पर्यटकांनी (Goa Tourist) सामूहिकरित्या गुंडगिरी करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातले अवघेच पोलिसांपर्यंत जातात. गोव्यात कसले पर्यटक येऊ लागले आहेत, असा सवाल करण्यात काही अर्थ राहिलेला नाही. ज्या पर्यटनाला विकसित होताना गोमंतकीय नेहमीप्रमाणेच हात पांघरून ‘सुशेगाद’ राहिले, त्याने जशी व्यसनाधीनता येथे आणली, तशीच गुन्हेगारीही. मध्यंतरी एका हिंदी चित्रपटात गोवा म्हणजे नैतिकता हरवलेल्यांचे राज्य, अशा आशयाचा उल्लेख आल्यामुळे राज्यात सात्त्विक संतापाची लाट वगैरे उसळली होती. पण देशाच्या बहुसंख्य भागांत गोव्याची हीच प्रतिमा विकसित करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानक वा बसस्थानकावर उतरलेला देशी पर्यटक जेव्हा, नग्न परदेशी युवती असतात तो समुद्रकिनारा कोणता, असा प्रश्न टॅक्सीचालकांना करतो, तेव्हा देशभरात गोव्याची पुरती बदनामी झाली असल्याचा पुरावा मिळतो. येथे काहीही चालते, प्रशासन त्याकडे कानाडोळा करते आणि राज्यकर्ते त्याला आशीर्वाद देतात, असे चित्र जर भरल्या खिशाने येथे येणाऱ्या देशी पर्यटकाच्या मनात असेल तर तोही वाकडे पाऊल टाकील. त्याला आपल्या पैशाने मोरजीचा किनारा आणि कळंगुटचे हॉटेलच काय, सगळा गोवाच विकत घेता येतो, असे वाटू लागले तर दोष केवळ त्याचाच का? गोवा सरकारला कसेही पटवता येते, हे त्याला इथे फुटलेले कॅसिनोंचे पेव सांगते; दरवर्षी ज्यात अमली पदार्थ सेवनाने युवक-युवती दगावतात, त्या ईडीएमना नियमितपणे मिळणारी निर्लज्ज परवानगी सांगते. पर्यटनाच्या आडून येथे विस्तारलेले गैरव्यवहार दुर्लक्षित करण्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. पण प्रशासनाला त्याचे काहीच सोयरसुतक नाही.
पर्यटनाकडे डोळे वटारून पाहायची राज्य सरकारची शामत नाही. याचे कारण हा व्यवसाय कधीच गोमंतकीयांच्या हातून निसटला आहे. तो दिल्लीपर्यंत वट असलेल्या थैलीशहांच्या हातात गेला आहे. किनारपट्टीतले मालमत्ताविषयक व्यवहार याची साक्ष देतील. गोमंतकीय आता आपली जागा परप्रांतीय उद्योजकांच्या हवाली करतात आणि मग त्याच्या आस्थापनात कारकुनाचे काम शोधतात. प्रचंड पैसा गुंतवणारे त्याचा परतावा जसा शोधतात तसेच सरकारी हस्तक्षेपाने आपले गिऱ्हाईक बिथरून जाऊ नये, याचीही काळजी घेतात. किनारपट्टी अमली पदार्थांच्या विळख्यात जाऊनही गोवा पोलिसांना केवळ चिमूटभराचा मुद्देमाल पदरी बाळगणारे फुटकळ विक्रेतेच का भेटतात? या व्यवसायाच्या मुळांपर्यंत जाण्यात त्यांना कोणती अडचण येते? काही दशके हॉटेल व्यवसायात असलेल्या गोमंतकीय व्यावसायिकास भाडोत्री गुंडांच्या साहाय्याने धमकावण्यापर्यंत काल-परवा येथे आलेल्या नवागतांची कशी मजल जाते? असे प्रश्न कोणतीच कृती करण्याचे सामर्थ्य नसलेल्या सामान्य माणसांनाच पडतात. ज्यांच्याकडे यावर उपाययोजना करण्याचे अधिकार असतात, त्या राज्यकर्त्यांना मात्र असले प्रश्न कधीच पडत नाहीत. पडले असते तर कळंगुटसारख्या गुन्हेगारीचा आलेख सतत वर असलेल्या पोलीस स्थानकाची धुरा एकाच अपयशी अधिकाऱ्याकडे राहिली नसती. अशा अधिकाऱ्यांना मिळणारा वरदहस्त न बोलता बरेच काही सांगून जातो. या पोलीस स्थानकावर नियुक्ती करून घेण्यासाठी किती लाखांची बोली लावली जाते, याच्या सुरस कथा पोलीस खात्यात नेहमीच सांगितल्या जातात. गुन्हेगारीची पाळेमुळे किती खोल गेलीयत, याचा अंदाज त्यातून येतो.
गेल्या चार दशकांत राज्याच्या पर्यटनाला लागलेल्या किडीचे श्रेय या काळात सत्तेत असलेल्या सगळ्याच राजकीय पक्षांकडे जाते. कुणी या किडीला पोसले तर कुणी या संगोपनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले, सगळेच या पापात भागीदार आहेत. गोव्याला कसले पर्यटन हवेय, याविषयीचा सम्यक विचार आजवरच्या एकाही मुख्यमंत्र्याने आणि पर्यटनमंत्र्याने केला नाही. उलट एकेकाळी पर्यटनमंत्री असलेले मिकी पाशेको यांनीही मोरजीतल्या माथेफिरू पर्यटकाप्रमाणे थेट किनाऱ्यावर आपले चारचाकी वाहन चालवण्याचा पराक्रम केला होता. सध्याचे पर्यटनमंत्री तर एका बाजूने कॅसिनो लॉबीला डोळा घालतात आणि प्रकरण शेकण्याची शक्यता दिसली की आपल्या मतदारांना जर कॅसिनो नको असेल तर आपल्यालाही नको असे तद्दन बाष्कळ आणि पोरकट विधान करतात. लोकांच्या वतीने योग्य तो निर्णय वेळीच घेण्यासाठी आपल्याला निवडून देण्यात आले आहे, याचेही त्यांना स्मरण नसते. असे का होते, हे न कळण्याइतका कुणी गोमंतकीय खुळा नसेल.
गोवा या कल्पनेलाच सुरूंग लावणारे पर्यटन आपल्याला मिळाले आहे आणि त्याला आपल्या बेजबाबदार व सुस्त राजकारण्यांचा स्वार्थच जबाबदार आहे. गेली अनेक वर्षे आपले सरकार पर्यटन धोरणाच्या नावाने पिंगा घालते आहे. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात अंतर्भागातले पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन, कौटुंबिक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन अशा अनेक पुड्या मुख्यमंत्री सोडून देत असतात. प्रत्यक्षात गोव्यावरली किनारी पर्यटनाची छाया काही विरळ होत नाही आणि त्या पर्यटनातला गुन्हेगारीचा टक्काही उतरत नाही. अमली पदार्थ, देहविक्री ही इथल्या पर्यटनाची व्यवच्छेदक लक्षणे बनली आहेत, हे केवळ सत्ताधारीच नाकारतील. विरोधात बसल्यावरच पर्यटनाची रया गेल्याचा साक्षात्कार होत असतो. नादान राजकारण्यांची पापे पुन्हा पुन्हा माफ करणारी उदार जनता गोव्यात असल्यामुळे असे होते; पर्यटनाचा टिळा लावत स्वैराचार बोकांडी बसतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.