लेखिका- गीतांजली तिडके
कशाला हवेत स्पायडर मॅन किंवा आयर्न मॅन? आजकाल जर तुम्ही 4 ते 8 वयोगटातील मुले पाहिलीत तर ती इंग्रजी चित्रपटातील काल्पनिक स्पायडर मॅन, आयर्न मॅन वगैरे व्यक्तिरेखांबाबत (सुपरहिरो) सतत बोलत असतात.
त्यांचीच खेळणी त्यांना हवी असतात. सतत मोबाईलवर (Mobile) अशा सुपरहीरोंनाच पाहात असतात. तुम्हीही अशी लहान मुलं पाहिली असतील? त्यामुळे आपल्या जवळच्या आपल्या भारतीय सुपरहीरोकडे त्यांना वळवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागेल.
रामायणाचा अविभाज्य भाग - हनुमान...मारुती!! ज्याच्या गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. आजही जेव्हा भीती वाटते तेव्हा पटकन मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो, हो ना? का? तर लगेच एक मोठ्ठा आधार आपल्या सोबत आहे असे वाटते. अशा शक्ती देवतेची वीराची नव्या पिढीला आपण ओळख करून दिली पाहिजे.
उद्या (6 एप्रिल) हनुमान जयंती देशासह जगभरात साजरी केली जाणार आहे. हनुमानाच्या शक्ती, बुद्धी आणि चातुर्याची काय महती सांगावी? बालपणी सूर्याला गिळायला निघालेला हनुमान, रावणाची लंका भस्मसात करणारा हनुमान. रामाची सेवा आणि भक्ती अत्यंत निष्ठेने करणारा हनुमान... किती त्याची रूपे.
असे म्हणतात कि जिथे रामाचे भजन सुरु असते तिथे हनुमान आजही येऊन बसतो. आहे कि नाही भक्तीची अनोखी मिसाल!!! पैलवान बनण्याची इच्छा बालगणाऱ्या तरुणांच्या व्यायामशाळेत मारुतीचा फोटो असतोच. बळाची देवता मारुतीची उपासना ते खूपच श्रद्धेने करतात.
हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर झाला. त्यांचे वडील म्हणजे वायुदेव आणि आई अंजना होय. हनुमानाला अष्टसिद्धी प्राप्त होत्या समर्थ रामदासांनी लिहिलेल्या मारुतिस्तोत्रात उल्लेख असल्याप्रमाणे तो त्याचे शरीर अणु एवढे लहान आणि ब्रह्माण्डा एवढे मोठे करू शकत असे. त्याच्या शक्तीची कोणाशीही तुलना होऊच शकत नाही. मेरू पर्वत एका हातात घेऊन त्याने उड्डाण केले.
मारुतीचे दर्शन घेतल्याने त्याची उपासना केल्याने सर्व समस्यांमधुन सुटका होते. सर्व रोग आणि आजार दूर होतात अशी जनमानसात आजही मान्यता आहे.
चला आपल्या नव्या पिढीला या शक्ती देवतेची महती सांगूया. त्यांना तुमच्यासोबत मारुतीच्या देवळात दर्शनाला घेऊन जा. घरी संध्याकाळी दिवा लावल्यावर मुलांसोबत बसून मारुती स्तोत्र म्हणा. कधी कधी त्यांना मारुतीच्या शौर्याच्या आणि बुद्धिचातुर्याच्या गोष्टी सांगा.
जय हनुमान !!!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.