Gujarat Lodge : गुजरात लॉज

Gujarat Lodge : गुजरात लॉजच्या रस्त्यावरून जाताना नाकाला इतक्या वेगवेगळ्या पदार्थांचा मिश्र सुगंध येत असतो की तिथून जाणाऱ्या व्यक्तीला काही खायचे नसेल तरी तो एक मिनिट थांबून पदार्थांचे नेत्रसुख घेतोच.
Gujarat
GujaratDainik Gomantak
Published on
Updated on

मनस्वीनी प्रभुणे - नायक

पणजीतील खाद्यपदार्थांशी संबंधित सुरुवातीच्या आठवणींमध्ये ‘गुजरात लॉज’ची आठवण येतेच. पणजीतला सुप्रसिद्ध अठरा जून रस्ता. या रस्त्याला मी पणजीचा ‘लक्ष्मी रोड’ म्हणायचे. पुण्यातला लक्ष्मी रोड आणि पणजीतला अठरा जून रोड यांची तशी तुलना होऊ शकत नाही.

पण आपले गाव सोडून नव्या गावात आल्यावर आपल्या गावाशी साम्य असतील अशा गोष्टी आपण शोधू लागतो. लक्ष्मी रोड आणि अठरा जून रोड यांच्यात ‘बाजारपेठेचा मुख्य रस्ता’ एवढेच या दोन्हीत साम्य. अठरा जून रस्त्यावर, त्याला लागून असलेल्या गल्लीत अनेक छोटे-मोठे कॅफे, रेस्टोरंट आहेत आणि या साऱ्यात एक नाव कायम लक्षात राहील असे आहे ते म्हणजे ‘गुजरात लॉज’.

सात्त्विक गुजराती थाळी

गुजरात लॉज हे पणजीत सात्त्विक गुजराती थाळी मिळणारे पाहिले रेस्टोरंट. मधल्या काळात यांनी थाळी बंद केली होती. पण गेल्या काही वर्षांपासून परत थाळी मिळू लागली आहे. अत्यंत कमी मसाले, तिखटपणा नाही, तेलाचा वापर कमी हे यांच्या पदार्थांचं वैशिष्ट्य. भात- डाळ, भाजी, पातळ भाजी, गरम गरम फुलके, सलाड, पापड आणि ताक एवढे पदार्थ या थाळीत मिळतात.

याशिवाय खिचडी - ताक, ठेपला -भाजी, फुलके -भाजी असेदेखील आपण ऑर्डर करू शकतो. वीस - बावीस वर्षांपूर्वी पणजीत शाकाहारी थाळी मिळणारी फारच कमी रेस्टोरंटस होते. त्यात सात्त्विक पदार्थ मिळतात म्हणून गुजरात लॉजमध्ये जाणे व्हायचे. अठरा जून रस्त्याच्या आसपास अनेक शासकीय कार्यालये आहेत.

या कार्यालयातले कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी गुजरातमध्ये यायचे. विशेष करून सोमवार - गुरुवार आणि शनिवारी ‘शिवराक’ असणारे इथे जेवताना दिसायचे. पोटभर जेवून मग ग्लासभर ताक पिणे हे ठरलेले असायचे. पण मी बरेचदा इथली खिचडी कढी खाल्ली आहे.

गुजरात लॉजची खिचडी मूगडाळ आणि तांदूळ वापरून केलेली असल्यामुळे घरी करतात तशी चव म्हणून प्रिय. बाकीच्या रेस्टोरंटमध्ये तूरडाळ घालून केलेली खिचडी असायची. गुजरात लॉजचे जेवण घरगुती पद्धतीचे, साधेसुधे आणि म्हणूनच जेवणासाठी इथे वाट बघावी लागायची. मधली काही वर्षे यांची थाळी सेवा बंद होती. पण आता थाळी परत सुरू केली आहे. शाकाहारी जेवणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे.

मला आठवतेय साताऱ्यातल्या खाणावळींमध्ये जशी वाटलेली सुपारी मिळायची तशी इथल्या काउंटरवर मिळायची. जेवण झाल्यावर ते एक आकर्षण असायचे.

इथे मिळणाऱ्या सामोसा, कचोरी, ढोकळा, खमण, जिलेबी, पाणीपुरी, सॅन्डविच या पदार्थांसाठी गुजरात लॉज सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. गोव्यात आल्यावर पहिल्यांदा ‘ऑथेंटिक’ चवीचा सामोसा आणि कचोरी मी इथे खाल्ली. पंजाबी पद्धतीचा सामोसा आकाराने बऱ्यापैकी मोठा असतो. इथल्या बाकीच्या कॅफेमध्ये सामोसासोबत चटणी मिळत नाही. पुण्यात तर नुसते पंधरा वीस प्रकारचे वेगवेगळे सामोसावाले आहेत.

या प्रत्येकाकडे सामोसासोबत वेगवेगळ्या चवीची चटणी, तळलेली मिरची असे मिळत असते. सामोसा खायला येणाऱ्यांचे इथे लाड असतात. पण गोव्यात फक्त सामोसा काढून दिला जातो. तळलेली मिरची सोडाच चटणी मिळणे दुर्लभ. पण गुजरात लॉजमध्ये गोड - आणि तिखट अशी मिक्स केलेली चटणी दिली जाते.

इथली कचोरीदेखील चांगली असते. पूर्वी कचोरी पणजीत फक्त गुजरात लॉजमध्येच मिळायची. आता अनेक स्वीट मार्टमध्ये कचोरी मिळू लागली आहे. पण गुजरात लॉजच्या कचोरी एकदम खात्रीलायक. आतमध्ये मूगडाळीचे सारण असलेली खुसखुशीत कचोरी आणि त्यात घातलेली गोड - तिखट चटणी यामुळे चविष्ट लागते.

संध्याकाळच्या छोट्याशा भुकेच्या वेळी एक सामोसा किंवा एक कचोरी; पोट शांत होऊन जाते. पण इथे गेल्यावर एवढ्यावरच भागत नाही. गरम गरम कापे काढलेली दिसतात, तेलकट नको असेल तर सॅन्डविच तयार असतातच.

सोबत गरमगरम जिलेबी खावीशी वाटतेच. एवढे कमी असते की काय म्हणून मालक दुधीभोपळा हलवा, गाजर हलवा चवीसाठी आपल्या पुढे करतो. हलवा प्रकारातदेखील ही मंडळी सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात, कधी चॉकलेट घालून, कधी चिक्कू घालून, कधी ड्रायफ्रूट घालून हलवा करतात.

एकदा का तुम्ही त्याची चव घेतलीत की मग ते विकत घेतल्याशिवाय राहवत नाही. इथे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हांला भरपेट जेवायचेय तर थाळी आहे. नुसती चपाती भाजी खायचीय तर तीदेखील आहे. खूप काही खायचे नाही तर सामोसा - कचोरी - ढोकळा, पाणीपुरी, बर्गर असे असंख्य प्रकार आहेत.

Gujarat
Goa Tourist : दक्षिण गोव्यात पर्यटक घटलेच ; व्यावसायिक चिंतेत

गुजरात लॉजच्या रस्त्यावरून जाताना नाकाला इतक्या वेगवेगळ्या पदार्थांचा मिश्र सुगंध येत असतो की तिथून जाणाऱ्या व्यक्तीला काही खायचे नसेल तरी तो एक मिनिट थांबून पदार्थांचे नेत्रसुख घेतोच.

या सदरातून नवनवीन रेस्टोरंट, कॅफे यांची ओळख करून देण्याचा आमचा उद्देश असतो. मला आवडलेली चव, आवडलेले पदार्थ तुम्हांला आवडतीलच असे नाही. प्रत्येकाची आवडनिवड, चव वेगळी असते. हे लिखाण म्हणजे त्या त्या रेस्टोरंटचे मूल्यमापन नाही.

ते मूल्यमापन तुम्ही करायचे. मी फक्त तुम्हांला वेगवेगळ्या रेस्टोरंट आणि तिथे मिळणाऱ्या पदार्थांची ओळख करून देण्याचे काम करतेय. कधी बाहेर जेवायची, नाष्टा करायची वेळ आलीच तर आपल्यासमोर असंख्य पर्याय असावेत यासाठी हे लिखाण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com