हिंदुस्थानातील पोर्तुगीज (Portuguese) राज्याच्या सशस्त्र दलाचा कमांडर इन चीफ या नात्याने जनरल मान्युयल आंतोनियू व्हासालु ई सिल्व्हा यानी 19 डिसेंबर 1961 रोजी रात्री साडेआठ वाजता बिनशर्त शरणागती पत्करली. लेफ्टनंट जनरल के.पी कॅन्डेथ आणि भारतीय सैन्यदलाच्या अधिकान्यांच्या आणि सैनिकांच्या शौर्यामुळे पोर्तुगीजांच्या गुलामगिरीखाली खितपत पडलेल्या गोवा, दमण आणि दीव प्रदेशातल्या जनतेला स्वातंत्र्याची प्राप्ती झाली आणि हा प्रदेश भारतीय संघराज्यात समाविष्ट झाला. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या संदेशपत्रात म्हटले "विदेशी सत्ता दूर झाल्यामुळे आमच्या भूमीवरील वसाहतवादाचे हे शेवटचे चिन्ह नष्ट झाले... चौदा वर्षांच्या दीर्घ मुदतीत ज्यावेळी समस्त भारतीय स्वातंत्र्याची शुभफळे चाखत होते त्यावेळी आमचे गोमंतकीय बांधव एका विदेशी सत्तेच्या अधीन होते आणि त्यांच्या शासनव्यवस्थेखाली होणारे जुलूम, अपमान सहन करीत होते. या गोष्टीचे आम्हाला दुःख होत होते."
19 डिसेंबर हा दिवस गेल्या अर्धशतकापासून राज्याचा मुक्तिदिन (Goa Liberation Day) व भारतीय सार्वभौमत्व आणि अस्मितेचा मानदंड म्हणून तिरंगा ध्वडा फडकवून उत्साहाने साजरा केला जातो. 1510 साली पोर्तुगीजांनी जेव्हा तिसवाडीचा महाल जिंकून घेतला आणि त्यानंतर बार्देश आणि सासष्टीवरती आपली सत्ता प्रस्थापित केली, त्यावेळी इथल्या जुन्या काबिजादीत गुलामगिरीबरोबर पराकोटीच्या धर्मांधतेने गोमंतकीयांना संत्रस्त केले. जुन्या काबिजादीत साडेतीनशे तर नव्या काबिजादीत दिड-दोनशे वर्षांपर्यंत स्थानिकाना पोर्तुगीजांनी आरंभलेल्या अन्याय, अत्याचाराला सामोरे जावे लागले. सत्तरीतल्या कष्टकरी जनतेनं राणे सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली 25 पेक्षा जास्तवेळा बंडांची निशाणे उभारून, पोर्तुगीज साम्राज्याला आव्हान दिले. कुंकळ्ळीतल्या जनतेने स्वधर्म, भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी परमोच्च त्याग केला. 'भारत'कार गोविंद पुंडलीक हेगडे देसाई यांनी आपल्या लेखणीने पोर्तुगीज सरकारची नाराजी पत्करून स्वतःवर 50 खटले ओढवून घेतले आणि चार वेळा तुरुंगवासाची शिक्षा सोसली. त्यांच्या 'भारत'च्या पोर्तुगीज विभागात त्यावेळी राष्ट्रीय बाण्याचे मिनेझिस बागांझा, डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा, तेलु मास्कारेन्हस यांच्यासारखे झुंजार गोमंतकीय लिखाण करत होते. तेलु मास्कारेन्हस यांच्या 'देवतांचा मृत्यु' या पोर्तुगीज व मराठी विभागात प्रसिद्ध झालेल्या लेखाखातर पोर्तुगीज सरकारने खटला दाखल केला. पणजी येथील न्यायालयाने भारतकारांना सजा फर्माविली होती, पण त्यांनी न डगमगता आपला लढा कायम ठेवला.
पोर्तुगीजांच्या जोखडातून गोव्याला विमुक्त करण्यासाठी स्वाभिमानी गोमंतकीयांनी धर्म, भाषा, जात यांची बंधने झुगारून लढा उभारला. राष्ट्रीय गोवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली डॉ. त्रिस्ताव बागांझा कुन्हा, पीटर अल्वारिससारखी मंडळी गोमंत भूमीवरच्या असीम प्रेमापायी एकत्र आली. महात्मा गांधीजीच्या सत्याग्रह चळवळीचा अंगीकार करून असंख्य निर्भिड पोर्तुगीजांच्या झोटींगशाहीविरुद्ध उभे ठाकले. डॉ. पुंडलिक गायतोंडे, गोपाळ आपा कामत, अॅड. पांडुरंग मुळगावकर यांच्यासारखे उच्च विद्याविभूषित चळवळीत सहभागी झाले. अस्नोड्यातल्या पार नदीच्या उजव्या तीरावरच्या मयतेतला बाळा राया मापारी गोवा मुक्तिसंग्रामासाठी पहिला हुतात्मा झाला. त्यानंतर बाळकृष्ण भोसले, कामिल परेरा, सोमा मळिक, बापू गवससारख्या तरुणांनी तारुण्यात गोव्यासाठी मृत्यूचा आनंदाने स्वीकार केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु गोव्यातली जनता पारतंत्र्याच्या अंधारात त्रस्त आहे यासाठी भारतभरातून स्वाभिमानी तरुणाई पुढे सरसावली. बाबूराव केशव थोरात, नित्यानंद सहा, पन्नालाल यादव यासारख्या भारतभरातून आलेल्या स्वातंत्र्यवीरांनी गोवा मुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले.
डॉ. राम मनोहर लोहियानी 1जून 1946 रोता क्रांतीचे मशाल पेटवली आणि निद्रिस्त गोमंतकीयांना अंतिम लढ्यासाठी प्रेरित केले. बॅरिस्टर तेलु मास्कारेन्यश यांना लिस्बनच्या सैनिकी न्यायालयाने त्यांनी वयाची साठी गाठलेली असताना शिक्षा ठोठावून १९७० पर्यंत काशियशच्या तुरुंगात डांबले. तुरुंगात जाण्यापूर्वी स्वतःचा बचाव करण्यासाठी न्यायालयात त्यांनी ठणकावून सांगितले: ''गोवा नि:संशय भौगोलिक, ऐतिहासिक, वांशिक व सांस्कृतिक दृष्टीने भारताचा भाग आहे. सालाझारने एकाहून अधिकवेळा आपल्या भाषणातून ते मान्य केले आहे. याचमुळे आम्ही गोमंतकीय भारतभूमीला पूज्य मानतो. तिला भारतमाता म्हणतो आणि आम्ही जयहिंद म्हणून तिला सलाम करतो. जयहिंद याचा अर्थ भारताला व त्यांच्या शांतता, बंधुत्वाच्या कार्याला यश लाभो, असा आहे. तेलु माश्कारेन्यशसारख्या स्वातंत्र्यसेनानींनी गोव्याला भारतभूमीचा अविभाज्य घटक मानलेला आहे. परंतु विमुक्त गोव्यात आजही गोवा हे स्वतंत्र राष्ट्र व्हावे, गोवा पोर्तुगीज साम्राज्याचा भाग आहे अशा मानसिकतेची व्यक्तिमत्त्वे आहेत. अपघाताने गोवा पोर्तुगालच्या वसाहती चा भाग बनला.
परंतु आज ही भाषिक, धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या इथल्या लोकमानसाची नाळ भारतीय माती आणि संस्कृतीशी जोडलेली आहे. पश्चिम किनारपट्टीवर वसलेला गोवा शेकडो वर्षांपासून नानाविध जाती, धर्माच्या, विविधांगी संस्कृतीच्या प्रवाहाना सामोरा गेला आणि त्यामुळे गोव्याला आगळावेगळा चेहरा लाभला. असे असले तरी इथल्या सर्वसामान्यांचे हृदय मात्र भारताशी कायम जोडलेले राहिले. गोवा मुक्तीच्या महापर्वदिनामुळे भारताशी असलेले नाते जुळले. शतकानंतर आलेल्या या पर्वदिनी गोवा भारताचा अविभाज्य घटक बनला. आज गोव्याचा मुक्तिदिन अभिमानाने साजरा करताना राष्ट्रीय बाणा, भारतीय संस्कृतीशी अनुबंध घट्ट करण्याची नितांत आवश्यकता आहे. गोवा मुक्तिदिनाची स्मृती आमच्यासाठी नित्य मंगलमय आणि स्फूर्तिदायी व्हावी याखातर मुक्ती संग्रामात झुंजारपणे मरणाची अजिबात तमा न बाळगता सहभागी झालेल्या असंख्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण चिरंतन ठेवण्यासाठी प्रत्यक्ष झाले पाहिजेत.
-राजेंद्र पां. केरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.