सुशीला सावंत मेंडीस
कविता किंवा लेखनासाठी आपल्यामध्ये असणारी सर्जनशील शक्ती ही खरे तर दैवी प्रेरणा असते. गोव्यातील जेझुइट्सचे मिशनरी कार्य केवळ ख्रिश्चन पंथाच्या आध्यात्मिक शिकवणीचा प्रसार करण्यापुरतेच मर्यादित नव्हते.
ती आध्यात्मिक शिकवण कलात्मक अभिव्यक्तीही बनली, जिला ‘जेझुइट मोडो गोआनो’ असे संबोधले जाते. प्रत्येक सुसंस्कृत समाजाला उपासना आणि संस्कृती यांचा समन्वय साधत विकास करणे आवश्यक आहे.
एकमेकांच्या श्रद्धा आणि प्रथांबद्दल सुसंवाद आणि आदर असणेही खूप गरजेचे. ’द जेझुइट्स, गोवा अँड द आर्ट्स’ हे पुस्तक नुकतेच पर्वरी येथील ‘झेवियर सेंटर ऑफ हिस्टोरिकल रिसर्च’ने प्रकाशित केले आहे. गोवा हे कला, साहित्य आणि विचारमंथनाचे केंद्र बनत आहे.
सात योगदानकर्ते त्यांच्या स्वत:च्या कार्यात आणि संशोधन क्षेत्रात दिग्गज आहेत. क्रिस्टीना ओस्वाल्ड, एक कला इतिहासकार.
जेसुइट कला आणि साहित्य युरोपियन आणि स्थानिक कलात्मक आणि स्थापत्य परंपरांच्या अद्वितीय मिश्रणामुळे मोडो गोआनोच्या व्याख्येत कसे मूलभूत होते यावर चर्चा करतात.
या मूर्ती, वेद्या, तंबू, कबुलीजबाब, अत्यंत सजवलेल्या दीपवृक्ष, रिलीक्वेरी बॉक्स, मॉन्स्ट्रेन्स, पवित्र चेस्ट, मंच हे शिल्प तयार करणारे गोमंतकीय होते. त्यामुळे, त्यांनी आपल्या स्वदेशी सर्जनशील शैलींचा समावेश या सर्व कलाकृतींमध्ये केला.
जेसुइट्सच्या सुरुवातीच्या मोहिमांमधून जे स्थानिक गोमंतकीयांशी पांथिक आणि सांस्कृतिक समन्वयन घडले, त्याचे प्रतिनिधित्व हे पुस्तक करते.
‘सोसायटी ऑफ जीझस’च्या गोवा प्रांताचे प्रांताधिकारी रिनाल्ड डिसोझा आणि ‘झेवियर सेंटर ऑफ हिस्टोरिकल रिसर्च’चे संचालक, अँथनी दा सिल्वा यांनी कष्टपूर्वक संपादित केले आहे. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
रोलँड कोएल्हो यांनी इग्नेशियन वर्षाची थीम (मे २०२१ ते जुलै २०२२) ’ख्रिस्तातील सर्व गोष्टी नव्याने पाहण्यासाठी’ या त्यांच्या अग्रलेखाला ‘नथिंग न्यू, एव्हरीथिंग न्यू’ असे शीर्षक दिले आहे.
१५२१मध्ये लोयोलाच्या सेंट इग्नेशियसच्या कॅनोनाइझेशनचा ५००वा वर्धापन दिन आणि मार्च १६२२मध्ये सेंट इग्नेशियस आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या कॅनोनाइझेशनच्या ४००व्या वर्धापन दिनाचा उत्सव यानिमित्त हे पुस्तक काढण्यात आले आहे.
एक माजी आदिवासी कार्यकर्ता असलेल्या डेव्हिड डी सूझा यांनी जेसुइट कलेचे सौंदर्य आणि आत्मा आपल्या कॅमेऱ्यात अत्यंत संवेदनशीलतेने टिपले आहे. डी सूझा जरी स्वत:ला ‘प्रोफेशनल अॅमेच्युअर’ म्हणत असले तरी ते एक अतिशय उच्च दर्जाचे, आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले फोटोग्राफर आहेत.
त्यांचे छायाचित्रण जुन्या आणि जीर्ण झालेल्या कलाकृतींमध्ये चैतन्य आणते. त्यांच्या क्लोज-अप्समध्ये त्यांची प्रत्येक लहानसहान तपशील टिपणारी नजर स्पष्ट दिसते. कलाकृतींच्या माहितीला फोटोंची मिळालेली अर्थपूर्ण जोड हे या मोनोग्राफचे वैशिष्ट्य आहे.
जगाचे तारणहार असलेल्या तान्ह्या येशूच्या मुखपृष्ठावरील प्रतिमेचे विस्तृत विवेचन नताशा दा कोस्ता फर्नांडिस यांनी केले आहे. पूर्णपणे युरोपियन (शिशु) आणि दुसरी इंडो-पोर्तुगीज (बेस), अशा दोन स्वतंत्र शैली या प्रतिमेत एकरूप झाल्या आहेत.
युरोपियन वैशिष्ट्यांमध्ये लहान मुलांची शारीरिक ठेवण, शरीराचा नाजूकपणा दिसावा म्हणून वापरलेली चांदीचा मुलामा असलेली रंगछटा यांचा समावेश आहे.
फर्नांडिस यांच्या निरीक्षणानुसार बेसमध्ये गोल गोल गुंडाळलेल्या आच्छादित तराजूसह सर्पाचे आणि पाण्यातील वनस्पतींच्या पानांचे स्वरूप, शेल डिझाइन आणि टोकदार लोझेंज यात केलेली सोनेरी धाग्यांची जारदोजी यावर गोव्याच्या सराफांचा प्रभाव जाणवतो.
प्रारंभीच्या काळात मिशनऱ्यांना कोकणी व मराठी भाषा येत नसल्यामुळे त्यांनी कलेचा उपयोग संवादाचे साधन म्हणून केल्याचे अँथनी दा सिल्वा, ’आर्ट, अ पाथ टू इंटिरिओरिटी’ या त्यांच्या चिंतनशील लेखात म्हणतात.
जेझुइट्सनी त्यांचे ख्रिश्चन सिद्धांत विचाराच्या आणि कलेच्या माध्यमातून व्यक्त केले. जेसुइट्सनी तयार केलेल्या नवख्रिश्चन समुदायांसाठी, कला हे समुदाय उभारणीचे एक शक्तिशाली साधन बनले, असेही मत सिल्वा मांडतात.
चर्च हे दोन भिन्न संस्कृतींना एकत्र आणणारा दुवा ठरल्याचे मत ‘द कल्चरल एन्काउंटर ऑफ द जेझुइट्स इन गोवा’ या लेखात रिनाल्ड डिसोझा यांनी मांडले आहे. गोव्यातील उच्चभ्रू लोकांनी ‘इबेरिअन गोअन कॅथलिक पंथीय’ अशी स्वत:ची नवी ओळख निर्माण केली. लेखक लिहितात की
गोमंतकीय जनमानस आणि कलाकौशल्य यांना ‘मोडो गोआना’ या आध्यात्मिक मंथनातून आकार मिळाला. गोमंतकीयसंवेदना आणि बांधकाम साहित्य यातून अनेक कलाविष्कार साकार झाले. हे पुस्तक म्हणजे पुढील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी १५४२ ते १५५२ दरम्यान आशियामध्ये घालवलेल्या कालावधीत लिहिलेल्या सुमारे १४० पत्रांचा अभ्यास डेलिओ मेंडोन्सा यांनी केला आहे.
त्यांच्या निबंधात लोयोलाच्या इग्नेशियसचा सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावरचा प्रभाव आणि सेंट झेवियर यांचा भारतातील कॅथलिक पंथावर तसेच जेसुइट्सवर प्रभाव, याचा अभ्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
दोघेही पॅरिस विद्यापीठात शिकत असताना एकाच खोलीत राहायचे; तेव्हा इग्नेशियसच्या अध्यात्मिक प्रभावाने सेंट झेवियरचे जीवन बदलले.
जुने गोवे चर्चच्या पलीकडे जाऊन नेवरा, पोर्ताइस, अझोशी, ताळगाव येथील वेद्यांचे वेगळेपण, ऐतिहासिकता आणि ओळख यांचा तौलनिक अभ्यास ’फॉरगॉटन अल्टरपीसिस इन गोवन चर्च’ या लेखात मोनिका एस्टेव्हस रेइश करतात.
संस्कृती, पंथ यांचे प्रतिबिंब कलेवर पडत असते. ख्रिश्चन कला ज्यांच्यामुळे घडली त्या कलाकारांची कलेबद्दल स्वतःची धारणा आहे. एखादी कलाकृती पाहताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे, असे मत रेइश व्यक्त करतात.
आपल्या इंडो-पोर्तुगीज वारशाच्या जतनासाठी कोणताही पूर्वग्रह न बाळगता, सर्वसमावेशक संवाद आणि सांस्कृतिक नम्रता आवश्यक आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या पुस्तकाच्या पानापानांत कला आणि बुद्धिमत्ता यांचे मिश्रण आहे. त्यामुळे, या पुस्तकात तारखा देताना झालेल्या टंकनातील त्रुटींकडे दुर्लक्ष केले तरी चालते.
कला आणि प्रतिमाशास्त्रावरील कोणतेही पुस्तक, पंथाचा चष्मा लावून न वाचल्यास भविष्यातील संशोधनासाठी नेहमीच स्वागतार्ह असते. प्रगतिशील विचार हे आजच्या काळातील, विशेषत: गोव्याचे वैशिष्ट्य असलेच पाहिजे.
झेवियर सेंटर ऑफ हिस्टोरिकल रिसर्च लवकरच ’टेम्पल आर्किटेक्चर ऑफ गोवा’ या विषयावर आपला पुढील उपक्रम सुरू करेल यात मला शंका नाही. काही पुस्तके अमूल्य असतात, त्यांपैकीच हे एक.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.