महिला ‘जय श्रीराम’ म्हणतच राहतील!

अग्निप्रवेश, नंतर गरोदर असताना सीतेला वनात सोडले, ते तिचे स्थान दुय्यम होते म्हणून नव्हे, हे भारतीय स्त्रीला माहीत आहे. रामाने सीतेला अग्निप्रवेश करायला लावला, गरोदर असताना सोडून दिले याचे तिला दु:ख नाही; ते करत असताना ज्या वेदना रामाला झाल्या त्या आपल्या रामाला होत नाहीत, याचे आहे. हा फरक कळतो, अशी स्त्री ‘जय श्रीराम’च म्हणेल.
goa
goaDainik Gomantak

प्रसन्न शिवराम बर्वे

कुठल्याही संस्कृतीमधील आदर्श व्यक्ती समाजामध्ये जशास तशा स्वीकारल्या जातातच असे नाही. म्हणून त्यांचे महत्त्व कमी होत नाही.

भारतीय संस्कृतीमध्ये, ‘का जगावे?’ या प्रश्‍नाचे उत्तर रामाच्या आयुष्यात सापडते आणि ‘कसे जगावे?’ याचे उत्तर कृष्णाच्या आयुष्यात सापडते. राम ही माणसाने देवत्वापर्यंत पोहोचण्याची यात्रा आहे; तर कृष्ण हे देवत्वापासून माणसात येण्याची. असे असले तरीही राम व कृष्ण अनुसरणीय आहेत, अनुकरणीय नाहीत.

त्यांच्यासारखे वागणे हे अनुकरण आहे व त्यांच्या विचारांनी वागणे हे अनुसरण आहे. आपण आजच्या फूटपट्ट्या घेऊन ऐतिहासिक, पौराणिक व्यक्तींची मोजमापे काढतो. असे केल्याने आपण पुरोगामी अजिबात ठरत नाही; उलट मूर्ख ठरतो.

ज्या व्यक्ती ‘जय श्रीराम’ म्हणतात त्यांच्या राजकीय, सामाजिक पार्श्‍वभूमीला विरोध असणे एकवेळ समजू शकते; पण त्यावरून श्रीरामाचा जयजयकार महिलांसाठी कसा योग्य नाही व त्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणणे आता तरी सोडावे, असा सल्ला देणे हा अचरटपणा झाला.

मुद्द्यांची सरमिसळ, अंतर्विरोध, निष्कर्ष आधीच ठरवून मग त्याचे दाखले शोधणे व ते आपल्या गृहीतकात बसवणे, ही दत्ता नायकांच्या लेखाची वैशिष्ट्ये आहेत. रविवार ३१ मार्चचा लेखही याला अपवाद नाही.

शेवटच्या वाक्यातला निष्कर्ष ठेवून मांडणी करताना तारा भवाळकरांचा फक्त वापर केलाय. त्या आधीच्या परिच्छेदात जे तारा भवाळकर म्हणत आहेत, ते रामायणातल्या रामाबद्दल नाही. अन्यथा त्यांनी ‘भारतातील सीतांची’ असे शब्द वापरलेच नसते. रामायणात निष्करुण झालेल्या रामाला आदर्श प्रस्थापित करायचा होता.

सीतेला व रघुकुळाला सर्वांसमोर निष्कलंक प्रस्थापित करायचे होते. असा कोणताही आदर्श नसताना केवळ स्वत:चे वर्चस्व गाजवण्याकरता भारतातील राम आपल्या सीतेशी करुणेने वागत नसतील, तर केवळ समाजात असलेला कामी, कपटी रावण संपून चालणार नाही तर, त्यांच्या स्वत:मधील केवळ स्वत:ला वरचढ ठरवण्यासाठी सीतेशी निष्ठूर वागणारा लोकजीवनातील राम संपला पाहिजे, असे भवाळकर म्हणत आहेत.

रामायणातील रामाच्या आदर्शासाठी सीताही अग्नीत प्रवेश करायला तयार झाली व रामानेही तिला रोखले नाही. वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडातील एकशे अठराव्या सर्गातील तेरा ते वीस हे श्‍लोक वाचल्यास आपल्या लक्षांत ही गोष्ट येते. रामाला रावण व सीता यांच्याबद्दल पूर्ण माहिती होती. सीतेलाही रामाबद्दल विश्‍वास आहे.

राम जेव्हा तिला ‘भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, सुग्रीव किंवा विभीषणासोबत (आश्रित म्हणून) राहू शकतेस; तुला हवे ते करू शकतेस’, असे म्हणतो तेव्हा सीता उत्तर देताना, ‘महाराज ! लंकेत मला पाहण्यासाठी जेव्हा आपण महावीर हनुमानाला धाडले होते, त्याच वेळी माझा त्याग का केला नाहीत?’, असा प्रश्‍न विचारते.

जिच्यासाठी एवढे मोठे युद्ध केले, त्या आपल्या प्राणप्रियेला ‘दशदिशा मोकळ्या तुजसी नच माग अनुज्ञा मजसी, सखि सरलें तें दोघांमधलें नातें..’ म्हणताना काहीच वाटले नसेल? रामाची अवस्था काय झाली असेल, हे त्या लीन, चारु असलेल्या सीतेला माहीत नसेल का? निश्‍चितच माहीत आहे. भारतातील प्रत्येक रामाला व सीतेलाही हे माहीत आहे.

अगदी वाल्मिकी रामायणातील रामही अग्निप्रवेशाच्यावेळी मान खाली घालतो व सीतेला वनात सोडून ये म्हणून लक्ष्मणला सांगताना रडतो. एका मराठी चित्रपटात (नाव आठवत नाही) लक्ष्मण सीतेला वनात सोडतो तेव्हा ती विचारते, ‘ही माझ्या रामराजाची आज्ञा आहे की, राजा रामाची?’ हा प्रश्‍न खूप काही सांगून जातो.

महाकाव्यातील राम व लोकवाङ्मयातील राम यात फरक आहे. नात्यांचा आदर्श प्रस्थापित करणारा राम लोकजीवनात नाही, ही खंत आहे. लोकवाङ्मयातील रामायण स्थानिक लोकजीवनाशी सुसंगत होत जाते. अल्प रूपात उपलब्ध असलेले ‘कोकणी रामायण’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

आता त्यातील संदर्भ धरून जर कोणी, राम लहान असताना त्याचे माझोर्डा येथून अपहरण झाले होते, वसिष्ठाने त्याला कुल्लस्तली (कुठ्ठाळी?) येथून सोडवले; इंद्रजिताने स्वत:चे रूप पाहून मुग्रुभूमीतील (मुरगाव?) विहिरीत उडी घेतली असे म्हणत असेल तर काय समजावे? नेमाडेंनाही तीनशे रामायणे असणे या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कौतुकापेक्षाही ‘वाल्मिकीचे रामायणच खरे कशावरून?’, असे विचारावेसे वाटते.

खलिफाने उपलब्ध कुराणाच्या भूर्ज, दगड व चामड्यावरील प्रती नष्ट करून एकच एक प्रत ठेवण्यामागे बहुधा अशा भविष्यातील संभाव्य नेमाडे व नायक सारख्यांना आळा घालण्याचा हेतू असावा.

लोकमानसात ज्या पद्धतीने कथा, मते व्यक्त केली जातात, तसेच त्यांचे स्वरूप खरे धरून स्त्री-पुरुष समानतेवरून व स्त्रीवरील अत्याचाराविषयी रामाला बोल लावणे योग्य होणार नाही. पण, अशी सरमिसळ जाणूनबुजून केली जाते.

त्यासाठी ज्याच्यावर अन्याय झाला आहे (प्रत्यक्ष कथेत, काव्यात त्या व्यक्तीला तसे वाटत नसले तरी) असे वाटते, त्याच्या भूमिकेतून विषय मांडला जातो. मग ती रामायणातील सीता, उर्मिला, शंबुक असतील किंवा महाभारतातील कर्ण, एकलव्य असतील; यांना वंचित, दुय्यम ठरवून त्या दृष्टिकोनातून अन्याय झाल्याची मांडणी करायची.

त्यावरून संस्कृती ज्याला आदर्श मानते तो कसा आदर्श नाही, हे ठसवायचे. स्त्रीच्या, अन्यायग्रस्ताच्या दु:खाविषयी आस्था वगैरे काहीच नसते. अन्यथा हेच विचारवंत माल-ए-गनीमतविरुद्धही तितक्याच तीव्रतेने बोलले असते. अल्पवयात मुलीचे लग्न केल्यास मातीचा घडा फुटतो, अशा आशयाची जाहिरात लहान मुलींचे लग्न करू नका असे ठसवण्यासाठी खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून रोज दाखवली जात असे.

पाळी आलेल्या किंवा सोळा वर्षाखालील मुलीचा निकाह कायदेशीर आहे, याविषयी कुणीच बोलत नाही. इतकेच नव्हे तर पंथानुरूप घटस्फोटानंतर पोटगीची कायदेशीर असलेली विषम-विभागणीही अन्यायकारक वाटत नाही.

स्त्रीवरचा अन्याय संस्कृती पाहून ठरवला जातो, तेव्हा घटना, विचार सगळेच तपासावे लागते. येनकेनप्रकारेण आपल्या संस्कृतीला, आदर्श स्थानांना कसे व कुठल्या पद्धतीने हीन ठरवता येईल, याचीच मांडणी केली जाते.

त्यासाठी शोषित व शोषक अशी वर्गवारी केली जाते. प्रत्येक पूरक नात्याला एकमेकांविरुद्ध ठेवले जाते. प्रत्येक गोष्ट, नाते त्याच नजरेने व दृष्टिकोनातून पाहिले जाते. आजही आपल्याकडे ‘सीताराम’, ‘राधाकृष्ण’ म्हटले जाते; रामसीता किंवा कृष्णराधा असे नाही. त्यामुळे त्यानुरूप न वागणारा पुरुष निंदेचे कारण ठरतो; राम व कृष्ण नाही.

goa
Gorakhpur To Goa Train: गोरखपूर ते गोवा रेल्वे धावणार; तयारीला वेग, एप्रिलमध्ये महत्वाची बैठक

प्रत्येक नात्याबाबत आपल्या पुरुषाने रामासारखेच आदर्श असावे, असे भारतीय स्त्रीला वाटते. रामाने सीतेला अग्निप्रवेश करायला लावला, नंतर गरोदर असताना तिला वनात सोडून यायला सांगितले, ते तिचे स्थान दुय्यम होते यासाठी किंवा अन्याय करण्यासाठी नव्हे, हेही भारतीय स्त्रीला माहीत आहे.

त्यामुळे, भारतीय स्त्रीला रामाविषयी राग नाही. राम सीतेशी असे वागत असताना जे दु:ख, ज्या वेदना रामाला झाल्या त्या आपल्या रामाला आपल्याशी चुकीचे वागताना होत नाहीत, याचे दु:ख तिला आहे. दु:ख आपल्या रामाने आपणास न समजून घेण्याचे आहे आणि रागही आपल्याच रामाचा आहे; रामायणातील रामाचा नाही. हा फरक कळतो, अशी प्रत्येक स्त्री

‘जय श्रीराम’च म्हणेल!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com