Film Industry: बॉलिवुड बहिष्काराचा ट्रेंड गंभीर; पडद्याआडचे खलनायक कोण ?

प्रेक्षकवर्गाला चित्रपटगृहाकडे कसे खेचून आणायचे, या चिंतेने हिंदी सिनेसृष्टीला ग्रासलेले दिसते.
Film Industry
Film IndustryDainik Gomantak
Published on
Updated on

Film Industry: सुष्टांचा दुष्टांवरला विजय हे हिंदी चित्रपटसृष्टीचे जन्मजात सूत्र राहिले आहे. खलनायकाचा खात्मा करणारा परमप्रतापी नायक कितीही ‘चाकलेटी चिमणा’ असला तरी भारतीय भाबडे मन त्याला स्वीकारते. अर्थात हे सारे घडते पडद्यावर…प्रेक्षकांसमोर!

पडद्यावर व्हिलन लोकांची हालत बेकार करणारे बॉलिवुड पडद्यामागे मात्र खऱ्याखुऱ्या खलनायकांपुढे नांगी टाकते, असाही इतिहास आहेच. भरपूर गल्ला जमवणारा हा ‘सिनेमा धंदा’ गुन्हेगारी अधोविश्वालाही ‘आपला’ वाटत राहिला.

त्या कचाट्यातही या सिनेमाधंद्याने अनेक वर्षे काढली. परंतु, ही सारी संकटे चंदेरी दुनिया एक तर सहन करत होती किंवा त्यातून मार्ग काढत होती. या दुनियेसमोर सध्या उभे राहिलेले आव्हान मात्र चांगलेच दुर्घट आहे.

हिंदी चित्रकर्त्यांसमोर आता कुणी परका खलनायक उभा नाही, प्रेक्षकच पाठ करुन उभा राहिला आहे! त्या प्रेक्षकवर्गाला चित्रपटगृहाकडे कसे खेचून आणायचे, या चिंतेने हिंदी सिनेसृष्टीला ग्रासलेले दिसते. म्हणूनच मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉलिवुडच्या तारांगणाने परवा- गुरुवारी अवघड साकडे घातले. -‘काहीही करा, पण बॉलिवुडच्या बहिष्काराची समाजमाध्यमांवरची भाषा बंद पाडण्यास मदत करा!’

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा दौरा शतप्रतिशत ‘व्यावसायिक’ होता. महानगरातील दिग्गज उद्योजकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी भरभक्कम गुंतवणुकांची आश्वासने पासोडीत बांधून नेली, असे दिसते. उत्तर प्रदेशात गेली दोनेक वर्षे चित्रनगरी उभी करण्याचे घाटत आहे. मुंबईतील चित्रनिर्मात्यांना तेथे येऊन निर्मिती करण्याचा आग्रह केला जात आहे. असे प्रयत्न करण्यात गैर नाही.

पण कोणतीही कला आणि त्यावर आधारित उद्योग बहरण्यासाठी गुंतवणूक आणि सवलतींइतकेच महत्त्वाचे असते ते समाजातील अनुकूल वातावरण. चित्रपटाकडे एक कला म्हणून पाहता येण्याची प्रगल्भता.

उत्तर प्रदेशचे काय किंवा अन्य सरकारे काय, ती या दिशेने प्रयत्न करणार का, हा खरा सवाल आहे. बॉलिवुड ही मुंबईची शान. ही मिरास उत्तर प्रदेशात जाणे, काहींना वेदनादायी वाटते. तसे वाटणे स्वाभाविकही आहे.

Film Industry
Taxi App Goa: टॅक्सी अ‍ॅप गरजेचेच, पण समस्यांचे काय?

उत्तर प्रदेशात चित्रनिर्मार्त्यांनी आवर्जून यावे, म्हणून आदित्यनाथ यांनी काही सवलती जाहीर केल्या. उदाहणार्थ, ओटीटी मंचासाठी वेबमालिका उत्तर प्रदेशात निर्मिली गेली तर पन्नास टक्के घसघशीत सवलत दिली जाईल. निर्मितीसाठीही अशाच काही सवलती देऊ केल्या आहेत. हे सारे अर्थातच आकर्षक आहे, आणि व्यावसायिक चित्रपटसृष्टी या सवलती पदरात पाडून घेण्यासाठी तिथे जाईलही.

पण त्यामुळे मुंबईची चंदेरी ओळख पुसली जाईल, ही भीती अनाठायी वाटते. योगी आदित्यनाथ यांनी काही सिनेनिर्माते, दिग्दर्शक, सितारे यांची भेट घेतली. त्यांची भेट घेणाऱ्यांमध्ये हिंदी चित्रसृष्टीतली दिग्गज म्हणता येतील, अशी नावे तुलनेने कमीच होती. तथापि, या बैठकीत अभिनेता सुनील शेट्टी याने व्यक्त केलेले विचार परखड आणि थेट होते.

हिंदी चित्रपटांना लागलेला बहिष्काराचा बट्टा थांबला पाहिजे. समाजमाध्यमांवरील विखारी प्रचारामुळे विविध कारणांसाठी चित्रपटांना बहिष्कारासारख्या ‘शिक्षे’ला तोंड द्यावे लागते, ते थांबवावे!’ असे त्याने आदित्यनाथ यांना सांगितले. खरं तर ‘सुनावले’ असे म्हणणे योग्य ठरेल. ‘पठान’ या चित्रपटातील गाण्यात दीपिका पडुकोणने परिधान केलेल्या एका किमान पोशाखाच्या रंगावरुन सध्या बहिष्काराची भाषा सुरु झाली आहे.

काही ठिकाणी शाहरुख खानच्या पोस्टरला जोड्याने मारण्याचे, जाळण्याचे कार्यक्रमही यथासांग पार पडले. मागे ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वेळीही अशीच दहशत माजवण्यात आली होती.

काही महिन्यांपूर्वी ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमधल्या सैफ अली खानच्या ‘रावण दर्शना’ने तथाकथित प्रेक्षकांचे पित्त खवळले होते. सर्वसाधारणपणे हे निषेधाचे कार्यक्रम यशस्वी ‘वाटाघाटीं’नंतर थंडावतात. पण सध्या सुरु असलेला बॉलिवुड बहिष्काराचा ट्रेंड गंभीर वाटतो. सिनेतारकेच्या पोशाखाचा रंग कोणता असावा किंवा नसावा?

चित्रपटाचे कथानक कुठल्या अंगाने जायला हवे? काय केले असता पौराणिक व्यक्तिरेखांचा अपमान होणार नाही? पटकथेत काय हवे? भाषा कशी हवी? हे सगळे प्रश्न सामान्य प्रेक्षकवर्गाने स्वत:च सोडवायला घेतले असावेत, असे चित्र आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, असे म्हणावे तर अन्य धर्मीयांच्या बाबतीत तशी हिंमत का दाखवत नाही, असा विपरीत युक्तिवाद केला जातो. या ‘व्हॉटअबाऊटरी’ला अंत नाही.

सुनील शेट्टी यांनी बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल काळजी व्यक्त करताना योगी आदित्यनाथांना ‘आपण हे थांबवू शकता’ असेही सुचवले, यात सारे काही आले! हिंदी चित्रपटांवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने प्रेक्षागृहे ओस पडत असल्याचे शेट्टी यांचे म्हणणे मात्र पटण्याजोगे नाही.

प्रेक्षकवर्ग सिनेमागृहांकडे वळण्यासाठी तशा आशयाचे चित्रपट बनायला हवेत, हे ‘पुष्पा’, ‘कांतारा’ या दाक्षिणात्य किंवा ‘अवतार २’ या हॉलिवुडी चित्रपटाने सिद्ध केले आहे. दोष द्यायचाच तर प्रेक्षकांना नव्हे, तर मोबाईल फोनमध्ये मनोरंजन उपलब्ध होणाऱ्या ओटीटी मंचांना द्यावा. पण त्यांना तर योगीजींनी लाल पायघड्या घालून बोलावले आहे. आता काय करायचे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com