Panjim Smart City: ऊन-पावसाच्या गोष्टी

पणजीत सध्या स्मार्ट सिटी, मलनिस्सारण, जी२० आणि रस्त्यांची डागडुजी अशी एकाबरोबरच चार कामे सुरू आहेत
Smart City
Smart City Dainik Gomantak
Published on
Updated on

राजू नायक

ऊष्णतेची लाट गोव्यात आली आहे काय? या प्रश्‍नाचे वस्तुनिष्ठ उत्तर कोणी हवामान खात्याचा किंवा आरोग्य खात्याचा अधिकारी देणार नाही. गोव्यात 36 अंश तापमान आहे. काही ठिकाणी त्याहूनही अधिक तापमानाची नोंद झालीय. त्यात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांना अस्वस्थ वाटते.

डॉक्टर सांगतात त्यानुसार, लोक आरोग्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. डोकेदुखी, अंगदुखी, ताप ही लक्षणे सर्वसाधारणपणे दिसतात. डॉक्टर ब्लड प्रेशर तपासण्याचा सल्ला देतात. ब्लड प्रेशर साधारण असेल तर चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगण्यात येते.

दुसऱ्या बाजूला कोविडचाही परिणाम आहेच. परंतु कोणी चाचणी करून घ्यायला जात नाही. मला स्वत:ला दोन महिन्यांपूर्वी तापाची लक्षणे दिसल्यावर मी तातडीने तपासणी करून घेतली होती.

परंतु रिपोर्ट नकारार्थी आल्यावर मी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. म्हणजे अंगदुखी किंवा थोडेसे अस्वस्थ वाटल्यावर पूर्वीसारखी चाचणी करून घेण्यासाठी धावाधाव केली नाही.

डॉक्टर सांगतात, कोविडची वेगवेगळी रूपे सध्या फिरताहेत. परंतु ती जीवघेणी नाहीत. त्यामुळे लोक फारशी फिकीर करीत नाहीत. न्यूमोनिया झाला तरच इस्पितळात धाव घेतली जाते.

नाहीतर लोक तपासणीही करीत नाहीत. कारण तीच औषधे घ्यायची असतात. त्यामुळे समाजात अनेकांना कोविड झालेलाही असू शकतो.

उष्णतेची लाट संपूर्ण आशिया खंडात आहे आणि भारतातही तिने थैमान घातले आहे. परंतु हवामान खात्याच्या मते, उत्तर भारतात आता दोन दिवसांपासून तापमानात घट झालेली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या काही भागांत जरूर गारपीट झाली; इतकी की काही ठिकाणी नद्याही भरून वाहायला लागल्या होत्या. उत्तर भारतात त्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

परंतु गोव्यात मात्र यावर्षी पावसाळापूर्व बरसातीने संपूर्णत: हुलकावणी दिली आहे. पणजी सोडून इतर ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. परंतु उष्णतेच्या तडाख्याने हैराण असले तरी पाऊस आला नाही याच वार्तेने पणजीकर खुश होऊन आनंद साजरा करताहेत.

पणजीतील खोदकाम बंद ठेवले जाईल व रस्ते ठाकठिक केले जातील, असे एकाबाजूला सांगतानाच दुसऱ्या बाजूला पुन्हा खोदकाम सुरू झाले आणि गेले दोन दिवस पुन्हा अवजड यंत्रणा रस्ते खणताना दिसू लागल्या.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीच्या आमदाराला बाजूला ठेवून मंगळवारी पणजीतील रस्त्यांची; विशेषत: मलनिस्सारण वाहिनीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि रस्त्याची कामे जूनपर्यंत सुरूच राहतील, असे जाहीर केले.

गोवा सरकारचे अजब तर्कशास्त्र आहे. इतकी वर्षे बाबूश यांच्या कामात कसलाही हस्तक्षेप न करण्याचे प्रमोद सावंत यांचे धोरण होते. त्यामुळे एका बाजूला बाबूश व दुसऱ्या बाजूला त्यांचे महापौर पुत्र रोहन यांना मुक्तद्वार दिल्याचा संदेश पणजीकरांना गेला होता.

मोन्सेरात कुटुंबाला पणजी आंदण दिली आहे, असे वातावरण त्यामुळे पणजीत पसरले आणि पर्रीकरांच्या भक्तांवर हा राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न असल्याचीही भावना पसरली.

वास्तविक पणजीतील सारस्वत समाजाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची सवय पूर्वीपासून आहे. येथे मूळ पणजीकर मूठभर. इतर आले ते एकतर सरकारी सेवक बनून किंवा व्यवसायानिमित्त. मडगावकरांसारखी आक्रंदन करण्याची किंवा चळवळी चालविण्याची परंपरा पणजीमध्ये नाही.

भाजपातील राजनीतीज्ञ सांगतात की, पणजीकर तसे मनोहर पर्रीकरांचेही मूळ समर्थक नव्हतेच. पर्रीकर मुख्यमंत्री बनल्यावर त्यातील अनेकजण स्वत:ची कामे करून घेण्यासाठी त्यांना निकट गेले होते. त्यानंतर पर्रीकरांच्या धडाडीवर खुश होऊन पणजीतील महिला वर्गाने त्यांना साथ दिली; इतकी की पर्रीकरांनी हाक दिल्यावर या महिला दुपारच्या भर उन्हात रस्त्यावर ठिय्या देत.

परंतु तो आता इतिहास झालाय. त्यानंतर बाबूश मोन्सेरात उगवता सूर्य बनले. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यातील अनेक मतदारांनी ‘पक्षनिष्ठे’चे कारण देत उत्पल पर्रीकरांकडेही पाठ केली होती. इतक्या लवकर ही कुटुंबे त्यांचे परममित्र भाई मनोहर पर्रीकरांना विसरली.

**

पणजीकरांना तुम्ही विचारा, आता आम्हाला होड्या आणून दारात ठेवाव्या लागणार असल्याचे ते प्रत्येकजण सांगतील.

मुख्यमंत्र्यांच्या कानावरही ही चर्चा आलीच असणार. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीत पणजीतील व्यथेबद्दल ज्येष्ठ सदस्यांनी त्यांना जबरदस्त सुनावले. ‘तुम्ही पणजी बाबूश मोन्सेरात कुटुंबाला आंदण दिलीय काय? कारण तुम्ही पणजीकरांची वास्तपुस्त करणे एकदमच सोडून दिले आहे.’

म्हणून मुख्यमंत्री गेल्या आठवड्यातच दोनवेळा पणजीतील रस्त्यांवर फिरले. दुसऱ्या वेळी तर त्यांनी बाबूश आणि पणजीच्या महापौरांना बोलावलेही नाही. त्यामुळे बाबूश खवळले. त्यांनी स्मार्ट सिटीच्या सल्लागारांवर राग काढला.

कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा थेट आरोप केला. मला आठवले, 30 वर्षांपूर्वी मडगावात मलनिस्सारणाचे काम सुरू होते. तेव्हा कोंब भागात ते दर्जाहीन झाल्याचा आरोप तत्कालीन आमदार बाबू नायक यांनी केला होता. त्यामुळे त्यावेळी सरकारने ते काम तत्काळ थांबविले होते.

पणजीत सध्या एकाबरोबरच चार कामे सुरू आहेत. स्मार्ट सिटी, मलनिस्सारण, जी२० आणि रस्त्यांची डागडुजी. मलनिस्सारणाचे काम व रस्ते ही दोन्ही जरी सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येत असली, तरी त्यांच्यात किती समन्वय आहे, हा प्रश्‍नच आहे. त्याचे प्रत्यंतर मंत्री नीलेश काब्राल यांच्या वक्तव्यातून आपल्याला मिळालेच आहे.

मलनिस्सारणाचे पाईप व खोदकाम यांच्यात अंतर असल्याने पावसाळ्यात रस्ता खचण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. हे काम अधिक भक्कमरित्या करायचे ठरविले असते तर खर्च दुपटीने वाढला असता. त्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे; परंतु या कामात त्याचा अवलंब केलेला नाही.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत ‘भिवपाची गरज ना’ मंत्र आळवत आहेत. मात्र, पक्षाच्या सूचनेबरहुकूम त्यांनी पणजीत फेरफटका मारला आणि स्वतंत्रपणे साबांखाच्या अभियंत्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे; परंतु अभियंतेही काय करणार? कारण रस्त्याचे काम करणारा एक व दुसरा मलनिस्सारणाचा विभाग स्वतंत्र आहे.

राज्य सरकारच्या अनेक खात्यांत समन्वय कुठे आहे? जून महिना येऊन ठेपल्यावर पावसाळ्याची चाहूल लागते आणि ते धावपळ करू लागतात. त्यामुळे पणजी पूर्वापार बुडत आलेली आहे. शिक्षण खात्यालाही जून महिना तोंडावर आल्यावर नवीन शैक्षणिक धोरण राबवायचे असल्याची आठवण झाली होती.

शिक्षणतज्ज्ञांनी आवाज उठवल्यावर शिक्षण सचिवपद प्रसाद लोलयेकरांना देण्यात आले. त्यानंतरच शिक्षण संचालक शैलेश झिंगडे व शिक्षक प्रशिक्षण विभागाला कुंभकर्णी झोपेतून उठवण्यात आले.

काहीजण म्हणतात, हा सरकारचा दोष नाही. तो अंगभूत ‘गोवेकरपणाचा’ आहे. दुसरे, पावसाळ्यात पणजी नेहमी बुडत होतीच की! त्यामुळे ती यावर्षी रस्ता खचून व गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन थोडी अधिक गटांगळ्या खाणार आहे! त्यात नवे काय?

थोडी रोगराईही पसरेल! पण कोविडचा संसर्ग घिरट्या घालतोच आहे; त्यात आणखी काहीजणांना प्राणाची आहुती द्यावी लागेल! पणजीत आता स्मार्ट सिटीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी संजीत रॉड्रिग्स यांना पाचारण केले आहे.

ती सूचनाही भाजपच्या सुकाणू समितीनेच केली. त्यामुळे बाबूशना विचारण्याच्या फंदात मुख्यमंत्री पडले नाहीत. तेही आणखी एक कारण झाले बाबूश खवळण्याचे! बाबूश खूपच कमी मताधिक्याने पणजीत जिंकले आहेत.

त्यांनी यावेळी चांगलीच फिल्डिंग लावली होती. परंतु त्यांना फारच कमी मते मिळाली. अशावेळी भाजपने त्यांच्या मागे भरभक्कमपणे राहण्याचे सोडून ज्यांना दोन मतेही पडू शकत नाहीत, अशा सुकाणू समितीचे ऐकायचे म्हणजे काय!

बाबूश यांचे संजीत रॉड्रिग्स यांच्याशी न पटण्याचे कारण, या अधिकाऱ्याला स्वतंत्ररीत्या काम करायचे असते. त्यांना मुक्तहस्त हवा असतो. पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना त्यांना ते स्वातंत्र्य मिळायचे. त्यामुळे संजीत पणजीत अधिक काम धडाकेबाज पद्धतीने करू शकले.

कचऱ्याचे विलगीकरण, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये छोटे प्रक्रिया प्रकल्प, पालिकेची कचरा योजना आदी ते स्वतंत्र बुद्धीने राबवू शकले. त्यामुळे पणजी हे कचरा प्रक्रियेसाठी देशातील पहिले शहर बनले व त्यासाठी पुरस्कारप्राप्तही ठरले.

परंतु संजीत रॉड्रिग्स यांचे इतरांशी पटत नाही, यातही तथ्य आहे.

**

Smart City
Goa College Admission: ऑनलाईन प्रवेशाची पहिली फेरी उद्यापासून सुरू

सार्वजनिक बांधकाम खात्यात प्रामाणिक अधिकारीही आहेत. त्यांना विचारल्यावर ते वास्तवपूर्ण गोष्टी सांगतात. ‘जायका’चे काम सुरू होते, तेव्हा मुख्य अभियंत्यांच्या देखरेखीखाली ते व्हायचे. ते काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा व मलनिस्सारणासंदर्भातील विभाग सार्वजनिक बांधकाम खात्यात सामावून घेणे आवश्‍यक होते.

खात्यांतर्गत विभाग तयार झाले; परंतु जबाबदारी कोणी घेतली नाही. ‘जायका’ केवळ लुईस बर्जरसाठी गाजले; ‘जेय आणि खा’ असे त्याचे नामकरण झाले व नेत्यांनी भरपूर माया जमवली. पणजीच्या नेत्यांनी पहिल्या टप्प्यात भरपूर मलिदा लाटला.

आता पंतप्रधान कार्यालयाची संपूर्ण देखरेख निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे मलिदा लाटता येत नाही; त्यामुळेही काहींची मुस्कटमार होत असल्याचा आरोप आहे. या काळात आलेल्या बऱ्याच सल्लागारांनी भरपूर बिदागी उपटली- यात तथ्य आहे!

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मांडवीचा नवीन पूल तयार झाल्यावर काही दिमाखदार रस्तेही तयार झाले. तेव्हा सेल्फी टाकून ‘पणजी आता आंतरराष्ट्रीय शहर बनले, दिमाखदार नगरी’ अशी शेखी काही पणजीकर भाजप नेते मिरवत होते, परंतु तेच - पणजीतील लोक सध्या हवालदिल झाले आहेत.

- अशावेळी मूग गिळून गप्प आहेत - त्यांच्या सांत्वनासाठीही फेसबुकवर मते व्यक्त करत नाहीत. पणजीचे काम जर मुख्यमंत्र्यांच्या निरीक्षणाखाली आता सुरू राहणार असेल, तर भाजपचे पणजीतील नेते व भाजप मंडळाच्या सदस्यांनी, नगरसेवकांनीही क्रियाशील व्हायला नको का? अजूनपर्यंत आम्हाला कोणीच विश्‍वासात घेतले नाही, असे नगरसेवक सांगतात.

पणजीचे महापौर व आमदार नेहमीच स्मार्ट सिटी योजनेचे संचालक होते. बाबूश मोन्सेरात आता कामाच्या दर्जाबद्दल अवाक्षर काढू शकत नाहीत, असे त्यांचे विरोधक सांगतात. परंतु पणजीतील हालहवाल विचारायला कोणीही उपलब्ध नाही;

केवळ उत्पल पर्रीकर आक्रंदन करताहेत. परंतु त्यालाही बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधातील धार आहे. मुळात विरोध, कामांमध्ये समन्वय का नाही, काम कुठे चुकले, दिरंगाई का होते, अगदी शेवटच्या क्षणी काम पुढे रेटण्याची घाई कशी झाली, यावर कोणाचेही अवाक्षर नाही!

Smart City
Goa Crime: झुआरीनगर गोळीबारातील संशयितांना पोलिस कोठडी

एक राजकीय निरीक्षक रागाने म्हणालाही, पणजीवर गेले सहा महिने आक्रीत ओढवलेय; पण लोकही शांत आहेत. घरात बसून राग व्यक्त करतात. मित्रांच्या पार्ट्यांमध्ये मल्लिनाथी केली जाते;

परंतु सामुदायिक राग - असंतोष व्यक्त करण्याचे धाडस नाही. माझ्या एका व्यावसायिक मित्राने फोन करून मला त्याच्या दुकानासमोर गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याची तक्रार केली; परंतु आमच्या वार्ताहराशी बोलण्याचे त्याने टाळले. सध्या पणजीत असे बोलण्याची सोय नाही, असे त्याचे कारण होते.

एक डॉक्टर म्हणाला, बोलून काय होणार? हा डॉक्टर अनेक विषयांवर वृत्तपत्रांसाठी लिहितो. अलीकडे त्याचे लेख थांबलेत. त्याला म्हणे, लोकांनीच (पणजीकरांनी) म्हटले, डॉक्टर, असे तिखट लिहून तुम्ही वाईटपणा का घेता? सुरेंद्र फुर्तादो म्हणाले, मी आधी विरोध करून ‘जोकर’ बनलो होतो, त्यामुळे गेली दोन वर्षे मी तोंड उघडलेले नाही.

पणजीकरांची ही ‘सहज’ मानसिकता सर्वत्र सारखीच पसरली आहे.

त्यामुळे पणजीत सात वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले, तेव्हाच रस्ते व इतर पायाभूत सेवा निर्माण करण्याचे काम हाती घेता आले असते. परंतु 1600 कोटींच्या कामांपैकी 80 टक्के कामे सुशोभीकरणाचीच सर्वप्रथम हाती घेण्यात आली.

रस्त्यांवर रंगीबेरंगी दिवे, कॅमेरा, वायफाय... आता बजेट संपविण्याची घाई झाली आहे, त्यामुळे उर्वरित 300 कोटीही संपविले जात आहेत. लोकांना कुठे पडलेय? एक निरीक्षक म्हणाले, ‘पणजीकर कोणी आवाज उठवत नाहीत... ते बुडण्यास पात्र आहेत!’

Smart City
C-20 Conference: देशाची वाटचाल महासत्तेच्या दिशेने- गोविंद गावडे

गॅलेलियो जेव्हा म्हणत होता, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तेव्हा चर्च धर्मसंस्था त्याच्यावर भडकली. पोपनी त्याला बोलावून इन्क्विझिशनची कारवाई सुरू केली व म्हटले, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, असे म्हण! तो म्हणाला, तुम्ही आणि मी म्हटले म्हणून काय पृथ्वी सूर्याभोवती फिरणे थांबवणार नाही! पृथ्वी आपली प्रदक्षिणा काढतच राहील...

त्याप्रमाणे, मुख्यमंत्र्यांनी देखरेख ठेवली, कामे जूनपर्यंतही सुरूच राहणार असल्याचे आदेश दिले व रस्ते खणायचे या आठवड्यात पुन्हा सुरू झाले... मलनिस्सारणाचे काम घाईघाईत रेटण्यात आले... तरीही पाऊस ठराविक वेळी येणारच आहे.

हा पाऊस व त्याचा वेग काही थांबवता येणार नाही... नेहमीप्रमाणे पाऊस कोसळणार, रस्त्यांवर पाणी तुंबणार, पुन्हा गटारे उघडी पडणार, मलनिस्सारणाचा फज्जा उडणार...

...आणि पणजी काही बुडायची थांबणार नाही!

यावेळीही गटांगळ्या खाऊन पणजीकरांच्या डोक्यावरून पाणी जाणार नाही, एवढीच अपेक्षा करणे आपल्या हातात आहे! तरीही पणजीतील कविमन म्हणेलच...

काय तो पाऊस, काय तो चिखल...

काय ते डोंगर- काय ते धबधबे-

पावसाच्या पाण्यात काय ती प्रेते...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.