गोळीबाबा

गुढीपाडव्यानंतर येणारा रविवार तर खास त्याच्याच …गोडशाच्या परबेसाठी–उत्सवासाठी राखून ठेवलेला. लोकमानसांच्या मनासारखे घडून आल्यावर गोळीबाबाच्या पेडावर गुढी उभारून त्याच्याविषयीचा श्रद्धाभाव व्यक्त केला जातो.
goa
goaDainik Gomantak

प्रा. पौर्णिमा केरकर

शिशेवटे, सुंगटा, काळुंद्रा, तोकी, बुराटे, करकरो, पेवो, माङोळ्यो

खुबे, खरसाणी, गोबऱ्यो, वागोळे,हुकीर,पालू,भिंगुरली,थिगुर,

धोडयारे, तांबूस, चणाक…. मासे चवीने खाणाऱ्यांच्या जिभेला पाणी सुटावे अशी ही माशांची यादी वाढत जाणारी या वैविध्यपूर्ण माशांची पैदाशी करणारे गाव आणि तिथल्या मानशी याविषयीचे कुतूहल मनामनात दाटून राहिले नाही तर नवलच मानावे लागेल.

शीत आणि माशांची कढी(हुमण)

यावर ताव मारायला मिळाला की या गावातील घराघरात आलेले अतिथी तृप्त होऊन जायचे.किंबहुना मासे खाण्यासाठीच अनेकांची पावले या गावाकडे वळायची. जुवारी मांडवी या जीवनदायिनींचा वेढा या गावाभोवती पडलेला आहे...

या दोन्ही नद्यां गावच्या खाजन शेतीच्या पलीकडील बाणास्तरीच्या खाडीत एकमेकांशी समरस होतात.म्हणून गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले.नदीच्या पल्याड खाजन शेती.तिथपर्यंत जायचे असेल तर नदी ओलांडून केलेल्या प्रवासाशिवाय गत्यंतरच नव्हते.होडीतून प्रवास हा तर रोजच जीवन मरणाचाच संघर्ष होता. गोळीबाबाच्या स्थानाच्या पलीकडे पसरलेली होती ती विस्तीर्ण खाडी.ही खाडी ओलांडून जाण्यासाठी आधार घ्यावा लागायचा तो होडीचाच !होडीत पाऊल टाकण्यापूर्वी …

होडीतुन प्रवास करताना..शेतात पोहोचल्यावर… प्रत्यक्षात कामाला सुरुवात करताना..कष्टकरी जीवांच्या ओठावर सर्वप्रथम नाव यायचे ते गोळीबाबाचेच.काबाडकष्ट करून प्रामाणिकपणे जीवनरथ पुढे नेणाऱ्या या लोकमानसांच्या अथक धडपडीचा मूक साक्षीदार होता..तो म्हणजे गोळीबाबाच!त्यांच्यावरील असीम श्रद्धेतूनच गावाने सर्व संकटांचा सामना केला.खाजन शेती,बागायती, मत्स्यव्यवसाय,होडी व्यवसाय,सण,

उत्सव परंपरा,अध्यात्म, पुराण,तत्वज्ञानाची गुढी उभारली.त्याच्याच कृपादृष्टीमुळे अन्नधान्याची सुबत्ता घरीदारी आली,या कृतज्ञतेच्या भावनेतूनच पाहिले भाताचे कणसं गोळीबाबाला अर्पण करण्याची परंपरा जतन केली गेली.

भात पिकून मुड्या भरून होडीतून घरी आल्यावर तेही प्रथम त्यालाच अर्पण.. गुढीपाडव्यानंतर येणारा रविवार तर खास त्याच्याच …गोडशाच्या परबेसाठी–उत्सवासाठी राखून ठेवलेला. लोकमानसांच्या मनासारखे घडून आल्यावर गोळीबाबाच्या पेडावर गुढी उभारून त्याच्या विषयीचा श्रद्धाभाव व्यक्त केला जातो. खाजनात भरपूर भात पिकायचे…मासे खुप मिळायचे.. धोंगजे, ऑफळा,तावजी,दामडा इत्यादी खाजनात पाऊल टाकण्यापूर्वी…मासे पकडण्यापूर्वी तोच आठवतो… कालही..आजही…

गावात मासे आणि भात दोन्हीची पैदाशी मोठयाप्रमाणात व्हायची.या गावाच्या पल्याड मयेकरांचा वाडा….तिथं त्यांच्या घरी एखादेवेळी नातेवाईक आले तर घरातील थोरली व्यक्ती मानशीकडे जायची.त्या तेथील जागेकाराची आर्त विनवणी करायची माशांसाठी म्हणून गरी घालायची आणि मग काय आश्चर्य अगदी भरभरून मासे मिळायचे.

goa
Goa Education: शैक्षणिक बदल! राज्यात यंदापासून अकरावी, बारावीचे विभाग रद्द

घरी पाहुणे आले की बहुतेक वेळा हे असेच व्हायचे.त्या जागेवर जाऊन फक्त गोळीबाबा पाव रे ‘ असे म्हटले की अगदी चोम्यांनी मासे मिळायचे ….गोळीबाबाच मासे देतो हिच धारणा मनी मानसी वसलेली.

तिसवाडी तालुक्यातील डोंगरी गावचा हा गोळीबाबा.खाजन शेतीचा राखणदार. डोंगरीच्या धाकटे भाटातील देवचार. मात्र त्याची नजर संपूर्ण गावावर.इथल्या खाडी जवळच गोळीबाबाचे अस्तित्व असलेले मोठे पेड आहे.

तेथील गोळीच्या झाडाचा विस्तारात तो मुळापासून शेंड्यापर्यंत सर्वत्र आहे.बुंध्यात, पानापानात….खोडात…फांद्यातून तो भाविक मनाच्या श्रद्धेला ओ देतो.संपूर्ण गावाचे अस्तित्व ज्या खाजन शेतीवर अवलंबून आहे त्या शेताकडे जायची वाट ही गोळीबाबाच्या पेडा जवळूनच जाते.

त्यामुळे जाता येता त्याचे दर्शन घडते.शेतात जाण्याचा हा प्रवास होडीचा.. तसा तो संघर्षाचा..समस्यांचा आणि अंगावर भितीने काटा उभा राहाण्याचा…मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून लोकमनाच्या आयुष्यात असले प्रसंग येता येता ते अगदी यातून सहीसलामत सुटलेले आहेत…हा फक्त चमत्कार नव्हता..तर गोळीबाबावरची ती मनःपूर्वक श्रद्धा होती.जी आजही कायम आहे.

हा ‘खाजनाचा राखणदार’शेतात राबराब राबणाऱ्या कष्टकरी जीवांच्या हाताला भरघोस पीक रुपी यश प्राप्त होण्यासाठी गोळीबाबाची कृपादृष्टी लाभणे गरजेचे.तशी ती गावाला पूर्वापार पासून लाभलेली आहे.

या गावाला अन्नधान्याचा तुटवडा कधी भासलाच नाही.भरभरून पीक घेतले.आसगो ,कोरगुट..सारख्या भाताची पैदाशी.. आणि मानशीचे मासे यांची तृप्ती इथल्या लोकमनाच्या जीवन जाणिवांशी जोडली गेली आहे…या तृप्तीला आशीर्वाद आहे तो गोळीबाबाचा..असे लोकमानस मानीत आलेले आहे.

पोवाड्यावरील देवचार,देटटो देवचार, साखळयो,पोस्तावरील ,सीमेवरचा देवचार ,सावरीवयलो अशा नावांनी या गावाला संरक्षण देणाऱ्या अनाकलनीय शक्तींचा वावर सर्वत्र भरून राहिलेला आहे…तिसवाडी तालुक्यातील हा गाव सांस्कृतिक दृष्ट्या नाते अधोरेखित करतो ते अंतरुज महालाशी.

goa
Goa News : खाजने, अमेरेची पुरापासून मुक्तता : जलस्रोतमंत्री शिरोडकर

धालो,कालो धेंडलो, इंतरुज, सुवारीवादन,अशा असंख्य पारंपरिक सण उत्सवांतून गावचे सांस्कृतिक संचित लोक मनानी अबाधित ठेवलेले आहे ते या लोकदैवतांच्या आश्वासक आशीर्वादांच्या बळावरच..

षष्टी शांतादुर्गा धमे मंडप,बाबरे मंडप,तारी मंडप,देटत्या देवस्थान, सीताराम चंद्र देवस्थान,जगदंबा षष्ठी शांतादुर्गा पूर्वाधिष्ठान देवस्थान, ब्राह्मण, महाविष्णू नागदेवता,सुशेंत सायबिण, इंत्रूज मंडप, या सर्व देवतांचा आशीर्वाद गावाला आहेच… त्यांच्या बळावरच जे काही इथल्या लोकमनाला लाभले ते असिम समाधान देणारे…

असेच आहे.गावाला जाग आहे मांडवी जुवारीच्या अनाहत नादाची..इंत्रूज-सुशेंत सायबिणीच्या फेस्ताच्या धार्मिक सलोख्याची,कृष्णंभट बांदकरांच्या आध्यात्मिक संचिताची, लोकसंस्कृतीच्या परंपरेची…नाटक,भजन,कीर्तन,साहित्यात योगदान देणाऱ्या महान विभूतींची….

शिमगोत्सवात लहानापासून थोरांपर्यंतच्या हातातील ढोलावर पडणारी थाप…घुमटांचा नाद..आणि अंतःकरणपूर्वक त्या अनाकलनीय तत्वासाठी दिलेली साद…रंध्रारंध्रात थरार आणते…

गोळीच्या पानांची सळसळ…होडीतून जीव मुठीत घेऊन खाजनात राबणाऱ्या कष्टकऱ्यांची तळमळ….आजपर्यंत अनुभवली ती त्या विशाल नदीपात्राने…खाजनाने …नानाविध प्रजातीच्या माशांनी… त्याला सोबत होती ती तिथेच अवतीभोवती निवास करणाऱ्या..आत खोलपर्यंत मुळांना पोहचवून आकाशाशी स्पर्धा करू पाहणाऱ्या गोळीबाबाच्या अनाकलनीय अस्तित्वाची…

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com