच्या विभिन्न पैलूंचे आगर ठरलेली आहे.

आज लांब चोचीची जी गिधाडे विस्मृतीत गेलेली आहेत, त्यांच्यासाठी लाडकेच्या धबधब्याच्या शिलाखंडाच्या कपारी हा नैसर्गिक अधिवास ठरला होता. इथे बारा महिने निरंतर पाणी कोसळत असल्याने वृक्षवनस्पतींच्या नानाविध प्रजातींसाठी नदीचे खोरे जीवनाधार ठरलेले होते. नदीच्या डाव्या काठावरचे पारवाड गावातले राखीव जंगलक्षेत्र आज जंगली श्वापदांसाठी महत्त्वाचा आधार ठरलेले आहे.

गवे, सांबर, चितळ, भेकरे, पिसयसारख्या तृणाहारी प्राण्यांच्या वास्तव्यामुळे त्यांची शिकार करण्यात गुंतलेल्या पट्टेरी वाघ, बिबट्यासारख्या मांसभक्षी प्राण्यांचा संचार इथे असतो. नदीपात्रात नानाविध गोड्या पाण्यातल्या माशांची मुबलक पैदास होत असल्याने पाण मांजरांचे वास्तव्य पाहायला मिळते.

महाकाय बुंधा आणि आकाशाला गवसणी घालण्यास सिद्ध झालेल्या वृक्षांच्या आच्छादनात शेकरू, पारव मांजरासारखे प्राणी मुक्तपणे विहार करतात. सदाहरित जंगल आणि बारमाही पाणी खळाळत वाहत असल्याकारणाने इथे राजनाग म्हणजे अति जहरी गणल्या जाणाऱ्या भुजंगाचा संचार असतो.

आणि केवळ दुसऱ्या सापांची शिकार करून जगणाऱ्या या भुजंगाला टिपणारा सर्प गरुडही या जंगलाची शान आहे. नदी खोऱ्यात ज्या नैसर्गिक गुंफा आहेत तेथे अस्वले, साळिंदर वास्तव्यास असतात.

इथली सकाळ मलाबारी राखाडी धनेश, मोठा धनेश, मलाबारी बाशिंगधारी धनेश, कोकिळ, हरोळ, हळदयासारख्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने सुरेल होते तर निशाचर घुबडांच्या घनगंभीर आवाजाने भुताखेतावरचे भय वृद्धिंगत होत जाते.

कधीकाळी दिव्यत्वाच्या प्रचितीचा अनुभव देणारी पाच आम्याची देवराई इथल्या परिसरातल्या डोंगर उतारावर केल्या जाणाऱ्या कुमेरी शेतीतल्या धान्यांचे गोटे कष्टकऱ्यांच्या हाती आल्यावर पारंपरिक धर्मविधींना सामोरी जायची.

Kalasa cannal
Pilerne Fire: पिळर्ण येथील दुर्घटना; एकाएकी काळवंडलेल्या ढगांनी गोवा हादरले !

सुर्लहून कोदाळ गावात कळसा नाल्याचा प्रवेश ज्या परिसरात होतो तेथे चुनखडीचे महाकाय शिलाखंड आणि गुंफा असून, त्यात वटवाघळाच्या नाना प्रजातींचे वास्तव्य आहे. कधीकाळी पश्चिम घाटातला हा सारा परिसर सागराच्या पाण्याने वेढलेला होता,

त्याची साक्ष देणारे हे चुनखडीचे शिलाखंड मामा-भाच्याच्या नावाने कुठे अजरामर झाले, तर कुठे आपल्या आकाराने महाभारतातल्या पराक्रमी भीमाच्या हातातली काठी म्हणून ‘भिवगो गुणो’ या नावाने परिचित झालेले आहेत.

कर्नाटकातल्या पारवाड गावात उगम पावणारी देऊची नदी चिखलेतल्या वन क्षेत्रातले पाणी चुनखडीच्या गुंफेच्या स्थळी कळसाशी एकरूप होते. ती साटरे गावात. एकेकाळी इथल्या वृक्षवेली, पशुपक्षी, कृमीकिटक यांचे भरणपोषण करणारी ही नदी आज कर्नाटकाच्या प्रस्तावित धरण आणि वसंत बंधाऱ्यांच्या संकटांना सामोरी जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com